आसाममध्ये महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी लखिमी बरुआ ह्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी ‘कोनोक्लोटा महिला सहकारी बँकेची’ स्थापना केली. महिलांना पैशाची बचत आणि आर्थिक सुरक्षा याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले आहे. त्यांनी आसाममधील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
आसाममधील जोरहाट येथे 71 वर्षीय समाजसेविका लखिमी बरुआ ह्यांनी फक्त महिलांसाठी पहिली सहकारी बँक स्थापन केली आहे. देशाच्या या भागात म्हणायला गेले तर विकास आता सुरू झाला आहे. पण जिथे आपण राहतो, त्या भागात कार्य करण्याच्या हेतूने लखिमी बरुआ बाहेर पडल्या आणि या अनोख्या कार्यासाठी त्यांना ह्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मुळातच महिलांमध्ये निसर्गाकडून काही देणग्या पुरुषांपेक्षा जास्त आहेत. स्त्रीमध्ये सहनशीलता, नावीन्य, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, संघप्रेरणा, स्मरणशक्ती हे गुण निसर्गत:च अधिक आहेत. स्त्री सर्जनशील आहे, कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांना दिला आहे. स्त्री मुळातच सबला आहे. जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले असले, तरी भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाजाच्या व कुटुंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. पण दुर्गम भागात काम करत असताना आज महिलांना स्वत:च्या पायावर उभे करत आर्थिक क्षेत्रात स्वावलंबी करण्याचे कार्य पद्मश्री लखिमी बरुआ करत आहेत.
आसामी महिलांसाठी ‘लक्ष्मी माँ’ म्हणून त्या परिचित आहेत. शून्यातून लखिमी बरुआ ह्यांचा प्रवास सुरू झाला. आसाममध्ये महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी लखिमी बरुआ ह्यांचे नाव आदराने घेतले जाते. लखिमी बरुआ ह्यांनी 1998मध्ये ‘कोनोक्लोटा महिला सहकारी बँकेची’ स्थापना केली. त्यांनी महिलांना रोजगार देत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. जोरहाट, शिवसागर, गोलघाट ह्या जिल्ह्यांतील अनेक महिला सहकारी बँकेच्या सदस्य आहेतच, त्या उत्पन्न वाचवीत, सुलभ कर्ज घेत त्याचे हफ्ते फेडत आहेत. ह्या बँकेत येणार्या जवळपास 75%हून अधिक महिला निरक्षर आहेत.
लखिमी बरुआ ह्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईचे निधन झाले. वडिलांनी सांभाळ केला, पण पुढे तारुण्यात असताना वडील सोडून गेले आणि त्यानंतर नातेवाइकांनी त्यांची जबाबदारी घेतली आणि त्यांनीच महिलांसाठी आर्थिक सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. कठीण परिस्थितीतसुद्धा त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आणि आठ वर्षे संघर्ष करत आज सहकार क्षेत्रात आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
लखिमी बरुआ ह्यांना जाण होती की, अत्यंत गरीब स्त्रियांना पैशांच्या अभावामुळे किंवा विविध महिला गटांमध्ये गुंतवणुकीत पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना कुठल्या समस्या येऊ शकतात आणि त्या जाणिवेतून त्यांनी बँक सुरू केली. बहुतेक महिलांना तर बँक कशी चालते ह्याबद्दलही माहिती नव्हती. पण परिस्थितीत बदल होत गेला. लखिमी बरुआ ह्यांनी महिलांसाठी सहकारी बँक स्थापन करण्यासाठी 1990 साली भारतीय रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला. 1998मध्ये मंजुरी मिळाली आणि दोन वर्षांनंतर जोरहाटमध्ये 8.50 लाख रुपयांच्या आणि 1500 महिला सदस्यांच्या आरंभिक गुंतवणुकीसह पहिली सहकारी बँक स्थापन झाली.
बँकेत केवळ महिलाच काम करतात आणि आता ‘कोनोक्लोटा महिला सहकारी बँके’च्या चार शाखा आहेत. 21 नियमित कर्मचारी आणि 34,000 खातेदार आहेत आणि बर्यापैकी खातेदार महिला आहेत. 21 महिला कर्मचारी सरकारी योजनांचा लाभ ह्या निरक्षर महिलांना सांगतात आणि महिला शून्य शिल्लक किंवा 20 रुपये इतक्या कमी रकमेने आपली खाती उघडून आतापर्यंत त्यांनी 8,000हून अधिक महिलांना आणि सुमारे 1200 महिला बचत गटांना कर्ज दिले आहे. गेल्या वर्षातील त्यांची उलाढाल जवळपास 15 कोटीहून अधिक होती आणि 30 लाख रुपये नफा होता. अत्यंत गरीब महिलांच्या ठेवी ह्या बँकेमार्फत चालतात.
खासदार किंवा आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी संबंधित सरकारी योजना किंवा त्या संबंधित कामे त्यांच्या बँकेमार्फत केल्या जातात. अधिकाधिक महिलांना मदत मिळावी, हाच त्यांचा उद्देश आहे. आसाममधील 33 जिल्ह्यांत प्रत्येकी कमीत कमी एक शाखा उघडण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आसामसारख्या दुर्गम आणि सुदूर भागात सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक क्षेत्रात स्वावलंबी करणार्या लखिमी बरुआ ह्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत.