विकेंड पर्यटन आणि वसई किल्ला

विवेक मराठी    25-Feb-2022   
Total Views |
पर्यटनाने माणूस समृद्ध होतो. त्यातही जर त्या स्थळाचा इतिहास जाणून घेतला, तर माणसाच्या मुळात असलेल्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळते आणि म्हणूनच वारसा स्थळे ही पर्यटन क्षेत्रातील बलस्थाने आहेत.


prayatan

 किल्ला संपूर्ण पाहायचा असल्यास एक दिवस पूर्ण खर्च होतो. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले वसई म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने एक पर्वणीच आहे. वसईला असलेला फार मोठा सांस्कृतिक वारसा आणि अनेक राजवटींच्या अनेक कहाण्या आपल्या पोटात दडवून वसईचा किल्ला आजही लोकलमधून जाणार्‍या प्रवाशांना हिरवी साद घालत असतो. एकदिवसीय पर्यटनासाठी वसई किल्ला व त्याच्या आजूबाजूची ठिकाणे फार रम्य आहेत.
 
वसई किल्ल्यात काय काय पाहाल?
 
हा भुईकोट किल्ला 108 एकर परिसरात वसलेला आहे. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दुर्ग अभ्यासक श्रीदत्त राऊत यांची ‘किल्ले वसई मोहीम’ असते. सकाळी 8 वाजल्यापासून चिमाजी आप्पा स्मारकापासून वसई किल्ला दर्शनाला सुरुवात करतात. किल्ल्याविषयी सर्वांना माहिती व्हावी हा उद्देश असल्याने ही मोहीम पूर्णत: विनामूल्य व अभ्यासपूर्ण असते. किल्ल्यात एकूण 7 चर्च आहेत व आप्पांनी नवसाला बांधून घेतलेले वज्रेश्वरीचे मंदिर आहे. सागरी दरवाजाजवळचा बुरूज प्रशस्त आहे. तेथून खाडीचे संपूर्ण पात्र, तसेच उत्तनचा किनारी भाग व पुढे गोराईमधला पॅगोडा सहज दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्याद्रीतील कामण दुर्ग, टकमकचा किल्ला, चिंचोटी धबधबासुद्धा दिसतो. तटबंदीवरून चालत गेल्यास पुढे चर्च, चक्री जिना आणि त्यापुढे बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यात दगडी बांधणीची एक पुष्करणी आहे. तिथेच तुटका मनोरा आहे. प्रशस्त मैदान आहे. तेथून बाहेर पडल्यावर साखर कारखाना आहे. वज्रेश्वरीसमोर शंकराचे देऊळ आहे. देवळासमोरचे तळे आज वापरात नसले, तरीही जागोजागी असलेल्या या तळ्यांमुळे किल्ल्यात हिरवाई आहे.
 
किल्ल्याचा इतिहास
 
दोन बाजूंनी समुद्र, एका बाजूने खाडी आणि एक बाजूने जमीन असलेला हा भुईकोट किल्ला अनेक वर्षे इतिहास जपत उभा आहे. कित्येक प्रमाणात पडझड झालेला, काही भागात पुनर्बांधणी केलेला, भाइंदर खाडीच्या कुशीत हिरवी संपदा सांभाळून शौर्याच्या, बेइमानीच्या, स्वार्थाच्या, परोपकाराच्या, जुलमाच्या, आपलेपणाच्या, विजयाच्या आणि त्याचबरोबर दु:खाच्या कहाण्या घेऊन आपल्याच अस्तित्वासाठी आणि गौरवशाली इतिहासासाठी समाजाशी लढा देत आहे. गुजरातचा सुलतान बहादुरशाह, पोर्तुगीज, मराठे आणि नंतर ब्रिटिश इतक्या राजवटी इथे होऊन गेल्या आणि म्हणूनच हा किल्ला इथल्या स्थानिक ख्रिस्ती आणि हिंदू बांधवांना एकत्र सांधून ठेवणारा दुवा आहे.
 
साधारण 1414च्या दरम्यान क्षत्रिय नाथोजी सिंदा भंडारी भोंगळे यांनी 4 बुरुजांची एक गढी बांधली. 1530मध्ये गुजरातचा सुलतान बहादुरशहा याचे या प्रदेशावर आक्रमण झाले व त्याने भंडारी भोंगळेंकडून गढी घेतली. 1534मध्ये दमण प्रांतात उतरलेल्या फिरंग्यांना (पोर्तुगीजांना) सुलतानाने हीच गढी देऊ केली. तेव्हापासून परकीयांचा वावर वसईत सुरू झाला. पुढल्याच वर्षी नुन्हो दकुन्हा यांच्या सांगण्यावरून पहिले कॅप्टन गार्सिया डिसा यांनी बालेकिल्ल्याच्या बांधणीला सुरुवात केली. दरम्यान बहादुरशहा दमण येथे गेला असता या पोर्तुगीजांनी किल्ल्यावर गुप्तपणे 16 तोफा आणल्या व आपले बस्तान बसवले. याच किल्ल्यावरून फिरंगी वसईवर राज्य करू लागले. मुळातच व्यापार व धर्मप्रसार यासाठी आलेले फिरंगी आपले काम चोख बजावू लागले. वसईतील बर्‍याच कुटुंबांना ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागला किंवा त्यांनी तो स्वेच्छेने स्वीकारला, ह्याबाबत अजूनही बरेच वाद आहेत. इथल्या गरीब जनतेच्या गरजा लक्षात घेऊन, काही वेळा आमिष दाखवून, कधी जोरजबरदस्तीने तर कधी खरेच ख्रिस्ती धर्मातील प्रेमाचा मार्ग दाखवणार्‍या निरपेक्ष भक्तीमुळे भारावून जाऊन स्वेच्छेने कित्येकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. वसई किल्ल्याने हा असा आणि बराचसा अज्ञात इतिहास आपल्याकडेच सुरक्षित ठेवला.
 
या सार्‍या गदरोळानंतर पुण्याहून वसईची मोहीम चिमाजी आप्पा यांच्या नावे आखली गेली व अनेक परिश्रमान्ती मराठ्यांना यश आले. शके 1661 म्हणजेच दिनांक 12 मे 1739मध्ये रामचंद्र हरीने वसई किल्ल्यावर मराठ्यांचे निशाण फडकवले. मे 1739मध्ये विजय मिळवला व 25 ऑक्टोबर 1802 रोजी होळकर आणि शिंदे पेशवे युद्ध होऊन 31 डिसेंबर 1802 रोजी इंग्रजांची मदत घेतली. हाच तो वसईचा कुप्रसिद्ध तह. त्यानंतर पेशवे सत्ता संपुष्टात आली.
 

vasai 
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा आहे, तो थेट सागरी दरवाजाजवळ जाऊन मिळतो. तिथेच एक छोटीशी जेट्टी आहे, जिथून स्थानिक कोळी बांधव आपले मचवे घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात. सागरी दरवाजातून आत शिरले की एक छोटे मंदिर आणि पडझड झालेले ख्रिस्तमंदिर. त्या ख्रिस्तमंदिराजवळच चक्री जिना आहे. वर चढून गेलो की सुशेगात पसरलेले खाडीचे पात्र आणि त्या चमचमत्या पाण्यावर वार्‍याच्या आधाराने टिकाव धरू पाहणार्‍या लहान-लहान होड्या. केवढ्यातरी. पहाटे गेलात तर तास-तास उठणार नाहीत आणि संध्याकाळी गेलात तर डोळे मिटवणार नाहीत. खाली उतरल्यावर दुसर्‍या बाजूस एक बाप्तिस्मा कुंड आहे. लहानांच्या डोक्यावरून पवित्र पाणी ओतून त्यांना इथेच बाप्तिस्मा देत. तिथले छताचे कोरीवकाम खूप सुंदर आहे. नीट निरीक्षण केल्यावर त्याची विलोभनीयता वेड लावते. सरळ पुढे चालत गेलो की येतो बालेकिल्ला. 20 जानेवारी 1535 रोजी अंटोनियो गॅलवाह यांच्या हस्ते बालेकिल्ल्याच्या उभारणीला सुरुवात झाली होती. हा बालेकिल्ला संत सेबास्टियन यांच्या नावाने ओळखला जातो. एका बाजूने वळून गेल्यास थोडे पाणी आणि त्या पलीकडे वज्रेश्वरी मातेचे मंदिर आहे. दक्षिण तटबंदीजवळ एक भुयारी मार्ग आहे. हे भुयार साधारण 553 फूट लांबीचे आहे आणि त्याच्या एका टोकापासून शेवटाला निघेपर्यंत 15 मिनिटे सहज जातात. आतून जाताना काही ठिकाणी अक्षरश: झोपून सरपटत पुढे जावे लागते. हातात टॉर्च आणि काठी असावीच. आत वटवाघूळ राज्य बिनदिक्कत चालू असते, आपल्या मध्येच झालेल्या कुरबुरीमुळे त्यांच्या आतल्या आत येरझार्‍या सुरू होतात. इथे श्वास घ्यायला त्रास होऊ नये म्हणून बुरुजावरून थेट झरोके तिरपे आत सोडलेले आहेत. त्यातून प्रकाश मात्र येत नाही. भुयार जिथे संपते, तिथे कॅप्टन हाउसचा छुपा दरवाजा आहे. किल्ल्याचे हे रूप प्रत्येक ऋतूत बदलते, पावसाळ्यात तर काळ्या दगडावरची हिरवीकंच झाडांची दाटी फार सुंदर वाटते.
 
किल्ला परिसरातील इतर ऐतिहासिक ठिकाणे
 
इतिहासाच्या दृष्टीकोनातून वसईला फार महत्त्व आहे. आज भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सात बेटांचा समावेश एकेकाळी वसईच्या उपनगरांत होत असे. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी पोर्तुगीजांनी 402 वर्षे भारताच्या किनारी भागांत राज्य केले. त्यापूर्वी मौर्य, चालुक्य, सातवाहन या राज्यांच्या खाणाखुणा वसईतील नालासोपारा भागात पाहायला मिळतात. इथेच एक बौद्ध स्तूप आहे. त्याची दुरवस्था झाली असली, तरी आता पुरातत्त्व विभागाने त्याचा जीर्णोद्धार करावयास घेतला आहे. हा स्तूप जमिनीत गाडला गेलेला होता. 1882 साली उत्खननात तो सापडला. त्याचे वय साधारण 2 हजार 561 वर्षे इतके आहे. या स्तुपात 14 शिलालेख कोरलेले होते. निर्मळ येथे आद्यशंकरचार्यांचे मंदिर आहे. पोर्तुगीजांनी धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात घेण्यासाठी ते आले होते, असे म्हटले जाते. निर्मळ हे तलावांचे गाव म्हणूनसुद्धा ओळखले जाते. इथेच एक टेकडी आहे, जिथे पूर्वी वज्रगड नावाचा किल्ला होता. काळाच्या ओघात सर्व अवशेष नष्ट झाले, मात्र दत्ताचे एक देऊळ तेवढे डोंगरावर अजूनही आहे. वरून वसईचा संपूर्ण परिसर दिसतो. मागच्या सह्याद्रीतून उल्हास नदी जिथून येते व समुद्राला मिळते, तिथून या टेकडीवरून पूर्ण समुद्र दिसतो.

vasai 
 
वसईत येऊन काय खरेदी कराल?
 
पश्चिमेला सुंदर समुद्रकिनारे, पूर्वेकडे उभा सह्याद्री आणि दोन बाजूंना उल्हास आणि वैतरणा नदीच्या खाड्या, मधून वाहणारी तानसा यामुळे वसईची जमीन सुपीक. हिरव्या भाज्या, फळझाडे मुबलक. तसेच समुद्रकिनारे असल्याने मासेही भरपूर व माफक दरात बाजारात उपलब्ध असतात. वसईची केळी प्रसिद्ध आहेत. केळ्यांपासून सुकामेवा बनवण्याचा प्रयोग वसईजवळील आगाशी गावात झाला होता, तेव्हापासून या भागात सुकेळी मिळतात. राजेळीच्या केळ्यांपासूनच सुकेळी बनवता येतात. त्याचबरोबर चिकू, फणस, आंबे ही फळे ऋतूनुसार उपलब्ध होतात. वसईत भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. लालसर रंगाचे रात्याचे तांदूळ, तसेच कोलम आणि आंबेमोहोर असे काही प्रकार मोठ्या प्रमाणात विकत घेतल्यास शेतकरी फारच कमी दरात उपलब्ध करून देतात. त्याजोडीला पालेभाज्या, फळभाज्या आहेतच.
 
एकदिवसीय पर्यटनासाठी वसईचा किल्ला चांगला पर्याय आहे. वसई रेल्वे स्थानकापासून खासगी रिक्षा सहज उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे वसई विरार महानगरपालिकेने बसेसची सुविधासुद्धा केली आहे. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम, सभोवतालची प्रेक्षणीय स्थळेही पाहता येतात. किल्ल्यात दुकाने किंवा ठेले नाहीत, त्यामुळे खाऊचे पुडे सोबत नेलेले केव्हाही चांगलेच. पाणी मात्र जेट्टीजवळच्या दुकानात मिळू शकेल. घरी परतताना तुमचे हात रिकामे राहणारच नाहीत. किल्ल्यातल्या छोट्या बंदरावर आलेले ताजे मासे, किल्ला बंदर गावात मिळणारे खारवलेले सुके मासे, हिरव्या रसरशीत ताज्या भाज्या, चिकू, केळी, जाम ही फळे आणि त्याचबरोबर रानमेवासुद्धा! वसई मोहात पाडते. एकदा तरी भेट द्यावीच असे हे गाव मुंबईपासून इतके जवळ अजूनही आपली संस्कृती जपून आहे, याचेच आश्चर्य वाटते.

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.