ईशान्य भारताच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या माय होम इंडिया संस्थेच्या माध्यमातून ईशान्य भारताच्या विकासासाठी आपले भरीव योगदान देणार्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दि. 15 डिसेंबर 2022 रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झाला. अरुणाचल प्रदेशातील न्यिशी जनजातीचे प्रतिनिधी तेची गुबीन यांना यंदाचा पुरस्कार देण्यात आला.
ईशान्य भारत - भारतभूमीतील निसर्गाचा वरदहस्त लाभलेले क्षेत्र. मात्र स्वातंत्र्यानंतर या क्षेत्राकडे भारताचा अविभाज्य भाग म्हणून न पाहता कायमच सर्वच बाबतीत उपेक्षित ठेवले गेले, हे दुर्दैवी वास्तव आहे. विकसनशील भारताने या क्षेत्राकडे विकासाच्या बाबतीत कायमच पाठ फिरवली. याचे परिणाम म्हणून व हे शल्य उराशी बाळगल्यामुळे येथील तरुण फुटीरतावाद, दहशतवाद, व्यसनाधीनता या चक्रव्यूहात पुरता फसला आणि सर्वच भारताला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले, हेही तितकेच खरे.
हे वास्तव असले, तरी समाजातील सज्जनशक्ती जागृत आहे, तोपर्यंत या दुर्जनांशी सामना करणे कठीण नाही, हे आशादायक आहे. भारतीय समाजातील अशीच एक सज्जनशक्ती गेली 99 वर्षे समूहरूपाने कार्यरत आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हे कायमच अग्रक्रमी ठेवून सर्व क्षेत्रांत नि:स्वार्थी ही शक्ती पण कार्यरत असते. डॉ. हेडगेवारांनी 1925 साली या समूहरूपाचे बीज रुजवले आणि या बीजाचा वटवृक्ष आज आपल्या छायेखाली अनेकांना बळ प्रदान करीत आहे. या केशवकुळातील एक स्वयंसेवक या वटवृक्षाच्या छायेत ईशान्येतील आपल्याच बांधवांमध्ये ‘आपण सारे जण भारतमातेची लेकरे आहोत’ हा बंधुभाव दृढ करत आहे आणि त्यांच्या विकासासाठी तत्परतेने कार्य करत आहे, तो स्वयंसेवक म्हणजे सुनील देवधर.
ईशान्य भारतातील समस्या निराकरणासाठी आणि तेथील लोकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी सुनील देवधर यांनी सतरा वर्षांपूर्वी ‘माय होम इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे ईशान्य भारतातील लोकांमध्ये राष्ट्रीय भावना आणि आपणही भारताचे नागरिक आहोत ही भावना बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. ‘फ्रॅटर्निटी कप’ (फुटबॉल सामने), ‘नेस्ट फेस्ट’ यासारख्या उपक्रमांमुळे तेथील मुलांमध्ये बंधुतेची भावना दृढावते आहे. याव्यतिरिक्त ‘सपनो से अपनो तक’ या उपक्रमाद्वारे ईशान्य भारतातील बेघर झालेल्या अनेक मुलांना स्वगृही पाठवण्याचे कार्य चालू आहे. अशी बेघर झालेली मुले सामान्यत: चिल्ड्रन होममध्ये, रेड लाइट एरिआत जातात, अनेक छोट्या उद्योगांत बालमजूर म्हणून काम करत असतात. ‘दर्द से हमदर्द तक’ यामध्ये अशा अंधारात सापडलेल्या मुलांना माय होम इंडियाच्या या कार्याने आशेचा किरण दिसतो. छोटे-छोटे अपराध केल्यामुळे अशा मुलांना काही कालावधीचा तुरुंगवास भोगावा लागतो, परंतु त्यांच्या पाठीशी कुणी नसल्यामुळे अशा मुलांच्या शिक्षेचा कालावधी वाढवला जातो. अशा वेळी माय होम इंडियाच्या माध्यमातून अशा मुलांना कायदेशीर बाहेर काढून त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचे कार्य केले जाते. कोविड काळात ईशान्य भारतातील अनेक क्षेत्रांत मदतकार्य (अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा) केले गेले.
तसेच ईशान्य भारताच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या माय होम इंडिया संस्थेच्या माध्यमातून ईशान्य भारताच्या विकासासाठी आपले भरीव योगदान देणार्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. ‘कर्मयोगी पुरस्कार’ आणि ‘वन इंडिया पुरस्कार’ हे त्यातीलच पुरस्कार. भारताशी ईशान्य भारताला जोडून ठेवणार्या लोकांना हेरून त्यांना भारताच्या आर्थिक राजधानीत वन इंडिया पुरस्कार (अवर नॉर्थ ईस्ट इंडिया) प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचा पहिलाच शब्दच O (Our) असा आहे, म्हणजे आपलेपणा. ईशान्य भारतासंबंधी आपलेपणाची भावना यातून जागृत होते. यंदाचा हा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दि. 15 डिसेंबर 2022 रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झाला. अरुणाचल प्रदेशातील न्यिशी जनजातीचे प्रतिनिधी तेची गुबीन यांना यंदाचा पुरस्कार देण्यात आला.
“अरुणाचल हा चीनचा हिस्सा असल्याचा दावा करून सातत्याने सीमाभाग अशांत ठेवण्याचे प्रयत्न चीन करीत असतो. सीमेपलीकडून नित्यनेमाने होणारे चिनी हल्ले, गोळीबार, चकमकी, तणावाच्या व दहशतीच्या वातावरणात असलेली जनता, त्यात भरीस भर मतांतरणाचा सुळसुळाट. या अनिश्चिततेच्या वातावरणात समस्येचे मूळ काय आहे, हे जाणून घेण्याचा पहिला प्रयत्न म्हणून 2010 साली तेथील 91 तरुणांना घेऊन सीमांत दर्शन यात्रा आयोजित केली. भारत-चीन सीमेवरील शंभरहून अधिक खेड्यांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचे विदारक वास्तव समजून घेतले आणि राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे एक अहवाल पाठवण्यात आला. या अहवालाचा परिणाम म्हणून एकट्या अरुणाचलमध्ये 52 पोलीस ठाणी सुरू करण्यात आली. या सीमांत दर्शन मोहिमेेचे नेतृत्व करणारे तेची गुबीन.
तेे स्वत: वास्तुरचनाकार आहेत. परंतु आपले मूळ गाव अशांत असूनसुद्धा आपण स्वस्थ जीवन कसे जगू शकतो, ही अस्वस्थता त्यांना आपल्या गावी घेेऊन आली. तेथील वाढलेल्या धर्मांतरणाचा सुळसुळाट रोखला पाहिजे, यासाठी त्यांनी तरुणांना एकत्रित केले, त्यांना आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले आणि आपल्या संस्कृतीचा मतांतरणाने कसा र्हास होत आहे, हा धोेका स्पष्ट केला. तेथील लोकांना हे महत्त्व पटले आणि आता तिथे 600हून अधिक श्रद्धा जागृती केंद्रे स्थापन झाली आहेत. अरुणाचल प्रदेशात मुख्य 26 जनजाती आणि 106 उपजाती आहेत. त्यांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत, त्यांची आता जोपासना होत आहे, त्याचे सर्व श्रेय तेची गुबीन यांना जाते” असे माय होम इंडिया संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांनी प्रतिपादन केले.
ईशान्य भारतातील विकासात माय होम इंडियाचे योगदान अतुलनीय आहे, त्यामुळे कृतज्ञ भावनेेने या कार्यक्रमास अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू उपस्थित होते. अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता आणि नुकत्याच 9 डिसेंबरला चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यामुळे ते काय बोलतात याची उत्सुकताही होती. ईशान्य भारतातील लोक हे उर्वरित भारतातीलच नागरिक आहेत, ही भावना जागृत करण्याचे कार्य माय होम इंडिया संस्थेमार्फत केले जात आहे, त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “इतिहासाची कितीतरी पाने आहेत, जी आपल्यासाठी लिहिलीच गेली नाहीत. ईशान्य भारतातील अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांबद्दल ईशान्य भारतातदेखील मोजक्या लोकांना माहीत आहे आणि उर्वरित भारताला तर याची गंधवार्तादेखील नाही. खरे तर 1914च्या शिमला कराराद्वारे अरुणाचल प्रदेश आणि तवांग हे भारताशी जोडले गेले आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947नंतर छोट्या छोट्या राज्यांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण योगदान केले. अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग जोडण्याची कल्पनादेखील मा. सरदार पटेल यांचीच, त्यामुळे ईशान्य भारत सरदार पटेल यांना कधी विसरू शकत नाही. मात्र तेव्हाच्या सरकारच्या उदासीन धोरणांमुळे ईशान्य भारत हा फुटीरतावादाचा शिकार झाला आणि त्याचे परिणाम आपणा सर्व भारतीयांना भोगावे लागले. या चुकीच्या धोरणांमुळे आपल्यात दरी निर्माण झाली. परंतु ‘राष्ट्र प्रथम’ हेे अग्रक्रमी ठेवणार्या रा.स्व. संघाच्या अनेक प्रचारकांमुळे ईशान्य भारत उर्वरित भारताशी पुन्हा एकदा जोडला गेला. संघाचीच शिकवण असलेली माय होम इंडियासारखी संस्था ही दरी आता पुसून टाकून ‘एक भारत’ ही संकल्पना साकार करत आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना त्यांच्या निर्णायक धोरणांमुळे सफल होत आहे. गेल्या आठ वर्षांत ईशान्य भारत बदलत आहे, याचे कारण विद्यमान सरकारचे सर्वसमावेशक धोरण आहे” असे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी आशादायक उद्गार काढले.
“अरुणाचलचे रहिवासी कायम महाराष्ट्राचे ऋणी राहू इच्छितात. कारण महाराष्ट्रातील रा.स्व. संघाने ईशान्य भारताच्या विकासासाठी अनेक प्रचारक दिले आणि माय होम इंडियासारखी संस्था. शिक्षणासाठी येणार्या ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्याच्या सर्वंगीण विकासासाठी तत्पर असतात. मी तर म्हणतो, ईशान्य भारतातील मुले खूपच भाग्यवान आहेत, ज्यांना एका जन्मात दोन-दोन आई-वडील लाभले आहेत - एक जन्मदाते आणि दुसरे त्यांचे सर्वांगीण विकास करणारे माता-पिता. सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणार्या राज्यांत आणखी एक भाऊ - सिक्किम या राज्याची भर पडली आहे, अशा आठ राज्यांचे पालकत्व स्वीकारणे सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्राचे हे कार्य प्रशंसनीयच नाही, तर आचरणीय आहे. त्यांच्या या कार्यापुढे मी केवळ माझ्या राज्यापुरते केलेले काम मला थिटे वाटते” असे गौरद्वागार वन इंडिया पुरस्कार विजेते तेची गुबीन यांनी काढले.
तेची गुबीन यांना महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पतंगे या वेळी म्हणाले, “राष्ट्रीयतेच्या संदर्भात माय होम इंडियाचे काम अतुलनीय आहे. माय होम इंडियाच्या कामाकडे संविधानाच्या दृष्टीने बघितले, तर आपल्या उद्देशिकेतील पहिले शब्द आठवतात - ‘आम्ही भारताचे लोक’. या ‘आम्ही भारताचे लोक‘, या वाक्याचा आविष्कार माय होम इंडिया संस्थेच्या वतीने चालणार्या कामातून व्यक्त होतो. आणि आजचे पुरस्काराचे मानकरी तेची गुबीन यांना देण्यात आलेला पुरस्कार या वाक्याचे प्रतिबिंब आहे. राज्यघटनेची उद्देशिका राज्यघटनेचा आत्मा असतो, राज्यघटनेचे तत्त्वज्ञान असते, राज्यघटनेची मूल्यसंकल्पना असते. उद्देशिकेतील एक ओळ अशी आहे- "LIBERTY of thought, expression, belief, faith and worship.'आपले आजचे पुरस्कार विजेते तेची गुबीन उपासना, श्रद्धा व उपासना स्वातंत्र्याचे रक्षण करीत आहेत, एका अर्थाने हे सांविधानिक कार्य आहे.
दुसरे वाक्य "to promote among them all FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation' - व्यक्तीच्या सन्मानाची आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता याची खात्री देणारे सर्व बंधुत्व त्यांच्यामध्ये प्रस्थापित करणे. फॅ्रटर्निटी - आम्ही सर्व जण भारतमातेची लेकरे आहोत, या नात्याने आपण एकमेकांचे बंधु-भगिनी आहोत. उद्देशिकेतील बंधुता या ध्येयाकडे वाटचाल करण्याचे काम माय होम इंडिया करीत आहे. वन इंडिया पुरस्कार देऊन राष्ट्राची अखंडता मजबूत करण्याचे कार्य माय होम इंडिया करीत आहे. त्यांच्या या कार्याला माझ्या कायम सदिच्छा आहेत.” असे रमेश पतंगे म्हणाले.
माय होम इंडियाच्या वन इंडिया पुरस्कार कार्यक्रमास सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल, माय होम इंडियाचे अध्यक्ष हरीश शेट्टी, ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे, उद्योजक पद्मश्री मिलिंद कांबळे, सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले आदी मान्यवरांसह, सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरलेले होते. या कार्यक्रमात आपापल्या कार्यक्षेत्रात नावाजलेल्या संस्थांचा आणि व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.