पॅकेजिंग इंडस्ट्रीचे स्वरुप आणि प्रकार खूप आहेत. छोट्या ते मोठ्या गोष्टींपासून सर्व प्रकारचे पॅकेजिंग होत असते. त्यातील एक प्रकार म्हणजे लेबल पॅकेजिंग. लेबल पॅकेजिंग म्हणजे नेमके काय आणि तिचे स्वरूप काय असते, याविषयी आपण फ्रंटिअर प्रा. लि.चे संचालक ओंकार शेंबेकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
केजिंग इंडस्ट्री ही सर्वसामान्यांना परिचित नसलेली इंडस्ट्री असली, तरी तिचे स्वरूप व्यापक आहे. आज छोट्यातील छोटी वस्तू असो की मोठ्यातील मोठी वस्तू असो, पॅकेजिंगशिवाय पर्याय नसतो. पॅकेजिंग इंडस्ट्रीशी संलग्न असलेल्या घटकांपैकी प्रमुख घटक म्हणजे विविध उत्पादने बनविणार्या कंपन्या आणि जोडीने त्यांच्या उत्पादनासाठी डिझाइन बनविणार्या अॅड एजन्सीज. हे दोन्ही घटक हे पॅकेजिंग इंडस्ट्रीचे कस्टमर असतात. या इंडस्ट्रीच्या सप्लायर्सची यादी अगदी लांबलचक आहे. कागद, शाई, अॅल्युमिनियम फॉइल यासारखा कच्चा माल, शिवाय त्यासाठी लागणार्या वेगवेगळी मशीन्स, अवजारे इत्यादी.
ही इंडस्ट्री स्वतंत्रपणेे स्वत:चे उत्पादन करीत नाही, तर उत्पादने बनविणार्या कंपनीने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे पॅकेजिंगसाठीची मागणी पूर्ण करते. त्यामुळे या इंडस्ट्रीला ‘सर्व्हिस इंडस्ट्री’ असेही म्हणू शकतो. एकमेकांना पूरक असलेल्या या व्यवसायात महत्त्वाचा बिंदू असतो, तो प्रत्यक्ष ग्राहक ज्याला आपण ‘एंड यूजर’ असेही म्हणू शकतो. या एंड यूजरला डोळ्यासमोर ठेवूनच या व्यवसायाचे गणित जमविले जाते.
मुळात एखादी वस्तू ग्राहकांपर्यंत सुरक्षित पोहोचावी हा उद्देश ठेवून पॅकेजिंग इंडस्ट्री ही संकल्पना उदयाला आली. कालानुरूप त्यात बदल होत गेले. आज आपण कुठलीही वस्तू पाहिली, तर आपले पहिले लक्ष त्या वस्तूच्या लेबलवर जाते, त्यावरूनच ती वस्तू नेमकी काय आहे, तिचा दर्जा काय आहे, ती कोणत्या कंपनीची आहे हे लक्षात येतेे. लेबल पॅकेजिंग म्हणजे नेमके काय आणि तिचे स्वरूप काय असते, याविषयी आपण फ्रंटिअर प्रा. लि.चे मालक ओंकार शेंबेकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
आपल्याकडे ज्या उत्पादनांची लेबल्स तयार केली जातात, त्यासाठी ग्राहकांच्या मानसिकतेचा, वयोगटाचा वगैरे विचार केला जातो की केवळ उत्पादकांच्या मागणीनुसार काम करून दिले जाते? या प्रश्नावर शेंबेकर म्हणाले, “आमच्याकडे मुख्यतः फार्माशी संबंधित काम असते. त्यामध्ये त्यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणेच काम करावे लागते. एखादे औषध डॉक्टरांनी घ्यायला सांगितले आहे की मग ते घ्यायचेच, त्याचे लेबल कसे आहे, सिरपची बाटली आकर्षक आहे की नाही, या सर्व गोष्टी दुय्यम ठरतात.
आपली कल्पकता दाखविण्याची संधी कॉस्मेटिकची लेबल्स बनविताना मिळते. कारण ती उत्पादने जितकी आकर्षक करता येतील, तेवढा त्याच्या विक्रीवर चांगला परिणाम होत असतो. येथे एंड यूजरच्या मानसिकतेचा, वयोगटाचा विचार करून त्याप्रमाणे विचार केला जातो. एखादी वस्तू बघताक्षणीच तिची भुरळ पडली पाहिजे. बहुतांशी कॉस्मेटिक उत्पादनातील ग्राहक ह्या स्त्रिया असतात. प्रथमदर्शनी वस्तू घेतली नाही, तरी वस्तू घेण्याचा मोह आवरता येणार नाही, अशा पद्धतीने त्या वस्तूचे लेबल आणि पॅकेजिंग केले जाते. या सर्व गोष्टींचा विचार केला तर लेबल्सचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
आता फार्माच्या क्षेत्रातही ‘विंडो पॅकिंग’ हा प्रकार रुजू लागला आहे. वस्तूच्या बॉक्सची एक बाजू पारदर्शक असते, जेणेकरून ग्राहकाला बाहेरून आणि आतील बाजूची लेबल्स दिसू शकतील. यातील लहान मुलांच्या औषधांच्या पॅकेजिंगवर हे प्रयोग होताना दिसत आहेत. विश्वासावर या व्यवसायाचा डोलारा उभा असतो. प्रत्येक जण एकमेकांवर विश्वास ठेवून दिलेले काम चोख देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र या विश्वासाला तडा गेला, तर कामाची पूर्ण साखळीच निखळून पडते. त्यामुळे दिलेले काम चोख केले तरच केलेल्या कामाचा मोबदला आणि पुढचे काम मिळण्याची शाश्वती असते, हा या इंडस्ट्रीचा अलिखित नियम असतो.
कामाचा दर्जा उत्तम ठेवायचा असेल, तर त्याला लागणारा कच्चा मालही उत्तम प्रतीचाच वापरावा लागतो. त्यात कुठलीही उणीव असता कामा नये, हे माझ्यापुरते मी बंधन घालून घेतले आहे. आमच्याकडे वापरली जाणारी शाई आणि डाय या जर्मनीच्या आहेत. प्रिंटिंग प्लेट्सही अत्यंत महागड्या आणि उत्तम दर्जाच्या (कऊ) अशा आहेत. वस्तूच्या किमतीवर याचा परिणाम होत असतो. पण जर का वस्तू चांगली हवी असेल, तर त्यासाठी आर्थिक गुंतवणूक चांगली करावी लागणार, हे आता सर्वमान्य होऊ लागले आहे.
सगळ्याच क्षेत्रांत आता स्पर्धा पाहायला मिळत आहे, त्यातून हे क्षेत्र तरी कसे सुटणार? आमचा जो कस्टमर आहे, त्यालाही त्यांच्या कंपनीकडून टार्गेट दिलेले असते. त्यामुळे आमच्याकडून काम करून घेताना तो त्याच्या कंपनीचा फायदा बघत असतो, तर आमचे सप्लायर्स आम्हाला काही मुदत देतात, त्याने दिलेल्या मुदतीला त्याचे पैसे जमा झाले पाहिजेत. विषय असा आहे की, कस्टमरकडे आम्ही करत असलेले काम करणारे शेकड्याहून अधिक आहेत, तर सप्लायर्सकडे आमच्यासारखे ग्राहकही शेकड्याहून अधिक आहेत, त्यामुळे कधी कधी अडकित्त्यात अडकल्यासारखे होते. शिवाय कागदाचा दर्जा उत्तम देणारे सप्लायर्स, प्रिंटरच्या तुलनेत फारच कमी आहेत. त्यामुळे दोघांशी जुळवून घेताना आमची तारेवरची कसरत होते.”
या तारेवरच्या कसरतीतून तुम्ही मार्ग कसा काढता? त्यावर शेंबेकरांचे म्हणणे असे की, “एकदा व्यवसाय करायचा ठरविले आहे, तर या गोष्टींचा सामना करावा लागेल, याचीही तयारी केली होती. यावर मार्ग एकच - कस्टमरचा विश्वास संपादन करायचा, त्याच्या कामाचा दर्जा उत्तम ठेवायचा, जेणेकरून तो अन्यत्र जाणारच नाही आणि सप्लायर्सची मालाच्या भावाबाबत घासाघीस करत राहायचे.”
वस्तूंची किंमत वाढ होण्याच्या कारणे काय असू शकतात? यावर शेंबेकर यांनी सांगितले, “किमती वाढण्याचे दोन महत्त्वाचे फॅक्टर असतात, ते म्हणजे पेट्रोल दरवाढ आणि विजेची दरवाढ. या दोन्ही घटकांच्या किमती वाढल्या, तर ओघानेच कामाच्या साखळीतील प्रत्येक गोष्टींच्या किमती वाढतात, परिणामी वस्तूंच्या किमती वाढतात.”
“आपण लेबल पॅकेजिंगमध्ये काम करता; एखाद्या वस्तूकडे लक्ष वेधले जाते, ते त्याच्या लेबलकडे पाहूनच.. तुमचा व्यवसाय पॅकेजिंगमधील महत्त्वाची भूमिका बजाविणारा आहे, तर तुमचे एखादे असे उत्पादन आहे का की ज्यामुळे उत्पादनाला भरघोस प्रतिसाद मिळाला, एखादे उदाहरण?”
“एक कॉस्मेटिक कंपनी आहे. त्याच्या वापरामुळे टक्कल असलेल्या व्यक्तीला अल्पावधीत केस येऊ लागतात. यासाठीचे लेबल कसे करावे हे त्यांना समजत नव्हते. यासाठी त्या कंपनीची सहा जणांची टीम आणि मी अशा दीर्घ बैठका घेतल्या. त्यांना नेमके काय पाहिजे हे समजून घेतले आणि विचारान्ती ट्रायल-एरर करत करत फायनल लेबल त्यांना दाखविले. लेबल पाहिल्यानंतर ते खूप खूश झाले. एवढेच नाही, तर त्यांच्या उत्पादनाचा खपही मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्यांची एक अट होती की, लेबल साधे असले, तरी ते आकर्षक वाटले पाहिजे आणि दर्जा उत्तम झाला तरी त्याचा किमतीवर परिणाम होता कामा नये. त्यांच्या या निकषाला आम्ही पूर्ण उतरलो. हे दिसायला साधे असले, तरी यात आठ कलर वापरले गेलेत. या लेबल निर्मितीत कल्पनाशक्तीचा कस लागला. कस्टमरला हे लेबल आवडले याचा आनंद झाला. तसेच आमच्या कंपनीत फार्माशी संबंधित काम असते, कॉस्मेटिक क्षेत्रात केलेल्या या यशस्वी कामामुळे या क्षेत्रातील कामेही मिळू लागली.
महाराष्ट्र सरकाराला सर्वात जास्त महसूल लघुउद्योगातून मिळतो. पण आज बघितले, तर या इंडस्ट्रीची अवस्था अतिशय वाईट आहे. मुंबईतीलच इंडस्ट्री पाहिल्या, तर त्या तीसहून अधिक वर्षे जुन्या आहेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम जागा लागते, तिथपासूनच सुरुवात आहे. व्यवसायाला लागणार्या पायाभूत सुविधांचाही अभाव असतो.
सरकारने व्यावसायिकांसाठी मोक्याच्या ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण कराव्यात. त्याचा फायदा व्यवसायवृद्धीसाठी होईल आणि पर्यायाने महाराष्ट्राची आर्थिक बाजूही भक्कम होईल. मॉल्सचे जे पोकळ जाळे निर्माण केले आहे, त्या जागी औद्योगिक वसाहती निर्माण व्हायला हव्यात.
कोरोनाच्या काळातही लघुउद्योजकांचा विचार न करता लॉकडाउन घोषित केला. सुदैवाने माझ्याकडे फार्माचे प्रमाणपत्र होते, त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये होतो. परंतु कामगारांचे खूप हाल झाले. त्यांना प्रवास करणे इत्यादी गोष्टींचा त्रास सहन करावा लागला. लेबल्स पॅकेजिंगची युनियन सुरू केली आहे. पण म्हणावी तशी दाद मिळत नाही.
युरोपमध्ये एका प्रॉडक्टवर सहा लेबल्स असतात, आपल्यापेक्षा पाच पट लेबल्स जास्त वापरली जातात. व्यवसायिकांच्या पायाभूत सुविधांसाठी तेथील सरकार कटिबद्ध असते. त्याउलट आपल्या येथील महाराष्ट्र सरकार या बाबतीत उदासीन आहे.
तरुण पिढीला पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये भरपूर संधी आहेत. या क्षेत्रात काम करण्यासाठी अनेक पर्याय खुले आहेत. प्रॉडक्शन, डिझाइनिंग, मार्केटिंग, सेल्स, वितरण, इत्यादी. मॅनेजर, पर्चेस मॅनेजर, पॅकेज मॅनेजर, क्वालिटी अॅनालिस्ट, मटेरियल मॅनेजर इत्यादी पदांवर नोकरीची संधी मिळू शकते. फार्मा आणि कॉस्मेटिक क्षेत्रात अशा स्पेशलायझेशन केलेल्या व्यक्तींना मागणी आहे.”
व्यवसायवृद्धीसाठी शेंबेकर यांनी काही स्वप्ने पाहिली आहेत, ती अशी - “आता माझ्याकडे आठ कलरचे मशीन आहे, भविष्यात 10 ते 12 कलरचे मशीन घेणार आहे. मशीनची संख्या वाढविणार. आता तीन गाळ्यांत ऑफिसेस आहेत. तसे पाहिले, तर तुकड्यातुकड्यांत काम होते आहे असे मला वाटते. या सर्वांसाठी एकच मोठी जागा घेण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे वेळेत आणि कामाच्या दर्जात चांगला फरक पडेल.”
शेंबेकर यांनी पाहिलेली स्वप्ने साकार होऊन त्यांचा व्यवसाय फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेवो, ही सदिच्छा!
ओंकार श्रीकांत शेंबेकर
फ्रंटिअर रोल लेबल्स प्रा.लि.
संपर्क : 9820077670