रत्नागिरीतील नंदकुमार पटवर्धन या उद्योजकाने आपल्या ‘आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी एमआयडीसीत जीवविविधता उद्यान सुरू केले आहे. आणखी 50 वर्षांनी इथे सह्याद्रीतल्या जंगलांसारखंच जीवविविधतेने नटलेलं एक मोठं अभयारण्य तयार झालेलं असेल, याची खात्री हे उद्यान पाहिल्यावर कळते.
शहर म्हटलं की डोळ्यासमोर येतं काँक्रीटचं जंगल. असलीच तर रस्त्याच्या कडेने थोडीफार आकेशियाची वा गुलमोहराची झाडं! रत्नागिरी हे कोकणातलं एक सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेलं शहर. कुठल्याही शहराप्रमाणे गेल्या वीस-पंचवीस वर्षांत रत्नागिरी शहराचाही आडवा-उभा विस्तार होत आलाय आणि अजूनही होतो आहे. शहरं विस्तारताना पहिला बळी जातो तो अर्थातच निसर्गाचा. केवळ रत्नागिरीसारखी शहरंच नव्हे, तर कोकणातली खेडेगावंही नगदी पिकांनी संपृक्त होत आहेत. आणखी 25 वर्षांनी त्या वेळच्या विद्यार्थ्यांना विचारलं की कोकणात कुठली झाडं आढळतात? तर बहुतांश विद्यार्थ्यांचं उत्तर एकच येईल - आंबा, काजू, नारळ आणि सुपारी! एका बाजूला वाढतं शहरीकरण आणि दुसर्या बाजूला फक्त आर्थिक उत्पन्न देणार्या मोजक्याच झाडांची लागवड यामुळे कोकणातली मूळची जंगलं आणि जीवविविधता झपाट्याने नष्ट होत आहे. आर्थिक विकासाच्या या प्रवाहाची ताकद इतकी प्रचंड आहे की त्याला थोपवणं सहज शक्य नाही. आपण सगळेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे या प्रवाहाचा भाग आहोत. तरी, या प्रवाहातून निर्माण होणारा पैसा पुन्हा निसर्गाच्या पुन:स्थापनेसाठी वापरायचे प्रयत्न काही व्यक्ती/संस्था करीत आहेत. असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे रत्नागिरीतले निसर्गप्रेमी उद्योजक नंदकुमार पटवर्धन. त्यांनी स्थापन केलेल्या ‘आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन’च्या माध्यमातून रत्नागिरी एमआयडीसी परिसरात सुमारे साडेसहा एकर परिसरात एक जीवविविधता उद्यान साकारलं जात आहे. नुकताच या उद्यानाला भेट द्यायचा योग आला.
रत्नागिरीत साडेसहा एकर परिसरात जीवविविधता उद्यान उभारणीचा केलेला प्रयोग हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. असे अनेक प्रकल्प अनेक ठिकाणी करता येऊ शकतात. त्यासाठी फक्त जमीन उपलब्ध असायला हवी आणि उपलब्ध जमिनीत बागा किंवा व्यावसायिक लागवड करण्याऐवजी असे जंगलनिर्मितीचे प्रयोग करण्याची इच्छाशक्ती हवी. वनखात्याने त्यांच्या आधिपत्याखाली असलेली जमीन निसर्गासाठी तळमळीने काम करणार्या व्यक्तींना/संस्थांना उपलब्ध करून दिली, तर असे याहीपेक्षा मोठे छान अनेक प्रकल्प करता येऊ शकतात.
- नंदकुमार पटवर्धन
‘श्रीकृष्ण ट्रेडर्स’ या नावाने नंदकुमार पटवर्धन यांचा रत्नागिरीत स्विच गियर सप्लायचा व्यवसाय आहे. पिंडाने उद्योजक असलेले पटवर्धन निसर्ग, लहान मुलं आणि भारतीय शास्त्रीय संगीत या तीन गोष्टींना दैवतासमान मानतात. 2010नंतर व्यवसायातून मिळणारा पैसा हा वैयक्तिक गरजांसाठी न वापरता या तीन गोष्टींसाठी खर्च करायचा, असं त्यांनी ठरवलं. यातूनच 2012 साली सुरू झाली ‘आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन’ ही संस्था. आज रत्नागिरीत आणि आजूबाजूच्या ठिकाणी या संस्थेच्या पुढाकाराने शास्त्रीय संगीत महोत्सव आणि लहान मुलांसाठी विविध प्रबोधनपर आणि मनोरंजनपर उपक्रम केले जातात. निसर्ग हा आपला आश्रयदाता आहे हे ओळखून त्याच्या संरक्षण-संवर्धनासाठी काहीतरी करावं, या तळमळीतून हे जीवविविधता उद्यान आकाराला आलं.
हर्षद तुळपुळे लिखित पुस्तक - गप्पा निर्सगाच्या
बदलते हवामान, बांबू लागवड, जंगल कायदा, गवताळ प्रदेश, गावरान बीजसंवर्धन, गोव्यातील जंगले आणि खाण प्रश्न, पर्यावरणस्नेही कापडनिर्मिती आणि घरबांधणी.
₹225.00
https://www.vivekprakashan.in/books/chat-nature/
2016 साली रत्नागिरी एमआयडीसी परिसरातली सुमारे साडेसहा एकर जमीन आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनने भाडेतत्त्वावर घेतली. हा जमिनीचा भाग आकेशियासारख्या परदेशी वनस्पतींनी व्यापलेला होता. त्याची साफसफाई करून या जागेत दुर्मीळ देशी झाडांची रोपं लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या जीवविविधता उद्यानात आजमितीस सुमारे सव्वादोनशे विविध प्रकारची, विशेषत: कोकण-सह्याद्रीत अलीकडे दुर्मीळ होत चाललेली झाडं बाळसं धरत असलेली पाहायला मिळतात. विविध ठिकाणांहून दुर्मीळ वृक्षांची रोपं आणून इथे त्यांची सुसूत्र पद्धतीने लागवड केली गेली आहे. नुसती लागवडच नव्हे, तर लावलेली झाडं जगवण्यासाठी आवश्यक असलेली चोख व्यवस्थाही केलेली आहे. सीता अशोक, अर्जुन, बेल, कडुनिंब, काटेसावर, कदंब, सुरंगी, शिसव, पळस, बेहेडा, आवळा, सातवीण, कैलासपती, कुसुंब, बकुळ असं वृक्षवैविध्य इथे एकाच ठिकाणी बघायला मिळतं. पत्रावळींसाठी उपयोगी पडणारी रुंद मोठी पानं असलेल्या ‘मुचकुंद’ या झाडाबद्दल खूप वाचलं, ऐकलं होतं. हे मुचकुंदाचं झाड या उद्यानात मी सर्वप्रथम पाहिलं. कोकणात इतरत्र हे झाड सहसा आढळत नाही. शेंद्री, पुत्रंजीवा, नेवरं अशा काही झाडांची नव्याने ओळख झाली. आमच्यासारख्या अनेकांना झाडांची खूप आवड असते, परंतु ती बघितल्याबघितल्या लगेच ओळखण्याएवढी नजर पक्की झालेली नसते. वनस्पतींची ओळख होण्यातली अडचण दूर व्हावी व आपली नजर पक्की व्हावी, यासाठी या उद्यानातल्या प्रत्येक झाडावर नावांच्या ठळक पट्ट्या लावलेल्या आहेत. यामुळे नवख्या माणसाला झाड ओळखणं सोपं होईल. परिसराची निगा राखण्यासाठी पुरेसा वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात. साडेसहा एकराच्या परिसराला सुयोग्य कुंपण करणं, लावलेल्या झाडांना पाण्याची व्यवस्था करणं, वर्षातून एकदा शेणखत, माती असं खाद्य देणं, रान बेणणं, उपलब्ध जागेत नवीन झाडं लावणं या सगळ्यासाठी वर्षाला एक ते सव्वा लाख रुपये खर्च ‘आसमंत’कडून केला जातो. बुलबुल, भारद्वाज, शिंपी, मैना, नीलांग, शिंजीर, कोतवाल, इंडियन रॉबिन असे विविध प्रकारचे पक्षी व सरपटणारे प्राणी या परिसरात नोंदवले गेले आहेत. प्राणी-पक्ष्यांसाठी इथे एक छान तळंही करण्यात आलं आहे. आणखी 50 वर्षांनी इथे सह्याद्रीतल्या जंगलांसारखंच जीवविविधतेने नटलेलं एक मोठं अभयारण्य तयार झालेलं असेल, याची खात्री हे उद्यान पाहिल्यावर पटते.
संयुक्त राष्ट्रांनी 2021 ते 2030 हे दशक ‘परिसर पुनर्निर्मिती’चं दशक (UN Decade on Ecosystem Restoration) म्हणून जाहीर केलं आहे. जिथे जिथे मोकळ्या, पडीक जमिनी आहेत, तिथे तिथे निसर्गाची पुन:स्थापना करण्याचा हा एक जागतिक कार्यक्रम आहे, ज्यात भारतही सहभागी आहे. ‘आसमंत’ने रत्नागिरीत साडेसहा एकरांमध्ये केलेला प्रयोग परिसर पुनर्निर्मितीच्या व्यापक चळवळीसाठी आदर्श नमुना आहे.