अष्टपैलू

विवेक मराठी    08-Mar-2021
Total Views |

2012 मध्ये सांगलीत 92वे अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची निवड झाली होती. ज्या सांगलीसाठी श्रीकांतजींच्या मनात हळवा कोपरा होता, आदराचं स्थान होतं त्याच शहरात होणा-या नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणं ही त्यांच्यासाठी विशेष आनंददायी गोष्ट होती. या निवडीचं औचित्य साधत, सा. विवेकसाठी त्यांची विस्तृत घेतली. तीच मुलाखत, या ज्येष्ठ रंगकर्मीच्या जगाच्या रंगभूमीवरून झालेल्या 'एक्झिट'नंतर पुनःप्रकाशित करत आहोत.


moghe_3  H x W:

एका ज्येष्ठ अभिनेत्याचं-एका वास्तुविशारदाचं-एका चित्रकाराचं घर म्हणून जे चित्र मनाशी रंगवलं होतं त्याच्याशी अजिबात मेळ खाणारं, साधंसुधं आतिथ्यशील घर..अशा या घरात, नाट्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मिळालेले देखणे पुष्पगुच्छ हॉलमधे जागा मिळेल तिथे विसावलेले... सकाळी सकाळी पार सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत एका निर्मात्याबरोबर फेरफटका मारून आलेले श्रीकांत मोघे सोफ्यावर बसले होते. आधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची धावपळ, मग प्रत्यक्ष निवड झाल्यानंतर भेटायला येणारे-फोनवरून अभिनंदनाचा वर्षाव करणारे चाहते-स्नेहीपरिवार, त्यातच एकीकडेवार्यावरची वरातच्या प्रयोगाची चाललेली गडबड, ‘पुलकीतसाठी फोनवरून येत असलेली निमंत्रणं आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावावी म्हणून येत असलेली आग्रहाची निमंत्रणं...80 चा उंबरठा ओलांडलेल्या वयाला झेपणार्या या दगदगीचा थकवा चेहर्यावर दिसत असला तरी आवाजातला रुबाब, नाट्य आणि उत्साह तरुणाला लाजवेल असा...

 

गप्पांना सुरुवात साहजिकच बालपणाच्या दिवसांपासून झाली.. लहान वयातच त्यांच्यातला अभिनेता प्रथम रंगमंचावर आला.. वडील किर्लोस्करवाडीत नोकरीला आणि उत्तम कीर्तनकार. उत्तम कीर्तनकाराला गाता गळा लागतो आणि अभिनयाचं अंगही... गोष्टीवेल्हाळ असणं ही तर त्यासाठीची पूर्वअट!

 

कीर्तनकार ही नारदाची गादी आहे. आजच्या एकपात्री प्रयोगाचं मूळ कीर्तनात सापडतं. माझ्या लहानपणी बरेचदा मी वडिलांच्या मागे उभा राहून त्यांना साथ केली आहे पण मी स्वत: कीर्तनाला उभा राहिलो नाही कधी... तरीही मला वाटतं की मीही जन्मजात कीर्तनकारच आहे. माझं बोलणं तसंच अघळपघळ असतं.. सगळ्या गोष्टी विस्ताराने सांगायची मला जी सवय आहे ना, त्याचं मूळ याच्यात आहे. कीर्तनाला सगळंच लागतं... गाणं लागतं, अभिनय लागतो, शब्दांवर प्रभुत्व लागतं. हे तिथून आलेले संस्कार आहेत.”

वडील आणि किर्लोस्करवाडी म्हणजे त्यांचे हळवे कोपरे. बोलण्यातून त्याची प्रचीती येत राहते.

वडिलांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्कार तर केलेच पण त्याला उत्कृष्ट खतपाणी मिळालं ते किर्लोस्करवाडीत!


माझा पिंड घडलाय तो किर्लोस्करवाडीत... सांगलीत... वाडीची अत्यंत अहम् भूमिका आहे. खूप मोठं सांस्कृतिक केंद्र होतं ते! माझ्या जन्माच्याही आधीपासून तिथून किर्लोस्कर, स्त्री, मनोहर ही मासिकं निघत असत. सामाजिक चळवळींचंही महत्त्वाचं ठिकाण होतं. अशा हृद्य संस्कारात मी वाढलो. स्वातंत्र्य आंदोलनाने तापलेल्या वातावरणात मी मोठा होत होतो. ते वातावरणही आम्हांला घडवत होतंच. चांगले संस्कार तर होत होतेच पण मनाला जखमा करणार्या घटनाही भवताली घडत होत्या.. देशाच्या फाळणीने हृदयाला झालेली जखम आजही ओलीच आहे.


moghe_2  H x W:
माझे
वडील काही काळ लखनौला किर्लोस्करांचे डेपो मॅनेजर होते.. तिथे ते हिंदीत कीर्तन करायचे. या सुसंस्कृत शहराचा, इथल्या लाघवी हिंदीचा ठसाही माझ्या मनावर उमटला. काही काळ दिल्लीतही गेला. बचपना असा या भागात गेला. त्या सगळ्याचा परिणाम घडण्यावर होत गेला.”


किर्लोस्करवाडीचा
त्या काळी बराच बोलबाला होता. उद्योगाच्या निमित्ताने किर्लोस्करांनी वसवलेलं हे गाव.. सांस्कृतिक वातावरण ठेवून त्याचं गावपण तर जपलंच पण त्याचबरोबर एक उद्योगनगरी म्हणून उद्यमशीलतेचे संस्कार तिथल्या लोकांवर केले, त्याचा प्रत्यय श्रीकांतजींच्या बोलण्यातून येतो...


भाई
अर्थात् पु.. म्हणजे श्रीकांतजींच्या मर्मबंधातली ठेव! सुनिताबाईंशीही त्यांचं जिव्हाळ्याचं नातं....या दोघांशी असलेलं मैत्र उलगडतांना, त्यांच्या आठवणी जागवताना त्यांच्या चेहर्यावर प्रसन्न हसू पसरतं.. काही वेळा स्वर हळवा होतो..


भाईची भेट प्रत्यक्ष होण्याआधीच तो त्याच्या लेखनातून भेटला. घरात वाचनाचं वातावरण असल्यामुळेपुरुषराज अळुरपांडेनावाच्या माणसाच्या लेखांचं आमच्या घरी सामूहिक वाचन होत असे. हा माणूस कोण, असं हुडकणं एकीकडे चालू होतंच. मग 1949 साली सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधे मी सायन्सला गेलो, तिथे भाई एम.. करायला आला. त्यावेळी त्याचावंदे मातरम्हा चित्रपट रिलिज झाला होता. त्यात त्याची हिरॉईन सुनिता होती. सुनिता त्याची बायको आहे, हेसुद्धा त्यावेळी माहीत नव्हतं. सुनिता म्हणजे खास रत्नागिरीचा लख्ख गोरा वर्ण.. लांबसडक सोनेरी केस.. नाजूक बांधा.. मूर्तिमंत देखणेपण म्हणजे सुनिता! आणि तिच्यासमोर भाई म्हणजे सावळा, दणदणीत.. रूपानं साधारण पण व्यक्तिमत्त्व छाप पाडेल असा पुरुष. तर हे चित्रपटातले हिरो-हिरॉईन आणि खर्या आयुष्यातले जोडीदार आमच्यासमोर आले आणि आम्ही त्यांच्या प्रेमातच पडलो. तिथून जो आमचा दोस्ताना झाला तो कायमचा! मुळात मला अभ्यासापेक्षा नाटक आणि बाकीच्या गोष्टींमधेच रस होता. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला...या गोष्टींमुळे कॉलेजात फेमस आणि अभ्यासात नापास.. एकूण सगळे रंग बघून वडिलांनी माझी रवानगी पुण्याला-मामांच्या घरी केली. तिथे इंटर सायन्सला पास झालो, त्या दरम्यान शरद तळवलकरने मला हेरलं होतं. पी.एल. हा तेव्हाचा उभरता नाटककार होता, त्याचं अंमलदार हे नाटक नुकतंच लिहून पूर्ण झालं होतं. त्या नाटकातल्या हिरोसाठी शरद तळवलकरने परस्पर माझं नाव सुचवलं. तो हिरो म्हणजे वाया गेलेल्या तरुणाचं कॅरेक्टर होतं, म्हणूनही कदाचित शरदने माझं नाव सुचवलं असावं. त्या नाटकाने खरं म्हणजे मला माझ्या करिअरचा सूर मिळाला, पुढे पी.एल.नेच माझं नाव पिक्चरसाठी हिरो म्हणून सुचवलं.


पण
खर्या अर्थाने, करिअरला आकार आला तो 1962 साली, ‘वार्यावरची वरातमुळे... मात्र अंमलदार ते वरात यामधे 10 वर्षं गेली.”


वार्यावरची वरातहा त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड! कोकणी कडवेकर मास्तर आणिदिल देके देखोम्हणत दिलखुलास नाचणारा शिरप्या, दोन्ही भूमिका तेवढ्याच ताकदीने त्यांनी पेलल्या आणि अजरामर केल्या. त्यांच्या लाडक्या भाईचंवरातते आता पुन्हा रंगमंचावर आणतायत..आजच्या तरुण पिढीला - काम करणार्यांच्या आणि प्रेक्षकांच्याही..एक दर्जेदार नाट्यानुभव द्यावा ही त्यामागची इच्छा...आणि त्यांच्या परमदैवताला केलेलं विनम्र अभिवादनही!


moghe_1  H x W:
इतक्या वर्षात इतकं निखळ, इतकं निर्मळ आणि इतकं नेमकं लिहिलं गेलंय असं मला वाटत नाही. शब्दांचं मर्म शोधण्यात आणि ते पोचवण्यात भाई बापमाणूस होता. नाटककाराला जुन्याजाणत्यांनीकवीम्हणून उगीच गौरवलेलं नाही, ती जातच दुर्मीळ! आणि व्यक्तिरेखेसाठी अचूक नट शोधण्यातही त्याचा हातखंडा होता. वरातच्या पुन:प्रत्ययाचा आनंद जुन्या पिढीला देताना, नव्या पिढीला दर्जेदार कलाकृतीची ओळख करून द्यावी असं वाटलं म्हणून हा प्रयोग!”


गायनाचं
उत्तम अंग असलेला अभिनेता ही श्रीकांतजींची विशेष ओळख...‘लेकुरेनं त्यावर शिक्कामोर्तब केलं...अभिषेकीबुवांनी स्वरसाज चढवलेली गाणी त्यांनी गायली आणि प्रेक्षकांनी-जाणकारांनी त्यांच्यातल्या गायकाचं भरभरून कौतुक केलं..ज्येष्ठ संगीतकार स्व. सुधीर फडके यांना श्रीकांतजींचा आवाज आवडत असे. गीत रामायणातली दोन गाणी त्यांनी श्रीकांतजींकडून गाऊन घेतली आहेत. ही तर त्यांच्यातल्या गायकाला मिळालेली मोठी पोचपावती आहे. असं असूनही ते कधी पारंपरिक संगीत नाटकांतून दिसले नाहीत, असे का हा प्रश्न मनात होताच... त्यांनी जे उत्तर दिलं ते त्यांच्यातल्या विचारी अभिनेत्याची साक्ष देणारं होतं. ते म्हणाले...


पारंपरिक संगीत नाटकं मी नाही केली... कारण माझ्या असं लक्षात आलं की, मला भावगीत मानवतं. पण नुसत्या सुरांचा माझ्यावर तसा पगडा नाही, मात्र शब्दांना लगडून आलेले सूर मला भावतात.”


वास्तविक
श्रीकांतजींनी वैविध्यपूर्ण भूमिका रंगमंचावर साकारल्या. मात्र त्यांचं विशेष कौतुक झालं ते वरात आणि लेकुरेसाठी...एक कलावंत म्हणून याची कधी खंत वाटली का, या प्रश्नावरचं त्यांचं उत्तरही दाद देण्याजोगं!


एखाद्या भूमिकेचा मोती प्रेक्षकांच्या मन:संपुटात तयार व्हावा, हा नटाला लाभलेला भाग्ययोग आहे. तो माझ्या वाट्याला या भूमिकांमुळे अधिक आला हे खरं...पणगरुडझेपकिंवा हिंदीशेर शिवाजीमध्ये मी केलेला शिवाजी, ‘सीमेवरून परत जामधला जगज्जेता सिकंदर, ‘मृत्युंजयमधला तामसी वृत्तीचा दुर्योधन, ‘तुझे आहे तुजपाशीमधला सुसंस्कृत डॉ. सतीश, ‘अश्वमेधनाटकातला आदर्शवादी प्रोफेसर आणिस्वामीमालिकेतला राघो भरारी या सगळ्यांनाच प्रेक्षकांनी आणि जाणकारांनीही दाद दिली...”


अभिनेता
श्रीकांत मोघे आणि कवी सुधीर मोघे..एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेले दोन भाऊ.. प्रतिभेचं वरदान लाभलेले पण वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे... कधी या भूमिका बदलायचा मोह झाला नाही का, यावर ते म्हणाले...


सुधीर हा जन्मानं कवी आणि मी जन्मानं नट आहे. आम्हीही शब्दभोगीच आहोत... पण मीपरभृतआहे.. म्हणजे नाटककाराने लिहिलेले शब्द कदाचित मला लिहिता येणार नाहीत पण त्या शब्दांत अभिनयाच्या माध्यमातून प्राण फुंकता येतो. नाटकाकाराने लिहिलेलं नाटक जेव्हा कागदावर उतरतं तेव्हा ते शिळा झालेल्या अहिल्येसारखं असतं. त्यांच्यात जो प्राण फुंकतो, जो चैतन्य निर्माण करतो तो नट असतो...... कलावंत म्हणून माझा तो मार्ग आहे आणि सुधीर कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करणारा


 स्वतःमधल्या
गुणवैशिष्ट्यांची नेमकी जाण असलेला हा हरहुन्नरी कलावंत... अभिनेता असणं हे चरितार्थाचं साधन नाही तर तो त्यांचास्वधर्मआहे याचा साक्षात्कार घडवणारी ही भेट माझ्यासाठी यादगार बनून गेली.


अश्विनी
मयेकर

9594961865