रांगोळी हे भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य. मूळ 64 कलाप्रकारांमध्ये याची गणना होते, इतका जुना. महाराष्ट्रासह 14 राज्यांत आजही रांगोळीची परंपरा टिकून आहे.
रांगोळी हे भारतीय संस्कृती-परंपरेचं एक वैशिष्ट्य. ही परंपरा कधीपासून आपल्या संस्कृतीत रुजली?
मांगल्य आणि सौंदर्य याचं प्रतीक म्हणजे रांगोळी. यजुर्वेदाच्या काळात ज्या वेळी यज्ञसंस्थेचा जन्म झाला, तेव्हापासून रांगोळीची परंपरा आहे. तेव्हा तिला रांगोळी असं संबोधन नसलं, तरी यज्ञाभोवती रांगोळी काढली जायची. तिसर्या शतकात पौष्कर संहितेमध्ये लिखित स्वरूपात प्रत्यक्ष रांगोळीचे नाही, पण मंडलांचे (पद्मोदर) उल्लेख आढळतात. यज्ञ, बिंब, कुंभ आणि मंडल अशा चार मार्गांनी माणूस मोक्षप्राप्तीची आराधना करतो, अशी आपली समजूत आहे. यज्ञपूजा यजुर्वेदाच्या काळापासून सुरू झाली. तिचं प्रमाण कालौघात कमी झालं. नंतर बिंबपूजा - म्हणजे मूर्तिपूजा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. कुंभपूजा - कलशपूजन आजही गुजरात, राजस्थान या भागात केलं जातं. आपल्याकडेही सत्यनारायण पूजेसारख्या विधींमध्ये कलशपूजनाला - पंचतत्त्वांच्या पूजेला आजही महत्त्व आहे. मंडलपूजा मात्र आज तितकीशी प्रचलित नसली, तरी त्यातल्या भद्र आणि स्वस्ति या कल्याणकारी रचनांमधूनच रांगोळी विकसित होत गेली.
रांगोळी काढण्यामागे भक्तीची भावना असली, तरी प्रांतानुसार रांगोळी काढायची साधनं बदलली. त्यामुळेही रांगोळीत वैविध्य आलं. त्याविषयी थोडक्यात...
1130च्या सुमारास राजा सोमेश्वराने प्रथम रांगोळीविषयी लिहिलं आहे. त्याच्या मते विद्ध, अविद्ध, भाव असे चित्रांचे तीन प्रकार पडतात. नारदसंहितेमध्ये चित्रांचे तीन प्रकार म्हटले आहेत. भौम्य - भूमीवरचा, कुड्यक - भिंतीवरचा आणि ऊर्ध्वक - छतावरचा. त्यातली भौम्य म्हणजे भूमीवरची चित्रकला. त्यामध्ये रांगोळी येते. रांगोळीचे रसचित्र आणि धूलिचित्र असे दोन प्रकार सांगितले आहेत.
बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ हा जो सगळा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे, तिथे तांदूळ भिजत घालून त्याची पेस्ट करून काडीला कापूस लावून रांगोळ्या काढल्या जातात. या टिकतातही खूप आणि अलंकारिक पद्धतीने काढताही येतात. प. बंगालमधली अल्पना, केरळची कोलम हे त्यातले अनेकांना माहीत असणारे प्रकार.
आणि धूलिचित्राच्या - म्हणजे पावडर फॉर्ममधली रांगोळी कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या पश्चिम किनारपट्टीच्या भागात काढली जाते. या रांगोळीत प्रतीकात्मकता जास्त आहे. मूळ प्रकार हे दोनच. फुलापानांच्या, रंगीत मिठाच्या वा अन्य साधनांपासून जी रांगोळी काढली जाते, ते सगळे आधुनिक प्रकार.
देवापुढे, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढण्याची परंपरा गावपातळीवर आजही बर्यापैकी टिकून आहे. शहरांमधूनही सणासुदीला, काही समारंभाच्या निमित्ताने रांगोळी काढली जाते. चैत्र महिन्यात काढलं जाणारं चैत्रांगण हे एक आपलं वैशिष्ट्य. यामागचा विचार काय? ही परंपरा किती जुनी असावी? त्यात एकूण किती प्रतीकांचा अंतर्भाव असतो?
तेराव्या शतकात, महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रामध्ये चैत्रांगणाचा उल्लेख आढळतो. मराठी साहित्यातलं पहिलं लिखित वाङ्मय म्हणूनही त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहेच. घराचं अंगण शेणाने नीट सारवलेलं असावं. या सारवण्याने जमिनीला जो खरखरीतपणा येतो, त्यातून काही वाईट कंपनं तयार होतात, ती नाहीशी करण्यासाठी रांगोळी घालावी, असा लीळाचरित्रात उल्लेख आहे.
चैत्रांगणात 64 प्रतीकांचा अंतर्भाव असतो. या रांगोळीची सुरुवात बिंदूपासून होते, ज्याला आपण ठिपका म्हणतो. ठिपका म्हणजे ठप्प करणं, थांबवणं. दाराबाहेर काढलेली रांगोळी घरात प्रवेश करणार्या अतिथीच्या मनावर काही शुभ संस्कार करते. त्याच्या मनात जर नकारात्मक भावना असेल, तर ती रांगोळीमुळे बदलू शकते. आडवी रेषा ही पृथ्वीरेषा समजली जाते. ती निसर्गदत्त रेषा आहे. मात्र उभी रेषा ही निसर्गदत्त नाहीये. उभी रेषा ही आकाश रेषा आहे. ‘तुम्ही काही पेरलं तर उगवेल’ असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. स्वस्तिक हे गतिमानतेचं प्रतीक आहे. उलट स्वस्तिक हे नकारात्मक ऊर्जा नाहीशी करणारं समजलं जातं. म्हणून ते सुलट्या स्वस्तिकाबरोबर आवर्जून काढलं जातं.
गोपद्म हे रांगोळीतलं महत्त्वाचं शुभचिन्ह आहे. आईनंतर गाय असं मानणारी आपली संस्कृती आहे. गायीचं माणसाच्या आयुष्यातलं महत्त्व, तिची उपयुक्तता याविषयीची कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करण्यासाठी गोपद्मांना चैत्रांगणात स्थान दिलं आहे.
चैत्रांगण हे अंगणात किंवा गच्चीवर काढलं जातं. हे चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया - अक्षय्य तृतीया काढलं जातं. त्यामागे भूमिवंदन हा विचारही आहेच. तिच्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. हा नवसर्जनाचा कालखंड असतो. हिंदू पंचांगात या महिन्याला विशेष महत्त्व असल्यानेही चैत्रांगणाची परंपरा सुरू झाली असावी.
शस्त्र आणि शृंगार यांच्या प्रतीकांचा मिलाफ चैत्रांगणात दिसतो, हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. जमिनीचा मैत्री उपनिषदामध्ये ‘अन्नरूपी परब्रह्म’ म्हणजे विष्णू असा उल्लेख आहे. अन्नरूपी म्हणजे पृथ्वी, म्हणजेच ती लक्ष्मीही. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता असल्याने पृथ्वीच्या रक्षणासाठी विष्णूची शंख-चक्र-गदा-पद्म चैत्रांगणात असतात. त्यामुळे रांगोळीच्या माध्यमातून भूमातेला वंदन करताना या शस्त्रांनाही वैशिष्ट्यपूर्ण प्रतीकात्मकता लाभली आहे. त्याने चैत्रांगणाचं बळही वाढलं आहे.
या शस्त्रांबरोबर स्त्रीतत्त्वाचं सात्त्विक सौंदर्य खुलवणार्या बाह्य आभूषणांचा अंतर्भावही चैत्रांगणात होतो. या सर्वातून जाणवणारी प्रमाणबद्धता हे आपल्या संस्कृतीचं आणखी एक वैशिष्ट्य. जी जी गोष्ट प्रमाणबद्ध असते, तिला देवत्व प्राप्त होतं असं आपल्याकडे समजलं जातं.
‘आत्म्याची रांगोळी’ या नावाचं तुमचं फेसबुक पेज आहे. सर्वच विशुद्ध कलांचं नातं आत्म्याशी - परमात्म्याशी असतं, अशी आपली धारणा आहे. तुम्हांला या नावातून नेमकं काय सुचवायचं आहे?
संत तुकारामांचा एक अभंग आहे,
देहाचा गं देहपाट, आत्म्याची गं रांगोळी।
सावळ्या विठ्ठला, तुझ्या आसनाजवळी॥
हा अभंग मला फार आवडतो. पूर्ण शरणागतीची ही कल्पना आहे. माझी रांगोळीप्रती हीच भावना आहे. या कलेच्या माध्यमातून मी स्वतःला सापडत गेले, असं मला वाटतं. फेसबुक पेजला हे नाव देण्यामागे हा विचार आहे.
रांगोळी जेव्हा पारंपरिक माध्यमात रेखाटली जाते, तेव्हा ती अल्पायुषी ठरते. म्हणूनच तिला ‘क्षणिका’ असंही एक नाव आहे. ही उणीव दूर करण्यासाठी तुम्ही वेगळी माध्यमं वापरून, रांगोळीला दीर्घायुषी केलंत. त्याविषयी सांगावं.
‘क्षणिका’ या नावाप्रमाणे अल्पायुषी असलेल्या या सुंदर कलेला दीर्घायू कसं करता येईल, असा विचार चालला होता. त्यासाठी अजंठ्याच्या गुंफांमधील चित्रांपासून प्रेरणा घेत, त्यातील ताज्या टवटवीत चित्रांमागची कारणं लक्षात घेत, 7-8 वर्षांच्या प्रयत्नांनंतर मी आणि ताओ आर्ट्समधील माझे पार्टनर चित्रकार सुनील बलकवडे ड्राय फेस्को पद्धतीने रांगोळी कॅनव्हासवर आणण्यात यशस्वी झालो.
या चित्रपद्धतीत पृष्ठभाग तयार करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. यामध्ये पृष्ठभाग तयार करण्यासाठी विहिरीत चुनखडी दोन वर्षं भिजवून तिच्या साक्यापासून भिंतीला गिलावा करतात. गिलावा ओला असतानाच त्यावर रंगवलं की रंग गिलाव्यात आणि गिलावा दगडावर पक्का बसून चित्र पूर्ण होतं. ड्राय फ्रेस्को पद्धतीमध्ये मात्र गिलावा वाळल्यावर चित्र रंगवतात. मूळ तंत्रज्ञानात कालसापेक्ष आवश्यक ते बदल केले. ते यशस्वी झाले असं आज म्हणता येईल. यामध्ये आठ लेयर्सवर काम करावं लागतं. तेव्हा तयार होणारी कलाकृती मूळ रांगोळीपेक्षा अधिक तेजस्वी आणि सुंदर दिसते. माझ्या अतिशय प्रिय कलेला मी या प्रयोगातून दीर्घायुष्य बहाल करू शकले, याचा आनंद शब्दांपलीकडचा आहे.
मुलाखत आणि शब्दांकन - अश्विनी मयेकर