भारताचा डिजिटल स्ट्राइक

विवेक मराठी    03-Feb-2022   
Total Views |
प्रत्यक्ष युद्धामध्ये भारताला पराभूत करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानने भारताविरुद्ध ‘छद्म युद्ध’ (प्रॉक्सी वॉर) पुकारले आहे. या छुप्या युद्धाचाच एक भाग म्हणून पाकने सायबर युद्धाचा पर्याय अवलंबला आहे. यूट्यूबसारख्या ऑनलाइन माध्यमावर चॅनल्स तयार करून त्यावरून भारताची यथेच्छ बदनामी करणारे, इथल्या लोकभावना प्रक्षुब्ध करणारे, भारतातील अल्पसंख्याकांची डोकी भडकावणारे व्हिडिओ प्रसारित केले जात होते. अलीकडेच भारताने अशा 35 चॅनल्सवर बंदी घातली असून संपूर्ण जगभरात ते आता दाखवले जाणार नाहीयेत. भारताचा हा डिजिटल स्ट्राइक स्वागतार्ह असला, तरी या सायबर युद्धातला मुख्य खेळाडू चीन आहे, हे लक्षात ठेवावे लागेल.

1

पाकिस्तानने भारताविरुद्ध सुरू केलेल्या सायबर युद्धामध्ये भारताने डिजिटल स्ट्राइक करत पाकिस्तानला एक मोठा दणका दिला आहे. याअंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत 35 यूट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे. ही सर्व चॅनल्स पाकिस्तानमधून ऑपरेट केली जात होती. ‘नया पाकिस्तान’ या अम्ब्रेला ग्रूपअंतर्गत ही चॅनल्स चालवली जात होती. विशेष म्हणजे, या चॅनल्सवर केवळ भारतातच बंदी घालण्यात आलेली नसून संपूर्ण जगभरात ही बंदी घातली गेली आहे. त्यामुळेच या सायबर युद्धामधील भारताच्या या यशाचे महत्त्व वेगळे आहे. सामान्यत:, यूट्यूबसारख्या सामाजिक माध्यमांवरून प्रदर्शित केल्या जाणार्‍या चॅनल्स, व्हिडिओंसंदर्भात जर काही तक्रारी, हरकती, आक्षेप घेतले गेले, तर त्याची दखल घेऊन आणि शहानिशा करून यूट्यूबकडून ज्या क्षेत्रांमधून तक्रारी आल्या आहेत, त्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांपुरती बंदी घातली जाते. परंतु या वेळी परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. या 35 चॅनल्सविषयी भारताकडून तक्रारी जाऊनही त्यांच्यावर सर्वदूर बंदी घातली गेली आहे.
 
या यूट्यूब चॅनल्सचे सबस्क्रायबर्स पाहिल्यास तो आकडा 35 लाख इतका आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या चॅनल्सवर भारताची बदनामी करणार्‍या व्हिडिओंच्या व्ह्यूजचा आकडा 130 कोटींच्या आसपास होता. यावरून या चॅनल्सचा पसारा आणि व्यापकता किती प्रचंड मोठी होती, हे लक्षात येते. भारताला बदनाम करण्यासाठी किती मोठे षड्यंत्र रचले जात होते आणि त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत होता, याचीही प्रचिती येते. त्यामुळेच भारताने उशिरा का होईना, पण डिजिटल स्ट्राइक करत हे षड्यंत्र मोडीत काढले आहे. अशा प्रकारचा डिजिटल स्ट्राइक भारताने प्रथम केलेला नाही. डिसेंबर 2021मध्ये भारताने अशाच प्रकारच्या 20 यूट्यूब चॅनल्सवर जगभरात बंदी आणली होती.
 
आता कुतूहलादाखल अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे की, या चॅनल्सवर नेमके काय दाखवले जायचे? त्यावर कोणती माहिती दिली जायची? या चॅनल्सवरून भारताविषयीची धादांत खोटी माहिती पसरवली जात होती. नुकत्याच बंद करण्यात आलेल्या 35 चॅनल्समध्ये भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या अलीकडेच झालेल्या दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातास भारतच जबाबदार आहे, जनरल रावत यांची कन्या इस्लाम धर्म स्वीकारणार आहे, भारतात जातीय तेढ कशी निर्माण केली जाऊ शकते अशा दिशाभूल करणार्‍या, इथल्या शासन-प्रशासन यंत्रणेविरुद्ध जनभावनांना चिथावणी देणार्‍या व्हिडिओंचा समावेश होता. त्याचप्रमाणे काश्मीरसंदर्भातील अत्यंत स्फोटक व्हिडिओही त्यामध्ये होते. तसेच भारतीय लष्कराला बदनाम करणारे व्हिडिओ यामध्ये मोठ्या प्रमाणावर होते. उत्तर कोरियाचे लष्कर भारतात येणार आहे अशी अप्रस्तुत आणि असंबद्ध माहिती देणार्‍या व्हिडिओंचाही त्यात समावेश होता. विशेष म्हणजे, भारतातील अल्पसंख्याक समाजामध्ये काश्मीरच्या प्रश्नावरून चीड निर्माण करणारे, इथल्या लष्कराविषयी संताप निर्माण करणारे व्हिडिओ त्यामध्ये अधिक प्रमाणावर होते. भारताच्या परराष्ट्र धोरणावर कडाडून टीका आणि खोटी माहितीही या चॅनल्सच्या माध्यमातून पसरवली जात होती. कृषी कायद्यांवरून भारतात प्रदीर्घ काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरून हाताळले जात आहे, अशी माहितीही यातून दिली जात होती. थोडक्यात, या सर्वांमागचा हेतू एकच होता, तो म्हणजे जनतेत कमालीचा असंतोष पसरवणे! भारतात सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका होत असून ती वेळ साधून हे व्हिडिओ अधिक प्रमाणावर व्हायरल केले जात होते.
 
पाकिस्तानकडून असे प्रकार घडणे हे नवेही नाही आणि अनपेक्षितही नाही. प्रत्यक्ष युद्धामध्ये भारताला पराभूत करणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानने भारताविरुद्ध ‘छद्म युद्ध’ (प्रॉक्सी वॉर) पुकारले आहे. या छुप्या युद्धाचाच एक भाग म्हणून या सायबर युद्धाकडे पाहावे लागेल. अलीकडील काळात, विशेषत: 2014नंतर एलओसीवर म्हणजेच भारत-पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताने गस्त वाढवली आहे. त्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना भारतात घुसणे आणि इथे दहशतवादी हिंसाचार घडवून आणणे अवघड होऊन बसले आहे. दुसरीकडे, भारताचा आर्थिक विकास वेगाने होत आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत चालला आहे आणि आज भारत हा विभागीय महासत्ता म्हणून पुढे येत आहे. भारत अनेक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांचा सदस्य बनतो आहे. त्यापुढे जाऊन यातील अनेक संघटनांचा अजेंडा भारत ठरवू लागला आहे. अमेरिका, रशिया, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आदी पाश्चिमात्य देशांबरोबरच इस्लामी देशांशीही भारताचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित होत आहेत. भारताची ही घोडदौड पाकिस्तानला खुपते आहे. कारण भारताच्या विरुद्ध दिशेने पाकिस्तानचा प्रवास सुरू आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे. अशा स्थितीत जगाला आरोग्यसेवा देणारा पुरवठादार म्हणून भारताचा उदय होत आहे. कोरोना काळात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, मास्क, पीपीई किट्स भारताकडून पुरवले गेले. कोरोना प्रतिबंधक 7.5 कोटी लसी भारताकडून गरीब आणि विकसनशील देशांना पुरवल्या गेल्या. तथापि, पाकिस्तान मात्र फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये आहे. कोणतीही परकी गुंतवणूक पाकिस्तानात येत नाहीये. भिकेकंगाल झालेल्या पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यास कोणी तयार नाहीये. तेथे महागाईने उच्चांक गाठला आहे. टोमॅटोचे दर 200 रुपयांपुढे गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी तेथे सोन्याचा दर 1 लाख रुपये प्रतितोळ्यापर्यंत गेला होता. आपल्या या सर्व दयनीय, शोचनीय आणि रसातळाला गेलेल्या अवस्थेत भारताची प्रगती पाहून पाकिस्तानचा जळफळाट होत असून तोच या सर्व चॅनल्सवरील व्हिडिओमधून प्रतिबिंबित होताना दिसून येत आहे. भारताशी दोन हात करण्याची क्षमता पाकिस्तानकडे नसल्याने छुप्या मार्गांनी भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न हा देश करत आहे.



1
 
सायबर युद्धातील मुख्य खेळाडू चीनच
 
अर्थात यामध्ये पाकिस्तान एकटाच आहे असे नाही. या सायबर युद्धातील मुख्य खेळाडू चीन आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. चीनने जगभरातल्या प्रसारमाध्यमांत फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकी केलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाची माहिती उघड झाली होती की, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल यांसारख्या अमेरिकेतील वर्तमानपत्रांना चीनकडून जाहिरातींच्या माध्यमातून किंवा अन्य मार्गांनी भरघोस आर्थिक मदत दिली जात होती. तसेच काही युरोपीय प्रसारमाध्यमांतही चीनने मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्याआधारे चीन भारतविरोधी बातम्या जाणीवपूर्वक छापून आणण्याचा प्रयत्न करत आहे. न्यूयॉर्क टाइम्ससारख्या वर्तमानपत्राला तर चीनने जणू भारताची बदनामी करण्याची सुपारी दिली आहे की काय अशी शंका येते. याच न्यूयॉर्क टाइम्सने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान भारताची प्रतिमा मलीन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज कोरोनाचे जगातील सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत सापडत आहेत, त्याचप्रमाणे अमेरिकेत कोरोनाचा मृत्युदरही जास्त आहे. असे असताना अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्ये आजही डेल्टा प्लसचा भारतात कसा प्रसार झाला, भारत सरकार कोरोना नियंत्रणात कसे अपयशी ठरते आहे हे सांगणारे लेख प्रसिद्ध होताहेत आणि हे सर्व चीनपुरस्कृत आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तानवर जसा डिजिटल स्ट्राइक केला आहे, तशीच उपाययोजना चीनविरोधीही करावी लागणार आहे. कारण चीन अशा प्रकारच्या सायबर युद्धनीतीमध्ये अत्यंत माहीर आहे. चीनकडून त्यांच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवणारे आणि भारताला कमी लेखणारे, तसेच भारताचे भूभाग आपल्या हद्दीत समाविष्ट करणारे अनेक व्हिडिओ-छायाचित्रे, नकाशे प्रसारित केले जात असतात. त्यामुळे भारताला याबाबतही काहीतरी पाऊल उचलावे लागणार आहे.
 
एक गोष्ट निश्चित आहे की, ताज्या डिजिटल स्ट्राइकमधून भारताचा वाढता प्रभाव दिसून आला आहे. गूगल, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब यांसारख्या माध्यमांमधून अनेक देशांच्या बदनामीचे व्हिडिओ, छायाचित्रे, माहिती प्रसारित होत असते. त्या सर्वांवर सर्व ठिकाणी बंदी घातली जातेच असे नाही. पण भारताने ज्या ज्या वेळी या कंपन्यांकडे आक्षेप नोंदवले आहेत, त्या त्या वेळी या कंपन्यांनी तो कंटेंट काढून टाकण्याचे सौजन्य दाखवले आहे. यातून भारताचा प्रभाव लक्षात येतो. पण तरीही भारताने गाफिल राहून चालणार नाही. कारण अशा प्रकारच्या ग्लोबल प्रपोगोंडाचा परिणाम देशात येणार्‍या आर्थिक गुंतवणुकीवर होत असतो. त्यामुळे अशा बदनामीकारक, खोट्या, दिशाभूल करणार्‍या कंटेंटला वेळीच चाप लावण्याबाबत यापुढील काळातही दक्ष राहावे लागेल.
 
लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक