परशुराम गंगावणे यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या साह्याने जनजागृतीचे अनेक कार्यक्रम सातत्याने केले आहेत. याच कार्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने त्यांना कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथीसाठी गुरू म्हणून नियुक्त केले आहे. परशुराम गंगावणे 12 वर्षांचे असताना त्यांचे वडील गेले. तेव्हापासून त्यांनी या कलेचे जतन करण्याचा निर्धार केला आणि गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ तो पाळलाही आणि आज निरंतर पाळतही आहे. केंद्र सरकारने याचीच दखल घेऊन त्यांना यंदाचा पद्मश्री किताब दिला आहे.
पद्म गौरव लेखमालेत या वेळी आपण व्रतस्थ चित्रकथी संग्राहक परशुराम गंगावणे यांच्या कार्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ कलावंत परशुराम गंगावणे यांना केंद्र सरकारने यंदाचा ‘पद्मश्री’ सन्मान जाहीर करून, व्रतस्थपणे काम करणार्या या कलाकाराची दखल घेतली आणि संपूर्ण कोकण परिसर आनंदित झाला आहे.
परशुराम गंगावणे हे कोकणातील कुडाळजवळ पिंगुळी गुढीपूर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन करणारे ज्येष्ठ कलावंत आहेत. परशुराम गंगावणे यांनी सुरू केलेले ‘ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम व आर्ट गॅलरी’ म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारचे पहिलेच संग्रहालय आहे. पंधरा वर्षांपूर्वी एका गोठ्यात सुरू झालेले हे संग्रहालय आणि त्याचा व्याप आता बराच वाढला आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून परशुराम गंगावणे यांनी ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककलांचे म्हणजे कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, पोतराज, वाद्यगोंधळ, डोना, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बैल या सर्व कलांचे जतन केले आहे.
कळसूत्री बाहुल्यांच्या साह्याने त्यांनी जनजागृतीचे अनेक कार्यक्रम सातत्याने केले आहेत. याच कार्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने त्यांना कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथीसाठी गुरू म्हणून नियुक्त केले आहे. ‘चित्रकथी’ या कलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजाश्रय होता, मात्र काळाच्या ओघात ही कला मागे पडत गेली. परशुराम गंगावणे 12 वर्षांचे असताना त्यांचे वडील गेले. तेव्हापासून त्यांनी या कलेचे जतन करण्याचा निर्धार केला आणि गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ तो पाळलाही आणि आज निरंतर पाळतही आहे. खरे तर हा निर्धार तडीपार नेणे सोपे नव्हते. अनेकदा खायची भ्रांत पडली, हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, प्रसंगी अवहेलनाही सोसावी लागली, वीस वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात पाय जायबंदी झाला, तरीही या कलेवरची त्यांची निष्ठा अजिबात ढळली नाही. मात्र आज एवढ्या वर्षांनी त्यांच्या तपश्चर्येला फळ आले आहे. आज महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात या कलेची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
परशुराम गंगावणे स्वत: अशिक्षित असले, तरी चित्रकथी या लोककला प्रकारातील त्यांचा अभ्यास सखोल आहे. परशुराम गंगावणे यांची कलांगण नावाची संस्था असून या संस्थेद्वारे ते पर्यटकांसाठी चित्रकथीचे आणि बोलक्या बाहुल्यांचे खेळ करतात. त्यांच्या घरी चित्रकथीचा पिढ्यानपिढ्यांचा वारसा आहे. त्यांचे दोन चिरंजीव एकनाथ, चेतन आणि कन्या गीता त्यांच्या या कला सादरीकरणात मदत करत आहेत.
चित्रकथी या लोककलेला राजाश्रय मिळाल्यापासून ठाकर समाजाने ही लोककला चालू ठेवलेली आहे. ठाकरांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून पिंपळाच्या पानांवर चित्रे काढायला सुरुवात केली. सुरुवात करताना यामध्ये रामायणातील आणि महाभारतातील कथांवरील चित्रे होती. रामायणातील, महाभारतातील कथा या गंगावणे कुटुंबाच्या पद्धतीने सादर होतात. या कथा पूर्वी ठाकर भाषेत सादर व्हायच्या. या सादरीकरणातील रामायण-महाभारताच्या कथा रूढ कथेपेक्षा वेगळ्या असतात. पिंपळाच्या पानावरील चित्रे आणि बाहुल्या हे दोन्हीही प्रकार ठाकर समाजामध्ये रूढ होते. सुरुवातीला सावंतवाडीच्या खेमराज सावंत महाराजांनी या कुटुंबाला 12 बाय 18चा पेपर बनवून दिला आणि या अशा पेपरांवर ते चित्रे काढू लागले. राजाने त्यांना आश्रय दिला. हाताने तयार पेपरवर ते चित्रे काढू लागले. अरण्यकांड, सुंदरकांड, बालकांड अशी रामायणातील प्रकरणे पाडून त्यांनी चित्रांच्या पोथ्या तयार केल्या. आज अशा चित्रांचे जवळपास बावन्न संच उपलब्ध आहेत.
रात्री दहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत एक पेपर ठेवून रात्रभर कथानक सांगितले जाते. प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असते, त्या मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवसांत राजाच्या निर्देशाने चित्रकथीचे कार्यक्रम सुरू ठेवले गेले. ही परंपरा आजही कायम आहे. हे कार्यक्रम करताना तंबोरा ही निशाणी असते. वीणा, टाळ, डमरू ही वाद्येदेखील साथीला असतात. तंबोरा घेऊन घरमागणी केली जाते. ‘आणा गो बाई काहीतरी माउली इला माउलीकडे इलो, हा आणा गे बाई काहीतरी देवाचा निशाणा इलो’ असे म्हणत घरोघर जाऊन धनधान्य मागितले जाते. महिला भात किंवा कोकम जे काही असेल, ते सूप भरून दान देतात. दरम्यान राजाश्रय संपल्यानंतर हे सगळे बंद झाले आणि एकेकाळी जे दान म्हणून मिळायचे, त्यातला सन्मान संपला आणि गंगावणे कुटुंबावर भिक्षेकरी होण्याची वेळ आली. काही क्षणी त्यांना सामाजिक मानसन्मानही मिळेनासा झाला होता. नंतरच्या काळात मात्र कुडाळच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये चित्रकथी कार्यक्रम करण्याचा मान त्यांना देण्यात आला.
पूर्वी चित्रकथ्यांची दहा-बारा घरे होती. आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठाकर समाजाची लोकसंख्या साडेचार हजार इतकी आहे. आता सहसा कोणी हे चित्रकथी करत नसल्याने अगदी बोटावर मोजण्याइतके लोक आहेत, जे अजूनही चित्रकथी दाखवतात. आता मुले चित्रकथी दाखवतात, कारण जुने लोक तर आता राहिले नाहीत. परशुराम गंगावणे यांनी त्यांची कला मर्यादित न ठेवता ते लहानांपासून मोठ्यापर्यंत ज्यांना आवड आहे त्यांना शिकवतात. ते अनेक शिबिरे घेतात. अनेक प्रसिद्ध संस्थांमध्ये त्यांचे सत्कार झाले आहेत. आज पिंगुळी गुढीपूर, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे ते स्थायिक झाले असून चित्रकथीतील त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.
जनजागृतीचे संशोधन करण्यासाठी अनेक अभ्यासू सिंधुदुर्गला येत असतात. आतापर्यंत फ्रान्सचे इयॉन लिंच, लंडनचे टॉम, सायमन, ऑस्ट्रेलियाची जेनिफर, अॅलेक्समोरा, केंब्रीज यूकेची उमा फोस्टिस, जर्मनी - तुवाइलायन कॅरीयसवायन, डॉ. सुयी लारनिंग, हॉलंड - मरिना अशा सुप्रसिद्ध परदेशी फोटोग्राफर्ससह किम मेक्सिको येथील डायगो दिहानीने तर या कला पॅरिस वेरनिक पोल्स कलांगणमध्ये पाच दिवस थांबून ठाकर कलेबद्दल परिपूर्ण माहिती घेतली. सध्या तो या दुर्मीळ कलेवर संशोधन करत आहे. अनेक शाळांच्या सहली, तसेच पीएचडी करणारे अभ्यासक परशुराम गंगावणे यांच्या संग्रहालयाला भेट द्यायला येत असतात. आता गंगावणे यांची मुले हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गंगावणे आज 65 वर्षांचे आहेत. ‘पद्मश्री’ सन्मानानंतर त्यांच्या मनात आज केवळ कृतार्थतेची भावना आहे. अशा या व्रतस्थ व्यक्तीला सादर नमन आहे. यांच्या कार्याची आपल्याला सतत ओळख राहावी याचसाठी हे लेखन आहे, कारण ही माणसे खरेच देवदुर्लभ आहेत.