नसीरुद्दीन शाह, सरकारची चूक काय?

विवेक मराठी    15-Sep-2021
Total Views |
माध्यमे ही समाजमनाचा आरसा असतात, त्यामुळे समाजाला काय पाहिजे हे लक्षात आल्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टी बदलू पाहत आहे, याची जाणीव नसिरुद्दीन शाह यांना असेलच. तरीही केंद्र सरकारच्या भूमिकेवर ते प्रश्न उपस्थित का करत आहेत? या प्रश्नांची दोन उत्तरे असू शकतात - एक म्हणजे गेली काही दशके हिंदी चित्रपट क्षेत्र म्हणजे आपली खाजगी वतनदारी आहे असे मानणार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.

Naseeruddin Shah_1 &

एका दूरचित्रवाहिनीवर मुलाखत देताना नसीरुद्दीन शाह यांनी सरकारवर निशाणा साधला. भारतीय चित्रपट उद्योगात दीर्घकाळ काम करणार्‍या या अभिनेत्याच्या मनात साचलेले गरळ या निमित्ताने माध्यमांसमोर आले आहे. आपल्या मुलाखतीत ते म्हणाले, "फिल्म इंडस्ट्रीला आता सरकारकडून त्यांच्या विचारांचं समर्थन करणारे सिनेमा बनवण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. सरकारच्या कामगिरीचं कौतुक करणारे सिनेमा बनवले जातात. त्यांना फंडिंगदेखील केलं जातं. तसचं जर ते थेट प्रचार करणारे सिनेमा असतील, तर त्यांना क्लीन चीट देण्याचं आश्वासनही सरकारकडून दिलं जातं.” या कामाची तुलना नसीरुद्दीन शाह यांनी नाझी जर्मनीशी केली. ते म्हणाले, “नाझी जर्मनीमध्ये असं होत होतं. उत्तम सिनेनिर्मिती करणार्‍या फिल्ममेकर्सना नाझी विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमा बनवण्यासाठी सांगितलं जायचं. माझ्याकडे याचा सबळ पुरावा नसला, तरी सध्या ज्या प्रकारचे मोठे सिनेमे येत आहेत, यावरून आपण अंदाज घेऊ शकतो.” असे नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत. आपल्या मुलाखतीतून शाह यांनी भारत सरकारची नाझीशी तुलना केली आहे.
 
शाह यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे. कारण सरकार यशस्वी आहे, त्यांच्या योजना यशस्वी होत असून त्याला लोकसहभाग आणि स्वीकार प्राप्त होतो आहे. चित्रपटातून समाजमनाचे प्रतिबिंब प्रकट होते. जनतेच्या भावभावना आणि सामाजिक, मानसिक बदलांची नोंद अशा माध्यमातून घेतली गेली पाहिजे आणि ती घेताना 'राष्ट्र प्रथम' हीच भूमिका असली पाहिजे. असे असेल, तर मग अशा चित्रपट निर्मितीवर आणि सरकारी अनुदानावर नसीरुद्दीन शाह यांना आक्षेप का? 'आझाद काश्मीर'च्या घोषणा देणारे, दहशतवादी, घुसखोर यांचे समर्थन करणार्‍या चित्रपटांची निर्मिती बंद होऊन जर आपल्या देशाच्या प्रगतीचे कलात्मक चित्रण करण्याला नसीरुद्दीन शाह यांचा विरोध का आहे. याचा विचार केला पाहिजे.
साधारणपणे १९७६ साली प्रदर्शित झालेला 'मंथन' हा चित्रपट नसीरुद्दीन शाह यांच्या कारकिर्दीतील दुसरा चित्रपट आहे. गुजरातमध्ये यशस्वी झालेल्या श्वेत क्रांतीचे चित्रण या चित्रपटात असून या चित्रपटाचा नायक नसीरुद्दीन शाह यांनीच साकारला आहे. वर्गिस कुरियन यांनी गुजरात राज्यात जो यशस्वी प्रयोग केला, तोच या चित्रपटातून देशभर पोहोचला होता आणि त्यांच्या निर्मितीसाठी सरकारी अनुदान देण्यात आले होते. तेव्हा नसीरुद्दीन शाह यांनी कोणताच आक्षेप घेतला नव्हता. २०१४पर्यंत असे अनेक चित्रपट विविध राज्यभाषांतून प्रदर्शित झाले आहे, तेव्हाही आक्षेप घेतला गेला नव्हता. मग आताच ही मळमळ का?

Naseeruddin Shah_2 & 
 
 
२०१४च्या आधीच्या चित्रपटांचा एक ठरलेला फॉर्म्युला होता. एक अजेंडा होता. हिंदू, हिंदू धर्म, हिंदुत्व यांना बदनाम करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीचा वापर करून घेतला जात होता आणि अशा चित्रपटात नसीरुद्दीन शाह कामही करत होते. आता परिस्थिती बदलली आहे. २०१४नंतर बदललेल्या मानसिक, सामाजिक, आर्थिक, सामरिक परिस्थितीचे चित्रण हिंदी चित्रपटातून होताना दिसते आहे. आपण जे अनुभवतो, तेच चित्रपटात दिसत असल्यामुळे प्रेक्षकही असे चित्रपट डोक्यावर घेतात. मागील पाच-सहा वर्षांतील तीन हिंदी चित्रपटांचा विचार केला, तरी भारतीय समाजमन आणि चित्रपट जगत काय व्यक्त करत आहे हे लक्षात येते. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधानांनी 'स्वच्छ भारत अभियान' राबवण्याचा संकल्प केला. गावखेड्यापर्यंत हे अभियान पोहोचले. या विषयावर 'टॉयलेट एक प्रेमकहानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. गावखेड्यातील विशेषतः महिलांच्या शौचालयाचा प्रश्न या चित्रपटातून मांडला. थोडी विनोदी शैली असूनही चित्रपट गाजला, तो केवळ सरकारी मोहिमेचे समर्थन केले म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन समस्या योग्य प्रकारे मांडली म्हणून. या चित्रपटाला अनुदान देण्यात आले असेल तर त्यात काय चुकीचे आहे? दुसरा चित्रपट 'मिशन मंगल' याचा विचार करता येईल. भारतीय संशोधक आणि त्यांची कल्पकता, २०१४आधीच्या सरकारची उदासीनता आणि भारताची सामरिक शक्ती विकासित करण्याचे ध्येय या चित्रपटातून मांडले होते. हाही चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला होता. भारतीय संशोधकांनी केलेल्या अतुलनीय कामावर चित्रपट काढायचा नाही, तर मग कशावर काढायचा? या प्रश्नाचे उत्तर नसीरुद्दीन शाह यांना कधीतरी द्यावे लागेल. तिसरा चित्रपट पठाणकोट, पुलवामा येथील दहशतवादी हल्लानंतर भारतीय सैन्याने अल्पावधीत घेतलेल्या बदल्याचे कलात्मक चित्रण करतो. पठाणकोट, पुलवामा हल्ल्यात मरण पावलेल्या सैनिकांविषयी भारतीय मनात असलेल्या श्रद्धाभावाला व्यक्त करण्यासाठी संधी उपलब्ध करून देतो.

 
Naseeruddin Shah_3 &
 
केवळ या तीन चित्रपटांचा विचार केला आणि या तिन्ही चित्रपटांच्या निर्मितीसाठी सरकारने अर्थसाहाय्य केले असे गृहीत धरले, तरी त्याबाबत आक्षेप घेण्यासारखे काय आहे? हे एकदा नसीरुद्दीन शाह यांनी स्पष्ट केले पाहिजे. फुटीरतावादी, नक्षली, प्रांतीयवाद, मुस्लीम तुष्टीकरण, लव्ह जिहाद, लँड जिहाद असे विषय घेऊन निर्माण होणार्‍या चित्रपटांना सरकारने अनुदान द्यावे, असे नसीरुद्दीन शाह यांना वाटते काय?


Naseeruddin Shah_4 &

माध्यमे ही समाजमनाचा आरसा असतात, त्यामुळे समाजाला काय पाहिजे हे लक्षात आल्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टी बदलू पाहत आहे, याची जाणीव नसिरुद्दीन शाह यांना असेलच. तरीही केंद्र सरकारच्या भूमिकेवर ते प्रश्न उपस्थित का करत आहेत? या प्रश्नांची दोन उत्तरे असू शकतात - एक म्हणजे गेली काही दशके हिंदी चित्रपट क्षेत्र म्हणजे आपली खाजगी वतनदारी आहे असे मानणार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. इतिहासाचे, संस्कृतीचे विकृतीकरण म्हणजेच कलात्मकता असे मानणारे आता अडगळीत जाऊ लागले आहेत. दुसरे म्हणजे आपली संस्कृती काय? आपले संस्कार काय? याविषयी सजग झालेला समाज आज चित्रपट पाहतो आहे. संस्कार आणि संस्कृती या दोन शब्दांना पर्यायवाचक शब्द आहे 'राष्ट्रभक्ती' आणि सरकार 'राष्ट्रभक्ती'च्या आणि राष्ट्रभक्तांच्या पाठीशी उभे राहणार नाही, तर कुणाच्या?
 
रवींद्र गोळे
९५९४९६१८६०