मोहनजी भागवत यांनी एका भावनिक प्रश्नाला आणि सामरिक प्रश्नाला हात लावलेला आहे. अखंड भारत ही कोट्यवधी भारतीयांची भूक आहे. गांधारीमुळे गांधार विसरता येत नाही, विद्यापीठामुळे तक्षशिला विसरता येत नाही, ज्या सिंधू नदीवरून हिंदू या शब्दाचा उगम झाला, ती सिंधू विसरता येत नाही. बामियानचा बुद्ध विसरता येत नाही, बलुचिस्तानातील हिंगलाज माता विसरता येत नाही, पाणिनीला विसरता येत नाही. हे सर्व आपल्या भावविश्वाचे भाग आहेत, म्हणून भारत अखंड झाला पाहिजे.
मोहनजी भागवत यांनी एका भावनिक प्रश्नाला आणि सामरिक प्रश्नाला हात लावलेला आहे. अखंड भारत ही कोट्यवधी भारतीयांची भूक आहे. गांधारीमुळे गांधार विसरता येत नाही, विद्यापीठामुळे तक्षशिला विसरता येत नाही, ज्या सिंधू नदीवरून हिंदू या शब्दाचा उगम झाला, ती सिंधू विसरता येत नाही. बामियानचा बुद्ध विसरता येत नाही, बलुचिस्तानातील हिंगलाज माता विसरता येत नाही, पाणिनीला विसरता येत नाही. हे सर्व आपल्या भावविश्वाचे भाग आहेत, म्हणून भारत अखंड झाला पाहिजे. वेळोवेळी त्याचे स्मरण करीत राहिले पाहिजे आणि करून देत राहिले पाहिजे. मोहनजी भागवतांनी हे काम केले आहे. ते ज्या स्थानावर आहेत, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर देशात उलटसुलट चर्चा होत राहते. असाही एक वर्ग देशात आहे, ज्यांना अखंड भारत ही संकल्पना अव्यवहार्य वाटते. त्यांचे एक तर्कशास्त्र आहे. परंतु देश आणि इतिहास कोणत्याही तर्कशास्त्राने घडत नाही.
जे देश भारतापासून फुटून निघाले आहेत, ते स्थिर नाहीत. याचे कारण आपली स्वतंत्र ओळख आहे का? या प्रश्नाचे उत्तर त्यांना सापडत नाही. इस्लाम ही राष्ट्राची स्वतंत्र ओळख असू शकत नाही, ती एक उपासना पद्धती आहे. ती ओळख प्रमाण मानली, तर जगातील सगळ्या इस्लामी देशांचा मिळून एकच देश झाला पाहिजे. तसे होणे अशक्य आहे. देशाची ओळख तिथला निसर्ग, जनजीवन, संस्कृती, परंपरा, मूल्यव्यवस्था, प्राचीन थोर स्त्री-पुरुषांचे स्मरण इत्यादी घटकांमुळे होत असते. पाकिस्तान म्हणतो की पाणिनी आमचा आहे, तक्षशिला आमची ओळख आहे, मोहेंजोदडो आणि हडप्पा ही आमची संस्कृती आहे. यापैकी कुणाचाही इस्लामशी संबंध नाही. या सर्व भारतीय संकल्पना आहेत. म्हणून काबूल ते कछार (आसाम) भारत एक आहे. संस्कृतीने एक आहे, मानववंशाने एक आहे, आणि मूल्यसंकल्पनांनीदेखील एक आहे. तो अखंड होणे ही जितकी नैसर्गिक गोष्ट आहे, तितकीच अपरिहार्य गोष्ट आहे. या सर्व भूभागाला निसर्गाने पर्वताच्या साहाय्याने, नद्यांच्या साहाय्याने आणि समुद्राच्या साहाय्याने बांधून ठेवले आहे.
अमेरिका हा अनेक राज्यांचा संघ आहे आणि एक राष्ट्र आहे. ब्रिटन चार राष्ट्रांचा समूह आहे आणि तरीही एक राज्य आहे. रशिया अनेक राष्ट्रांचा समूह आहे, पण तो राष्ट्र आणि राज्य जरी नसला तरी एक साम्राज्य म्हणून अस्तित्वात आहे. भारताला यापेक्षा वेगळा मार्ग शोधावा लागेल. समान संस्कृतीचा समूह म्हणून भारताला वाट शोधता येईल का, याचा विचर केला पाहिजे. इंग्लिश शब्द वापरायचा तर ‘कल्चरल कॉमन वेल्थ’ ही आपली भावी दिशा राहू शकते. देशाचे आजचे राजकीय नेतृत्व पुरेसे परिपक्व असल्यामुळे ते या संदर्भात काही पावले टाकतील, अशी आशा करू या.