@निहारिका पोळ सर्वटे
महाराजजींचं नृत्य हे देहापलीकडचं नृत्य होतं. स्त्री-पुरुष या सर्वापलीकडे जाऊन त्यांचे भाव असायचे. त्यांच्या हावभावांमधून आपल्याला खरोखरीच कृष्ण भेटायचा आणि राधासुद्धा, त्यांच्या नृत्यातून खरंच विद्युल्लतेचा भास व्हायचा आणि पावसाचे थेंब आपल्यालाही जाणवायचे. त्यांच्या हस्तकांमधून रामाचं धनुष्य आणि कृष्णाची बासरी आपल्याला खरोखरीच दिसायची. त्यांनी दिलेला हा एक खूप मोठा वारसा आहे, जो त्यांचे शिष्य आणि त्यांना बघून तयार झालेले अनेक एकलव्य आता पुढे नेणार आहेत.... महाराजजी अनंतात विलीन झाले, त्या वेळचं दृश्य बघण्यासारखं होतं. देवालाही हेवा वाटावा असं हे दृश्य होतं. महाराजजींच्या शिष्यांनी कथकच्या बोलांच्या माध्यमातून त्यांना शेवटची आदरांजली दिली आणि तिथे आभाळही नतमस्तक झालं.
पंडित बिरजू महाराज गेले! 17 जानेवारी 2022ची सकाळ या बातमीने झाली आणि अचानक संपूर्ण कलाविश्व थांबल्यासारखं वाटलं. अचानक काहीतरी हरवलं, निखळलं, हातातून सुटलं असं झालं. एखादा बोल समेवर आला नाही, आणि त्याची सम सापडतच नसेल तर कसं वाटेल? अगदी तसंच वाटलं. आणि हे केवळ कुणा एकाला नाही, तर कला क्षेत्राशी जोडलेल्या सर्व कलाकारांना आणि रसिक प्रेक्षकांना वाटत होतं. संध्याकाळ होता होता पंडित बिरजू महाराजांच्या अंत्यविधीचे व्हिडिओज समोर आले. ते सर्व दृश्य अंगावर शहारा आणणारं आणि त्याच वेळी अतिशय शांत करणारंदेखील होतं. ताली खाली आणि पढंत करत, कथकचे बोल म्हणत महाराजजींचे सर्व शिष्य त्यांना श्रद्धांजली देत होते. मंत्रोच्चारांप्रमाणेच हे या कथक बोलांचं उच्चारण सुरू होतं. एका गुरूंसाठी याहून सुंदर, मोठी आणि भावपूर्ण श्रद्धांजली असेल ती काय? कथक नृत्यपरंपरेच्या एका युगाचा अंत झाला आणि महाराजजी अनंतात विलीन झाले. सम रिकामी झाली, हरवली आणि कला क्षेत्र पोरकं झालं.
‘कालका - बिंदादीन’चा वारसा पुढे चालवणारे पंडित बृजमोहन मिश्रा म्हणजेच बिरजू महाराज हे नाव देशाच्या कानाकोपर्यात पोहोचलं. अशी एखाददुसरीच व्यक्ती असेल, जिला पंडित बिरजू महाराज हे नाव माहीत नाही. कथक नृत्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाऊन, भारतीय शास्त्रीय नृत्याचा सन्मान वाढवण्याचे काम पद्मविभूषण पंडित बिरजू महाराजांनी केलं. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. बिरजू महाराजांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी कथकच्या प्रसिद्ध लखनऊ घराण्यात अच्छन महाराज यांच्या घरी झाला. वयाच्या तिसर्या वर्षापासूनच महाराजजींनी नृत्याच्या क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल ठेवलं. वयाच्या 13व्या वर्षीच ते दिल्ली येथे नृत्याचे धडेदेखील देऊ लागले होते. ज्या वयात मुलं खेळण्यात आणि बागडण्यात व्यग्र असतात, त्या वयात महाराजजी घराण्याचा वारसा पुढे नेत एक मोठा इतिहास रचत होते.
महाराजजींच्या जन्माच्या आधीपर्यंत कथकचं स्वरूप वेगळं होतं. कलाकार राजाश्रयात असायचे, त्यामुळे त्या काळात ‘दरबारी कथक’चं चलन अधिक होतं. मात्र महाराजजींनी पारंपरिक कथकच्या परंपरेला पुढे नेत त्यात काही बदल केले आणि हळूहळू कथकला या दरबारी भावातून बाहेर आणून मंचापर्यंत नेलं. त्यांच्या जाण्याने कथकचा मंच पोरका झाला.
एकदा आपल्या काही शिष्यांना नृत्याचे धडे देत असताना महाराजजी म्हणाले, “कला ही कधीच सोन्यासारखी असू नये, ती पितळ्यासारखी असावी.” शिष्यांना काही कळेना, महाराजजी असे का म्हणताहेत ते. एका शिष्याने विचारले “पण असे का महाराजजी?” तर ते म्हणाले, “सोन्याला तुम्ही सांभाळून लॉकरमध्ये ठेवता आणि गरज पडली कीच वापरायला काढता. मात्र पितळ्याला आपण रोज चमकवतो, घासतो आणि मग पितळ्याची भांडीदेखील सोन्यासारखी चमकू लागतात.” कला ही नेहमी पितळ्यासारखी असावी, ते त्यांनीच असंख्य कलाकारांच्या मनात रुजवलं आणि आज ते सर्व कलाकार रोज आपल्या या कलेला घासून लख्ख साफ करताहेत. ‘करत करत अभ्यास के जडमति होत सुजान, रसरी आवत जात है, सिर पर पडत निशान’ असं म्हणतात. महाराजजी याचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी रियाज, तयारी कधीच थांबविली नाही. ते या वयातदेखील रोज रियाज करत असत.
रियाजाचं, सातत्याचं आणि शिस्तीचं महत्त्व महाराजजींच्या जीवनातून दिसतं. महाराजजींनी कथकच्या कार्यक्रमांचे प्रयोग अगदी अमेरिकेपासून ते श्रीलंकेपर्यंत केलेत. ते खर्या अर्थाने भारतीय शास्त्रीय नृत्यकलेला एक ग्लोबल कला बनवणारे ठरले. त्यांच्या कार्यक्रमांना लाखोंनी प्रेक्षक हजर असत. केवळ आणि केवळ महाराजजींची मयूर गत किंवा विद्युत लडी असू देत किंवा त्यांचा अतिशय सुंदर पदन्यास बघायला ही रसिक प्रेक्षकांची गर्दी होत असे. महाराजजींनी खर्या अर्थाने कलाकारांना त्यांचा सन्मान आणि योग्य मंच मिळवून दिला. आपल्या नृत्यातून ‘श्रीयंत्र’ दाखवण्याची कला फक्त आणि फक्त महाराजजींच्याच अंगी होती.
महाराजजी नेहमी म्हणायचे, “तुमचं नृत्य अभ्यासपूर्ण असायला पाहिजे, मात्र तुमचा कार्यक्रम कधीच ‘अभ्यास’ वाटता कामा नये.” कार्यक्रम हा आनंद देण्यासाठी असायला हवा आणि त्यासाठी मंचावर असताना आपण खूप काहीतरी मोठं करतोय हा देखावा तुमच्या वागण्यातून, देहबोलीतून आणि नृत्यातून कधीच दिसता कामा नये, हे महाराजजींचं ठाम मत होतं आणि त्या मतांनुसारच ते जगले.
ते बाळकृष्ण दाखवत एखाद्या लहान बाळाप्रमाणे प्रत्येकाच्या मनात घर करत असत. ते कृष्ण-राधा युगल दाखवत असताना प्रत्येकाच्या मनात प्रेम निर्माण करत असत. ते योगीश्वर कृष्ण दाखवताना रसिक प्रेक्षकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करत असत. त्यांच्या प्रत्येक भावभंगिमेतून ते रसिक प्रेक्षकांना त्या त्या ठिकाणी, त्या त्या प्रसंगी घेऊन जात असत. त्यांचा कार्यक्रम बघत असताना रसिक प्रेक्षक मनातून कधी वृंदावनात जाऊन पोहोचायचे, त्यांचं त्यांना कळायचं नाही. ते रंगून जाऊन, कृष्णमय होऊन जाऊन नृत्य करत असत. नृत्य ही त्यांच्यासाठी कधीच केवळ एक कला नव्हती, ती त्यांची साधना होती आणि या साधनेत ते सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्या समवेत घेऊन जात असत.
महाराजजींनी कथकमध्ये अनेक प्रयोग केले आणि पारंपरिक कथकला त्यांनी नवीन पिढीशी आणि त्यांच्या आशाआकांक्षांशीदेखील जोडलं. ‘श्री कृष्ण निरतत थूँगा थूँगा त्राम दिग दिग तक थरी..’ हे त्यांचं गीत आजच्या पिढीत अतिशय प्रचलित आहे आणि त्यावर अनेक कलाकारांनी नृत्य प्रस्तुतीदेखील दिली आहे.
आपण गुरू कोणाला मानतो? जो आपल्याला योग्य पथावर चालण्यास प्रवृत्त करेल, जो आपल्याला एखाद्या विषयाच्या/कलेच्या पलीकडे जाऊन ज्ञान देईल आणि आपल्याला संपूर्ण आयुष्य काढण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग होईल. महाराजजी अशा अनेक एकलव्यांचे द्रोणाचार्य आहेत, ज्यांनी आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराजजींकडून नृत्याचे धडे घेतले आहेत, जे आजही महाराजजींचे व्हिडिओ पाहून शिकताहेत, त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या बोलांवर, गाण्यांवर नृत्य करताहेत!
महाराजजींचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक खूप मोठी शिकवण आहे. त्यांनी अनेक सिनेमांच्या गाण्यांवर कोरिओग्राफी केली आहे, बाजीराव मस्तानी आणि देवदास त्याची प्रमुख उदाहरणंं. महाराजजींची कला ही बंदिस्त नव्हती, त्यांनी जुन्याचा मान राखत, जुन्याला पुढे नेत नव्याला देखील प्रोत्साहन दिलं, जोपासलं आणि या दोन्हीचा अतिशय सुरेख असा संगम दिसून आला. जुनं आणि नवं यांची सांगड घालत महाराजजींनी परंपरा जपली.
कथक नृत्याच्या क्षेत्रात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. लखनऊ शैलीला, या शैलीतील नजाकत आणि सौंदर्याला जगापर्यंत पोहोचवण्यात खर्या अर्थाने महाराजजींचाच खूप मोठा वाटा आहे. तुमच्या-आमच्यासारख्यांपर्यंत कथक त्याच्या शाश्वत रूपात पोहोचलं ते महाराजजींमुळेच.
महाराजजींचं नृत्य हे देहापलीकडचं नृत्य होतं. स्त्री-पुरुष या सर्वापलीकडे जाऊन त्यांचे भाव असायचे. त्यांच्या हावभावांमधून आपल्याला खरोखरीच कृष्ण भेटायचा आणि राधासुद्धा, त्यांच्या नृत्यातून खरंच विद्युल्लतेचा भास व्हायचा आणि पावसाचे थेंब आपल्यालाही जाणवायचे. त्यांच्या हस्तकांमधून रामाचं धनुष्य आणि कृष्णाची बासरी आपल्याला खरोखरीच दिसायची. त्यांनी दिलेला हा एक खूप मोठा वारसा आहे, जो त्यांचे शिष्य आणि त्यांना बघून तयार झालेले अनेक एकलव्य आता पुढे नेणार आहेत.
महाराजजी अनंतात विलीन झाले, त्या वेळचं दृश्य बघण्यासारखं होतं. देवालाही हेवा वाटावा असं हे दृश्य होतं. महाराजजींच्या शिष्यांनी कथकच्या बोलांच्या माध्यमातून त्यांना शेवटची आदरांजली दिली आणि तिथे आभाळही नतमस्तक झालं.
महाराजजी तर गेले, मात्र ते मागे सोडून गेले आहेत कलेचा एक खूप मोठा वसा.. तो तुमच्या-आमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांनी आणि त्याहूनही अधिक माझ्यासारख्या अनेक कथक कलाकारांनी आता पुढे न्यायचा आहे. कथकच्या प्रत्येक बोलातून, लखनऊ घराण्याच्या प्रत्येक हावभावातून आणि कृष्णाच्या प्रत्येक लीलेतून महाराजजी झळकतील. त्यांचा आवाज, त्यांची कला, कथक क्षेत्रातील त्यांचं काम चितंरन राहील आणि हेच शाश्वत सत्य आहे!
महाराजजींना माझं सादर नमन!
घुंगरांचा आवाज हरपला,
आणि मंच पोरका झाला।
नटराजाच्या चरणी
मोहन नतमस्तक झाला!
थांबले मृदंग पखवाज
थांवली पावले आज!
थांबले तबल्याचे बोल
थांबले सर्वही साज!
शब्द झाले मौन
सर्वदिशांना दिसे तम।
बिरजू गेले निघून
आणि हरवली आज सम!
आणि हरवली आज सम!