पू.डॉ. हेडगेवार व प्रसिद्धी

विवेक मराठी    05-Feb-2022   
Total Views | 195
संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक पू.डॉ. हेडगेवार हे त्यांच्या हयातीत कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहिले. युवकांचे संघटन हेच आपले जीवनध्येय मानून ते कण-कण झिजले. त्यांच्या मृत्यूनंतरही प्राय: जनमानसात त्यांची फारशी प्रसिद्धी झाली नाही. 1988-89 या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात संघकार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक, समाजात त्यांच्यासंबंधी किमान माहिती देण्याचा पुष्कळसा प्रयास केला. विविध पुस्तके व ग्रंथ यांच्या माध्यमातून 1940पासून आजतागायत त्यांचे अधिकृत चरित्र उपलब्ध आहे.

RSS
 
आज हा लेख लिहिण्यास कारण असे घडले - विदर्भातील एका काँग्रेस नेत्याने कारण नसताना डॉ. हेडगेवारांविषयी धादांत असत्य विधान केले. त्यांनी म्हटले की, “डॉ. हेडगेवार अत्यंत भीरू (भेकड) होते. सुभाषचंद्र बोस डॉक्टरांना भेटण्यास आले, तेव्हा इंग्रज सरकारच्या भीतीने आजारीपणाची सबब सांगून त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट टाळली.” वास्तव असे आहे - पू. डॉक्टर त्या वेळी बेशुद्धावस्थेत मृत्यूशी झुंज देत होते. तेव्हा आलेल्या सुभाषचंद्रांनी त्यांचे दुरूनच दर्शन घेतले व ते परत गेले. याविषयी ठोस पुरावे उपलब्ध आहेत.

अशाच एका अन्य स्वयंघोषित पुढार्‍याने “डॉ. हेडगेवार यांनी जंगल सत्याग्रहात कधीही भाग घेतला नव्हता” असे विधान केले. वास्तव असे की, डॉक्टरांनी त्या कारणासाठी एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही भोगली. तुरुंगात सोबत कोण होते त्यांची नावेही उपलब्ध आहेत. नियमानुसार शेवटचे काही आठवडे त्यांना शिक्षेतून कायद्यानुसार काही सूट मिळाली होती. सुटून आल्यावर सरसंघचालक म्हणून त्यांनी पुन्हा दायित्व स्वीकारल्याची तारीखवार नोंद उपलब्ध आहे.

या बातम्या वाचून काही कार्यकर्त्यांनी माझ्याकडे विचारणा केली. अशा धादांत असत्य बोलण्याला आपण प्रतिरोध का करत नाही? सामान्यपणे संघाचे प्रमुख अधिकारी अशा अनिर्बंध बोलण्याची दखलही घेत नाहीत. आपल्या कामानेच व वर्तणुकीने आपण सिद्ध होत असतो! मला दोन प्रसंग आठवतात.

 
काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या एका भाषणात एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने डॉ. हेडगेवारांसंबंधी बोलताना म्हटले की, “त्यांनी जर्मनीत जाऊन हिटलरकडून नाझीवादाचे प्रशिक्षण घेतले होते.” सदर नेत्याशी माझी ओळख होती. मी त्यांना जाऊन भेटलो व सांगितले की, “डॉ. हेडगेवारांनी त्यांच्या आयुष्यात भारताची सरहद्द कधीही ओलांडली नाही. त्यामुळे हिटलरची व त्यांची भेट होण्याचा विषयच उद्भवत नाही.” त्यानंतर त्या नेत्यांनी या विषयाचा कधीही उल्लेख केला नाही.
 
द्वितीय सरसंघचालक पू. श्रीगुरुजी त्यांच्या नित्याच्या प्रवासात रत्नागिरी येथे गेले होते. त्या निमित्ताने एका भुक्कड पुढार्‍याने स्थानिक लंगोटी वृत्तपत्राशी बोलताना श्रीगुरुजींविषयी निरर्गल उद्गार काढले. तथापि त्या वेळचे रत्नागिरीचे काँग्रेस खासदार मोरोपंत जोशी यांनी याविषयी पत्रकाराला ठोस समज दिली. त्यांनी म्हटले, “श्रीगुरुजींच्या जीवनावर शिंतोडे उडविणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे!” तो विषय तेथेच संपला.

तृतीय सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस यांना याविषयी विचारले असता, अशा विधानांची उपेक्षा करावी असा सल्ला देत असत. म्हणून संघाचे कार्यकर्ते कोणताही प्रतिवाद न करता आपल्या कामातूनच स्वत:ला सिद्ध करत असतात.

या निमित्ताने एका रूपक कथेची आठवण होते - जंगलातील पाणवठ्यावर ‘वनराज सिंह’ आणि ‘सुकर (डुक्कर)’ यांची भेट झाली. वनराजाने सुकराला आधी पाणी पिऊ दिले. सुकराच्या डोक्यात हवा गेली. तो सिंहाला म्हणाला, चल माझ्याशी लढाई कर. वनराजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. सुकर चिखलात लोळून, हातपाय झाडून चिखल उडवत ‘जितं मया, जितं मया’ असे ओरडू लागला. वनराज सिंह त्याच्याकडे उपेक्षेने पाहत म्हणाला,
‘गच्छ भद्र सुकरं ते। बुहि सिंहो जितं मया॥
 
पंडिता: एवं जानाति। कस्य बलं श्रेष्ठत्व च।’
- ‘हे सुकरा (डुकरा), तुझे कल्याण असो. तू सगळ्यांना जरूर ओरडून सांग की, मी सिंहाला हरवले. परंतु सर्व ज्ञानी जनांना सिंह आणि सुकर (डुक्कर) यामध्ये कोण श्रेष्ठ आहे हे ठीक माहीत आहे!’

लेख
अव्यवसायिक खगोलअभ्यासकांसाठी संधी

अव्यवसायिक खगोलअभ्यासकांसाठी संधी

खगोलशास्त्राची आवड असलेल्या प्रत्येकानी विशेषतः तरुणांनी अमॅच्युअर ऍस्ट्रोनॉमेर्स विद्या आत्मसात करून, त्याचा अभ्यास करून भारताचं प्रतिनिधित्व करणारी अनेक निरीक्षणं घेऊन ती जगभरात कार्यरत असलेल्या संस्थांना पाठवली पाहिजेत. खगोलशास्त्रातील महत्त्वपूर्ण शोध लावण्यासाठी, अवकाश तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अनेक तरुण खगोलशास्त्राकडे व्यवसाय म्हणून जसे बघत आहेत त्याचप्रकारे ज्यांनी हा मार्ग व्यवसाय म्हणून निवडला नाही त्यांना जगभरातील अनेक ठिकाणांहून येणार्‍या अशा निरीक्षणांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी निरीक्..