श्यामल नेत्रांची आणि शीतल अशी प्राचीन इजिप्शियन देवता आयसिस. विशेषत: महिलावर्गाला ही देवता आपलीशी वाटे. चाके लावलेल्या नावेच्या पालखीत ही देवता विराजमान करून मागून भक्तिगीते गात मिरवणुका निघत. आपली नियती इतक्या तेज:पुंज देवतेच्या हातात आहे, ही भावना सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देऊन जाई.
वाद्यांच्या गजरात, निशाण आणि अब्दागिर्या घेऊन भक्तिरंगात रंगलेली शोभायात्रा न पाहिलेला भारतीय नागरिक सापडणे अशक्य आहे. आपल्या आराध्य देवाची अथवा देवतेची आरास घेऊन निघणार्या मिरवणुका हिंदवी भक्तिसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. केवळ हिंदूच नाही, तर अन्य धर्ममताचे भारतीय नागरिकसुद्धा कमी-अधिक प्रमाणात अशाच प्रकारे शोभायात्रा काढताना आढळून येतात, कारण श्रद्धा कुठेही असो, भक्तीचे असे दिलखुलास आविष्करण ही आपल्या संस्कृतीची स्मृती आहे.
ऐकून आश्चर्य वाटेल, पण सुदूर युरोपमध्ये प्राचीन रोमन साम्राज्यात इ.स. 54 ते 192 या काळात भक्तीचे असेच आविष्करण करण्याची लाट येऊन गेली होती. आता याला लाट म्हणायचे कारण असे की रोमन बहुदेवतापूजक धर्माची घट्ट पकड असलेले रोम ते ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मपीठ मिरवणारे रोम, या स्थित्यंतरात या कालावधीपूर्वीही असे आविष्करण आढळून येत नाही व पुढेही पार मध्ययुग संपेपर्यंत आढळून येत नाही.
तर या लाटेचे वैशिष्ट्य म्हणजे अशी एक गोष्ट होती, जी भारतीय सहिष्णू मनाला खूप सहजसाध्य वाटेल, पण अन्य बहुतांश देशांत हीच गोष्ट कधी ना कधी कदाचित गुन्हादेखील ठरविली गेली असेल. म्हणजे कोणती हो? अर्थात विभिन्न पंथांच्या देवतांची खुल्या पद्धतीने उपासना करण्याची मुभा.
मग या लाटेस कारण तरी काय? तर सुरुवातीचा एक 40 वर्षांचा अनागोंदीचा कारभार सोडला, तर इ.स. 54 ते 192 या काळात रोमला तुलनेने उदारमतवादी राजे लाभले, त्याचबरोबर आले राजकीय व व्यापारविषयक स्थैर्य. दीर्घ कालावधीनंतर सामान्य रोमन मनुष्यालाही त्याच्या आयुष्याबद्दल शाश्वती वाटू लागली. भय आणि भुकेची भ्रांत मिटली. तो सुखी होण्याची स्वप्ने रंगवू लागला. शांततेच्या काळात मानवी भावभावना वेगळ्या प्रकारे विकसित होतात. राजे, उमराव, सेनाधिकारी यांच्या सामरिक आणि विजिगीषू रोमन देवतांशी त्याला जवळीक वाटेना.
याच वेळी रोमन साम्राज्य लौकिकाच्या शिखरावर होते.राजकीय व्याप्ती तर आडमाप होतीच, त्यातही इजिप्त, ग्रीस, असिरिया, इतकेच काय, तर ज्युडियाचा प्रदेश (आजचा इस्रायल) सर्व 4 प्रदेशांवर रोमन गव्हर्नर्स नेमले गेले होते. हे 4 प्रदेश वेगळे नमूद करण्याचे कारण? कारण हे सर्व प्रदेश 5 प्राचीन धर्ममतांचे जनक आहेत. ग्रीसमध्ये ग्रीक देवदेवतांची रोमपेक्षा जुनी परंपरा उदयास आली होती (हेलेनिक पॉलिथीइझम). इजिप्तमध्ये तर त्याहीपेक्षा जुनी त्यांची वेगळी उपासना पद्धती (इजिप्तचा नेटेरिझम) होतीच. सीरियामध्ये प्राचीन पर्शियन देवतांची उपासना चालू राहिली होती, तर ज्युडियाचा प्रदेश म्हणजे तर यहुदी आणि ख्रिस्ती पंथांची जन्मभूमीच होती. या सर्व उपासना पंथांची रेलचेल ही कधी नव्हे ते खाऊनपिऊन सुखी राहण्याची स्वप्ने रंगवू लागलेल्या सर्वसामान्य मनुष्यासाठी पर्वणी ठरली.
सम्राट आणि त्यांच्या मोहिमा दूरवर रोमन साम्राज्याच्या सीमांवर सतत चालूच असत. व्यापारउदीम वाढल्याने विभिन्न वंशसमूहांचे लोक सातत्याने नजरेस पडत असत. कनिष्ठ स्तरावरील प्रजाजनांना हे स्थलांतरितांचे देव जवळचे वाटू लागले.
श्यामल नेत्रांची आणि शीतल अशी प्राचीन इजिप्शियन देवता आयसिस. विशेषत: महिलावर्गाला ही देवता आपलीशी वाटे. चाके लावलेल्या नावेच्या पालखीत ही देवता विराजमान करून मागून भक्तिगीते गात मिरवणुका निघत. आपली नियती इतक्या तेज:पुंज देवतेच्या हातात आहे, ही भावना सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देऊन जाई.
‘ओम् मित्राय नम:’ या आशयाचा जप रोमन भाषेतसुद्धा झाला असणार आहे, बरे का! कसे काय? अहो, ‘मित्र’ नावाची सूर्याचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून मानली जाणारी प्राचीन पर्शियन देवता रोममध्येदेखील अफाट लोकप्रिय झाली होती. पुरुषवर्गावर या देवतेचा पगडा इतका जबरदस्त होता की रांगडे रोमन सैनिकसुद्धा भूमिगत उपासना स्थळांवर तिचा जयजयकार करत. या देवतेसमोर बैलांचा बळी चढवत असत. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी ‘मॅग्ना मातेर’ म्हणजेच विश्वाच्या मातेचा उत्सव साजरा केला जाई. सर्व गावकरी गावापासून ते या देवतेचे वास्तव्य असलेल्या टेकडीपर्यंत नृत्य करत जात आणि पुढे 12 दिवस हा उरूस चालू राही.
खरे तर याच काळात उदयास आलेला सर्वात नवा उपासना पंथ होता ख्रिस्ती उपासना पंथ. याचे अनुयायी अनेक आघाड्यांवर झगडत होते. रोममध्ये काही आपत्ती आली की या समुदायावर त्याचे खापर सररास फोडले जाऊन त्यांचा छळ केला जाई. पण ख्रिस्ताचे सदेह स्वर्गारोहण झाले हे ठामपणे मानणारे आणि केवळ तोच आमचा तारणहार आहे याची खात्री पटलेले हे अनुयायी 3 शतके तग धरून राहिले. इ.स. 312मध्ये प्रत्यक्ष एका रोमन सम्राटानेच, कॉन्स्टन्टाइन प्रथम याने ख्रिस्ती उपासना पंथ स्वीकारला आणि युरोपच्या धार्मिक भवितव्याला कलाटणी मिळाली.
मात्र दीडेकशे वर्षांतच ही संमिश्र उपासना पद्धती आणि त्यांचे उत्सव उतरणीस लागले. इ.स. 378नंतर रोमन साम्राज्य अस्ताकडे वाटचाल करू लागले होते. इ.स. 410ला तर व्हिसीगॅाथ्स नावाच्या जर्मेनिक टोळ्यांनी रोमवरच भयंकर हल्ला चढवला आणि रोमन दरारा संपुष्टात आणला. इजिप्त, ग्रीस, असिरिया आणि ज्युडियाचा प्रदेश यांच्यावरचा रोमचा अंमल संपला आणि त्यांच्यावर बायझेंटाइन साम्राज्याचे वर्चस्व निर्माण झाले. पण बायझेंटाइन साम्राज्याचा राजधर्म व समाजधर्म ख्रिस्तीच असल्याने पुन्हा अशी संमिश्र पंथांची लाट येण्याची शक्यता धूसर होऊन गेली होती. पुढे इ.स. 7व्या शतकात अरबस्तानात इस्लामचा उदय झाला. इजिप्त, सीरिया, पर्शिया इस्लामच्या अनुयायांनी व्यापला, तर ग्रीसने बायझेंटिनियन ख्रिस्ती उपासना पंथाची कास धरली. अशा तर्हेने युरोपीय व मध्य-पौर्वात्य प्रादेशिक सत्तांमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा अध्याय सुरू झाला, जो अगदी आधुनिक काळापर्यंत - म्हणजे पार 20व्या शतकापर्यंत चालू राहिला.
आता पुन्हा वळू या आपल्या भारताकडे. जागतिक पातळीवरील शेकडो साम्राज्यांचे उदय व अस्त आणि त्याचे वेळोवेळी खोलवर झालेले परिणाम या सर्वांना भारतीय लोकदेखील पिढ्यानपिढ्या सामोरे गेलेच. पण असे होऊनही नानाविध उपासना पद्धतींचे सहअस्तित्व आपण कधीही पुसून टाकले नाही. ‘सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति’ ही भावना असेल किंवा ‘सर्वं खलु इदं ब्रह्म’ ही भावना असेल, भारतीय समाज हा हजारो वर्षांपासून परमात्मा या त्यांच्या सर्वोच्च शक्तीप्रती अत्यंत आश्वस्त आहे. त्याला अन्य उपासना पद्धतींकडे पाहून अजिबात असुरक्षित वाटत नाही आणि म्हणूनच इथे कधीही त्यांचा उच्छेद करण्याचे अमानवी प्रकार घडले नाहीत.
समाजमानस या दृष्टीने पाहिले, तर उदारमतवादी राजे, राजकीय स्थैर्य आणि सामान्य मनुष्याला आयुष्याबद्दल वाटू लागलेली शाश्वती या तिन्ही गोष्टी अन्य प्राचीन संस्कृतींच्या तुलनेत सर्वात आगोदर आणि प्रदीर्घ कालावधीसाठी इथे रुजल्याचाच तर हा परिणाम नसेल?