Enter your Email Address to subscribe to our newsletters
नंदिनी नदीला प्रदूषणाच्या आणि अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी, तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काही सुजाण नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, मानवी साखळी करून नाशिककरांचे लक्ष वेधण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या सिडको मंडलाने त्यासाठी पुढाकार घेतला. भाजपाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांची ही संकल्पना होती. या वेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जनजागृती केली. नंदिनी नदीचे सौंदर्यसंवर्धन तर व्हायला हवेच, त्याबरोबरच गोदावरी व तिच्या सर्व उपनद्यांंकडेही असेच लक्ष देण्याची गरज आहे. अरुणा-वरुणा (वाघाडी), गायत्री, सावित्री व मेघा या पाच उपनद्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या असून सरस्वती नदीचे रूपांतर तर नाल्यात होऊन बराचसा काळ लोटला आहे! महत्त्वाचे म्हणजे गोदावरी नदी बारमाही वाहणे आवश्यक आहे.
पाच जूनला ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या औचित्याने झालेल्या या उपक्रमात भाजपा मंडलातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. अंजनेरी ते टाकळी दरम्यान 10 टप्प्यांत हा उपक्रम राबविण्यात आला. उंटवाडी पुलापासून शाहूनगर, यमुनानगर व पुढे आयटीआय पुलापर्यंत आणि सातपूर हद्दीत थेट अंबड लिंकरोडपर्यंत, नदीकाठच्या तिरावर 10-10 फूट अंतर राखून कार्यकर्ते साखळीने उभे राहिले. या संदर्भातील प्रबोधनाचा वैशिष्ट्यपूर्ण मजकूर लिहिलेले फलक प्रत्येकाच्या हातात होते. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. नागरिकांचे लक्ष त्यामुळे वेधले गेले व संदेश प्रभावीपणे पोहोचला. कोरोनाच्या काळातही पुरेशी दक्षता घेऊन एखादा उपक्रम योग्य पद्धतीने कसा राबविता येतो, याचा आदर्श वस्तुपाठच यातून नाशिककरांना मिळाला, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. या उपक्रमासाठी अतिशय नियोजनबद्ध पूर्वतयारी करण्यात आली होती. सर्व कार्यकर्त्यांनी पांढर्याशुभ्र टोप्या परिधान केल्या होत्या, त्यामुळे स्वच्छता व पावित्र्य अधोरेखित झाले. नदीच्या आजूबाजूला असणार्या परिसरात पत्रके वाटून त्यांनाही या मोहिमेत सामील करून घेण्यात आले. नंदिनी नदीतिरी ठिकठिकाणी अक्षरश: कचरा कुंडीची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. अनेक गटारे खुलेआम नदीपात्रात सोडलेली आहेत. मात्र या संदर्भातली जनजागृती हा केवळ एक दिवसाचा जल्लोश न राहता, काम पुढे नेण्याची जबाबदारी संयोजकांनी व महापालिकेने घेतली पाहिजे. दरम्यान महापालिका प्रशासनाने नंदिनी तिरावर संरक्षक भिंत उभारण्याचे ठरविले आहे. तसेच अस्वच्छता, वृक्षतोड करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापौर सतीशनाना कुलकर्णी व मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने दिले आहेत.
लक्ष्मण सावजी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ख्यातनाम जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह नाशिकला आले असताना आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याशी या विषयावर विस्तृत चर्चाही झाली. ती जणू नमामी गोदावरी अभियानाची नांदीच ठरली. नंतरच्या गंगा दशहरा कार्यक्रमात नदीच्या शुद्धिकरणाचा संकल्प केला. ब्रह्मगिरी पर्वतावरून तीर्थकलश आणला. गोदावरी खोरे विस्तृत असून त्याचा अभ्यास करण्यापूर्वी पायलट प्रोजेक्ट म्हणून नंदिनी (नासर्डी ) नदी संवर्धनाचे काम आधी हाती घेतले. गोदावरी शुद्धिकरण मंचाचे राजेश पंडित, भाजपा पर्यावरण मंचाचे उदय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाला मूर्त स्वरुप द्यायचे निश्चित झाले. नंदिनीच्या उगमाजवळ धरण किंवा बंधारा बांधला तर ती बारमाही वाहती राहील. १५ किलोमीटरच्या प्रवासात तिच्यात गटारी, सांडपाणी सोडले जाते. टाकळी येथे नंदिनी नदी गोदावरीला येऊन मिळते. त्या संगमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आरती करण्यात आली. नंदिनीच्या उगम ते संगमादरम्यान लाखो नागरिकांची वस्ती आहे. त्यांनाही या चळवळीत सहभागी करून घेण्यात आले. याचाच पुढचा भाग म्हणून दि.२३ जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी महिला नंदिनीच्या दोन्ही तीरांवर स्थानिक प्रजातींचे वृक्ष लावून नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. 'नमामी गंगे', 'नमामी चंद्रभागा' या उपक्रमांप्रमाणे 'नमामी गोदावरी' हे पुढील ध्येय साध्य करण्याचे स्वप्न आहे. सहा राज्यांमधून वाहणाऱ्या गोदावरीचे खोरे १५ हजार किलोमीटर पसरलेले आहे. आंध्र - तेलंगाणा येथील विद्यापीठात 'गोदावरी गीत' गायले जाते. तसे उगमस्थानी नाशिकमध्ये व्हावे हा आग्रह आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसार गोदावरीतून जलवाहतूक शक्य आहे. मात्र त्यासाठी आधी नदी स्वच्छतेची चळवळ यशस्वी व्हायला हवी.नंदिनी, गोदावरी नद्या खळखळून वाहत्या होवोत ही अपेक्षा सर्वांच्या सहकार्याने निश्चितच पूर्ण होईल असा विश्वास सावजी यांनी व्यक्त केला.