Enter your Email Address to subscribe to our newsletters
गोविज्ञान सेवाभावी संस्था संचलित जनकल्याण गोशाळेचा उद्घाटन समारंभ दि. ३ फेब्रुवारी रोजी पार पडला. सुरगाणा तालुक्यातील भिंतीघर-गुलाबी गाव येथे झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदाचार्य अजित रावळ उपस्थित होते. येथे अवघ्या पाच महिन्यांत गोशाळेची उभारणी झाली. गोसेवेचे व्रत अंगीकारलेले ८० वर्षांचे सेवाव्रती कुबेर पोपटी यांच्याशी या निमित्ताने झालेला हा संवाद...
“एक कार्य उभे राहून स्वयंपूर्ण झाल्यावर तेथे थांबू नये, ही प्रेरणा दासबोधातून मिळाली. एका जागी स्थिर झाल्यावर आसक्ती निर्माण होते, म्हणून आधीच्या कार्याची धुरा सक्षम हातांकडे सोपवली. सामाजिक कामातून मिळालेल्या ऊर्जेचा स्रोत मला भिंतघर येथे घेऊन आला” असे सांगून कुबेर पोपटी पुढे म्हणाले, “नाशिकच्या शंकराचार्य न्यास संचलित मोरोपंत पिंगळे गोशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी पूर्वी आलो होतो. त्या काळात वनवासी भागात तळमळीने सेवा कार्य करणाऱ्या भीमराव गारे यांच्याशी संपर्क आला होता. त्यांच्याच पुढाकाराने आदिवासी सुरगाणा परिसरात पाच जागांची पाहणी केली. प्रतापगड भागात जवळ पाणी उपलब्ध असणारी २२ एकर जमीन मिळत होती. पण तेथे सर्वच तयार असल्यावर आपण काय निर्माण करणार? हा प्रश्न पडला. म्हणूनच ‘नाही रे’चे प्रतिनिधित्व करणाऱ्या भिंतघर-गुलाबी गाव येथेच गोशाळा उभी करण्याचा संकल्प केला. रघुनाथ परशुराम जाधव यांनी २ एकर जागा दान केली. लॉकडाउनमध्ये केवळ ५ महिन्यांत कै. काळू धर्मा जाधव यांच्या स्मरणार्थ गोशाळा सर्वांच्या सहकार्याने उभी राहिली. स्वप्नपूर्ती झाली आहे. लवकरच ती स्वयंपूर्णदेखील होईल” असा आत्मविश्वास पोपटी यांनी व्यक्त केला.
हल्ली आपण आसपास बघतो की, बरेच जण वयाच्या पन्नाशीतच “थकलो बुवा..” हे रडगाणे गातात. सेवानिवृत्तीनंतर फक्त आराम व मौजमजेत वेळ घालवणारे आवतीभोवती दिसतात. या पार्श्वभूमीवर ८० वर्षांच्या तरुण गोसेवक कुबेर तुकाराम पोपटी यांचे सेवा कार्य तरुणाला लाजवेल असेच आहे. मेकॅनिकल इंजीनिअर ते गोपालक असा त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायक आहे. मूळचे कर्नाटकातील इरकल गावचे पोपटी यांचे शिक्षण गुजरातमधील अहमदाबाद येथे झाले. रोजगारानिमित्त ते महाराष्ट्रात आले. मुंबईत ६ वर्षे नोकरी करून ते पुण्यात कोथरूडला स्थायिक झाले. वनाझ इंजीनिअरिंग कंपनीत १९ वर्षे नोकरी केली. विद्यार्थिदशेत असताना पानशेत धरण फुटले, तेव्हा माहितीही नसलेल्या पुण्यात येऊन त्यांनी व मित्रांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. १९८५ साली त्यांनी नोकरी सोडून वारजे-शिवणे भागात स्वतःचा डाय-मेकिंगचा कारखाना सुरू केला. २००० साली मुलाचे लग्न होऊन सर्व स्थिरस्थावर झाल्यावर कारखान्याची पूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली. २००५ साली हरिद्वार येथे जाऊन बाबा रामदेव यांच्याकडून ते योगविद्या शिकले. पुढच्याच वर्षी योगशिक्षक प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला. २००७ साली पत्नी कलावती यांच्यासमवेत पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करताना आदिवासी बांधवांचा सेवाभाव, आदरातिथ्य जवळून अनुभवले. ते बघून समाजसेवेचा अभिमान गळून पडला, असे पोपटी यांनी प्रांजळपणे नमूद केले.
गोशाळेच्या माध्यमातून शाश्वत ग्रामविकास
गोशाळेचे प्रकल्पप्रमुख भीमराव गारे म्हणाले, “गोमातेची सेवा व गोशाळेच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी वस्तीत चांगले काम उभे राहील ही खात्री होती. पाच वर्षांपूर्वी कुबेर पोपटी यांच्याशी संपर्क झाला. त्यातून या प्रकल्पाला चालना मिळाली. लॉकडाउनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असताना पोपटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बघता बघता गोशाळेची उभारणी केली. आदिवासी बांधवांची संपूर्ण साथ मिळाली. अनेक ज्ञात-अज्ञात हातांनी श्रमशक्ती व अर्थशक्ती यांचा समन्वय साधला. शाश्वत विकासाचा पहिला टप्पा गाठला आहे. साबरदऱ्याचे कार्यकर्ते महादू भोये, हिरामण देशमुख, भिका जाधव, बिवळ गावचे विनायक कापडी, कृष्णा भोये, शिवराम बागुल, धामणकुंड गावातील मोतीराम भोये ही केवळ प्रातिनिधिक नावे. अशा अगणित कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाचे बळ दिले. गोविज्ञान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाठक, उपाध्यक्ष नरहर जोशी, सचिव सुनील काण्णव, तसेच सदस्य योगिनी चंद्रात्रे, रवींद्र करंबेळकर, रघुनाथ जाधव, जयंत गायधनी यांचे व अनेकांचे सहकार्य लाभले आहे.
महिला सबलीकरणाचा अनोखा संदेश
सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गाव हा राज्यातील आगळावेगळा प्रयोग आहे. गुलाबी रंग हा प्रेमाचे, सौहार्दाचे, परस्परातील सलोख्याचे प्रतीक आहेच. मात्र या आदिवासी गावाने महिला सक्षमीकरण, सबलीकरण यांचा अनोखा संदेश दिला आहे. ९० घरांची वस्ती असणाऱ्या या गावासह पाच गावांची मिळून ग्रामपंचायत आहे. शिक्षक जितेंद्र गवळी यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व घरे गुलाबी रंगात रंगलेली आहेत. संकल्पनेला मूर्त स्वरूप येण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून योजना राबवली. गावात प्लास्टिक बंदी असून स्वच्छता वाखाणण्याजोगी दिसते. कचरा संकलन करून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येते. येथील समाजमंदिराचे व सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे स्वागतासाठी सज्ज झालेल्या गुलाबी गावाला नवी झळाळी आली आहे. बचत गटाच्या महिला व पुरुष पारंपरिक तारपा नृत्य सादर करणार आहेत. या गावाला चांगली ओळख मिळाली आहे. पर्यटकांनाही येथे येण्याची उत्सुकता असते. पण अद्याप बसदेखील पोहोचत नसल्याने अडचणी येतात. ती अडचण दूर व्हावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त आहे.
९४२२२७२७५५