तुम न जाने किस जहाँ में खो गये

विवेक मराठी    06-Feb-2022   
Total Views |
गेल्या वर्षी आठवड्यातून चार वेळा पेडर रोडवरून जाणे होत होते. सुरुवातीलाच प्रभुकुंज. महालक्ष्मीला जोडलेला हात, प्रभुकुंज येईपर्यंत जोडलेला राहायचा. लक्ष्मी आणि सरस्वती हाकेच्या अंतरावर रहात असण्याचे हे अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. त्यांना तिथे कधी पाहिले नाही. दिसायच्या त्या बाल्कनीतील बंद काचा पण बस तिथून जात असताना असंख्य गाणी मनात गुंजत राहायची. 'लता' हा संगीताला समानार्थी शब्द असावा एवढ्या त्या संगीताशी एकरूप झाल्या होत्या.

lata

गेली दोन तीन वर्षे त्या आजारीच होत्या. तिथून जाताना मन चर्रर्र होते असे माझा एक मित्र म्हणाला. गेली पंच्याहत्तर वर्षे, कित्येकांचे आयुष्य सुरेल करणारा आवाज नसेल या कल्पनेनेसुद्धा व्याकुळ व्हायला होते ही भावना असंख्याची असणार पण शरीर नश्वर असले तर त्यांचे गाणे अमर आहे.हिंदी सिनेसृष्टीच्या आवाजाला सूरमयी करणारे 'लता मंगेशकर' हे सप्त अक्षरी नाव त्यांनी गाजवलेल्या सात दशकांची सुरेल सरगम आहे. त्यांनी गायलेली हजारो गाणी म्हणजेच त्यांचे अस्तित्व. त्याला वय नाही आणि अंतही नाही.
 
लता मंगेशकर यांच्यावर लिहायला बसले की लक्षात येते की त्यांच्या गीतांना, गायकीला शब्दात बांधणे फार कठीण आहे. असे काय लिहावे जे अजून लिहिले गेले नाही! सर्वच क्षेत्रातील थोरा मोठ्यांनी तिच्यावर विशेषणांची बरसात केली आहे. गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी, मंत्रसिद्धा, स्वरांचे लेणे, गानसरस्वती अशा शीर्षकांखाली विपुल लिहिले गेले आहे. सतत नाविन्याचा ध्यास असणाऱ्या माणसाला गेली सात दशके स्वतःच्या स्वरांनी बांधून ठेवण्याचा चमत्कार करून ती जिवंतपणीच एक आख्यायिका बनली आहे.
लहानग्या लताने सैगल साहेबांचा चण्डिदास हा सिनेमा पहिला. त्यांच्या गायकीने ती भारावून गेली. “मोठी झाल्यावर मी सैगलसाबशीच लग्न करणार," छोट्याश्या लताने आपला निर्णय घेऊन टाकला. नियतीने ऐकले असावे. हिंदी सिनेजगतातील एका प्रेमकहाणीची सुरुवात झाली. लता मंगेशकर आणि हिंदी सिनेसंगीताची चिरकाल टिकणारी प्रेमकहाणी. अतिशय उत्कट नि प्रामाणिक बांधिलकी होती ती. पुढे त्याचे रूपांतर एका अजरामर दंतकथेत झाले. ज्या कथेची मोहिनी रसिकांवर गेली सत्तर वर्षे आहेच नि पुढेही राहील.
 
सात वर्षाच्या लताने वडिलांच्या पं. दीनानाथ मंगेशकर यांच्या नाटकात नारदाची भूमिका केली. अपघात होता तो. ही भूमिका करणारा नट उपस्थित नसल्याने, तिच्या चिमुकल्या खांद्यावर तिने हे ओझे घेतले. “काही काळजी करू नका बाबा, मला हे नक्की जमेल. शेवटी मी तुमची मुलगी आहे." त्या संध्याकाळी टाळ्यांच्या कडकडाटाने रंगभूमी दणाणली. पुढच्या देदीप्यमान भविष्याची ती नांदी होती. हा सांगितिक प्रवास काही सोपा नव्हता. तिच्याबरोबर होती, तिची विनम्रता नि प्रचंड कष्ट घेण्याची तयारी. कोणतेही गीत असो, त्यातील शब्दांना तिने आपल्या सुरांनी जिवंत केले. पूर्णपणे झोकून दिल्याने असेल, त्यातली भावना केवळ नायिकेची न राहता, ऐकणाऱ्या प्रत्येक रसिकांपर्यंत पोचली. प्रसिद्ध गीतकार मजरुह सुलतानपुरी म्हणतात, “असे नाही की आम्ही केवळ लतासाठी उत्कृष्ट गाणी निवडली. तिच्या आवाजाची जादूच अशी की त्या शब्दांना तिने झळाळी दिली."
 
कारकिर्दीच्या सुरुवातीला आवाजाचा पोत पातळ आहे म्हणून लताबाईंना नाकारले. संगीतकार गुलाम हैदर यांनी मात्र हा आवाज ऐकून भविष्य केले, आज तुम्ही हिला नाकारत असाल पण एक दिवस असा येईल की सारी इंडस्ट्री ह्या मुलीच्या पायी लोळण घेईल. त्या नंतर केवळ चार वर्षात हे भविष्य खरे ठरले. लता मंगेशकर हे सप्तसूर साऱ्या भारतभर गुंजले. १९४९ हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्वाचे ठरले. या वर्षात महल हा गूढ,रहस्यमय चित्रपट प्रदर्शित झाला. खेमचंद प्रकाश या संगीत दिग्दर्शकाची "हा आवाज एके दिवशी संपूर्ण देशावर राज्य करेल " ही भविष्यवाणी खरी करणारे गीत होते ते याच चित्रपटात .
 
आयेगा आनेवाला ह्या गीताने दैवी सौन्दर्य असलेल्या मधुबालाला दैवी आवाजाची जोड मिळाली. खरेतर जेव्हा हे गाणे रिलीज झालं, तेव्हा या गीताच्या रेकॉर्ड वर गायिकेचे नाव होते, 'कामिनी'. मधुबालाच्या महल या चित्रपटातली पात्राचे हे नाव . या आवाजाचा शोध सुरू झाला आणि पन्नाशीच्या दशकाच्या सुरुवातीलाच 'लता मंगेशकर' हे नाव भारताच्या घराघरात पोचले. आयेगा आनेवाला ( खेमचंद प्रकाश), उठाये जा उनके सीतम, ( नौशाद ), जिया बेकरार है (शंकर जयकिशन), साजन की गलिया (शाम सुन्दर), घिर घिर के आये बदरिया (विनोद), तुम्हारे बुलाने को जी चाहता है( अनिल विश्वास) हीसर्व गाणी १९४९ या वर्षातली. संगीतकारांसाठी ही मोठी पर्वणी होती. उत्कृष्ट रचना गायला तेवढ्याच ताकदीचा गळा लागतो. त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटले. केवळ लताला डोळ्यासमोर ठेवून चाली लिहिल्या गेल्या नि असंख्य अजरामर गीते जन्माला आली.
 
समीक्षक अशोक रानडे म्हणतात, "लता मंगेशकर यांचे मूळ भांडवल आहे अलभ्य आवाज, अफाट ग्रहणशक्ती आणि
भावुक ते भावात्मक गाण्याची ओढ. चित्रपट गीतांच्या संदर्भात बोलायचे झाले तर, ज्याच्या आवाजाला गीताच्या भावापर्यंत पोचता येते तो गुणी गायक. भावरंग फार विस्तारित संज्ञा आहे. वात्सल्य, प्रेम, शृंगार, वासना, विरह वेदना, भीती , वैराग्य… त्यांच्या गीतात हे सर्व भाव दिसतात. ज्या तऱ्हेने आवाजाच्या लगावातून त्या गीतातील भाव सहज व्यक्त करतात, तेच त्यांच्या यशाचे गुपित आहे.
 
ही श्रद्धांजली लिहिते आहे आणि साथीला लता बाईंचा आवाज आहे. खरेतर त्यांना देण्यासारखे रसिकांकडे काही नाही. इतकी वर्षे यांनीच इतके भरभरून दिले आहे की त्यांच्यातलेच काही त्यांना परत करावे लागेल.
काही अत्यंत आवडीची गाणी आहेत.
 

lata 
धीरे से आजा रे अखियन में ( सी रामचंद्र )
--------------------------------------------------
प्रत्येक मुलासाठी त्याच्या आईचाच आवाज मधुर असतो यात काहीच वाद नाही पण आईच्या आवाजाशी साधर्म्य असलेला आवाज आहे तो आहे लताबाईंचा. सोज्वळ, शांत आणि दैवी. थकलेल्या मनाला उर्मी देण्याचे सामर्थ्य या आवाजात आहे. पावित्र्याचे अस्तर लेवून आलेला हा आवाज आहे.
पहिला स्वर आईचा जरी असला तर एक स्त्री कोणत्याही नात्यात आईची भूमिका सहज निभावू शकते. हृदयात वात्सल्याचा झरा असलेली कोणतीही स्त्री, कोणत्या न कोणत्या प्रसंगी तुम्हाला आईची माया देते.
हे गीत लहान बहिणीने आपल्या मोठ्या भावासाठी गायले आहे. पिलू रागावर आधारित असलेले ही गीत मोठ्यांसाठीसुद्धा झोपेची गोळी आहे .
 
आँखे तो सबकी है एक जैसी, जैसी अमीरों की गरीबो की वैसी
किस्मत के मारो की अखियन में, निंदिया आजा री आजा
साधे सरळ , हृदयाला भिडणारे शब्द. सी रामचंद्र आणि लताबाईंने दिलेले हे सर्वात मधुर गिफ्ट.
 
ओ सजना ( सलील चौधरी)
------------------------------------
तारुण्याची नुकती चाहूल लागलेल्या मुलीचा सखा असतो तो हा पाऊसच. सगळे छान तर चालू आहे, मग ही हुरहूर कसली हा प्रश्न पडला आहे खरा पण त्याचे उत्तर कोणाला विचारणार?
मग येतो मदतीला तो पाऊसच आणि तो त्या स्वप्नांना नुसता आकार नाही तर चेहेरा देतो.
तुमको पुकारे मेरे मनका पपीहरा
मिठी मिठी अगनी में जले मोर जियरा
आणि मग घातलेली आर्त साद "ओ सजना ऽऽ"
विरह सुसह्य करायला पाऊस आहेच की सोबतीला. पावसाची मातीत उठलेली आवर्तने, पानांवरून ओघळणारे जलबिंदू, थरथरणा-या जास्वंदीच्या पाकळ्या, कौलावरून घसरणाऱ्या पागोळ्या, आसमंतात दाटून आलेला काळोख, सलिल चौधरीचे संगीत, झंकारलेली सतार आणि साधनाच्या उत्कटतेला स्वर देणारा लताबाईचा आवाज. साधनाबरोबरच खिडकीच्या गजांमधून बाहेर पडताना किती जणींनी तिचे स्वप्न जगले असेल! सलील चौधरी यांची गाणी गायला अवघड. त्यांनाही ती कल्पना होती
म्हणून त्यांचा पहिला चॉईस नेहेमीच लता मंगेशकर हाच होता.
 
चाँद मध्यम है ( मदन मोहन )
----------------------------------
सारा आसमंत निद्रादेवीच्या कुशीत थकून श्रांत झाला आहे पण झळाळणाऱ्या चंद्रप्रकाशात ती वाट पहात आहे , आपल्या प्रियकराची. त्या वाट पाहण्याला अंत नाही. दूरवर दिसणाऱ्या खोल दरीत लपलेले ढगसुद्धा आता अंधारात दडलेल्या पर्वतांना स्पर्श करत आहेत. किती काळ लोटला आहे त्याची तमा नाही आहे तिला. पण आपले तारुण्य ओसरत असल्याची जाणीव तिला अस्वस्थ करत आहे . प्रेमात पडलेल्या मुलीची साशंकता, अस्वस्थता , एकाकीपणा, वेदना, नैराश्य सारे काही साहिर लुधियानवी यांच्या शब्दात आणि लताजींच्या स्वरात साकळून आले आहे.
 
असे म्हंटले जाते की मदनमोहन यांची गाणी गाताना आधीच मधुर असलेला हा आवाज अजूनही माधुर्य ओतत असे.-त्यांनी एकत्र जे काम केले आहे त्या विषयी ओपी नय्यर यांची टिपणी आहे , “देवाने मदनमोहन यांना लतासाठी आणले की लताला मदन मोहनसाठी हे त्या परमेश्वराला ठाऊक असावे पण त्या दोघांनी जे निर्माण केले आहे ते अत्यंत मौल्यवान आहे.
अल्ला तेरो नाम ( जयदेव )
स्वातंत्र्यानंतर नूरजहाँ पहिल्यांदाच भारतात आली होती. ह्या कार्यक्रमात लता गाणार होती. उत्सवमूर्ती नूरजहाँ असताना, तिथे गाण्यासाठी लताने हे गीत निवडावे हे बरेच काही सांगून जाते. असे तर सुचवायचे नसेल ना, की नूरजहान यांच्या प्रभावाखालून बाहेर पडल्यावर आज त्यांच्या गळ्यातून जितक्या सहजतेने अल्ला बाहेर पडतो, तितक्याच सहजतेने ईश्वर?
युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमात आपल्या सैनिकांचे रक्षण करण्यासाठी ईश्वराला केलेली ही आळवणी आहे.
झाकीर हुसेन बोलून गेले - दीदीचे गाणे ऐकणे म्हणजे देवाच्या अस्तित्वाची प्रचीती घेणे. सात्विकता याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर लता बाईंची भजने लावावीत.
 
“दर्द से मेरा दामन भरलो या अल्ला” जगजीत सिंग यांनी संगीत दिलेली ही गझल. यातील “अल्ला” ही आळवणी ऐका. जगातील दर्द या गीतात सामावला गेला आहे. “जगाची दुख्खे माझ्या झोळीत टाक” असे एक संतच बोलू शकतो ; पण त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी लताबाई आल्या असाव्यात.
 
ऐ दिलरुबा ( सज्जाद )
----------------------
हे पूर्ण गीत वरच्या सुरांत आहे तरी सुद्धा गाणे अतिशय मुलायम आहे. प्रत्येक नोट्स वर जो ताबा आहे त्या बद्दल काय बोलावे ! सज्जाद हुसेन यांची स्वररचना अतिशय गुंतागुंतीची. त्यांच्या पसंतीला येईल असे गाणे म्हणणे हे एक आव्हानच. पुढे तर नायिकेची गाणी लता म्हणणार असेल तरच मी संगीत देईन अशीही एक अट त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असायची ,
सावरे सावरे ( रवीशंकर ) नायक, नायिका अभिनयाने गीताला ओळख देतात का या आवाजांनी त्यांना अमरत्व मिळते हा वादाचा विषय आहे. लताबाईंची जेव्हा मी गाणी ऐकते तेव्हा अनेक गाणी आठवतात की ज्यांना चेहरा नाही. अनुराधा सिनेमातील रविशंकर यांनी संगीतबद्ध केलेले एक गीत आहे.
 
सांवरे सांवरे
काहे मोसे करो जोरा-जोरी बैय्याँ ना मरोड़ो मोरी
दूँगी दूँगी गारी हटो जाओ जी सांवरे सांवरे
 
हे गीत टायटल गीत आहे. सिनेमाची सुरुवात आणि त्यातील नायिकेचा प्रवास या गीताने सुरू होतो. पण त्या गायिकेची तयारी, संगीतात मिसळून गेलेले तिचे व्यक्तिमत्त्व, गाण्यामुळेच तिला मिळालेली ओळख सर्व सर्व ह्या गीतामुळे लक्षात येते. एवढ्या ताकदीने हे गीत गायले आहे, कोणत्याही अभिनयाशिवाय, लक्षात येते की संगीत जर नायिकेच्या आयुष्यातून वजा झाले तर तिच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होईल जी भरून येणे अशक्य. पूर्ण सिनेमाचा गाभा आहे हे गीत. जो गाभा बाईंनी आपल्या आवाजावर तोलला आहे.
 
पंचाहत्तर वर्षाच्या कारकिर्दीत मधुबाला ते माधुरीपर्यंत जवळजवळ सर्वच नायिकांना त्यांनी आवाज दिला. सत्तर एक गायकांबरोबर लता मंगेशकर यांची युगल गीते आहेत. प्रेमाची आतुरता, मादकता, सलज्जता, साशंकता, विरहाची आर्तता, रुसवा, छेडछाड . किती मूड्स, किती रूपे सांगावी ! ही लिस्ट परिपूर्ण नाहीच … पण प्रत्येकाची निवड वेगळी... कारण गाणे एकच असले तरी प्रत्येकाच्या भावविश्वात त्याचे पडलेले प्रतिबिंब वेगळे असते.
 
हिंदी सिनेगीतांचा प्रेक्षकवर्ग भारतभर पसरला आहे. त्याचा आवाका मोठा, त्याचे मार्केट मोठे. यात अतिशय व्यस्त असतानासुद्धा लताबाईंनी मराठी भावगीतांत फार दर्जेदार कामगिरी केली. मोजकीच गाणी त्यांनी गायली असतील पण त्यांच्या दैवी, ईश्वरदत्त सूराने भावगीतात एक क्रांतिकारक पर्व आणले. पं सावळाराम, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे यांच्या स्वररचना त्यांनी श्रोत्यांपर्यंत नेल्या. हे काव्य कठीण, सहजा सहजी गुणगुणता येईल अशा या रचना नाहीत पण त्यांनी असे काही पैलू पाडले की या रचना लोकप्रिय तर झाल्याच पण त्यांच्या स्वरांनी भावगीताचे पूर्वीचे बाळबोध रूप पुसून टाकले.
 
“कुठलाही आवाज लताच्या संस्कारित आवाजाशी बरोबरी करू शकत नाही. तिच्याशी स्पर्धा करणे अशक्य आहे कारण ज्या ज्या व्यक्तीचे संगीतावर प्रेम आहे त्या त्या प्रत्येक व्यक्तीत लताची गुंतवणूक आहे. ज्याच्या हृदयात सुराविषयी प्रेम आहे त्याच्या हृदयात लताला स्थान आहे." दिलीप कुमार यांचे हे उद्गार किती खरे आहेत!
 
हा आवाज सतत बरोबर आहे म्हणून जीवन सुंदर आहे. पुजलेले पाय मातीचे आहेत हे सतत दिसताना कानावर येणारे हे सूर सच्चे आहेत आणि ते ऐकायला तिच्याच काळात जन्माला येणे ही पुण्याई आहे. मागे वळून पाहिले तर लक्षात येते, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या आवाजाने साथ दिली आहे. …
 
आज एक पर्व संपले.
संगीताचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा लता मंगेशकर हे नाव अग्रभागी असेल यात शंका नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रिया प्रभुदेसाई

प्रिया  प्रभुदेसाई

अर्थशास्त्रात पदवीत्तर शिक्षण.... सा. विवेक आणि दिव्य मराठीत दोन वर्षे चित्रपट विषयक सदर. दिवाळी अंक, मासिके यात चित्रपटाविषयक लेखन. सेन्सॉर बोर्डवर ज्युरी म्हणून चार वर्षांसाठी निवड.