भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी देशहिताच्या भावनेने केलेल्या tweetवर तुटून पडणार्यांनी भारतविरोधी आंतरराष्ट्रीय षडयंत्रात खलिस्तानी चळवळीचा होत असलेला वापर समजून घ्यायला हवा. पाकिस्तान आणि कॅनडा सरकार यांचे हे कारस्थान पुराव्यानिशी समोर आणणारा अभ्यासपूर्ण लेख.
मी कोणत्याही सरकारच्या डोक्याचा विचार करणार नाही, कारण तो माझा अधिकार नाही. सरकारचे डोके ठिकाणावर आहे की नाही याची मी चौकशी करणार नाही, कारण तोही माझा विषय नाही. मला आजही भारतरत्न सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव वाटतो आणि त्याने क्रिकेटला रामराम केल्यावर मी क्रिकेट पाहणे सोडून दिले. कोणी म्हणेल की तुम्हाला क्रिकेटमधले काय कळते? नाही, तसेही असेल, पण मी क्रिकेटच्या दोन विश्वचषक स्पर्धांचे माझ्या वृत्तपत्रासाठी वार्तांकन केले आहे. मी ज्या वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे, तिथले क्रिकेटवर प्रसिद्ध झालेले अग्रलेख माझे आहेत. भारताच्या विजयावर किंवा पराभवावर लिहिलेले अग्रलेखही माझेच असत. पाकिस्तानात जाऊन प्रसंगी जीव धोक्यात घालून अन्य क्रिकेट सामन्यांचेही वृत्तांकन मी केलेले आहे. सांगायचा मुद्दा तो नाही. महाराष्ट्र सरकार म्हणे आता सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली, अक्षयकुमार यांच्या ट्वीटची चौकशी करणार आहे. तेव्हा सचिनने काय म्हटले होते ते आधी आपल्याकडे असलेल्या थंड डोक्याने पाहावे लागेल. सचिनने म्हटले होते की, ‘भारताच्या स्वायत्ततेशी कोणत्याही स्थितीत तडजोड होता कामा नये. बाहेरच्या शक्ती या बघ्याची भूमिका घेऊ शकतील, पण भारतीय नाहीत. भारतीयांना आपला देश माहीत आहे आणि त्यांनाच भारताचे भवितव्य ठरवू दिले गेले पाहिजे. आपण देश म्हणून संघटित असायला पाहिजे.’ त्याने (होय, त्याला मी क्रिकेटचा देव मानत असल्याने त्याचा उल्लेख एकेरी केला आहे) रिहानाचा किंवा ग्रेटा थनबर्गचा उल्लेखही केला नव्हता. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ किंवा ‘वंदे मातरम’ म्हणणार्या भारतरत्न लता मंगेशकरांनीदेखील आपल्या ट्वीटमध्ये देशाच्या स्वायत्ततेचाच विचार केला होता. या देशाच्या पंतप्रधानपदी ग्रेटा थनबर्ग नाही किंवा देव करो, रिहानाही या देशाची प्रमुख नाही. या दोघींना भारताचे भवितव्य ठरवायचा अधिकार नाही. शेतकरी आंदोलनाबद्दल या दोघींनी जे काही लिहिले ते समजा कदाचित योग्य आहे असे मानले, तरी त्यावर सचिनने किंवा अक्षयकुमारने भाष्य करायचेच नाही असे नाही. आपल्या देशात अजून तरी लोकशाही आहे. मग सरकार चौकशी कशाची करणार? ज्यांनी देशाच्या प्रजासत्ताक दिनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केला, ते मोकाट बनले तरी चालतील, पण त्यांना फूस देणार्यांबद्दल कोणी काही म्हणता कामा नये, असा हेतू त्यामागे दिसतो.
पण त्यापूर्वी राज्यसभेत शिवसेनेचे अनिल देसाई यांनी जो काही प्रश्न विचारला होता आणि त्यास जे काही उत्तर देण्यात आले, त्याचा उल्लेख करतो. देसाई यांनी विचारले होते की “कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदो यांनी भारतीय संसदेने संमत केलेल्या कृषी कायद्याविषयी जे मत व्यक्त केले आहे, त्याने देशाच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप होतो याची सरकारला माहिती आहे का? सरकारला त्यांचे हे मत अन्यायकारक आणि अनावश्यक वाटते काय? जर तसे असेल, तर आपल्या सरकारने कॅनडाच्या सरकारकडे त्या संदर्भात निषेध नोंदवलेला आहे काय? आणि त्यावर कॅनेडियन सरकारचा प्रतिसाद कसा आहे?” याचा मी काढलेला अर्थ असा की, अनिल देसाई यांना कॅनडाचा हा भोचकपणा आवडलेला नाही. त्यांनी अंतर्गत बाबीत हस्तक्षेप होतो काय, असे विचारलेले नाही. ‘असा हस्तक्षेप होतो याची सरकारला माहिती आहे काय?’ असे त्यांनी विचारलेले आहे. म्हणजेच त्यांनी सचिनने जे काही मत व्यक्त केले, त्यापेक्षा वेगळे काही सांगितलेले नाही. फक्त फरक एवढाच की सचिनने एका पॉप गायिकेचे नाव न घेता आपले मत व्यक्त केले आणि देसाई यांनी जस्टिन त्रुदो यांचे नाव घेऊन प्रश्न विचारला. त्यावर परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले की ‘त्रुदो यांच्या वादग्रस्त विधानाने उभय देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे सरकारने कॅनडाच्या सरकारला कळवले आहे’. ही प्रश्नोत्तरे लेखी आहेत.
खलिस्तानसमर्थक जस्टिन त्रुदो
आताचा विषय असा आहे की, देशावर परचक्र आले असल्यासारखीच स्थिती आहे. जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा त्या कोवळ्या वयात मीही एक समरगीत लिहिले होते आणि त्यास पुण्याच्या तरुण भारत या दैनिकाने प्रसिद्धीही दिली होती. त्या वेळी सर्व देश एक होऊन तेव्हाच्या सरकारच्या पाठीशी उभा होता. कुसुमाग्रज, वसंत बापट, ग.दि. माडगूळकर असे कितीतरी नामवंत कवी तेव्हा आपल्या लेखण्या सरसावून पुढे आले होते. ‘रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते’ यासारखे आपले रक्त उसळवणारे समरगीत तेव्हा प्रसिद्ध झाले होते. आज प्रत्यक्ष युद्ध नसले, तरी जवळपास तशीच स्थिती आहे. चीन एकीकडे आपल्यामागे हात धुऊन लागलेला आहे आणि त्याच्या कोरोनास्त्राची चौकशी जागतिक पातळीवर होण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे शिष्टमंडळ चीनमध्ये असताना त्यास वुहानच्या प्रयोगशाळेपासून अनेक दिवसपर्यंत दूर ठेवण्यात आले होते. मी हा लेख लिहीत असताना ते पोहोचले आणि त्यांचे उत्तर अपेक्षित होते ते मिळाले - वुहानमधून हा विषाणू निघालेला नाही! सांगायचा मुद्दा हा की, चीनबद्दल जशी ही शंका आपल्या मनात आहे, तशीच ती पाकिस्तानबद्दल नक्कीच आहे. दोन्ही देश आपल्या वाईटावरच आहेत आणि त्याबद्दल कोणी बोलायचे नाही किंवा लिहायचे नाही असे करून चालणार नाही. शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी घुसलेले आहेत ही शंका केंद्र सरकारच्या वतीने सर्वप्रथम उपस्थित केली गेली नाही. पंजाबचे मुख्यमंत्री काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी ही माहिती (शंका नव्हे) उजेडात आणली होती, जेव्हा केंद्र सरकारकडून शेतकर्यांशी अजून चर्चाही चालू व्हायची होती. सरकारने हा प्रश्न तातडीने सोडवावा, कारण त्यात घुसलेले खलिस्तानवादी त्रासदायक ठरू शकतात हे मत त्यांचे होते. ते पंजाबचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या गुप्तचर खात्याकडून ही माहिती मिळाली असणार, याबाबत शंका घ्यायचे कारण नाही. केंद्रीय पातळीवर काही पक्षीय नेते जेव्हा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत होते, तेव्हा कॅप्टन अमरिंदरसिंग परिणामांचा विचार न करता तसे म्हणाले होते. त्यानंतर ते सुरुवातीला एकदा एका ट्रॅक्टरवर बसल्याचेही दिसले, हा भाग निराळा.
जर वाचकांची स्मरणशक्ती मंदावली नसेल, तर मी असेही सांगू इच्छितो की जेव्हा कर्तारपूरचा मार्ग (मार्गिका) पाकिस्तानने खुला करायचे मनावर घेतले होते, तेव्हा याच कॅप्टन अमरिंदरसिंगांनी आपल्यावर होणार्या संभाव्य परिणामांचा विचार न करता केंद्र सरकारला या मार्गाबाबत सावध राहायची सूचना केली होती. आज हाच मार्ग खलिस्तानच्या दिशेने जाणारा मार्ग बनतो आहे. गेल्या काही महिन्यांत तिथे जाणार्या भाविकांना खलिस्तानचे प्रचारी साहित्य देऊन भारताच्या विरोधात भडकावले जात आहे. हे झाले कर्तारपूर साहिब या धर्मस्थळाबाबतचे, पण त्याही पलीकडे पाकिस्तानने खलिस्तानची ‘योजना’ कशी हाती घेतली आहे, ते पाहायला हवे. पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ या लष्करी गुप्तचर संस्थेकडून ती राबवली जात आहे. त्या संदर्भात कॅनडाच्या ‘मॅकडोनाल्ड लॉरिअर इन्स्टिट्यूट’ या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने एक अहवाल तयार केला असून त्याचे शीर्षकच मुळी ‘खलिस्तान : ए प्रोजेक्ट ऑफ पाकिस्तान’ असे आहे. माझ्या माहितीप्रमाणे सध्या खलिस्तानचे मुख्य केंद्र कॅनडा आहे, अमेरिका नव्हे. अमेरिकेत खलिस्तानवादी आहेत आणि तिथे त्यांच्या हालचालीही चालू असतात, पण त्यामागे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन नसावेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदो मात्र खलिस्तानचे गुप्त नव्हे, उघड समर्थक आहेत. त्याबद्दल आपल्या परराष्ट्र खात्याने कॅनडाकडे खरमरीत पत्रही पाठवलेले आहे. आपला हा अहवाल प्रसिद्ध करणार्या ‘मॅकडोनाल्ड लॉरिअर इन्स्टिट्यूट’ला धमक्यांची पत्रेही आता येऊ लागलेली आहेत. काही खलिस्तानवाद्यांनी किंवा तथाकथित कॅनडास्थित बुद्धिवाद्यांनी म्हणे त्या संस्थेला पत्र लिहून तो अहवाल मागे घेण्यास ‘बजावले’ आहे. कॅनडाचे प्रसिद्ध पत्रकार टेरी मिलेवस्की यांनी स्वत:च त्या संदर्भात माहिती दिली आहे. अहवाल तयार करणार्यांमध्ये ते स्वत: आहेत. हे मिलेवस्की सीबीसी न्यूजचे प्रतिनिधी आहेत. पाकिस्तानचा हा खलिस्तानी ‘प्रकल्प’ चालू आहे हे मिलेवस्की यांनी लिहिल्यावर त्यांना धमक्यांचे फोन जाऊ लागले, इतके की त्यांना संरक्षण देण्याची मागणी वाचकांकडून केली जाऊ लागली. व्हॅकूंव्हरमध्ये असलेल्या भारतीय उपराजदूतांनाही कॅनडाच्या सरकारने बर्याच टीकेनंतर संरक्षण दिले आहे. त्रुदो यांनी कोरोनावर भारताकडून बनवल्या गेलेल्या लशीची मागणीही केली नाही. हा प्रश्न त्यांच्या पार्लमेंटमध्ये विचारण्यात आला, पण नरेंद्र मोदींशी बोलायचीही त्यांना लाज वाटते आहे.
पाकिस्तानची खेळी
‘मॅकडोनाल्ड लॉरिअर इन्स्टिट्यूट’ या संस्थेचे मोठे संचालक मंडळ आहे आणि जगातल्या सर्व घटनांकडे तिचे बारकाईने लक्ष असते. प्राध्यापक, इतिहासकार, राष्ट्रीय सुरक्षाविषयक माजी सल्लागार असे त्यांच्या संचालक मंडळात आहेत आणि या संस्थेचे अहवाल हे नेहमीच उपयुक्त असल्याचे मानले जाते. आता त्या अहवालात काय म्हटले आहे ते पाहू.
‘खलिस्तान ही पाकिस्तानला वाटणारी ‘गरज’ आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक उभयरोधी (बफर) प्रदेश हवा आणि तो पाकिस्तानला साह्यकारक व्हावा, असा पाकिस्तानचा हेतू आहे. ही मूळ कल्पना पाकिस्तानचे हुकूमशहा झिया उल हक यांची. पण हे सांगताना त्यांनी भारताला रक्तबंबाळ करू, असे म्हटलेले होते, असे पाकिस्तानचे अमेरिकेतले माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी लिहिले आहे. खलिस्तान निर्माण करण्याची ‘खेळी’ ही केवळ बांगला देशनिर्मितीचा सूड घेण्यासाठी आहे असे नाही, तर खलिस्तान ‘निर्माण’ झाला की काश्मीरकडे जाणारा भारतीय मार्ग आपोआपच बंद होईल आणि काश्मीर भारतापासून तुटेल, असा दावाही झियांनी केला होता, असे हक्कानी यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानमध्ये अमेरिकेला हवा असलेला दहशतवादी ओसामा बिन लादेन हाच केवळ दडून बसला होता असे नाही, तर तिथे आणखीही काही दहशतवादी लपलेले आहेत. त्या अनेकांमध्ये तलविंदर परमार हाही आहे. तो आणि गोपालसिंग चावला हे लष्कर ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्या कायम संपर्कात असतात. या दोघांच्याही दृष्टीने पाकिस्तान हा सुरक्षित स्वर्ग आहे. प्रसिद्ध पंजाबी लेखक आणि मूळचे पाकिस्तानी पण सध्या कॅनडामध्ये आश्रय घेतलेले समालोचक तारेक फतेह यांनी स्वत: पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना काही निवडक पत्रकारांशी चर्चा करताना ‘भारताचे तुकडे तुकडे करू आणि खलिस्तानची निर्मिती करून बांगला देश निर्मितीचा बदला घेऊ’ असे सांगताना ऐकलेले आहे. ते असेही म्हणाल्याचे तारेक फतेह सांगतात की, पाकिस्तानच्या सरहद्दीवर आम्ही भारतातून एक नवा ‘बांगला देश’ निर्माण करू.’
झिया असोत वा भुट्टो वा इम्रानखान, त्यांना फक्त भारताशी वैर कायमस्वरूपी हवे होते आणि आहे. त्यावरच त्यांची राजकारणाची पोळी भाजली जात असते. ‘मॅकडोनाल्ड’चा हा अहवाल सांगतो की, कॅनडामध्ये असणार्या शीख फुटीरतावाद्यांना पाकिस्तानशी संधान बांधणे तसे अवघड, पण आवश्यक वाटते. नोव्हेंबर 2008मध्ये मुंबईत झालेल्या बाँबस्फोटात 166 जण ठार झाले, त्यामागे हाफिज सईदचाच हात होता. गोपालसिंग चावलाला हाफिज सईद हा ‘आदर्श’ वाटतो. तलविंदरसिंग परमार हा एअर इंडियाच्या विमानात करण्यात आलेल्या बाँबस्फोटानंतर कॅनडातून पळाला आणि पाकिस्तानातच गेला. त्याला अफगाण सरहद्दीवर दर्रा येथे बंदुकांच्या बाजारामध्ये जुलै 1989मध्ये मशीन गन खरेदी करताना पाहिले होते. त्यानंतर तो आणि त्याचे दोन पाकिस्तानी साथीदार यांना 15 ऑक्टोबर 1992 रोजी पंजाबमध्ये ठार करण्यात आले. तो बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा सहसंस्थापक. 1970मध्ये तो कॅनडामध्ये पळून गेला. (सुखदेवसिंग बब्बर हा बब्बर खालसाचा संस्थापक.) 1985मध्ये एअर इंडियाच्या फ्लाइट 182च्या, म्हणजे ‘कनिष्क’ विमानाच्या बाँबस्फोटाचा तो प्रमुख आरोपी होता, पण त्याचा खटला कॅनडात व्यवस्थित चालला नाही आणि त्याच्यावर आरोप सिद्ध करण्यात अपयश आले. तो कॅनडातून पळून गेला. त्या खटल्यात इंदरजितसिंग रेयात याला 20 वर्षांची शिक्षा झाली. परमार आणि रेयात यांना कॅनडातल्या ‘रॉयल कॅनेडिअन माउंटेड पोलिसां’च्या पथकानेच अटक केली. दोघांवरही एअर इंडियाचे सर्व 329 प्रवासी मारल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यात एकट्या रेयातला 9 फेब्रुवारी 2009 रोजो शिक्षा झाली. जपानमध्ये नरिता विमानतळावर झालेल्या एअर इंडियाच्या विमानातल्या स्फोटालाही याच दोघांना जबाबदार धरण्यात आले होते. मात्र परमार त्यातून सुटला. त्यानंतर तो पाकिस्तानात काही काळ राहून पंजाबमध्ये शिरला. राजीव गांधींना ठार करण्याचा त्याचा डाव 8 एप्रिल 1985 रोजी त्याच्याच एका फोनवरून उघडकीस आला, पण कॅनेडिअन सुरक्षा संघटनेने त्याचा हा संवाद त्या टेपवरून खोडून टाकला. हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले ते कळायला मार्ग नाही. 2006मध्ये न्यूयॉर्कमध्ये खालिद अवान याला ‘खलिस्तान कमांडो फोर्स’ला मदत करताना पकडले होते. अनेक अपिलांनंतर अवानला 14 वर्षांची शिक्षा झाली. दुसरा एक कॅनेडिअन नागरिक सतिंदरपालसिंग हा पळून जाऊन पाकिस्तानमध्ये स्थायिक झाला आहे. तो गेली अनेक वर्षे तिथे राहून ‘इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन’चे काम पाहतो आहे. भगतसिंग ब्रार आणि पर्वकारसिंग दुलाई यांनी कॅनडा सरकारने त्यांच्यावर बजावलेल्या उड्डाणबंदीला विरोध चालू केला आहे. हे दोघे भारतातल्या खलिस्तानवाद्यांना नेहमीच मदत करत असतात. त्यांचा भारतातल्या दहशतवादी कारवायांशी थेट संबंध असल्याचे न्यायालयात सांगितले गेले आहे.
अतिशय खोलवर रुजलेल्या कॅनडा-पाकिस्तान या कारस्थानाला बरेच कोन, उपकोन आहेत असे या अहवालावरून आपल्याला म्हणता येते. दिल्ली परिसरात शेतकरी आंदोलन सुरू झाल्यापासून पाकिस्तानच्या राजकारण्यांना अचानक बाळसे धरू लागले आहे. मनातून अतिशय आनंद दिसतो आहे. पाकिस्तानला गेल्या कित्येक वर्षांत जे जमले नाही, ते आता नजीक आल्याच्या थाटात त्यांच्या हालचाली आणि ते ज्यांचा हुकूम मानतात त्या ‘आयएसआय’च्या करामती चालू झाल्या आहेत. शीख समाजाबद्दल त्यांच्या मनात एकदम प्रेमाचे भरते आले आहे. आपण फाळणीच्या काळात या समाजाला कसे नामशेष केले हे त्यांना आठवेनासे झाले आहे. त्या वेळी वीस लाखांवर असलेला समाज आता काही हजारांच्या घरात आला आहे. त्यातही जेव्हा जनगणना होते, तेव्हा शीख आणि हिंदू समाज यांची संख्या एकत्रच दाखवली जाते. सांगायचा मुद्दा हा की, शीख समाज आपला आहे, असे त्यांना एकदमच वाटू लागल्याचे नाईला इनायत या पाकिस्तानी पत्रकार महिलेने आपल्या एका वृत्तान्तात म्हटले आहे. पाकिस्तानात शीख समाजाच्या मुली पळवून नेऊन कशा पद्धतीने बाटवल्या जातात आणि त्यांची लग्ने लावून दिली जातात, ते अशा वेळी त्यांना आठवत नाही. कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले, तेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी जाहीर भाषणात सांगितले की, ‘इम्रानखान यांची ‘गुगली’ नरेंद्र मोदींना समजलीच नाही’. म्हणजे कर्तारपूरच्या गुरुद्वाराचे त्यांना महत्त्व नसून त्याला ती गुगली मानतात हेही त्यातून स्पष्ट झाले. त्या वेळी परराष्ट्र मंत्री असणार्या सुषमा स्वराज यांनी त्यांना खणखणीत उत्तर दिले होते. सध्या शीख समाज हा त्यांचा ‘पोस्टर बॉय’ आहे असे मी नाही, नाईला इनायत म्हणतात, तेव्हा त्यातच सगळे काही आले.
इनायत यांची लेखणी कशी आहे, त्याचे हे उदाहरण पाहा.
नवरा आपल्या पत्नीस - मॅडम, आज कोरमा (शक्यतो मांसाहारी) आज अतिशय अवर्णनीय झाला आहे.
पत्नी - होणारच, आज कोरम्यात अॅटम बाँब घातले आहेत. (भारताने पाकिस्तानकडे टोमॅटोची निर्यात बंद केल्यानंतर त्यांनी दिलेली ही तळटीप.)
आता मूळ मुद्द्याकडे येतो. ट्विटरच्या कंपनीला भारताने सूचना केल्याप्रमाणे आधी तात्पुरते का होईना, 257 ट्विटर खाती बंद करण्यात आली. आता आणखी 1178 खाती बंद करण्यास सांगितले आहे. ही खाती पाकिस्तानमधून चालवली जातात आणि ती बहुसंख्य शेतकर्यांविषयी भडकवणारी आहेत, असेही सांगण्यात आले. ही खातीही व्यक्तिश: कोणी चालवत असेल असे नाही. त्यापैकी बहुतेक खाती ‘आयएसआय’कडूनच हाताळली जातात, यात शंका बाळगायचे कारण नाही. (ही ट्वीट खाती बंद करण्याचा हा ‘उद्योग’ कोणी सांगितला, त्याची चौकशी न करोत म्हणजे झाले.) जो खलिस्तानी डाव कॅनडात खेळला जात आहे, त्याचे कर्तेकरविते पाकिस्तानात बसून त्याच उद्योगात आहेत. त्यांना त्यांच्या देशाशी काही घेणेदेणे नाही. आपल्या देशात बेदिली माजावी असे काहीतरी घडते आहे, हे नक्की. त्याची चौकशी खरे तर व्हायला हवी.