कुडावळे या छोट्याशा खेडेगावात गेली पंचवीस वर्षं निसर्गस्नेही जीवनशैली जगणारं आणि अशा जीवनशैलीविषयी व्यापक प्रबोधन करणारं जोडपं म्हणून दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी अख्ख्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीतून केलेलं हे हितगुज.
गेल्याच महिन्यातला एक दिवस ठरवून सकाळी एकटाच एसटीने कुडावळ्याला दिलीपकाकांच्या घरी पोहोचलो. शेणाने सारवलेल्या मातीच्या घराच्या पडवीत कट्ट्यावर, पौर्णिमाकाकूंनी खास त्यांच्या पद्धतीने केलेल्या गुळाच्या खमंग चहाचे घोट घेत काका-काकूंशी गप्पा रंगल्या.
“कुडावळ्यासारख्या छोट्याशा खेडेगावात, मर्यादित गरजांमध्ये, शरीरश्रमावर आधारित पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्याचा प्रयोग तुम्ही गेली पंचवीस वर्षं करत आहात. हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झालाय असं आज आपल्याला वाटतं का?” मी प्रश्न केला.
“एखादं तत्त्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणताना त्यात काही उणिवा राहतात. पण शंभर टक्क्यांचं ध्येय आपण जेव्हा ठेवतो, तेव्हा किमान त्याच्या जास्तीत जास्त जवळ कसं जाता येईल हा प्रयत्न असतो. आमच्या हल्लीच प्रकाशित झालेल्या ‘स्वप्नामधील गावां...’ या पुस्तकात आम्हाला काय काय गोष्टी जमल्या आणि काय काय नाही जमल्या, त्यानुसार आम्ही स्वतःलाच ‘100पैकी गुण’ दिले आहेत. 1996च्या सुमारास आम्ही कुडावळ्याला जमीन भाड्याने घेऊन मातीचं घर बांधलं, जे आजही उत्तम स्थितीत आहे आणि आम्ही त्यात आनंदाने राहत आहोत. वीज आम्हाला घ्यायची नव्हती, पण त्यामुळे काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या, म्हणून विजेची जोडणी करून घेतली. पण घरात बाकी कुठलं इलेक्ट्रॉनिक यंत्र नाही, त्यामुळे आमचा महिन्याचा वीजवापर फक्त ‘एक ते दोन युनिट’ एवढा कमी राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. सुरुवातीला आमच्याकडे गॅस होता, पण 2004 साली आम्ही तो काढून टाकला आणि आता पूर्ण स्वयंपाक चुलीवरच होतो. सात्त्विक आहार, सूर्योदय-सूर्यास्तानुसार सम्यक दिनचर्या या गोष्टीही बर्यापैकी जमल्या आहेत. "प्लास्टिकचा वापर पूर्णतः टाळणं शक्य नाही झालेलं" अनेक ठिकाणी प्रवास होतो, त्यासाठी पेट्रोल-डिझेल जाळलं जातं. पण सार्वजनिक वाहनानेच फिरायचं हा नियम मात्र आम्ही कटाक्षाने पाळत आलो आहोत. संपर्कासाठी साध्या मोबाइलचा वापर करतो. लिखाणासाठी कागद-पेन वापरावं लागतं. त्यामुळे पर्यावरणीय निकषांवर स्वतःच्या जीवनशैलीचं मूल्यमापन करताना आम्ही 100पैकी 50 गुणांवरच आहोत. आणि लोकांनाही आमचं हेच सांगणं असतं की अशा प्रकारे प्रत्येकाने आपापलं मूल्यमापन करत राहावं आणि आपला ‘स्कोअर’ वाढवत राहावं.”
“पण काका, एकट्यादुकट्याने प्लास्टिक वगैरे न वापरून प्रदूषणाचा प्रश्न सुटणारे का? त्यासाठी उत्पादनावरच बंदी नको का यायला?” मी प्रतिप्रश्न केला.
“तुमच्या एकंदर जगण्यात आणि विचारांमध्ये भारतीय आयुर्वेदाचा आणि अध्यात्माचा खूप प्रभाव जाणवतो. या दोघांचा पर्यावरणाशी नेमका कसा संबंध आहे?” मी उत्सुकतेने विचारलं.
“आयुर्वेदाची दोन मूळ उद्दिष्टं आहेत - ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम’ आणि ‘आतुरस्य व्याधी हरणं’. ही उद्दिष्टं गाठण्यासाठी आयुर्वेदामध्ये जी काही दिनचर्या आणि जीवनशैली सांगितली आहे, ती शंभर टक्के पर्यावरणपूरक अशीच आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक औषधं ही अत्यंत कमी ऊर्जा खर्च करून, साध्या यंत्रांचा आणि शारीरिक बळाचा वापर करून, घरगुती पद्धतीने बनवता येऊ शकतात. त्यांचं स्थानिक उत्पादन शक्य आहे. याउलट अॅलोपॅथिक औषधं मोठ्या यंत्रांवर, प्रचंड ऊर्जा खर्च करून, केंद्रीकृत पद्धतीने बनवावी लागतात. या निकषावरही आयुर्वेद जास्त पर्यावरणपूरक ठरतो.
“भारतीय तत्त्वज्ञानातल्या निसर्गविचाराबाबत आपण बोललो. हा निसर्गविचार पाश्चात्त्य संस्कृतीत आढळतो का?” माझी आणखी एक उत्सुकता.
“आढळतो की! चारशे वर्षांपूर्वी जगातली सगळी माणसं निसर्गस्नेहीच जगत होती. कारण निसर्गाच्या मर्यादा ओलांडणारं तंत्रज्ञान मानवाच्या हाती नव्हतं. अठराव्या शतकात धार्मिक विचार मागे पडून जडवादी विचार लोकप्रिय होणं आणि त्याच वेळी वेगवेगळे तांत्रिक शोध लागणं या दोन्ही गोष्टी युरोपात एकदम झाल्यामुळे निसर्गाच्या मर्यादा ओलांडल्या जाऊ लागल्या आणि मग त्याला काही सुमारच राहिला नाही. पण अमेरिकेतही थोरोसारखे काही विचारवंत होऊन गेले, ज्यांनी निसर्गाच्या मर्यादा ओळखल्या होत्या आणि या मर्यादांचा आदर करण्याचा विचार मांडला होता. अमेरिकेतल्या रेड इंडियन जमाती किंवा ‘आमिष’ लोक अत्यंत साधी जीवनशैली जगतात. अमेरिकन उपभोगवादाचं वारंही ते लागू देत नाहीत. युरोप, जपान या आणि अनेक विकसित राष्ट्रांमध्ये अलीकडे ऐच्छिक साधेपणा (Voluntary Simplicity), ‘मिनिमलिझम (Minimalism)’ अशा नव्या जीवनपद्धती ज्यांमध्ये ‘गरजा मर्यादित ठेवणं’ हा मुख्य विचार आहे, याचं स्वागतच करायला हवं. फरक इतकाच की भारतीय संस्कृतीमध्ये अशा जीवनपद्धतीचा संबंध ‘मोक्षाशी’ वा अध्यात्माशी जोडलेला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये शुद्ध भौतिक प्रेरणेतून असे विचार पुढे आलेले आहेत.” काकांनी संदर्भासहित स्पष्टीकरण केलं.
दिलीपकाकांनी घरी ‘सोलर पॅनल’ मुद्दाम बसवलेलं नाही, हे माहीत होतं. त्याची नेमकी कारणमीमांसा त्यांच्याकडून जाणून घ्यायची होती म्हणून विचारलं, “आज सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, विजेवर चालणार्या गाड्या, एलइडी बल्ब इ. प्रकारच्या ‘हरित तंत्रज्ञान’ क्षेत्रात मोठी क्रांती घडून येत आहे आणि हा पर्यावरणरक्षणाचा उपाय म्हणून जगासमोर ठेवला जातोय. हे ‘हरित तंत्रज्ञान’ कितपत प्रभावी ठरणारं आहे?”
“छे! हे तंत्रज्ञान ‘हरित’ बिलकुल नाही, तर आणखी ‘काळं’ आहे.” काका उत्तरले.
“त्याचं कारण म्हणजे हे सगळं तंत्रज्ञान ‘रूपांतरित ऊर्जेवर’ आधारलेलं आहे. भौतिकशास्त्रीय नियम सांगतो की ऊर्जेचं एका प्रकारातून दुसर्या प्रकारात रूपांतर करताना ऊर्जेची नासाडी होत असते. एक सोलर पॅनल बनवण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते, तेवढी ऊर्जा ते सोलर पॅनल आयुष्यभरात निर्माण नाही करू शकत. इलेक्ट्रिक वाहन वापरताना, त्याची बॅटरी बनवण्यासाठी लागणारी ऊर्जा, ती बॅटरी बाद झाल्यानंतर तिची विल्हेवाट लावण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि या सगळ्यासाठी जाळली जाणारी जीवाष्म इंधनं यांचं गणित कधी कोणी आपल्यासमोर मांडत नाही. हे गणित भौतिकशास्त्रातल्या ‘एंट्रॉपी’च्या नियमानुसार ‘उणेच’ (negative) येतं. ऊर्जेचा ‘थेट’ वापरच निसर्गाची तुलनेने कमी हानी करतो. त्यामुळे रेल्वे चालवायचीच असेल तर ती विजेवर चालवायच्याऐवजी कोळशावर वा डिझेलवरच चालवावी. अंतिमतः ऊर्जापिपासू तंत्रज्ञानाचा अवलंब कमीत कमी करून साध्या, शारीरिक शक्तीवर चालणार्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणं हाच ‘शाश्वत विकासाकडे’ जाण्याचा एकमेव मार्ग आहे.” काकांनी अगदी रोखठोक उत्तर दिलं.
अनेकांना दिलीपकाकांचं हे म्हणणं धक्कादायक वाटेल, पण केवळ ‘हरित तंत्रज्ञान’ या शब्दाला न भुलता भौतिकशास्त्रीय गणितं करूनच आपण योग्य निष्कर्षापर्यंत यायला हवं, हे काकांशी बोलताना जाणवलं.
“तुम्ही चूल वापरता, याविषयी अनेक लोक आक्षेप घेतात. चुलीसाठी लाकडं जाळली जातात, त्यामुळे धूर आणि प्रदूषण होतं, मग चूल पर्यावरणपूरक कशी?”
“स्वतः निसर्गनियमांच्या चौकटीत राहून जगणं याचबरोबर त्याबद्दल व्यापक जनजागृती करणं हे कार्यसुद्धा तुम्ही गेली पंचवीस वर्षं करत आहात. याला लोकांचा एकंदर प्रतिसाद कसा आहे? अपेक्षित बदल खरंच होतोय का?”
“खरं सांगायचं झालं, तर एकंदर चित्र नकारात्मकच आहे. जगाने स्वीकारलेली विकासनीती, प्रसारमाध्यमांचा जबरदस्त प्रभाव हे सगळं माणसाला उपभोगाच्या प्रवाहात वाहून नेणारं आहे. पण आपण हताश न होता निष्काम कर्मयोग्याप्रमाणे प्रबोधनकार्य करत राहायचं, हे आम्ही ठरवलेलं आहे आणि आम्ही ते करतो आहोत. काही सकारात्मक चित्रंही दिसतात. आमच्याकडून प्रेरणा घेऊन काही लोक शहर सोडून गावात येऊन राहिले, काही लोकांनी घरातला फ्रीज काढून टाकला, काहींनी आइसक्रीम खाणं सोडलं, काही लोक चारचाकीवरून सायकलवर आले. असे काही बदल लोक करतायत. अगदीच नाही असं नाही.”
“बरेचदा असं होतं की, आपल्याला पर्यावरणाबद्दल आस्था असते, पण तरीही, ‘लोक काय म्हणतील?, वृद्धापकाळी आपलं कसं होईल?, आपल्या मुलांच्या भवितव्याचं काय?’ अशा सांसारिक विवंचना माणसाला पैशाच्या मागे लागायला भाग पाडतात आणि गरजा मर्यादित ठेवणं ही गोष्ट इच्छा असूनही होत नाही. या सांसारिक विवंचना तुम्हाला कितपत भेडसावतात?”
“माणसं अधिक पैशाला आणि अधिक उपभोगांना ‘नको’ म्हणण्याचं धाडस कितपत दाखवतात त्यावर हे अवलंबून आहे. व्यावहारिक अडचणी असतात हे मान्य आहे. पण ‘काय होईल ते होईल’ असं म्हणून आम्ही पाण्यात उडी मारली. वृद्धापकाळी काही दुर्धर आजार झाला, तर आम्ही सरळ मृत्यूला सामोरे जाऊ. आम्ही आमच्या दोन्ही मुलांना गावातल्याच मराठी शाळेत शिकवलं आणि याबद्दल त्यांची कुठलीच तक्रार नाहीये. शिवाय, आमच्यासारखंच त्यांनी जगलं पाहिजे असा आग्रहही आम्ही ठेवलेला नाही. त्यांची ध्येयं गाठायला त्यांना मोकळीक आहे. दोघेही आपापल्या व्यवसायांमध्ये उत्तम प्रगती करत आहेत.”
दिलीपकाका आणि पौर्णिमाकाकू दोघांशी गप्पा म्हणजे एक तत्त्वचिंतन होतं. त्यांच्या स्वभावातला प्रेमळपणा, हसतमुखपणा, निसर्गावरची अपार निष्ठा, ज्ञानाची आणि विचारांची खोली, वृत्तीतली लवचीकता आणि आपल्या मर्यादा मान्य करण्याची तयारी हे व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू त्यांच्याशी संवाद साधताना उलगडत होते. महाराष्ट्रातले अनेक लोक या दांपत्याचे चाहते आहेत, तसंच ‘ते अतिरेक करतात’ अशीही एक प्रतिक्रिया अनेकांकडून कानावर पडली आहे. माणसाच्या केवळ एखाद्या विधानावरून त्याला ‘जज’ करण्यापेक्षा आपण त्याच्या सहवासात काही काळ घालवतो, तेव्हा तो माणूस खर्या अर्थाने कळतो.