‘तीनशे वर्षं! तीनशे वर्षं महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापांखाली वेदनांनी कण्हत होती, गार्हाणं गात होती. सह्याद्रीच्या कडेकपारी, सिंधुसागराच्या लाटा आणि संतसज्जनांचे टाळमृदंग नियतीच्या गाभार्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करत होते..’
अशा हृदयाला भिडणार्या भाषेत ज्यांनी शिवकालीन इतिहास आपल्यासमोर जिवंत केला, ते आदरणीय बाबासाहेब पुरंदरे येत्या 29 जुलैला शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही’ हे वाक्य ते केवळ बोलले नाहीत, तर तसेच ते जगले आहेत, जगत आहेत. आज शंभराव्या वर्षातही शिवचरित्राचे अनेक नवनवे तपशील ते जमवत आहेत व अनेक नव्या योजनांनी आजही त्यांचं मनगट स्फुरण पावत आहे!
29 जुलै 1922 या पुण्यतिथीला नागपंचमीला आकाशात शुभनक्षत्रांची युती झाली असणार खास! या दिवशी पुरंदर्यांच्या सरदार घराण्यात जन्मलेला पुत्र हे महाराष्ट्राला दुसर्यांदा पडलेलं शिवस्वप्नच!
भरल्या गोकुळासारख्या पुरंदर्यांच्या वाड्यातलं सारे सण, उत्सव, कुळाचार भरभरून साजरे करणारं आणि कीर्तनं, प्रवचनं, दर्जेदार संगीत यांनी समृद्ध असं बालपण त्यांना लाभलं. वडिलांचं व्यक्तिमत्त्व एखाद्या रुबाबदार पेशवाई सरदारासारखं तर होतंच, शिवाय त्यांचा प्रचंड व्यासंग आणि अतिशय उत्तम कथनशैली याचा बाबासाहेबांवर फार प्रभाव पडला. पुढे प्लेगमुळे पुणं सोडून सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे गावात राहायला आल्यावर वडिलांचं बोट धरून सिंहगड प्रथम सर केला आणि तिथून जे इतिहासाचं वेड लागलं, ते कायमचंच!
बाबासाहेबांच्या तेजस्वी व्यक्तित्वाची जडणघडण करताना शिवरायांना बनवताना वापरलेली मातीच ईश्वराने वापरली असावी. ही महाराष्ट्राची माती पहिल्या पावसानंतर जी घमघमते, त्यात स्वराज्यास्थापनेकरता सांडलेल्या रक्त व घामाचा गंध आहे, हे बाबासाहेबांना जाणवलं. शिवरायांचं चरित्र हा अभ्यासाचा, जीवनध्यासाचा विषय बनला. हा ध्यास मग त्यांना सह्याद्रीच्या कानाकोपर्यात घेऊन गेला. शिवाजी महाराजांच्या चरित्राचं निर्दोष व तथ्याधारित लेखन करण्याकरता त्यांनी महाराजांचे सारे किल्ले पुन्हा पुन्हा पाहिले, महाराजांच्या पायाखालून गेलेल्या सार्या वाटा स्वत: तुडवल्या. पन्हाळगड ते विशाळगड महाराज रात्रीच्या अंधारात कसे गेले असतील हे समजून घेण्याकरता त्याच तिथीला, त्याच मार्गाने भर पावसात जाणं, आग्रा ते राजगड हा महाराजांच्या सुटकेचा मार्ग 85 दिवसांत पायी चालत पूर्ण करणं आणि तानाजी चढला असेल तिथून सिंहगडाचा कडा चढून जाणं असले वेडेचारही अतिशय श्रद्धेने केले. मात्र या शिवभक्तीचा पाया केवळ भाबड्या श्रद्धेचा नव्हता. शालेय वयापासूनच भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊन तिथले इतिहासाचे ग्रंथ वाचणं, बखरी आणि कागदपत्रं अभ्यासणं सुरू होतं. अत्यंत तल्लख स्मरणशक्तीचं वरदान असल्यामुळं सारे तपशील, सनावळ्या, तारखा तोंडपाठ असतात, हे आज वयाच्या शंभरीतही आपण अनुभवू शकतो. तब्बल वीस वर्षं हा अभ्यास सुरू होता.
मॅट्रिकच्या परीक्षेनंतर बाबासाहेब संघाचे प्रचारक म्हणून नगर जिल्ह्यात गेले. तिथून परतल्यानंतर स.प. महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी घेतली, पण परत 48च्या संघबंदीच्या सत्याग्रहामुळे येरवडा तुरुंगात रवानगी झाली. पुढे दादरा नगरहवेली मुक्तिसंग्रामातही सक्रिय झाले. या सार्या धावपळीत माजगावकरांच्या घरातल्या निर्मलाताई बाबासाहेबांच्या जीवनयज्ञाची इष्टदेवता बनून आल्या. या अवलियाचा संसार सांभाळत त्यांनी ‘वनस्थळी’सारखं स्वतंत्र मोठं कामही उभं केलं.
येरवड्याच्या कारावासात बाबासाहेब शिवाजी महाराजांचा प्रेरक इतिहास सांगत असत. हे सारं लिहून काढावं, असा विचार त्याच वेळी मनात रुजला. मनात असलेल्या प्रखर शिवभक्तीला देवी सरस्वतीच्या कृपेने लाभलेल्या अमोघ वक्तृत्वशैलीची आणि प्रसन्न ओघवत्या शब्दकळेची जोड मिळाली आणि बाबासाहेबांच्या शिवचरित्र व्याख्यानमालेने आणि राजा शिवछत्रपती या अजोड शिवग्रंथाने इतिहास घडवला!
सातत्याने साठ वर्षं, सुमारे बारा हजाराहून अधिक व्याख्यानं बाबासाहेबांनी दिली आहेत, तर ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या पाच लाखावर प्रती विकल्या गेल्या आहेत. ‘शिवकल्याणराजा’ ही संगीतमय शिवचरित्राची नितांतसुंदर भेट बाबासाहेबांनीच आपल्याला दिली आहे. आणि जगातील दुसर्या क्रमांकाचं महानाट्य हा विक्रमही ‘जाणता राजा’च्या भव्य प्रयोगांमुळे रचला गेला आहे.
पण केवळ या आकडेवारीत मावणारं वा बाबासाहेबांच्या पंचवीसेक पुस्तकांमध्ये सामावणारं बाबासाहेबांचं कर्तृत्व नव्हेच! बाबासाहेबांचं खरं योगदान आहे ते मराठी मनांमध्ये असलेली मरगळ झटकून तिथे अस्मितेची, पराक्रमाची, पुरुषार्थाची शिवज्योत चेतवण्याचं. बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या उगवत्या पिढ्यांच्या हाती शिवचरित्रातून मिळणारं संजीवक अमृत दिलं.
बाबासाहेबांच्या तोंडून शिवचरित्र ऐकताना मराठी मनं पेटून उठली आणि केवळ इतिहासाच्या अभ्यासाचीच नव्हे, एकूणच जीवनात कर्तृत्व गाजवण्याची प्रेरणा शिवचरित्राने नि:संशय अनेकांना दिली. इतिहासातून घेतलेला बोध व्यवहारात, वर्तमानात वापरून भविष्य सुंदर करता आलं पाहिजे. त्याकरता इतिहास वाचण्याची प्रेरणा व दृष्टीही बाबासाहेबांनी दिली.
‘शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसें असे।’ असे शिवरायांचे गुण व्याख्यानात फक्त बोलण्यापुरते नसतात, तर ते जगून दाखवायचे असतात. खरा शिवभक्त कसा असतो, कसा वागतो, बोलतो याचं उदाहरण बाबासाहेबांनी घालून दिलं आहे. हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगत असताना त्यांनी कुठेही अकारण धर्मद्वेषाचा स्वर उमटू दिला नाही. जातीपातीचा विचार तर त्यांना कधी शिवलाच नाही. बाबासाहेब ज्या ज्या निवासस्थानी राहिले, ते ठिकाण सर्वसामान्यांकरता पुरंदरेवाडाच असे. कुणीही अडल्यानडल्याने बेधडक जाऊन आपलं गार्हाणं बाबासाहेबांसमोर सांगावं, जात-धर्म न पाहता बाबासाहेबांनी त्याला मदत करावी असं सतत सुरू आहे. कितीतरी विद्यार्थी बाबासाहेबांकडे राहून शिकून गेलेत. कितीकांच्या अन्य आर्थिक अडचणी दूर झाल्यात, किती जणांना वैद्यकीय मदतीमुळे जीवनदान मिळालं याची गणतीच नाही! पण ‘अहंकाराचा वारा न लागो चित्ता’ याचं भान त्यांनी सदैव जपलं आहे.
बाबासाहेबांच्या वागण्याबोलण्यातली अदब, नम्रता त्यांच्या वयाला व लौकिकाला खरं तर न शोभेल अशी आहे!
बाबासाहेबांचं घर, त्यातला दिवाणखाना म्हणजे जुन्या काळातली महाराजांची सदरच भासावी. ‘जाणता राजा’चे प्रयोग पूर्ण बहरात सुरू असताना काही काळ बाबासाहेबांच्या पार्किंगमध्ये चक्क घोडे बांधलेले असत. बैठकीच्या खोलीत तलवारी, चिलखतं, जुनी भांडी, समया यांची कलात्मक मांडणी. बाबासाहेबांमध्ये संशोधकाबरोबरच कलाकारही दडलेला आहे, त्यामुळे त्यांची सगळी कामं अतिशय नेटकी, सुबक आणि अत्यंत मन:पूर्वक केलेली असतात. अतिशय गोष्टीवेल्हाळ असल्याने बोलताना एकातून एक हकीकतींची मालिका सुरू राहते, पण वेळेचं भान अत्यंत पक्कं असतं.
बोलताना महाराजांच्या इतिहासातला कुठलाही बारीकसा संदर्भ आला, तरी त्यांच्यात एक आगळं स्फुरण चढतं. डोळे लकाकू लागतात, चेहर्यावर लहान मुलासारखं निरागस हसू उमलतं नि ते उत्साहाने सांगू लागतात, “अहो, परवाच एका लहान गावातल्या एका वाड्यात एक कागद आहे असं समजलंय.. तिकडे जाऊन तो पाहून यायचंय..” किंवा “मला फार महत्त्वाची माहिती मिळालीय. महाराजांच्या घोड्याचं नाव समजलंय. आता त्याला योग्य ती पुष्टी मिळाली की असे नवे संदर्भ घालून मला नवी आवृत्ती काढायची आहे!” शंभरीतही असं नवनवं संशोधन व नवनवे प्रकल्प यात बाबासाहेब मनापासून रमलेले दिसतात.
बाबासाहेबांच्या सहवासात आलेली कुणीही व्यक्ती बाबासाहेबांच्या चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाने भारावून जाते. त्यांच्याबद्दल किती बोललं, किती लिहिलं तरी कमीच वाटतं.
‘राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्राचं कौतुक करताना आचार्य अत्रेंच्या लेखणीची तहानही एका अग्रलेखात शमली नव्हती. त्यांनी या अद्भुत पुस्तकावर दोन अग्रलेख लिहिले. अत्रे म्हणाले होते, ‘हे शिवचरित्र सार्या महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचत सुटावे इतके सुंदर व बहारदार झाले आहे!’ आणि खरंच तसंच घडलं!
पुलंनी ‘गणगोत’मध्ये लिहिलं, ‘बाबासाहेबांनी इतिहास अभ्यासला पंडितासारखा व मांडला मात्र गद्य शाहिरासारखा. इतिहास हा माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया, लेकीसुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत तो पोहोचला पाहिजे’ असं म्हणणारा हा आगळा इतिहासकार!’
छत्रपतींच्या वारसदार सुमित्राराजे भोसले यांनी बाबासाहेबांना ‘शिवशाहीर’ ही उपाधी बहाल केली व लिहिलं, ‘शिवचरित्रलेखन व आपली व्याख्यानमाला सुरू होण्याआधीच्या काळात इतिहासाच्या पुस्तकातदेखील महाराजांचा उल्लेख एकेरी होत असे. आपल्या प्रभावाने आता कुणी तसे करू धजत नाही!’ केवढी मोठी पावती आहे ही!
शिवसृष्टी
अवघा महाराष्ट्र ज्यांच्या कर्तृत्वाला असा मिरवतो आहे, ते बाबासाहेब मात्र स्वत:विषयी म्हणतात, “शिवशाहीचा इतिहास महाराष्ट्ररसात, महाराष्ट्राच्या कडेकपारावर गात हिंडणारा मी एक इतिहासाचा लहानसा विद्यार्थी आहे. इतिहास हा पाचवा वेद, पण मी वेदांती नाही. विद्वान इतिहासकार नाही. अभ्यासपूर्वक इतिहास गात फिरणारा मी गोंधळी आहे.”
‘शिवसृष्टी’सारख्या त्यांच्या मनातल्या कल्पना साकार होण्याच्या मार्गावर आहेत. त्याकरता निदान सव्वाशे वर्षांचं निरामय, चालतं-बोलतं-हसतं-खेळतं आयुष्य आई भवानी त्यांना निश्चित देणार आहे. नव्या पिढीला आपला वैभवशाली इतिहास, परंपरा, कला सारं एकत्र अनुभवता यावं, अशी त्यांची इच्छा साकार झालेली आपण पाहणार आहोत.
..जुन्या पद्धतीच्या, नक्षीदार दरवाजे-कमानी-सज्जे असलेल्या वाड्यात आपण जातो आहोत.. सडा-रांगोळ्या-तोरणं-गालिचे यांनी वास्तू सजली आहे.. पैठण्या-शालूंची सळसळ करत, दागिने लेवून मराठमोळ्या सुवासिनी केशरवेलचीचं पन्हं देऊन स्वागत करत आहेत.. आणि पूर्ण पारंपरिक पोशाखात व वातावरणात कलावंत कीर्तनं-भारुडं-गोंधळ-पोवाडे यांचा दंगा मांडत आहेत! तिथल्याच एका आसनावर रेलून, सुरेखसं वेलबुट्टीचं जाकीट परिधान करून हा इतिहासमहर्षी अत्यानंदाने हे वैभव अनुभवतो आहे.. इतिहासाच्या अंधारवाटा धुंडाळून आम्हाला दाखवलेलं आनंदवनभुवनाचं स्वप्न महाराष्ट्रदेशात साकार झालेलं पाहतो आहे.. बाबासाहेबांचा सव्वाशेवा वाढदिवस असा व्हायला हवा आहे!
आई भवानी, एवढंच मागणं तुझ्या चरणी आहे!