आपल्या अष्टपैलू गायकीने रसिकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करणार्या आशा भोसले यांना नुकताच राज्य सरकारचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाला. हिंदी चित्रपट क्षेत्रात व्यग्र असूनही आशाताईंनी मराठी संगीत क्षेत्रात अफाट काम केले, हे अतिशय विशेष आहे. संगीतावरील प्रेम आणि मराठी भाषेविषयी असणारी आत्मीयता यामुळे असेल, भावगीतांच्या राज्यातील त्या सम्राज्ञी ठराव्यात अशी त्यांची कारकिर्द आहे. आशाताईंच्या मराठी गीतसृष्टीतील योगदानाचा वेध घेणारा लेख.
आयुष्याचा प्रवास चालताना, कितीही समर्थ असो, जगातील प्रत्येक माणसाच्या मनात ही सोबतीची तहान असते. कुणीतरी आपल्या समजून घेईल, ज्याच्यापाशी आपल्याला मन मोकळे करताना आश्वस्त वाटेल, जिथे सुखदुःखाचा आलेख मांडताना संकोच होणार नाही अशा सोबतीची तहान. आशा भोसले यांच्या सुरांनी या तृष्णेला अमर केले.
‘महाराष्ट्रभूषण’ आशा भोसले यांचा जीवनप्रवास सोपा नव्हता. अवघ्या नऊ वर्षांच्या होत्या, तेव्हा वडिलांचे निधन झाले. आर्थिक चणचण होती. त्यात घरच्यांच्या मनाविरुद्ध त्यांनी लग्न केले. वय अवघे चौदा वर्षे. पंधराव्या वर्षी त्या आई झाल्या आणि संसाराला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांना काम करणे भाग पडले. शिक्षण तर अपुरे होते. गाता गळा आणि पंडित दीनानाथ मंगेशकरांचा सांगीतिक वारसा हीच त्यांची पुंजी.
संगीत इंडस्ट्रीमध्ये जीवघेणी स्पर्धा होती, त्यातच घरातील मोठ्या बहिणीने आपल्या कर्तृत्वाने त्यात सर्वोच्च स्थान मिळवले होते. तिच्याबरोबर होणार्या तुलनेचे ओझे आणि त्यातून बाहेर पडून स्वतःची निर्माण केलेली स्वतंत्र ओळख हे सर्वच अतिशय अभिमानास्पद. त्या स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आल्या. आयुष्य कठीण असू दे, स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी विराण आयुष्यात वसंत फुलवला.
‘जिवलगा’ ही साद त्यांच्या आवाजात ऐकताना त्यांच्या आयुष्याचा प्रवास आठवतो. एवढ्या काट्याकुट्यातून चालताना आशाताईंनी ही हाक घातली असणारच, पण ती स्वतःला. त्यांनी आपल्या क्षेत्रात गाठलेली उंची पाहिली की हे गीत व्याकूळ करत नाही, तर प्रेरणादायक ठरते.
हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात लता आणि आशा या भगिनींनी राज्य केले. लतादीदींची जागा आशाताईंनी घेतली नसेल, पण त्यांनी आपली स्वतःची स्वतंत्र जागा निर्माण केली. आवाजातील लवचीकता, वैविध्य, मेहनत करण्याची तयारी यामुळे अनेक नामांकित संगीतकारांनी आपल्या चाली त्यांच्याकडे सोपवल्या आणि त्यांनी या गीतांचे सोने केले. मुजरा, गझल्स, पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव असलेली क्लब साँग्ज, शास्त्रोक्त संगीतावर आधारभूत गीते, प्रणयगीते, भजन या सर्वांना त्यांच्या आवाजाने न्याय दिला.
हिंदी चित्रपट क्षेत्रात व्यग्र असूनही आशाताईंनी मराठी संगीत क्षेत्रात अफाट काम केले, हे अतिशय विशेष आहे. संगीतावरील प्रेम आणि मराठी भाषेविषयी असणारी आत्मीयता यामुळे असेल, भावगीतांच्या राज्यातील त्या सम्राज्ञी ठराव्यात अशी त्यांची कारकिर्द आहे. त्यांनी गायलेली भावगीते ऐकली, तर अष्टपैलू या शब्दाला समानार्थी म्हणून आशाताईंचा उल्लेख करावा लागेल एवढी त्यांच्या गाजलेल्या वैविध्यपूर्ण भावगीतांची संख्या असेल.
स्वरातील माधुर्याची ओळख झाली लतादीदींच्या ‘नीज माझ्या नंदलाला’ या अंगाई गीताने, पण हे सप्तसूर आपल्याही गळ्यातून निघावे असे प्रत्येक छोट्या मुलाला वाटले, त्याला कारणीभूत होते ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ हे गीत. बालगीतात आणि महत्त्वाचे म्हणजे पाऊस गाण्यांत हे गीत अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे.
काळा काळा कापूस पिंजला रे,
ढगांशी वारा झुंजला रे,
आता तुझी पाळी, वीज देते टाळी,
फुलव पिसारा नाच
प्रसन्नतेचा स्थायिभाव, स्वरांची उत्साही फेक, त्यांचा सच्चेपणा ही जी आशाताईंच्या आवाजाची लक्षणे आहेत, त्यांचा प्रत्यय या गीतात येतो. ‘नाच’ या शब्दाच्या शेवटी छोटीशी हरकत आहे. ती एवढी सहज आहे की देवबाप्पा या मराठी चित्रपटात एक चिमुरडी हे गीत गाते, तेव्हा ते तिच्या गळ्याला विसंगत वाटत नाही. ‘झुक झुक झुक झुक अगीन गाडी’, ‘दादा मला एक वहिनी आण’, ‘दादाचं घर बाई उन्हात’ ही आणखी काही उदाहरणे. खेळकर आणि नादमय अशी ही गाणी लहान मुलांच्या गळ्यातूनसुद्धा सहज येतात. सोपेपणा, सहजपणा ही जी बालगीतांची वैशिष्ट्ये आहेत, त्याचा बाज आशाताईंनी मस्त पेलला आहे.
लहान मुलांची गीते आणि किशोरवयीन मुलांची गाणी ह्यात सूक्ष्म फरक आहे. किशोरवयातील मुलांना समज असते, पण त्यांच्यातील निरागसपणा अजून टिकून असतो. मुलीला पाहायला येणे आता कमी झाले आहे. त्यातली गंमत, उत्सुकता, आतुरता आता कालबाह्य झाली आहे, तरीही ‘ताई मला सांग, कोण येणार ग पाहुणे’ हे गीत अजूनही आपली मोहिनी टिकवून आहे.
झाली झोकात वेणी-फणी
नवीन कोरी साडी नेसुनि
ताई माझी जरी दिसे देखणी
गोरे गोरेपान, तेही आहेत सुंदर म्हणे
झोकात हा शब्द अगदी ठसक्यात म्हणताना, देखणी ताई आता सासरी जाईल या कल्पनेने पुढचा ‘देखणी’ हा शब्द त्यांनी हळुवार गायला आहे आणि नंतर आपल्या भावजींचा गोरापान रंग सांगताना आवाजात आलेला खट्याळपणा. हे गीत काही चित्रपटात नाही, पण आशाताईंनी त्याला चित्रमय केले.
रूढी, परंपरा यामुळे दबलेल्या स्त्री-पुरुषांच्या भावनांना भावगीतांनी वाट करून दिली. शृंगाररस म्हणजे सर्व रसांचा राजा. संस्कृत नाटकांपासून ते आताच्या नाटक, चित्रपट, लेखन या सर्व माध्यमांत हा विषय हाताळला गेला आहे. शृंगाररसाची अभिव्यक्ती होते ती नायक आणि नायिका यांच्या प्रणयातून. या प्रणयाचेसुद्धा अनेक पैलू आहेत. त्यात राग आहे, वासना आहे, रुसवा आहे, विरह आहे, मत्सर आहे नि स्पर्धासुद्धा आहे. या सर्व छटा आशाताईंनी आपल्या भावगीतांतून दाखवल्या आहेत.
संध्याकाळच्या कलत्या उन्हात, सावल्या गडद होताना प्रियकराला संकेतस्थळी भेटण्यास जाणारी धिटुकली युवती ‘वासकसज्जा’ भेटते ती ‘सहज सख्या एकटाच येई सांजवेळी’ या गीतात. मिलनाची वेळ टळून गेलेली आहे. वचन देऊनही प्राणसखा न आल्याने चिंतित असलेली नायिका म्हणजे ‘विरहोत्कंठिता.’ हे गीत आहे ‘जिवलगा कधी रे येशील तू.’ नायकाला स्वतःच्या प्रेमाने वश करून, मुठीत ठेवणारी, मनस्विनी, समर्पित नायिका ‘स्वाधीनभर्तृका’ सापडते ‘या मिलनी रात्र ही रंगली’ या गीतात, तर प्रियकराने वचन मोडल्याने क्रोधित झालेल्या ‘खंडिते’चा संताप व्यक्त होतो तो ‘नको रे बोलूस माझ्याशी’ या सुरांत. प्रियकराने फसवल्याने हतबल झालेल्या ‘विप्रलब्धा’चे गीत ‘असा मी काय गुन्हा केला?’ तर स्वतःच्या सुंदरतेचा अभिमान बाळगणारी ‘कलहांतरिता’ झिडकारते ते ‘जा जा ना कान्हा छेडू नको भारी रे’ अशा तोर्यात. वाट पाहणार्या ‘प्रोषितभर्तृके’चे गीत ‘येणार नाथ आता’ आणि शेवटची धीट, रसिक, कुणालाही न जुमानता प्रियकराला साद घालणार्या ‘अभिसारिके’चे गीत आहे ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना.’ सहज म्हणून अष्ट-नायिकांना आठवले, तर आशाताईंची ही केवढी सुंदर गाणी आठवली. विविध भावनांचा असा सांगीतिक आविष्कार हा केवढा मोठा ठेवा आहे.
प्रसिद्ध गायक-संगीतकार सुधीर फडके म्हणतात, “जगातील कुठलाही संगीतप्रकार नाही, जो आशाच्या गळ्यातून तंतोतंत, अस्सल आणि तितक्याच ताकदीने उतरत नाही. तिच्या गळ्याला धार आहे, वरच्या पट्टीत ती सहज गाते. शास्त्रोक्त गायनाचा पायाही तयार असल्याने हे गाणे आणखीनच परिणामकारक होते.” नवल नाही, आशाताईंनी सुधीर फडके यांची तब्बल 192 गीते गायली आहेत.
वानगीदाखल त्यांचीच काही गीते देते.
मल्हार रागात बांधलेले ‘आज कुणीतरी यावे’, धानी रागातील ‘येणार नाथ आता’, पिलू रागातील बैठकीची लावणी ‘का हो धरिला मजवर राग’. ‘जिवलगा कधी रे येशील तू’ ही तर रागमाला आहे. ‘हवास तू’, ‘मी आज फूल झाले’ ही उडत्या चालीची गीते, ‘विकत घेतला श्याम’, ‘थकले रे नंदलाला’ ही कृष्णगीते, ‘कुणीतरी बोलवा दाजिबाला’, ‘बाई मी पतंग उडवीत होते’ ह्या फडावरच्या लावण्या केवढी विविधता आहे.
प्रत्येक गीताचा ढंग वेगळा आहे. ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले’ हे गीत तर किती मुलींनी आपल्या दाखवायच्या कार्यक्रमात गायले असेल.
सुधीर फडके यांचा सांगीतिक वारसा चालवणार्या श्रीधर फडके यांनी 1998 साली ‘ऋतू हिरवा’ या अल्बमची निर्मिती केली. सुंदर शब्द, संगीत आणि सूर यांचा उत्तम मेळ या अल्बममधील गीतांत आहे. आशाताईंच्या स्वच्छ, निर्मळ आणि पारदर्शक आवाजाची जोड मिळाल्याने, ‘जय शारदे वागीश्वरी’, ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’, ‘सांज ये गोकुळी’, ‘झिणी झिणी वाजे बीन’ ह्या गीतांना रसिकांनी डोक्यावर घेतले.
कधी अर्थाविण सुभग तराणा,
कधी मंत्राचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा
शरणागत अतिलीन
झिणी झिणी वाजे बीन।
शब्दाला अर्थाची मर्यादा असते, पण सूर मात्र अमर्यादित असतो. परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी तर नितळ, अथांग सुराचीच गरज आहे. मराठी भावगीताला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी एक वेगळे वळण दिले. गोड आणि सुलभ चाली असलेल्या भावगीतांच्या जमान्यात त्यांनी दिलेल्या चाली मात्र अनवट आणि गायला अवघड आहेत. आशाताईंबद्दल ते म्हणतात, “आशाताईंचा आवाज आता फक्त नैसर्गिक राहिला नाही. त्याला अफाट मेहनतीची जोड आहे. त्यामुळे तिच्या इच्छेप्रमाणे ती आवाज रगडू शकते.” याचे प्रतिबिंब ‘तरुण आहे रात्र अजुनी’ या गीतात दिसते. मिलनाला आसुसलेल्या प्रेमिकेची ही कैफियत. गझल या प्रकारात गुंफल्यामुळे यातील शृंगार भडक नाही, तर उत्कट आहे. त्याची तरलता आशाबाईंनी स्वरात उतरवली आहे. तार सप्तकातील पंचमावरून षड्जाकडे ज्या सहजतेने त्या खाली येतात, तेव्हा ‘वाह’ असा शब्द नकळत बाहेर पडतो. तसेच ‘मी मज हरपून बसले’ हे गीत दीनानाथ मंगेशकर यांच्या यमनमधील चिजेवर आधारले आहे. त्यातल्या भावाशी एकरूप होऊन आशाताईंनी या गीताला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.
स्त्रीची जी समाजातील प्रतिमा आहे, मग ती कुटुंबवत्सल असो किंवा मुक्त, या नजरेतून सुरेश भटांनी स्त्रीकडे पाहिले नाही. त्यांच्या कवितेतून आपल्याला भेटते ती सखी, प्रणयिनी. ती लाजरी, बुजरी नाही. आपल्या शारीरिक अपेक्षा सांगताना तिला संकोच वाटत नाही.
केव्हातरी पहाटे, उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे, हरवून रात्र गेली.
पहाटे जराशा सुटलेल्या मिठीतून ती हळूच निसटून गेली. इथे ती म्हणजे प्रेयसी, चोरट्या प्रणयाचे हे वर्णन. ‘सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे’ यातले कोवळेपण, त्या तरुण मुलीचे स्त्री होण्याच्या आधीचे असलेले निरागसपण आणि काहीतरी वेगळे घडत असल्याचे जाणतेपण आशाताईंनी किती नजाकतीने गायलेय.
वडिलांचा नाट्यसंगीताचा ठेवा त्यांनी प्राणपणाने जपला. ‘युवती मना दारुण रण’, ‘विलोपले मधुमिलनात या’, ‘शूरा मी वंदिले’, ‘कठीण कठीण कठीण किती’ ही गाणी कठीण. त्यातील ताना घेताना त्यांनी नाट्यसंगीताचा बाज तर ठेवलाच, तसेच वडिलांच्या गानकलेला उजाळा देऊन मुलीचे ऋण फेडले. ‘कठीण कठीण कठीण किती’ हे गाणे तर त्यांनी सांगीतिक नाटकात अभिनय केल्यासारखे गायले आहे. थोडी तक्रार, थोडा राग आणि खूप कौतुक हे सर्व त्यांच्या आवाजातून किती हुबेहूब निघाले आहे.
या एकाच लेखात आशाताईंच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणे अशक्य आहे. इथे तर फक्त मराठी गीतांचा विचार केला आहे. पण आशाताईंनी भारतीय भाषांतच नाही, तर बॉय जॉर्जबरोबर इंग्लंडचे थिएटर गाजवलेले आहे. सुरुवातीच्या काळात आशाताई लतादीदींच्या प्रभावाखाली होत्या. पन्नाशीच्या सुरुवातीच्या दशकात शमशाद बेगम आणि गीता दत्त यांचा दबदबा होता. त्या सावलीमधून वाट काढून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. उपजत प्रतिभेच्या, कमावलेला आवाजाच्या आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले. आवाजाची अफाट रेंज आणि कोणत्याही जॉनरचे गीत गाण्याचा आत्मविश्वास आणि अष्टपैलुत्व. क्वचितच असा कलाकार जन्माला येतो.
आयुष्यात आलेली असंख्य वादळे पचवून त्या हसतमुखाने जीवनाला सामोर्या गेल्या. एखाद्या व्यक्तीला आमंत्रण द्यावे तसे त्यांनी सुखालाच निमंत्रित केले.
या सुखांनो या
एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या, साथ द्या.
दुःखाशीसुद्धा खेळण्याची जिद्द बाळगणार्या या निडर, दिलदार, सुरेल व्यक्तिमत्त्वाला खूप शुभेच्छा.