रंगत जाते होळी!

विवेक मराठी    23-Mar-2021
Total Views |

भारतात विविध राज्यांत होलिकोत्सव आपापल्या ढंगाने साजरा केला जातो. होळी हा सण आपल्या जीवनात आनंद आणि उत्साह घेऊन येतो. होळी दहनाबरोबरच रंगाची उधळण करणारा हा सण अमंगळाचं दहन आणि चैतन्याची उधळण करून वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. या सोहळ्याशी निसर्ग-शेतीव्यवस्था-इतिहास-पुराण-नृत्य-चित्र-संगीतादी सर्व कला - इतकंच नाही, तर मानसशास्त्र नि सामाजिक घटितंही किती सुरेख गुंफली गेली आहेत. अग्नी-जल-पृथ्वी या तिन्ही महाभूतांचा सहभाग एकाच वेळी या उत्सवाला उष्णता, शैत्य नि रंग-गंध प्रदान करतो.

holi celebration 2021_1&n

होळी-होलिका-हुताशनी-फाल्गुनी-शिमगा अशा नावांनी ओळखली जाणारी होळी भारतभर सर्वांची प्रिय! तिच्या उत्सवांची नावंही धूलिपर्वोत्सव-वसंतोत्सव-दोलोत्सव-शिगमोत्सव-रंगोत्सव-मदनोत्सव-मधुमहोत्सव अशी एकसे एक रंगतदार! होळी भारतभर विविध नावांनी, विविध रूपांत साजरी होते, तशीच आपल्यालाही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती अधिक उमगत जाते आणि हलके हलके तिचे एकेक रंग मनावर चढत जातात.

माघ सरता सरता येणारी शिवरात्रशिव शिवम्हणत थंडीला गुंडाळून घेऊन जाते नंतर फाल्गुनात येणार्या होळीला विझवायला पाऊस येतो, हे लहानपणापासून मनावर पक्कं ठसलेलं गणित. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला घराच्या अंगणात वा वस्तीत/गावात मध्यभागी होळी रचायची आणि रात्री तिची पूजा करून तिला नैवेद्य दाखवून तिचं दहन करायचं, इतका साधा सोहळा! पण या सोहळ्याशी निसर्ग-शेतीव्यवस्था-इतिहास-पुराण-नृत्य-चित्र-संगीतादी सर्व कला - इतकंच नाही, तर मानसशास्त्र नि सामाजिक घटितंही किती सुरेख गुंफली गेली आहेत! अग्नी-जल-पृथ्वी या तिन्ही महाभूतांचा सहभाग एकाच वेळी या उत्सवाला उष्णता, शैत्य नि रंग-गंध प्रदान करतो!

लहान गावांमध्ये आजही होळीची खरी धामधूम होळीआधी पंधरवडाभर सुरू होते. लहान लहान गट करून मुलांची वानरसेना दिमडी/टिमकी गळ्यात अडकवून ती वाजवत गावभर फिरू लागते. सकाळी उजाडल्यापासून ते अंधार पडेपर्यंत गाव नुसतं दणाणून जातं. घरोघरी जायचं निहोळी द्या होळीअसा हाकारा मारत घरातलं कुणी बाहेर येईपर्यंतहोळीला पाच रुपये - नायतर दोन लाकडं - नायतर चार शेण्या - नायतर आमी बोंबलणार!’ असं म्हणून ठणाणा सुरूच होतो. हे झालं रीतसर मागून नेणं. त्याशिवाय ज्यांच्याकडे बागा आहेत, लाकडं वा चुलीकरता सरपण-फळकुटं जमवलेली आहेत, त्यांना दिवसरात्र राखण करायची वेळ असते! हेरून ठेवलेली लाकडं वानरसेना बरोब्बर लंपास करते. होळीच्या दिवशी तर आकाशाला भिडणार्या ज्वाळांशी स्पर्धा करतील असे आवाज असतात! शिरा ताणताणून मारलेल्या बोंबांना आज कुणी आक्षेप घेणार नसतं. आपल्या मनात साचलेलं सारं अमंगळ दहन करण्याची वा प्रत्यक्ष तोंडावाटे त्याचा निचरा करण्याची ही संधी.

लहानपणी सरत्या थंडीची आठवण देणारी संध्याकाळची सुखद हवा नि त्यात होळीची ऊब हवीहवीशी वाटे. नैवेद्याला केल्या जाणार्या पुरणपोळीचा खमंग वास आधीपासूनच जाणवू लागलेला असायचा. होळी नि पुरणपोळी इतकंच गणित तेव्हा फिट असायचं.


holi celebration 2021_4&n 

आजीकडून कहाणी ऐकलेली असायची - प्रल्हादाला मारण्याकरता होलिका राक्षसीला दिलेली सुपारी नि त्या प्रयत्नात तिचाच झालेला अंत.. सत्प्रवृत्तीच्या महादेवांच्या तपात विघ्न आणणार्या कामदेवाचं केलेलं दहन.. या सार्यात काही संदेश आहे असं आजी सांगे. मग कुणी शिक्षक सांगतहोळीदिवशी आपल्या सर्व दुर्गुणांची यादी करा नि होळीत टाका.. अगदीच ज्यांच्या जिभा शिवशिवतात त्यांनी होळीसमोर काय ते बाहेर काढून टाका. मग वर्षभर वर्गात, घरात शिव्या नाही द्यायच्या.’ ही निचरा होण्याची किती साधी सरळ व्यवस्था होती!

मग निसर्गातल्या बदलत्या रूपाचं या उत्सवाशी असलेलं नातं उमगायला लागलं. फाल्गुनात तयार होत आलेलं धान्य अग्नीला अर्पण करायचं. नवान्न अर्पण करण्याचा यज्ञच तो! हाती येऊ घातलेला घास निसर्गाच्या कृपेने काहीही विघ्न येता ओठापर्यंत पोहोचावा, याकरता करण्याची ती पूजा. ‘नवान्नेष्टि यज्ञअसं त्याचं वैदिक काळातलं संबोधन. ‘वासन्ती नवसस्येष्टिहे आणखी एक सुंदर नाव.


holi celebration 2021_1&n

भारतातले बहुतेक सण, परंपरा शेतीच्या चक्राशी वा निसर्गातल्या बदलाशी जोडलेल्या आहेत. ऋतूंच्या कोष्टकात वसंत ऋतूला चैत्र-वैशाखाशी जोडलेलं असलं, तरी माघ महिना निम्म्यावर आला की वसंताची चाहूल लागू लागतेच. (शिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहायची पद्धत आहे. मग चैत्रापर्यंत त्याच्या डाळपन्ह्याकरता वापरण्याजोग्या कैर्या होतात नि अक्षय तृतीयेच्या नैवेद्याला पहिला आंबा घरी यायचा, हे खरं तर निसर्गाचं स्वाभाविक चक्र!) तर माघात मोहरलेल्या झाडांच्या पानापानातून घुमणार्या कोकिळेच्या लकेरी, लालभडक फुलांनी बहरलेले पळस अन मोगरा-चमेलीचे धुंदावणारे गंध - वसंत ऋतूचं स्वागत निसर्गच असं रंग-गंध-स्वर यांनी भरभरून करतो. त्या उत्सवात आपणही सहभागी व्हावं अशा ऊर्मी मानवी मनात दाटत्या तरच नवल! चैत्र पाडव्याला सुरू होणार्या नवीन वर्षाच्या स्वागताकरता, नवे संकल्प लिहिण्याकरता आपल्या मनाची पाटी कोरी करायची, म्हणून या दिवसात जुनं वैर, शत्रुत्व, राग, ईर्षा, अपमान सारं विसरायचं. सारे दोष, नकारात्मक विचार, सारं काही त्या सर्वभक्षक, पावक अग्नीत स्वाहा करायचं नि मोकळ्या मनाने, नव्या उमेदीने जीवनाला कवेत घ्यायचं. हरिवंशराय म्हणतात तसं..

प्रेम चिरंतन मूल जगत का,

वैर-घृणा भूलें क्षण की,

भूल-चूक लेनी-देनी मे

सदा सफलता जीवनकी,

जो हो गया बिराना, उसको फिर अपना कर लो

होलि है तो आज शत्रुको बाहोंमे भर लो!

होली है तो आज मित्र को पलकों में धर लो!

होळी विझल्यावरही उत्सव संपत नाहीच. दुसर्या दिवशी तिची राख अंगाला फासणं, समुद्रात तिचं विसर्जन करणं अशा अनेक पद्धती आहेत. लहानपणी मन खरी वाट पाहत असायचं ते होळीनंतर पाच दिवसांनी येणार्या रंगपंचमीची! होळी, धुळवड वा रंगपंचमी हे रंग खेळायचे दिवस प्रांतानुसार बदलतात. पण रंगात मनसोक्त न्हाऊन निघण्याचा मोह आबालवृद्ध सर्वांना असतोच! सगळे जण काही ओले वा कोरडे रंग खेळायला बाहेर जात नाहीत, जाऊ शकत नाहीत, पण तान्ह्या बाळापासून घरातल्या गृहिणी, वृद्ध सर्वांना रंगाचं एक बोट तरी लावलं जायचंच. घरी अगदी तान्हं बाळ असलं की अगदी निगुतीने त्याची रंगपंचमी साजरी व्हायची. बाळाकरता खास शुभ्र मलमलीचं अंगडं-टोपडं बनायचं. त्यावर केशराचे शिंतोडे दिले जायचे. बाळाच्या नाजूक गालावरही केशराचं बोट लागायचं. बाळ थोडं मोठं असेल तर खास केशरी रंगाच्या साखरभाताचा खाऊ त्याला द्यायचा!


holi celebration 2021_2&n

आपल्या पारंपरिक चित्रकला-शिल्पकला-साहित्यातून होळी-होली-होरीचा उल्हास भरभरून वाहताना दिसतो. हिंदूंइतकंच (कदाचित जरा जास्तच रंगेलपणाने) मुस्लीम राज्यकर्त्यांनीही या उत्सवाला भरभरून उपभोगलं. लाल किल्ल्याच्या पिछाडीला, यमुनेच्या तिरावर हे रंगोत्सव चालत अशी वर्णनं आहेत. सोन्याचांदीच्या घंगाळात पलाशाच्या फुलांचा केशरयुक्त रंग भरलेला असे. साथीला अत्तरं मिसळलेली असत. सोबत मिठाई-ठंडाई-इलायची पान अन जोडीला मुशायरे-कव्वाल्या-नाचगाणी अशीमहफिल--होलीची वर्णनं चित्रांकनं पाहायला मिळतात.

विजयनगरच्या साम्राज्याच्या खुणा सांगणार्या चित्रांमध्येवसंतरागिनीहे पिचकारीने रंग खेळण्याचं चित्र पहायला मिळतं. मेवाडच्या चित्रांमध्येही महाराणा बसला आहे, दरबारी भेटी देत आहेत, नृत्य-गायन सुरू आहे मध्यभागी रंगाचं कुंड आहे, अशी चित्रं आहेत.


holi celebration 2021_3&n

बंगालमध्ये रवींद्रनाथांनी अनेक प्रथा-उत्सवांना सुंदर निसर्गस्नेही रूप दिलं. वसंताच्या शीतल सर्जक लहरींवर झुलणार्या निसर्गाला पाहून बंगालमध्ये या पौर्णिमेलादोल पौर्णिमाम्हटलं गेलं. सर्वत्र हिरव्या रंगांच्या अनंत छटा लेवून डोलणारी नवी पालवी, झाडांच्या सुगंधी मोहोराचा दर्वळ, लाल-केशरी-पिवळ्या रंगांच्या फुलांची लयलूट या धुंदावलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून साजरा करायचा हा सर्जनोत्सव गुरुदेवांनी शांतीनिकेतनमध्ये साजरा करायला सुरुवात केली. या वसंतोत्सवाकरता त्यांनी असंख्य रचना, पदं, गीतं लिहिली आणि त्यांना सुंदर चाली बांधल्या. त्यावर नृत्यं केली जात. किशोर-किशोरींच्या अंगात रंगीत वस्त्रं नि गळ्यात हातात कानात पळसाच्या फुलांचं अलंकरण! नवनिर्मितीला सामोर्या जाणार्या वयाकरता हा किती उत्कट, कोवळा, रसरशीत अनुभव गुरुदेवांनी निर्माण केला! शिक्षक, विद्यार्थी, अगदी कुलगुरूही रंगाच्या उधळणीत सहभागी होत. संयम आणि उल्हास यांचा सहजपाठच त्या मुलामुलींना मिळत असेल.


holi celebration 2021_5&n 

आज होळीला आलेलं विकृत रूप पाहिलं की फार खंत वाटते. ‘संस्कृतीचं रक्षणकरायचं तर केवळ तरुणाईला आवडणार्या नवनव्या प्रथांना विरोध करून भागणार नाही. मुळात माणसाच्या सर्व नैसर्गिक ऊर्मींना प्रकटीकरणाचा काहीतरी मार्ग मिळावा लागतो. आपल्या सुंदर परंपरा माणसाला मुक्त, निर्भर तरीही संयतपणे आनंद लुटायला शिकवतात. यौवनाचं, नवतेचं स्वागत करणार्या, विविध कलांचं प्रकटीकरण करणार्या त्याला निसर्गाविषयी कृतज्ञतेची किनार असलेल्या वसंतोत्सवासारख्या परंपरांचं कालसुसंगत पुनरुज्जीवन करायला हवं. अशा निर्भेळ, निरोगी, आनंदाची चव देणारे भारतीय पर्यायसेलिब्रेशनचा खरा अर्थ जगाला सांगू शकतील.

या वयातच भेटतात ती होळीची असंख्य गीतं!

आज छोडेंगे बस हमजोलीपासूनरंग बरसेनिबलम पिचकारीपर्यंत आणिआज गोकुळात रंग खेळतो हरीपासूनसख्या चला बागामंदी रंग खेळू चलापर्यंत अनेक गाणी कानात रंग उधळत असतात. पायाला थिरकायला लावत असतात. आणि मग कधीतरी शास्त्रीय संगीताची वाट सापडते अन तिथे मनाला भिजवणारी खरीखरीहोरीऐकायला मिळते.

बसंत, काफी, खमाज अशा रागांमध्ये होरी-फाग गीत-ठुमरी यांच्या उधळणी अशा काही रंगतात की आपण ब्रिजवासीच बनून जातो. ‘होरी खेलत है गिरिधारी’, ‘होली खेलनको चले कन्हैय्याम्हणत तिकडे धाव घेणार्या गोपिका किंवाना दैया मै अब ना आऊंम्हणत लटकं रुसणारी राधा किंवा मग खरंच त्याचं माझ्याकडे लक्ष नाही, ‘आये शाम मोसे खेलत नाहीम्हणत खंतावणारी कुणी व्रजकन्या.. ‘तो नाही, तर बाकी साजशृंगार, सुखसोयी काय कामाच्या म्हणत एखादी मीराबाईपिया त्यज गये है अकेली, किनु संग खेलू होरीम्हणते, तेव्हा हसर्या नाचर्या होरीची आर्त विराणी बनते. ती वेदना उमगायलाही एक वळण यावं लागतं!

तरुण वयात जगण्याचं भान येऊ लागत असताना होळीचे वेगवेगळे संदर्भ लक्षात येऊ लागतात. अमंगळ-अनावश्यक-अकल्याणकारक ते सारं जाळून नव्या विचारांचा उजेड देणारी होळीची कल्पना कुणी विनायक दामोदर सावरकर कल्पकतेने वापरतो आणि विदेशी कपड्यांच्या होळीतून स्वातंत्र्याचा उद्गार चेतवतो.. कुणी तिला नव्या युगाला अनुकूल पर्यावरणपूरक बनवतो, कुणी भुकेल्यांची आठवण काढत पोळी दान करण्याची प्रथा सुरू करतं. ‘सुलभनावाची कुणी एक संस्था विधवांचं शहर बनलेल्या वृंदावनात विधवांकरता होळीचा आनंदरंगोत्सव सुरू करते! मुळातच समाजाच्या अभिसरणाकरता, एकत्वाकरता या प्रथा आहेत याचं भान ठेवून भारतीय समाज किती सहजपणे आपल्या प्रथांना सुंदर, निकोप वळण देतो!

कृष्ण हा या रंगोत्सवाचा केंद्रबिंदू असला, तरी अवधवासीही त्यात मागे राहत नाहीतच. ‘होली खेले रघुवीरा’, ‘होरी कनक भवनमे खेलत राम नरेश, रामजीके हाथ अबीर की झोली - लछमन भर भर देतअशी श्रीरामांच्या रंगोत्सवाचीही अनेक गीतं ऐकायला मिळतात. पण सर्वात कडी करतात ते शिवशंकर. भोलेनाथांचे भक्त म्हणतात की सारं जग फक्त फाल्गुनात होळी खेळतं, पण शंभू महादेव तर रोजच होळी खेळतात.. ‘खेले मसानेमे होरी, दिगंबर खेले मसानेमे होरी!’ तिथे गोपी-श्याम नसतात, तर भुतं-प्रेतं असतात. रंग गुलाल नसतो, तर चिता भस्म असतं. डमरूचं संगीत असतं नि पिचकार्या? ‘छोडे सर्प गरल पिचकारी!’ साप त्यांच्या मुखातून जे गरळ ओकतात, त्याच पिचकार्या! पण तरी हीभूतनाथकी मंगल होरीआहे. कारण त्याला कुठल्याच वासनेचा, हव्यासाचा, अभिलाषेचा स्पर्श नाही!

अशीच निःसंग होळी खेळली संतांनी. संतांकरता होळी म्हणजेस्वला परमात्म्यात विसर्जित करण्याचं पर्व. आपल्या देहाच्या चिंधोटीला त्याच्या रंगात रंगवून महावस्त्र बनवण्याचा उत्सव! हिंदुस्थानच्या मातीचा गुणच असा की यातून कुणीच सुटले नाहीत!

हजरत निजामुद्दीन औलिया यांचे शिष्य अमीर खुसरो यालामहारंगम्हणतात -

आज रंग है री, महा रंग है,

मेरे महबूब के घर रंग है री -

मोहे पीर पायो निजामुद्दिन औलिया,

जहां देखू मोरे संग है री।

तरसतगुरु शब्द विचार, खेला मन होरीअसं म्हणत कबीरांनी मनाला गुरूच्या विचारांनी रंगवलं.

फागुन के दिन चार रे, होली खेल मना रे।

बिन करताला पखावज बाजे, अनहद की झंकार रे।

बिन सुर राग छतीसूं गावे, रोम रोम रण कार रे।

सील संतोखकी केसर घोली, प्रेम प्रीत पिचकार रे।

असं म्हणत मीराबाई आपल्या अस्तित्वालाच उधळून टाकते..

आणि बहुत दिनसे रुठे शामको

होरीमे मना लाऊंगी मै,

अपने अंगका फाग रचाके

भवमे तर जाऊंगी मै।

असं म्हणून आपला हा होळीचा प्रवास सहजपणे पैलतिराला लावून देते. बालपणापासून रंगांशी नातं जोडून देणारी होळी अशी अंतर्बाह्य रंगवून टाकते!