धुळे जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार व भाजपाचे पूर्व प्रदेश संघटनमंत्री धरमचंद चोरडिया यांचे 10 मार्च रोजी पुणे येथे आपल्या मुलाकडे आकस्मिक निधन झाले.
धरमचंद चोरडिया ह्यांच्या देहावसानाची बातमी मिळाली आणि मी मनाने 45 वर्षे मागे गेलो. धरमचा आणि माझा परिचय तेवढा जुना होता. आणीबाणीच्या काळात, बहुधा आणीबाणी संपता संपता कधीतरी आमची ओळख झाली. मी त्या वेळेला मुंबईत विवेक साप्ताहिकाचे काम करत होतो. त्याचबरोबर आणीबाणी विरोधात साहित्य तयार करावयाच्या विषयातही बर्याच गोष्टी - प्रामुख्याने लेखन करत होतो. त्यामुळे जनसंघाच्या त्या वेळच्या बर्याच नेत्यांशी, अर्थात जे तुरुंगात नव्हते अशा नेत्यांशी माझा संबंध येऊ लागला. त्याच काळात माझा वसंतराव भागवतांशी परिचय झाला. त्या वेळी जनसंघाचे कार्यालय वडाळ्याला चंचल स्मृती येथे होते. वेगवेगळ्या कारणांनी बहुधा रोजच माझे चंचलमध्ये जाणे-येणे होऊ लागले होते. त्या वेळेला उत्तमराव पाटील जनसंघाचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष होते. मुंबईत आल्यावर त्यांचा मुक्काम चंचलमध्येच असायचा. त्या दरम्यान झालेल्या एका जबरदस्त अपघातामुळे उत्तमराव - आम्ही सगळे त्यांना नानासाहेब म्हणत असू - काहीसे परावलंबी झाले होते. बाहेर वावरताना कोणी ना कोणी सोबत लागत असे. भागवतांनी ते काम माझ्या गळ्यात कधी घातले, ते कुणालाच कळले नाही. पण त्यामुळे त्या काळातील अनेक राजकीय घडामोडी, अनेक महत्त्वाच्या चर्चा मला कमालीच्या जवळून पाहायला मिळाल्या. त्याचा माझ्या पत्रकारितेला खूप फायदा झाला. धरमचंद हा नानासाहेबांबरोबर धुळ्यात वावरत असे. त्यांनी सुदर्शन नावाचे एक साप्ताहिक अनेक वर्षे चालवले होते. सुरुवातीला प्रल्हाद पाटील त्या साप्ताहिकाचे काम पाहत असे. आणीबाणीमध्ये प्रल्हाद अकस्मात गायब झाला. तो गायब होण्याचे रहस्य आजतागायत उलगडलेले नाही. त्याच्या पश्चात धरम सुदर्शन साप्ताहिकाचे काम बघायला लागला होता. त्यामुळे कधीतरी आमची फोनवर ओळख झाली असावी. नंतर तो सत्याग्रह केल्यामुळे तुरुंगात गेला, तेव्हा आमच्या अभाविपच्या साथीदारांच्या समवेत होता. आमची प्रत्यक्ष ओळख मात्र आणीबाणीच्या अखेरच्या काळात कधीतरी झाली. तेव्हापासून माझा विवाह होऊन मी देवगडला स्थायिक होईपर्यंतची बारा-पंधरा वर्षे आम्ही सतत एकत्र वावरलो. नंतर माझा मुंबईतला वावर कमी झाला आणि प्रदेशाच्या बैठकींच्या योगाने आमच्या भेटी होऊ लागल्या. 1994 साली राजस्थानमध्ये त्याचा भीषण अपघात झाल्यानंतर मात्र त्याच्या माझ्या भेटी फारच कमी झाल्या. पण जी बारा-पंधरा वर्षे आम्ही एकत्र वावरलो, तो आमच्या सगळ्यांच्याच आणि महाराष्ट्र भाजपाच्याही जडणघडणीचा काळ होता. पक्ष वाढवणे, अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जाणे, पक्षाची स्वीकारार्हता वाढवणे ह्या उद्देशांनी आम्ही त्या काळात अनेक उचापती केल्या, अनेक नवे, तेव्हा धाडसी वाटणारे प्रयोग केले. अर्थात त्या सगळ्यांच्या पाठीशी नानासाहेब आणि भागवत कायम होते, म्हणूनच आम्ही ते उद्योग करू शकत होतो.
छायाचित्रात डावीकडून धरमचंदजी, माधव भांडारी , प्रमोदजी, राम जोरापुरकर आणि विवेक घळसासी
प्रमोदजी, गोपीनाथराव, विश्वास गांगुर्डे, धरम, मी आणि किरीट सोमय्या अशी सुरुवातीची टोळी होती. नंतर त्यात जावडेकर आले. 1980 साली भाजपाची स्थापना झाली, त्यानंतर लगेचच मी आणि धरम पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम करायला लागलो. आमच्या टोळीतले मी आणि जावडेकर सोडता बाकी सगळे जनसंघापासून कामात होते. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून धरमकडे भारतीय जनता युवा मोर्चाची प्रदेशाची जबाबदारी आली, तर माझ्याकडे पक्षाचा कोकण विभाग संघटक आणि प्रदेशाचा प्रचार व प्रसिद्धी प्रमुख अशा जबाबदार्या आल्या. धरम हा कमालीचा राजकीय, इंग्लिशमध्ये ज्याला Political Animal म्हणतात असा कार्यकर्ता होता. त्याची राजकीय जाण विलक्षण होती. कोणत्याही लहान सहान घटनेतून परिणामकारक राजकीय मुद्दा शोधून काढण्याचे कसब त्याच्याकडे होते. शिवाय माणसे हेरून त्यांना जोडून घेण्याचे कसबही त्याच्याकडे होते. युवा मोर्चाचे काम महाराष्ट्रात वाढवण्याच्या बाबतीत त्याच्या ह्या गुणांचा खूप उपयोग झाला. त्याचबरोबर तो एक उत्तम लेखक होता. एका बैठकीत हजार शब्दांचा लेख लिहून काढण्याची त्याची क्षमता होती. खरे तर त्याचे औपचारिक शिक्षण कमी होते. पण भरपूर वाचन आणि अभ्यासाने त्याने ती उणीव भरून काढली होती. चौफेर वाचन करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. पण डोक्यात घेतलेल्या विषयासाठी तो जीव तोडून मेहनत घेत असे. विशेषत: सामाजिक विषय त्याच्या जिव्हाळ्याचे आणि आग्रहाचे विषय होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर, ओबीसी आरक्षण अशा विषयांमध्ये भाजपाची भूमिका ठरवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. त्याची बहरू लागलेली राजकीय कारकिर्द 1994 साली झालेल्या अपघातामुळे अचानक खंडित झाली. त्यानंतर त्याच्या तब्येतीचेही प्रश्न निर्माण झाले आणि काळाच्या धबडग्यात तो मागे राहिला.
भाजपामधील आजच्या पिढीला तर कदाचित त्याचे नावही माहीत नसेल. पण महाराष्ट्र भाजपाचा इतिहास लिहिताना धरमच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्याच्या जाण्याने ‘आमच्या’तला आणखी एक जोडीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
धरमच्या स्मृतींना अभिवादन करणे ही कल्पनाही अवघड आहे, पण ते करावे लागत आहे. कालाय तस्मै नम: !! सस्नेह अभिवादन !!!
माधव भांडारी