@रवींद्र गोळे । 9594961860
सध्या महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय वातावरण तापले आहे, याचा प्रत्यय सोशल मीडियातून सहजपणे येतो. अस्मिता दुखावल्या.. भावना भडकल्या.. या दोन वाक्यांतून महाराष्ट्रात सध्या काय चालू आहे हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. अस्मिता, भावना म्हणजे काय? हे नव्याने सांगण्याची गरज आता निर्माण झाली आहे. भान हरवलेली मंडळी पराचा कावळा करतात आणि अस्मितेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. कुणीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाही. मुळात संत, महापुरुष हे कोणत्याही एका समूहाची खाजगी मालमत्ता नाही; पण आज राजकीय कुरघोडी करण्यासाठी संतांच्या जाती शोधल्या जातात, महापुरुषांच्या जीवनाचा, कार्याचा वारसा एका समूहापुरता मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा सत्य-असत्याचा निवाडा करावाच लागतो.
सामाजिक द्वेष आणि जातीय अस्मिता जागृत करण्यासाठी केलेल्या वक्तव्यातून प्रबोधन होत नाही. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण आणि सामाजिक दरी अधिक रुंद होत असते. हे कोणत्या तत्त्ववेत्त्याचे विचार नसून समकालीन वास्तव समजून घेताना आमच्या लक्षात आलेली ही महत्त्वाची गोष्ट आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात जोरदार खडाजंगी चालू आहे आणि या खडाजंगीत सर्व जण आपापल्या परीने लढत आहेत. कधी इतिहासातील तर कधी वर्तमानातील विषयावर या लढाया होत असताना भविष्याची कोणाला चिंता नाही, हेही वारंवार सिद्ध होते आहे. सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक महापुरुषांना या लढाईत वेठीस धरले जाते आहे. वर उल्लेख केलेल्या सर्वच महामानवांच्या जीवनाचा, विचारांचा थोडा जरी अभ्यास केला गेला, तर असे समाजवास्तव निर्माण झाले नसते. पण दुर्दैवाने पुरोगामी महाराष्ट्रात सध्या सामाजिक, राजकीय अधू मानसिकतेचे प्रदर्शन पाहण्यास मिळत आहे. महाराष्ट्र म्हणून आम्ही एकसंघ नाही आहोत, आम्ही जातीचे, राजकीय संघटनांचे झेंडे घेऊन जगतो आहोत, आम्ही सारासार विवेक हरवून बसलो आहोत.
सध्याचे जग विज्ञानामुळे गतिमान झाले आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी एखादी घटना घडली, तर तिची माहिती सर्वत्र पसरायला थोडा वेळ लागत होता. आता तशी स्थिती नाही. एका छोट्याशा गावात घडलेली घटना दुसर्या क्षणी संपूर्ण जगाला कळते. या गतीवर स्वार होऊन आपणच सर्वात पुढे आहोत हे सिद्ध करण्यासाठी समाजाची दिशाभूलही केली जाते. शब्दातून व्यक्त होणारा भाव न समजताच विपर्यास केला जातो आणि मग समाजमाध्यमातून समर्थक व विरोधक यांचा घनघोर रणसंग्राम सुरू होतो. आपलीच बाजू कशी योग्य आहे हे सांगताना ज्या महापुरुषाचा वारसा ही मंडळी सांगतात, त्या महापुरुषाच्या विचाराला हरताळ फासला जातो. आरोप-प्रत्यारोप करताना आपण केवळ सामाजिक विद्वेषाची पेरणी करत आहोत, याचेही भान या मंडळींना राहत नाही. याला कुणीही अपवाद नाही.
आपला समाज हा केवळ राजकीय चळवळ, सामाजिक चळवळ यामुळे एकसंघ झालेला नाही. आपल्या समाजजीवनात खोलवर रुजलेली सांस्कृतिक एकात्मता आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विसरून समाजाला केवळ राजकीय दावणीला बांधून स्वत:ची पोळी भाजण्याची मानसिकता सर्वच विचारधारांमध्ये व चळवळींमध्ये दिसून येते आहे. समतेचा उद्घोष करत केवळ आपल्या जातीचा विचार करणारे सामाजिक नेतृत्व दुर्दैवाने आज जागोजागी दिसत आहे. मी आणि माझी जात, माझी जात माझी अस्मिता, माझी जात माझ्या जातीचा महापुरुष अशा चढत्या क्रमाने समाज वेगाने जातिग्रस्त होत आहे. वर वर संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक एकात्मता जपण्याचा आव आणून समाजाची जातीत विभागणी केली जाते आहे. यामागे केवळ राजकीय लाभ-हानीची समीकरणे आहेत. समाजजीवनात अस्थिरता निर्माण करून आपला स्वार्थ साधण्यासाठी असे वाद निर्माण केले जातात आणि त्याला अधिक प्रक्षोभक करण्यासाठी अस्मितेला, भावनांना आवाहन केले जाते. समाजमाध्यमातून असे वाद झाल्यानंतर त्यातून काय साध्य होते? याचा विचार करायला आज कोणत्याही नेतृत्वाकडे वेळ नाही. उलट आपल्या कृतीतून ते वाद अधिकच चिघळवण्याचा प्रयत्न करत असतात, हेही अनेक वेळा सिद्ध झाले आहे.
अशा वादातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हिंदुत्वाला टीकेचे लक्ष्य केले जाते. त्यासाठी संतमहंतांचे जीवन, विचार यांचा विपर्यास केला जातो. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास यांच्यावर टीका केली जाते. या मंडळींवर टीका म्हणजे हिंदुत्वावर टीका असा समज करून घेणारे या संतांचे सामाजिक विचार समजून घेत नाहीत आणि या टीकाकारांना चोख उत्तर म्हणून मग फुले, आंबेडकर यांच्याविषयी विपरीत टीकाटिपण्णी करण्यात धन्यता मानून आपण हिंदुत्वाची पाठराखण करत आहोत असे वाटणारा दुसरा गटही सक्रिय होतो. सोशल मीडियामधून, जाहीर सभांतून, पत्रकार परिषदेतून असे आरोप-प्रत्यारोप करताना आपण समाजात विषाची पेरणी करत आहोत याचेही भान या मंडळींना राहत नाही. यातून मग वैचारिक खंडन-मंडनाऐवजी मोर्चे, बंद, शारीरिक हल्ले, सार्वजनिक मालमत्तेची हानी इत्यादी गोष्टी सुरू होतात. एक विद्वेषपूर्ण वाक्य समाजाला वेठीस धरण्यात कारणीभूत ठरते. समाज अस्वस्थ होतो. समाजात खळबळ माजली की पुन्हा वाद निर्माण करण्यासाठी असे नेतृत्व विषय शोधू लागते. मागच्या काही दिवसांत अशाच प्रकारे वाद उत्पन्न करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अधिक भडकावण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
अशा वादातून कोणते सामाजिक प्रश्न तडीस गेले आहेत? कोणत्या विषयावर सामाजिक एकमत निर्माण झाले आहे? कोणत्या समाजघटकांना न्याय मिळाला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधा’ अशी आपली धारणा असली, तरी अशा वादातून केवळ विद्वेष उफाळून येणार आहे आणि सामाजिक दरी अधिक वाढणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सामाजिक न्यायासाठी संविधानाच्या चौकटीत राहून आपण लढले पाहिजे, माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारणार्याविरुद्ध शड्डू ठोकून मैदानात उतरले पाहिजे. मात्र अशा लढ्याचे अधिष्ठान हे द्वेष, सामाजिक संस्कार असता कामा नये. आज प्रत्येक जातिसमूहाचे नेतृत्व निर्माण झाले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र या नेतृत्वाने केवळ आपल्या जातीचा विचार करून चालणार नाही. त्याला संपूर्ण समाजाचा विचार करावा लागेल. हे भान हरवले तर सामाजिक राजकीय नेतृत्व आपला समाज एकसंघ ठेवू शकत नाही. त्यामुळे व्यक्त होताना, जाहीरपणे बोलताना आपण काय बोलतो, त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करायला हवा. आपला समाज आपणच सशक्त आणि प्रगतिशील करू शकतो, आपला उद्धार आपणच करू शकतो, हे लक्षात घेऊन नेतृत्व करणार्या सर्वच मंडळींनी आणि त्यांच्या समर्थकांनी आपला इतिहास, आपले वर्तमान आणि आपला भविष्यकाळ समजून घेतला पाहिजे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एका वाक्यात हा विचार सामावलेला आहे. ते म्हणतात, ‘आम्ही भूतकाळाकडून प्रेरणा जरूर घेतो, परंतु त्या काळाशी जखडलेले नाही. वर्तमानाचे भान आम्ही ठेवतो, परंतु आम्ही स्थितीवादी नाही आणि भविष्याची सुंदर स्वप्ने आम्ही पाहतो, परंतु आम्ही स्वप्नाळू नाही. भूत, वर्तमान आणि भविष्य यांना व्यापून उरलेल्या भारतीय संस्कृतीचे आम्ही जागृत कर्मयोगी असे पूजक आहोत.’
आज कदाचित पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या या विचारांचा विसर पडला असेल, तर पुन्हा एकदा नव्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना समजून घेतले पाहिजे. क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण करून समाजाला सशक्त करता येणार नाही, त्याचप्रमाणे अशा वादातून सामाजिक प्रश्नही सुटणार नाहीत, उलट सामाजिक ताणाबाणा अधिक विसविशीत होईल, याचा विचार या नेतृत्वाने केला पाहिजे.