’द वायर’ या डाव्या विचारांच्या न्यूज पोर्टलला कथित खोट्या बातमीमुळे तोंडघशी पडावे लागले. या प्रकरणामुळे पत्रकारितेतील शुचितेच्या, प्रामाणिकपणाच्या आणि लेखनस्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्या, डाव्यांचे ’फ्लॅगशिप’ (प्रमुख) माध्यम असणार्या ‘द वायर’वर ही नामुश्की ओढवली आहे. यामधून थोडक्यात सुटून जाण्याइतके यावेळी ’वायर’ सुदैवी नव्हते. त्यांच्या या खोटारडेपणा आणि बदमाशीबद्दल भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी दिल्ली पोलिसांकडे रीतसर तक्रार केली. ’द वायर’चे व्यवस्थापन, ही स्टोरी निर्माण करणार्या जान्हवी सेन आणि संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
सध्या सोशल मीडियात डाव्यांचे दिवस काही चांगले नाहीत, असे चित्र दिसतेय. एलन मस्कने ट्विटरवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे आणि त्याचबरोबर त्याने ट्विटरचा सीईओ पराग अग्रवाल आणि लीगल हेड विजया गड्डे यांना हाकलून लावले आहे. विशेषत: विजया गड्डेंना ट्विटरच्या सुरक्षा रक्षकाने अक्षरश: खेचून बाहेर काढले. ज्या बाईने सीईओच्या मदतीने डोनाल्ड ट्रम्पचे अकाउंट ब्लॉक केले, जिच्या एका इशार्यासरशी अनेक राष्ट्रीय विचारधारांच्या नेत्यांचे/कार्यकर्त्यांचे अकाउंट ब्लॉक होत होते, त्याच बाईला खुद्द ट्विटरच्या मुख्यालयातून धक्के मारून बाहेर काढले जाते.. हा काव्यगत न्याय आहे!
याच घडामोडीत दिल्लीत एक लहानशी घटना घडली, जिने पुढे बर्यापैकी मोठे स्वरूप धारण केले. या सर्व घटनेच्या केंद्रस्थानी असणार्या ’द वायर’ या डाव्या विचारांच्या न्यूज पोर्टलला तोंडघशी पडावे लागले. सोमवारी 10 ऑक्टोबरला ’द वायर’ने आपल्या पोर्टलवर एक स्टोरी केली. स्टोरीचे शीर्षक होते - ‘"Exclusive : If BJP's Amit Malviya Reports Your Post, Instagram will Take it Down-No Questions Asked'. ही स्टोरी जान्हवी सेनने केली होती. ही बाई डाव्या प्रसारमाध्यमांची आवडती पत्रकार आहे. सध्या ’द वायर’ या डाव्यांच्या डिजिटल माध्यमात ती सहसंपादिका आहे. या स्टोरीत जान्हवी सेनने सरळ आरोप केला होता की अमित मालवीय यांचे मेटा समूहाशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते म्हणतील ते सोशल मीडियावरील अकाउंट, त्याची चौकशीही न करता, तत्काळ ब्लॉक केले जाते. हा मेटा समूह म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमांची मूळ कंपनी. ही तीन माध्यमे मिळून एकूण सोशल मीडियाच्या जगातली अधिकांश जागा व्यापतात. त्यामुळे हा आरोप तसा स्फोटक होता.
वायर, स्क्रोल, प्रिंट वगैरेसारखी डाव्या विचारसरणीला वाहिलेली माध्यमे राष्ट्रीय विचारधारेच्या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचे आरोप करतच असतात. त्यामुळे ह्या आरोपात तसे नवीन काही नव्हते. पण तो आरोप जिच्यावर केला होता, ती व्यक्ती महत्त्वाची होती.
अमित मालवीय हे भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख आहेत. याशिवाय त्यांच्याजवळ पश्चिम बंगाल भाजपाचे सह प्रभारी अशी जबाबदारीही आहे. त्यामुळे जान्हवी सेनने केलेला आरोप हा अमित मालवीयवर नसून पर्यायाने भाजपावर होता. या निमित्ताने ‘भाजपा कशा पद्धतीने सोशल मीडियाला प्रभावित करून (किंवा डाव्यांच्या भाषेत ‘विकत घेऊन’) आपल्या विरोधकांचा आवाज बंद पाडतेय’ हा विमर्श (नॅरेटिव्ह) त्यांना प्रस्थापित करायचा होता.
त्यामुळे स्वाभाविकच अमित मालवीय यांनी याला उत्तर दिले आणि आरोप सिद्ध करण्याचे जान्हवी सेन यांना आव्हान दिले. दुसर्याच दिवशी, अर्थात मंगळवार 11 ऑक्टोबरला मेटाचे कम्युनिकेशन हेड अँडी स्टोन यांनी एक वक्तव्य जारी केले, ज्यात त्यांनी स्पष्ट शब्दात ’द वायर’च्या लेखात उल्लेख केलेले सर्व आरोप नाकारले. त्यांनी हेही म्हटले की या लेखात वायरने अनेक गोष्टी ’फॅब्रिकेट’ केल्या आहेत, अर्थात बनावट तयार केल्या आहेत.
आता या स्पष्ट नकारानंतर तरी वायरने गप्प बसायला हवे होते. मात्र त्यांनी ताबडतोब 11 ऑक्टोबरलाच एक बातमीवजा लेख प्रकाशित केला, ज्यात मेटाच्या अंतर्गत वर्तुळातील ईमेलचा उल्लेख होता. एखाद्या स्टिंग ऑपरेशनच्या धर्तीवर वायरने अँडी स्टोन आणि मेटाच्या कर्मचार्यांमध्ये झालेला मेल संवाद उद्धृत केला. जान्हवी सेनबरोबर सिद्धार्थ वरदराजनने हा लेख लिहिला होता. हिंदी वायर पोर्टलवर या लेखाचे शीर्षक होते - ’मेटाने क्रॉसचेक पर द वायर की रिपोर्टका े’मनगढंत’ कहा, आंतरिक ईमेलमे साक्ष लीक की बात मानी.’
याचा अर्थ, ठरवून ’वायर’ला हा वाद वाढवायचा होता. शिवाय या निमित्ताने भाजपा कसा वैचारिक स्वातंत्र्यावर घाला घालतोय असे नॅरेटिव्ह माध्यमांमध्ये रुजवायचे होते आणि म्हणून 16 ऑक्टोबरला वायरने या संदर्भात आणखी एक स्टोरी टाकली. आता या स्टोरीच्या लेखकांमध्ये जान्हवी सेन आणि सिद्धार्थ वरदराजनबरोबर देवेश कुमारचाही समावेश झाला. (हे नाव लक्षात ठेवा.) या लेखात परत या तिघांनी आपलीच बाजू लावून धरली आणि मेटा कसे खोटे बोलतेय ते सांगण्याचा प्रयत्न केला. ’वायर’च्या हिंदी पोर्टलवर याचं शीर्षक होते - ’मेटाद्वारा अंतरिक ई-मेल यूआरएल को गलत बताने के दावे का खंडन करनेवाले प्रमाण मौजूद है।’
आता गंमत बघा. इकडे अमित मालवीयने आणि तिकडे मेटाच्या व्यवस्थापनाने हे प्रकरण फार गांभीर्याने घेतले. दोघांनीही ’द वायर’ला, त्यांनी लिहिलेले सर्व सिद्ध करण्यास सांगितले. आणि सिद्ध करता आले नाही, तर फार मोठ्या न्यायालयीन दाव्याला सामोरे जायला लागेल, हे दाखवून दिले.
लेखनस्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्या ’वायर’ने या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी फारच विचित्र पाऊल उचलले, जे सर्वसाधारणपणे कुठलाही माध्यम समूह उचलत नाही. अशी एखादी चूक झाली तर स्टोरी दिलेल्या पत्रकारावर, तो माध्यम समूह अंतर्गतरित्या कारवाई करतो, पण लोकांसमोर मात्र त्या पत्रकाराची पाठराखणच केली जाते. हा माध्यमांमध्ये असलेला सर्वसाधारण संकेत आहे.
पण वायरने काय केले?
16 ऑक्टोबरला प्रकाशित केलेल्या या प्रकरणाच्या शेवटच्या स्टोरीमध्ये त्यांनी जान्हवी सेन आणि सिद्धार्थ वरदराजनबरोबरच देवेश कुमारचेही नाव टाकले होते. या तिघांमध्ये देवेश कुमार हाच जरासा ’कच्चा लिंबू’ या कॅटेगरीतला होता. अर्थात देवेश कुमारने अत्यंत प्रामाणिकपणे डाव्यांची लाइन लक्षात घेत वायरमध्ये केंद्र शासनाविरोधी अनेक खोट्यानाट्या स्टोरीज केल्या होत्या. 29 मे 2022ला त्याने केलेली स्टोरी "COVID-19 : Is India Really Doing 'Better' than Other Countries?' ही अनेक अर्थांनी विवादास्पद होती. कारण सरकारचे वाभाडे काढण्याच्या नादात त्याने अनेक खोटे आकडे दिलेले होते.
तर याच देवेश कुमारला बळीचा बकरा बनवण्याचे ठरले. कदाचित ते आधी ठरवूनच 16 ऑक्टोबरच्या स्टोरीमध्ये त्याचे नाव घातले गेले असावे आणि म्हणूनच 29 ऑक्टोबरला वायरच्या व्यवस्थापनाने तातडीने दोन गोष्टी केल्या - एक म्हणजे दिल्ली पोलिसांच्या आर्थिक अपराध विभागाकडे आपलाच माजी कर्मचारी असलेला देवेश कुमार याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. तक्रारीचे कारण काय? तर या देवेश कुमारने ’द वायर’ला खोटीनाटी बनावट माहिती पुरवली. याचे कारणही वायरनेच दिले की ‘देवेश कुमार मानसिकरित्या अस्वस्थ आहेत!’
याचबरोबर ’द वायर’ने 10 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबरचे आपले तिन्ही लेख (किंवा आपल्या तिन्ही स्टोरीज) मागे घेतले. ’वायर’च्या पोर्टलवर, त्या पानावर आपण गेलो तर त्या स्टोरीचं शीर्षक येते. स्टोरी तयार करणार्या पत्रकारांची नावे येतात. चित्रही येते. पण सोबत मजकूर असतो- The Wire has formally retracted this article.
बरे, हे आर्टिकल किंवा हा लेख कोणाच्या दबावामुळे मागे घेतला का? तर ते तसे नाही. म्हणजे आपल्या लोकसत्ताकारांनी ’असंगाशी संग’ हे त्यांचे संपादकीय, ख्रिश्चन लॉबीच्या दबावाखाली मागे घेतले होते. तसे इथे घडलेले नाही. ’द वायर’च्या व्यवस्थापनाच्या हे लक्षात आले की आपली खेळी चुकलेली आहे. म्हणूनच ते लिहितात - ‘द वायर’ की मेटा कव्हरेज पर आंतरिक समीक्षा प्रक्रिया (Internal review process) के नतीजे आने के बाद इसरिपोर्टको सार्वजनिक पटलसे हटा दिया गया है.’
लक्षात घ्या, पत्रकारितेतील शुचितेच्या, प्रामाणिकपणाच्या आणि लेखनस्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्या, डाव्यांचे ’फ्लॅगशिप’ (प्रमुख) माध्यम असणार्या ‘द वायर’वर ही नामुश्की ओढवली आहे. याचे कारण आहे, त्यांनी केलेली बदमाशी उघडकीला येणे.
पण हे करूनही प्रकरण संपायचे नव्हते. असे थोडक्यात सुटून जाण्याइतके ’वायर’ सुदैवी नव्हते. त्यांच्या या खोटारडेपणा आणि बदमाशीबद्दल भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी दिल्ली पोलिसांकडे रीतसर तक्रार केली. ’द वायर’चे व्यवस्थापन, ही स्टोरी निर्माण करणार्या जान्हवी सेन आणि संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली.
दिल्ली पोलिसांनी 31 ऑक्टोबरला या एफआयआरच्या आधारावर ’द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन आणि आताचे संपादक एमके वेणू यांच्या घरी धाड टाकली. या दोघांचे लॅपटॉप आणि मोबाइल जप्त केले. यात बरीच आक्षेपार्ह माहिती मिळाली आहे, असे समजते.
यानंतर बर्याच गोष्टी घडल्या. मुंबई पत्रकार संघासकट अनेक पत्रकार संघांनी या घटनेचा निषेध केला. हे स्वाभाविकच होते. ही मंडळी ’द वायर’च्या व्यवस्थापनासारखी, आपल्याच पत्रकाराला तोफेच्या तोंडी देणारी थोडीच होती? मात्र या सर्व पत्रकार संघांची गोची झालेली होती. नेमका निषेध कशाचा करायचा? कारण ’द वायर’च्या व्यवस्थापनाने आपली चूक कबूल केली होती. ते तिन्ही लेख मागे घेतले होते. अर्थात नकळत का होईना, एखाद्या कटाचा भाग असल्याचे त्यांनी मान्य केले होते आणि नंतर आपल्याच एका पत्रकाराला बळीचा बकरा बनवले होते. मग त्यांच्यावर पोलीस कारवाई झाली ती चूक की बरोबर? या संभ्रमात अनेक जण होते/ आहेत.
दरम्यान बुधवारी, दोन नोव्हेंबरला देवेश कुमारने ‘टाइम्स नाऊ’ला सांगितले की “मी मानसिकरित्या पूर्णपणे स्वस्थ आहे. मला काहीही झालेले नाही आणि मी पोलिसांना सहकार्य करतोय.”
हे प्रकरण पुढेही बरेच वाढेल असे चित्र दिसतेय. पहिल्यांदाच डाव्या विचारवंतांच्या माध्यमातील एका प्रमुख समूहाला सपशेल पराभव पत्करावा लागला आहे. हे शल्य त्यांच्या मनात असणे स्वाभाविकच आहे.