आदर्श गाव निर्माण करणारे श्यामसुंदर पालीवाल

विवेक मराठी    15-May-2021
Total Views |

@सर्वेश फडणवीस

राजस्थानमधील पिप्लंत्री ह्या गावात मुलगी झाली, तर 111 झाडे लावली जातात. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे श्यामसुंदर पालीवाल यांनी करून दाखवले आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा आणि व्यापक विचारांचा सकारात्मक परिणाम पिप्लंत्री गावाच्या रूपाने संपूर्ण जगाला दिसला. भारत सरकारने त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे...


bhushan_3  H x

राजस्थानमधील पिप्लंत्री ह्या गावातील माजी सरपंच श्यामसुंदर पालीवाल ह्यांना ह्या वर्षी अलौकिक समाजकार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने अलंकृत करण्यात आले आहे. आदर्श ग्राम संकल्पना त्यांनी ज्या पद्धतीने साकारली आहे, त्याचे कौतुक आज जगभरात होत आहे आणि देशातील आदर्श गाव म्हणून पिप्लंत्री सर्वमान्य झाले आहे.

श्यामसुंदर पालीवाल नुकतेचकर्मवीरम्हणून कौन बनेगा करोडपतीमध्ये येऊन गेले आहे. अमिताभ बच्चन ह्यांनीसुद्धा त्यांच्या कामाचा गौरव केला आहे, तसेच मन की बातमध्ये नरेंद्र मोदी ह्यांनीसुद्धा त्यांच्या कामाला शाबासकी दिली आहे. त्यांचे कार्य खरे तर सहज सोपे वाटावे असे आहे. आपल्या घरी मुलगी जन्माला आली तर आपण काय करतो? काही जण आनंदित होतात आणि त्या आनंदात मिठाई-पेढे वाटतात, काही जण मुलगीच झाली म्हणून निराश होतात; पण राजस्थानमधील पिप्लंत्री ह्या गावात मुलगी झाली, तर 111 झाडे लावली जातात. ऐकून आश्चर्य वाटेल, पण आजही तिथे मुलीच्या जन्माचे स्वागत 111 झाडे लावूनच केले जाते. ती झाडे सगळे जण एकत्रितपणे जगवतात आणि त्यामुळे एकत्रित येत मुलीच्या शिक्षणाची सोयही केली जाते.

विद्यमान केंद्र सरकारनेबेटी बचाओ, बेटी पढाओहा उपक्रम 2014मध्ये सुरू केला. देशात सर्वदूर या उपक्रमाचे स्वागत झाले. परंतु, पिप्लंत्री गावात त्याआधी कित्येक वर्षे मुलीचा जन्म साजरा करण्याची पद्धत आहे. अनिष्ट रूढी-परंपरा बदलण्यासाठी केवळ धाडस असून उपयोग नाही, तर योग्य विचार आणि त्याची सामाजिक प्रगतीशी सांगड घालता आली पाहिजे, ज्यायोगे केवळ कौटुंबिक पातळीवर हे बदल मर्यादित राहता सामाजिक परिवर्तनाने हे सहज शक्य आहे आणि श्यामसुंदर पालीवाल यांनी आपल्या प्रयत्नातून हेच कार्य सत्यात उतरवले आहे.

खरे तर आज स्त्रीभ्रूण हत्या हा देशासमोर ज्वलंत प्रश्न आहे. राजस्थान प्रदेश आपल्या पुरुषप्रधान संस्कृती, रूढी-परंपरा, हुंडाबळी, बालविवाह यांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे.



bhushan_1  H x

पिप्लंत्री गावामध्येही राजस्थानच्या इतर गावांप्रमाणेच स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण अधिक होते. कुटुंबामध्ये मुलीच्या जन्माबाबत लोक अत्यंत उदासीन होते. श्यामसुंदर पालीवाल ह्यांच्या मुलीचे काही वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले. आपल्या मुलीच्या निधनाने व्यथित झालेल्या श्यामसुंदर पालीवाल यांच्यामुळे परिवर्तनाची नांदी सुरू झाली आणि आज प्रदेशातील चित्र बदलले आहे.

आज पिप्लंत्री गावातील लोकांना समजावून त्यांना प्रसंगी प्रोत्साहन देऊन गावातील घरात मुलीचा जन्म आणि मुलगी का हवी ह्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले आहे. आता पिप्लंत्री गावामध्ये एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला आली की सर्व गावकरी मिळून 21,000 रुपये नवजात मुलीचे पालक 10,000 रुपये असे 31,000 रुपये त्या मुलीच्या नावे मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवतात. याबरोबरच, मुलीचे पालक एक प्रतिज्ञापत्र करतात की ते मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणार नाही. यामुळे, केवळ त्या मुलीच्या भवितव्याची आर्थिक तरतूद केली जात नाही, तर पालकांवरही बंधन येते की त्यांनी आपल्या मुलीला सक्षम करून 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मगच तिचे लग्न करायचे.


bhushan_2  H x

ह्या सगळ्या बदलाला 2006 साली सुरुवात झाली, ज्या वेळी श्यामसुंदर पालीवाल हे गावाचे सरपंच झाले. पिप्लंत्री गावाचा हळूहळू कायापालट होतो आहे. आज पिप्लंत्री गाव हिरवेगार झाले आहे. जवळपास 4 लाखाहून अधिक झाडे गावात आहेत. वाळवंटातील हा बदल श्यामसुंदर पालीवाल ह्यांनी घडवला आहे. पिप्लंत्री गावात आज वर्षाला जवळपास 50हून अधिक मुलींचा जन्म होतो आणि प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत 111 झाडे लावून होते. पिप्लंत्री गावात वड, पिंपळ, आंबा, कडुनिंबाची झाडे दूरदूरपर्यंत पसरली आहेत. त्याबरोबरच झाडांच्या आवतीभोवती कोरफडीची लागवडसुद्धा केली जाते. कोरफडीच्या लागवडीने गावात आर्थिक उद्योगही उदयाला आला आहे. त्यातून गावाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे.

श्यामसुंदर पालीवाल ह्यांच्या दूरदृष्टीचा आणि व्यापक विचारांचा सकारात्मक परिणाम पिप्लंत्री गावाच्या रूपाने संपूर्ण जगाला दिसला. छोट्या पण सातत्याने पूर्ण करण्याच्या विश्वासाने कार्य करणार्या माजी सरपंच श्यामसुंदर पालीवाल यांना निरामय आरोग्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

8668541181