एक स्वागतार्ह घटना

विवेक मराठी    29-Dec-2022   
Total Views |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाज संघटित करण्यासाठी काम करतो. आज संघविचार देशाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे अनेक गोष्टींचा जाब संघाला विचारला जातो, तसेच ज्या गोष्टीशी संघाचा संबंध नाही, अशा गोष्टीचे खापरही संघाच्या माथी फोडले जाते. नाताळच्या पार्श्वभूमीवर संघाने ख्रिश्चन धर्मातील महत्त्वाच्या व्यक्तींचे एकत्रीकरण केले, काश्मीरपासून केरळपर्यंत अनेक राज्यांतील ख्रिश्चन या एकत्रीकरणात सहभागी झाले अशी बातमी माध्यमातून आली आणि अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. संघ ख्रिश्चनांचे लांगूलचालन करू लागला इथपासून ते केरळमधील अठरा टक्के खिश्चन मतांचा भाजपाला फायदा होईल इथपर्यंत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. या पार्श्वभूमीवर संघाची नक्की भूमिका काय?

vivek
नुकताच ख्रिश्चन बांधवांचा नाताळ साजरा झाला. नाताळनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दिल्ली येथील मेघालय भवनात देशभरातील विविध क्षेत्रांतील ख्रिश्चन मान्यवर उपस्थित होते. विविध चर्चमधील, संस्थांतील आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या एकत्रीकरणात सहभागी झाले होते. संघप्रचारक मा. इंद्रेशकुमारजीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आयोजकांनी त्यांना निमंत्रण दिले आणि इंद्रेशजी त्या कार्यक्रमात सहभागी झाले, या एका गोष्टीवरून माध्यमातून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी म्हटले की संघ आता ख्रिश्चन धर्माचे लांगूलचालन करू लागला आहे, त्यासाठी संघाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.. संघाला ईशान्य भारतात आपले हातपाय पसरायला संधी उपलब्ध व्हावी, म्हणून संघ ख्रिश्चनांना जवळ करत आहे.. केरळमधील अठरा टक्के ख्रिश्चन मतांचा भाजपाला फायदा व्हावा यासाठी संघाने हे पाऊल उचलले आहे.. असे अनेक तर्कवितर्क लढवले गेले. वृत्तपत्रांतून, दूरचित्रवाणीवर, सोशल मीडियावर या विषयावर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन धर्मीय बांधव आणि संघ यांचे संबंध कसे आहेत? संघाची ख्रिश्चनांविषयी काय भूमिका आहे? संघविचार आणि ख्रिश्चन धर्मीय यांच्यातील संवादाचा फायदा नक्की कोणाला होईल? असे अनेक प्रश्न निर्माण करून सामाजिक संभ्रम निर्माण करण्यात माध्यमे पुढाकार घेत आहेत. मात्र वास्तव काय आहे? हे समजून घेतले पाहिजे.
 
 
 
ज्या कार्यक्रमामुळे अशी चर्चा सुरू झाली आहे, तो कार्यक्रम ख्रिश्चन बांधवांनी आयोजित केला होता. या आयोजनासाठी संघाला प्रयत्न करण्याची आवश्यकता नव्हती किंवा संघ इतिहासात अशा प्रकारच्या कोणत्याही आयोजनाची नोंद नाही. मात्र संघ संवाद करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो आणि म्हणून ख्रिश्चन बांधवांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून मा. इंद्रेशजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. अर्थात ही पहिलीच घटना आहे असे म्हणता येणार नाही. आणीबाणीनंतर अनेक वेळा ख्रिश्चन बांधवांनी संवाद साधला आहे. ख्रिश्चन बांधवांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून श्रीपती शास्त्री अशा कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी त्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ख्रिश्चनांविषयी भूमिका काय आहे या विषयावर भाषण केले होते, त्यांची पुस्तिका प्रकाशित झाली आहे. पू. बाळासाहेब देवरस सरसंघचालक असताना संघाकडून अशा संवादावर भर दिला गेला. आजही अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, संघाचे अधिकारी शक्य असेल तेथे ही संवाद प्रक्रिया अधिक दृढ करत असतात. सामाजिक विषयांवर चर्चा करतात. विविध विषयांवर संघाची भूमिका काय आहे, हे समजावण्याचा प्रयत्न करतात. याच प्रक्रियेचा भाग म्हणून मा. इंद्रेशजी दिल्लीतील नाताळच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र संघाची भूमिका काय आहे? हे समजून न घेताच माध्यमे व्यक्त झाली, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
 
 
 
संघ हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी काम करतो.हे संघाचा जीवनोद्देश आहे. याचा अर्थ असा नाही की संघ मुस्लीम व ख्रिश्चन बांधवांच्या विरोधात आहे. सा. विवेकच्या आगामी ‘हिंदुत्व’ ग्रंथासाठी मुलाखत घेताना पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना प्रश्न विचारला होता, “मुस्लीम व ख्रिश्चन समाजाविषयी संघाची भूमिका काय आहे? संघ मुस्लीम ख्रिश्चन यांच्या विरोधात आहे अशी मांडणी केली जाते, याबाबत संघाची भूमिका काय आहे?” तेव्हा मा. मोहनजींनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे आहे - मोहनजी म्हणाले, “संघ उत्तर द्यायच्या भानगडीत फारसा पडत नाही. कारण ज्याच्या मनात भ्रम असतील, त्यांनी ते स्वत: स्पष्ट करून घेतले पाहिजे. माझ्या मनात जर एखादा भ्रम असेल, तर त्यामुळे त्यामुळे जे काही नुकसान होणार असेल, ते माझेच होईल. ज्याच्या मनात भ्रम नाही, त्याचे काहीच नुकसान होणार नाही. खरे काय ते सांगण्याचा माझा प्रयत्न असला पाहिजे. तो प्रयत्न मला करायलाच हवा. असा प्रयत्न करू इच्छिणार्‍यांना मदत व्हावी म्हणून संघ लक्ष देतो. संघाचे प्रश्न अगदी सरळ असतात, उदा., ख्रिश्चनांच्या विरुद्ध किंवा मुसलमानांच्या विरुद्ध संघाने कधी काही केले आहे का? फक्त असे एक उदाहरण दाखवून द्या! देशहिताच्या विरोधात होणारी जी वर्तणूक असेल तिचा संघाने सतत विरोध केला आहे आणि संघ तो पुढेसुद्धा करणार आहे. लोकहिताच्या विरोधात काही झाले असेल तर संघ त्यालाही विरोध करणार आहे आणि हे काही लपून राहिलेले नाही. पण ख्रिश्चनांना ते ख्रिश्चन आहेत म्हणून आणि मुसलमानांना ते मुसलमान आहेत म्हणून संघाने कधीच विरोध केलेला नाही. या देशात ते आम्हाला नको आहेत असे आम्ही म्हटल्याचे एक तरी उदाहरण दाखवून देता येईल का? कुठल्याही पूजा पद्धतीच्या बाबतीत हिंदुत्वाचा असा विचार आहे की, सत्याकडे जाणारे अनेक मार्ग आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जात असतो. आपण त्याला विरोध करता कामा नये. प्रत्येकाने आपल्या मार्गावर अढळ राहून अन्य सर्वांचाही योग्य तो आदर केला पाहिजे. ‘जाकी रही भावना जैसी, प्रभू मूरत देखी तिन तैसी’. संघ ख्रिश्चनांच्या आणि मुसलमानांच्या विरोधात आहे असे काही लोक म्हणतात. पण जेव्हा आम्ही त्याचे एखादे उदाहरण दाखवून द्या असे म्हणतो, तेव्हा त्यांना असे कोणतेही उदाहरण सांगता येत नाही. मग ते म्हणतात की, संघ पाकिस्तानच्या विरोधात आहे. पण एकटा संघच पाकिस्तानचा विरोध करतो असे नाही. अनेक मुसलमानसुद्धा पाकिस्तानचा विरोध करतात. या गोष्टीमुळे लोक ढोबळमानाने असे मानतात की, जे भारताच्या हिताचे आहे ते हिंदूंच्या हिताचे आहे, म्हणून संघ मुसलमानांचा विरोध करतो असे लोक सांगतात. आम्ही देशहित आणि हिंदुहित ही भूमिका घेऊन वाटचाल करतो. आम्ही कोणाचाही दुस्वास करत नाही. संघाने कोणत्याही धर्माला, संप्रदायाला विरोध केला नाही. मात्र जे अराष्ट्रीय आहे, देशविघातक आहे, समाज तोडणारे आहे, इथल्या संस्कृतीवर आघात करणारे आहे, त्याला विरोध करण्यासाठी संघ नेहमी पुढे राहिला आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून धर्मांतर घडवून आणण्यास संघाचा विरोध आहे आणि यापुढेही कायम राहील. परदेशातून येणारा पैसा इथे धर्मांतर घडवून आणण्यासाठी वापरला जात असेल, तर त्याला संघ विरोध करेल. ही संघाची स्पष्ट भूमिका आहे. मात्र अशा विवादित मुद्द्यांशिवायही अनेक मुद्दे संवाद करण्यासाठी आहेत. शिक्षण, संस्कृती, संस्कार, रोजगार अशा विषयांवर आज सर्वच समाजगटांना एकमेकांशी संवाद करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही एका समूहाची प्रगती किंवा विकास हा राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. राष्ट्राचा विचार करताना कोणाला एकाला वगळून किंवा कोणा एकाला विशेष प्राधान्य देऊन करता येत नाही. समग्रपणे विचार करावा लागतो. हे तत्त्व लक्षात घेतले, तर दिल्लीत झालेल्या ख्रिश्चन बांधवांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात इंद्रेशजींचे जाणे सहजपणे झाले आहे आणि अलिप्तपणा, राजकीय दडपण यापासून दूर होत ख्रिश्चन बांधवांनी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकाची बाब आहे आणि म्हणून ही स्वागतार्ह घटना आहे. इतिहास या घटनेची नक्कीच नोंद घेईल.”

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001