उत्तराखंडाच्या महाप्रलयाला आपण कोणत्या दृष्टीकोनातून बघायचं? महादेवांचा प्रकोप की निसर्गाशी केलेल्या छेडछाडीचा परिपाक? पण हे असंच चालू राहिलं, तर सगळ्यांसाठीच संकटाची वेळ लवकरच येईल, हिमालयीन भागात राहणार्यांसाठी अन हिमालयापासून दूर राहणार्यांसाठीही. कदाचित आपल्याला नैसर्गिक संसाधनांचं योग्य मूल्यांकन करायला जमलेलं नाही, किंबहुना आपण असं मूल्यांकन करायचा प्रयत्नच केलेला नाहीये. अन म्हणूनच विकासाच्या नावाखाली विनाशाची जी रेखा नद्यांपासून ते हिमनद्यांपर्यंत आपण आखलीय, ती लवकरात लवकर नियंत्रित करण्याची गरज आहे. हिमालय बचाओ! देश बचाओ! ही फक्त घोषणा नाही, तर हा हिमालयीन क्षेत्रांत भावी विकास प्रकल्प धोरणं दिशाहीन होण्यापासून वाचवण्याचा मार्ग आहे.
आज क्यों बनकर हिमानी?
दे रहा है सहसा किसी
भूचाल का इशारा..
नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व्ह, नंदादेवी सँक्चुअरीचे दोन भाग, एक आतला व दुसरा बाहेरचा. नंदादेवी सँक्चुअरी ही नंदादेवी नॅशनल पार्क म्हणजे नंदादेवी शिखराच्या (7817 मी. उंच). भोवती असणार्या अनेक शिखरांना (6000 ते 7,500 मी.) वेढून असणारा ग्लेशिअर्सचा समुदाय. नंदादेवी सँक्चुअरीचा आतील भाग हा नंदादेवी शिखर व दोन प्रमुख ग्लेशिअर्सनी व्याप्त असा. दख्खिनी ऋषी व उत्तरी ऋषी ग्लेशिअर. ऋषिगंगा नदीचा उगम नंदादेवी शिखराच्या जवळच्या या दोन ग्लेशिअर्सच्या, दख्खिनी व उत्तरी ऋषी यांच्या संगमातून होतो. ऋषिगंगा आतील भागातून सुरू होऊन ऋषी गॉर्जमधून वाहते, जिचे दोन भाग, वरील भाग, जो 3 कि.मी. लांब आहे अन दोन्हीही सँक्चुअरीजना जोडणारा अन त्यातून नंतर खालच्या भागातून जो 4 कि.मी. लांब आहे. याच नंदादेवी इनर सँक्चुअरीत अनेक हिमशिखरं व असंख्य ग्लेशिअर्स आहेत, त्रिशूल, चंगबंग, दूनागिरी, रामानी, त्रिशूली, राँटी. हे अजस्र ग्लेशिअर्स आहेत.
ही घटना घडण्यापूर्वी या संपूर्ण भागात काही दिवस प्रचंड बर्फवृष्टी झाली. अन त्यानंतर पुन्हा स्वच्छ हवामानामुळे हा बर्फ लगेचच वितळून त्याचं पाणी पहाडांमधल्या भेगांत मुरून भूस्खलन (लँडस्लाइड) होण्याची शक्यता नकारता येत नाही. अनेकांच्या वेगवेगळ्या संशोधनांनुसार (glaciologists, seismologists, scientists, experts in remote sensing of glaciers) यातील नंदादेवी/रॉंटी सॅडल/त्रिशूल/त्रिशूली यापैकी एका शिखरावरील एक हँगिंग ग्लेशिअर अर्थात हिमनदी, ५६०० मी. उंचीवरून खाली पडला, अन ११ कि.मी. अंतर पार करून ३८०० मी. उंचीवरून ऋषिगंगेत पडला, ज्यामुळे एक हिमनद तलाव (glacial lake) तयार झाला. याच्या पाण्याचा दबाव आतून वाढल्यामुळे या तलावाच्या बंधार्यांच्या फुटण्यामुळे प्रचंड मोठा हिमप्रपात (Avalanche) होऊन भूस्खलन (landslide) होऊन वरील प्रवाह, तसंच मोठमोठे दगड, असं सर्वच प्रचंड वेगाने खाली कोसळलं, अन ऋषिगंगा गॉर्जमधून नदीच्या प्रवाहाची व्याप्ती वाढली. एखादा ग्लेशिअर वितळून किंवा फुटून त्यातलं पाणी जेव्हा वाहतं, तेव्हा ते प्रचंड वेगाने आपल्यासोबत पहाडांचं भाग घेऊन येतं. या प्रपाताने ऋषिगंगेला प्रचंड पूर आला. त्यामुळे या खोर्यात निर्माणाधीन असणारे १३.२ मेगॅवॉट क्षमतेचा ऋषिगंगा हायड्रो पॉवर प्रॉजेक्ट व ४ कि.मी. अंतरावरील ५२० मेगॅवॉट क्षमतेचा तपोवन विष्णुगाड हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रॉजेक्ट्स नष्ट झाले. जीवितहानी झाली. ५२० मेगॅवॉट शक्तीची ही परियोजना संपूर्णपणे नष्ट झाली. जीवितहानी अपरिहार्य होतीच. ऋषिगंगेचं व धौलिगंगेचं पाणी व सोबतचा राडारोडा तपोवन विष्णुगाड जल विद्युत परियोजनेच्या तीन कि.मी. मुख्य टनेलमध्ये भरला. हा सर्व गाळ काढण्याचं काम चालू आहे.
ऋषिगंगा पुढे धौलिगंगेशी संगम पावते अन धौलिगंगा अलकनंदेशी. अलकनंदेचं पात्र रुंद होत जातं अन ती देवप्रयागपर्यंत वाहते, भागीरथीशी संगम होण्यासाठी. मध्ये अनेक नद्या अलकनंदेला येऊन मिळतात. या घटनेनंतर अलकनंदेच्या पात्राची उंची वाढून काठावरच्या अनेक गावांना धोका उत्पन्न झाला.
2013मध्ये झालेल्या केदार खोर्यातल्या महाप्रलयाची आठवण करून देणारी ही घटना तितक्याच तीव्रतेची होती. अलकनंदा नदीच्या पात्राचा फुगवटा वाढला असता, तर मध्ये मंदाकिनीने माजवलेल्या हाहाकारासारखंच हे घडलं असतं.
केदारनाथ घटनेच्या वेळी यात अडकलेल्या लोकांसाठी सरकारी मदतकार्य जवळजवळ पाच दिवस सुरू झालं नव्हतं. तत्कालीन राज्य व केंद्र सरकारांनी पाच दिवस वित्तहानी, जीवितहानी सर्वांची दखल घेतली नव्हती. पण ऋषिगंगेच्या या घटनेनंतर सध्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या संवेदनशीलतेमुळे व त्वरित व अचूक निर्णयांमुळे भूदल, नौदल, हवाई दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यासारख्या प्रशासकीय यंत्रणा बचाव व मदतकार्यात युद्धापातळीवर उतरल्या, केवळ काही तासांतच. अडकलेल्या लोकांना शोधणं, वाचवणं तसंच पाण्याचा वेग कमी करण्यासाठी पुढची अनेक धरणं रिकामी करून सर्व पाणी एकत्र करणं, जेणेकरून पुराचं गांभीर्य कमी होईल, अलकनंदेच्या पात्राचा फुगवटा वाढून काठावरच्या गावांसाठी समस्या उभी राहणार नाही. लोकांना शोधून त्यांच्या राहण्या-जेवण्याची सोय करणं, त्यांना सुरक्षित स्थानी पोहोचवणं यासारख्या कार्यात ही सर्व प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करतेय.
जोशीमठ-मलारी महामार्गावर रैणी गावाजवळ असणारा चीन सीमेला जोडणारा पूल तुटून गेला, जो नव्यानं बांधण्याचं काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने तत्काळ सुरू केलंय. वैद्यकीय सेवा तत्काळ पुरवली गेलीय. स्वयंसेवक, डॉक्टर्स अथक परिश्रम करत आहेत. अन्नसामग्रीची कमतरता पडणार नाही याची काळजी घेतली जातेय. रैणी गावातल्या दोन घरांचं या दुर्घटनेत नुकसान झालंय, जे पुन्हा बांधून देण्याचं आश्वासन दिलंय.
या प्रभागाची आवश्यकता ही आहे की, हा भाग पुढे चीन सीमेपर्यंत जोडला गेलाय. इथे सीमेवर नजर ठेवण्यासाठी, सुरक्षा या सर्वांसाठी उत्तम रस्त्यांची गरज आहे. भूदल, आयटीबीपी, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यासारख्या यंत्रणा सजग राहाव्यात, यासाठी रस्त्यांचं जाळं व या खोर्यातल्या असंख्य गावांची, लोकांची विजेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इथे अनेक योजना सुरू केल्या आहेत.
पुराणातून केदारखंड असा उल्लेख झालेला उत्तराखंड.. श्रद्धा अशी की आपल्या देवदेवता व महान विभूती सर्वप्रथम या भूमीत अवतरल्या, त्यामुळे या भूभागाचा उल्लेख ‘देवभूमी’ असा.
हिमालय पर्वतमाला जगातील सर्वात तरुण पर्वतमाला आहे, हे सत्य आहे. परंतु याच पर्वतमालेच्या कुशीत अनेक महान संस्कृतींचा जन्म व विकास झालेला आहे. हिमालयाचं अस्तित्व म्हणजे निसर्गाची एक अनुपम देणगी. भारताचं अस्तित्वच जणू. आपल्या संस्कृतीपासून हिमालय वेगळा करताच येणार नाही.
2500 कि.मी. लांब आणि 350 कि.मी. रुंद असा हा हिमालय पसरलेला आहे.
जगातील सर्वात उंच पर्वत - सर्वात तरुण पर्वत.
हिमालय म्हणजे एखादी रांग नसून अनेक मैल पसरलेल्या अनेक हिमाच्छादित पर्वतरांगांनी बनलेला महाकाय पर्वत आहे.
हिमालयाची निर्मिती झाली आहे ती इंडियन प्लेट आणि तिबेटिअन प्लेट यांच्या टकरीतून. इंडियन प्लेट व तिबेटिअन प्लेट यांच्यात प्रचंड घर्षण झालं, त्यामध्ये तिबेटिअन प्लेट वर उचलली गेली आणि हिमालयाची निर्मिती झाली. हिमालयाची निर्मिती मुख्यत: समुद्र मागे रेटला गेल्यामुळे झाली. अत्यंत भुसभुशीत अशा पायावर हिमालय उभा आहे. तो अत्यंत ‘भंगूर, ठिसूळ’ असा आहे. लाखो वर्षं बर्फाचे थरच्या थर एकमेकांवर साचून तयार झालेला, पण आतून ठिसूळ.
हिमालयाचं अंतरंग व बाह्यरंगही ठिसूळ आहे. त्याचबरोबर इंडियन प्लेट आणि तिबेटिअन प्लेट यांच्यात सतत घर्षण आजही चालूच असतं. त्यामुळेच हिमालयाच्या अंतरंगात आजही सतत काही ना काही घडामोडी होत असतात. या घडामोडीमुळे याच्या बाह्यरचनेत सूक्ष्म पण सातत्यपूर्ण बदल सुरूच असतात. त्याचा परिणाम म्हणून एव्हरेस्टची उंची वाढणं किंवा गंगोत्री ग्लेशिअर मागे सरकणं हे दिसत राहतात.
हिमालयात वाहणार्या नद्यांचं पाणी संपूर्ण देशाच्या उपयोगी पडणारं. हिमालय हा ऑक्सिजनचं मोठं भांडार आहे, जो तापमानाचं नियंत्रण तर करतोच, तसंच उगम पावणार्या नद्या, ग्लेशिअर्स (हिमनद्या), झरे,धबधबे यांना जीवित ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतो. तेथील एकूण बर्फ व हिमाचा साठा सुमारे 1500 अब्ज (15 लाख मिलियन) घ.मी. इतका प्रचंड आहे. एका अहवालानुसार हिमालयातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधून पन्नास लाखांहूनही अधिक जलधारा आहेत. यात जवळजवळ 30 लाख जलधारा केवळ भारतीय हिमालय क्षेत्रातून वाहतात. परंतु पर्यावरणात होणारे बदल, पर्यावरणावर होणारे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम या जलधारांवरही दिसून यायला लागले आहेत.
यात हिमखंड वितळून जलस्तर वाढल्यामुळे नद्यांमध्ये जलस्तर उंचावतो. पर्यावरणात होणारे बदल निसर्गनिर्मित आहेत अन मानवनिर्मितही. त्यामुळे नद्या आटत चालल्या आहेत, त्यांच्या पात्रांच्या दिशा बदलत जात आहेत आणि हिमनद्या वितळत चालल्या आहेत. त्यांच्या जागा बदलत आहेत, त्या मागं सरकणं असे बदल होत जाताना दिसत आहेत. हिमालयातील नद्यांच्या मूळ स्रोतांना मानवी औद्योगिक हितांना बळी पडावं लागतंय. एका अहवालानुसार नंदादेवी बायोस्फिअरमधल्या त्रिशूल शिखराजवळच्या त्रिशूल ग्लेशिअरमध्ये मोठी हिमभेग/हिमगर्ता (crevasse) निर्माण होऊन ती वाढत चालल्याचं सध्या निदर्शनास आलं आहे.
या जलधारांच्या आकारमानात घट होण्याची किंवा त्यांच्या जागा बदलण्याची किंवा वितळण्याची अनेक कारणं आहेत, ज्यात ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनगांचं आकारमान कमी होणं, ते वितळणं, किंवा त्यांच्या जागा बदलणं हे घडत असतं. पाण्याची सतत वाढत चाललेली गरज, अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी मानव पर्यावरणातील विविध घटकांचा वापर करतो.
वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण यांमुळे पर्यावरणातील घटकांचा वापर वाढला. शेतीच्या, वस्त्यांच्या आणि उद्योगंधद्यांच्या विस्तारासाठी रस्ते, तसंच रोजच्या वापरासाठी अत्यावश्यक असणार्या विजेसाठी, औद्योगिकीकरणासाठी पहाडी भागात होणारे बदल, टेक्टॉनिक प्लेट्सचं घर्षण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलविद्युत परियोजनांसाठी हिमालयस्थित नद्या, झरे यांचा उपयोग होतोय. एकट्या उत्तराखंडात गंगेच्या अनेक उपनद्या, शाखा यांच्यावर 1 लाख 30 हजार कोटींच्या जलविद्युत परियोजना प्रस्तावित आहेत.
यासाठी हिमनदी किंवा ग्लेशिअर म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. गुरुत्वाच्या प्रभावाखाली सावकाशपणे वाहणार्या बर्फाच्या प्रचंड मोठ्या राशीला हिमनदी म्हणतात. जमिनीच्या पृष्ठभागावर बर्फ व हिम यांचं अखंड असं आच्छादन तयार झालेलं असतं आणि हे आच्छादन सर्व दिशांना बाहेरच्या बाजूस सरकत (वाहत) असतं. हिमनदीत अनेक वर्षे साचलेलं व घट्ट झालेलं हिम असून त्याच्या वजनाने अखेरीस त्याचं खालचं थर दाबले जाऊन बर्फ बनलेला असतो. उंच पर्वतीय क्षेत्रांत हिमनदी वाडग्याच्या आकाराची खोलगट व सर्व बाजूंनी भिंतींनी वेढलेली असून तिच्या भिंती प्रपाती (तीव्र उताराच्या) असतात. यांचे लांब, अरुंद प्रवाह असून ते डोंगराच्या दरीपर्यंत खाली वाहत जातात. जगातील पर्वतीय प्रदेशांत या प्रकारच्या हिमनद्या आढळतात.
हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ वितळला की बर्फाचं पाणी बर्फाच्या राशीत खोलवर पाझरतं आणि हिमस्फटिक व बर्फाचे कण यांच्यामधील रिकाम्या जागा त्या पाण्याने भरल्या जातात व ते पुन्हा गोठतं. या खोलवर पाझरलेल्या पाण्यात खाली हिमखंड असतात, अन या पाझरलेल्या पाण्याची तळी बनतात, त्यांना हिमनद तलाव (glacial lake) म्हटलं जातं. या हिमनद तलावांतील हिमखंड वेगाने वितळले, तर त्यातील पाण्याची पातळी वाढून या हिमगर्तांच्या नैसर्गिक भिंतींवर त्याचा दाब पडून ते फुटतं अन त्यातील पाणी, हिमखंड हे वेगाने बाहेर पडून विध्वंसक बनतात. हिमालयातील जवळजवळ 50 जीवनदायक हिमनद तलाव (ग्लेशिअल लेक्स) पुढील काही वर्षांत त्यांचे किनारे तोडून,(जसं मध्ये चोराबारी सरोवर वाहिलं होतं), मैदानी भागांना जलमय करू शकतात, ज्यामुळे लाखो कोट्यवधी लोकांचं जीवन धोक्यात पडू शकतं.
कधीकधी हिमनद्या घसरतात, आपली जागा बदलतात. अर्थात ही वर्षानुवर्ष घडणारी प्रक्रिया आहे, शेकडो वर्षांचा साठलेला जुना बर्फ हा घसरत, वितळत असतो अन हिमनद्यांच्या घसरण्याला कारणीभूत ठरतो.
वातावरणातील बदल हे यासाठी मुख्यत्वे कारणीभूत आहेत. मुख्यत्वे अतिवृष्टी, अति बर्फवृष्टी, भूस्खलन, भूकंप आणि दोन टेक्टॉनिक प्लेट्समधील वारंवर होणारं घर्षण यामुळे हिमालयाच्या अंतर्भागात सतत हालचाली होत असतात.
दर वर्षी उत्तराखंडात कुठे ना कुठे ढगफुटी होते. त्यामुळे एखाद्या नदीचा जलस्तर वाढणं, भूस्खलन होणं ही नवी घटना नाही. अति प्रमाणात पावसामुळे कुठे ना कुठे तरी भूकंपाचे हलके धक्के बसत असतात, कारण हा संपूर्ण भाग भूकंपप्रवण आहे.
हिमालय हा ग्रॅफाईटसारख्या भंगूर, ठिसूळ दगडांचा बनलेला आहे आणि तो अगदी कुमारावस्थेत आहे. त्यामुळे हिमालयामध्ये भूस्खलन सहज होत राहतं. यामुळे पाऊस आला की पाणी पहाडांमध्ये मुरतं आणि ऊन पडल्यावर या पाण्याचं बाष्पीभवन होऊन पहाडांचे थरच्या थर ढिले होऊन भूस्खलित होतात. अनेक ठिकाणी भूस्खलन सुरूच आहे.
या संपूर्ण डोंगररांगात सतत काही ना काही तरी घडामोडी होतच असतात. यापैकी सर्वात भयावह असं भूस्खलन (लँडस्लाइड) केदार खोर्यात झालं. 16 व 17 जून 2013 या दिवसांत केदारनाथ मंदिरामागील केदार व केदार डोम शिखरांपैकी केदार डोम शिखराचा एक कडा सततच्या बर्फवृष्टी व मुसळधार पावसामुळे कोसळला व त्याचे मोठे तुकडे खाली घसरून आले.
केदार डोमचे कडे कोसळून जो माती, बर्फ व दगडांचा ढिगारा खाली आला, त्यामुळे हे सरोवर भरून गेलं व त्यात साठलेलं पाणी, हा मलबा हा उतारावरून वाहून ग्लेशिअरमध्ये वाहून येऊन ग्लेशिअर फुटला व हे सगळं केदारनाथपर्यंत आलं व पुढची महाभयंकर घटना घडली.
सहा महिने झालेली प्रचंड बर्फवृष्टी, त्यानंतर आलेला पाऊस.. केदारनाथजवळचा ‘चोराबारी ग्लेशिअर’ अक्षरशः फुटला. एखादा ग्लेशिअर जेव्हा फुटतो, तेव्हा हजारो माणसं, घरं गिळंकृत करतो. इथे हा ग्लेशिअर फुटल्यावर त्याच्यातील बर्फाने चोराबारी सरोवरातील पाण्याची पातळी वाढली व चोराबारी सरोवराच्या तटबंदीला भेगा पडल्या.
याच ग्लेशिअरमधून मंदाकिनी नदीचा उगम होतो, जी उगमापासूनच भयंकर प्रपाती आहे. हा ग्लेशिअर फुटल्यावर मंदाकिनीही खूप भयंकररित्या वाहू लागली. केदार डोम या शिखराचा एक कडा निखळून येऊन हिमप्रपात झाला. मंदाकिनी व हा हिमप्रपात व ग्लेशिअरमधील बर्फ आपल्याबरोबर सगळे मोठमोठे दगड घेऊन खाली आले.
एखादा हिमकडा जेव्हा तुटतो, त्याचे तुकडे तुकडे जेव्हा होतात, तेव्हा हत्तीएवढ्या मोठ्या दगडांचा खच होतो. हे दगड वेगाने खाली येतात अन आपल्याबरोबर इतर अनेक कडे ढासळायला मदत करतात. हिमालयाचं स्वरूप पाहिलं तर अतिशय भंगूर, ठिसूळ अशा ग्रॅनाईटने तयार झालेला अन लाखो वर्षांपासून बर्फ साचत गेलेला. त्यावर हा बर्फ भुसभुशीत होऊन तोही खाली घसरतो.
या तिन्ही घटकांमुळे चोराबारी ग्लेशिअर, मंदाकिनी व प्रचंड पावसामुळे झालेला हिमप्रपात हे सगळं या विध्वंसाचं कारण आहे. ग्लेशिअर्स आज आपली मूळ जागा सोडून मागे-पुढे सरकत आहेत ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे. ग्लोबल वॉर्मिंगला आपण कारणीभूत आहोत.
या विध्वंसाचं आणखी एक मुख्य कारण आहे - अतिवृष्टी. Undergroundच्या अहवालानुसार 11 ते 17 जून या दरम्यान उत्तराखंडाच्या अनेक भागांमध्ये 50 सें.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला व तो नॉर्मल पातळीपेक्षा 800% जास्त होता. म्हणजेच नेहमीच्या पडणार्या पावसाच्या मर्यादेपेक्षा 375% जास्त.
6 महिन्यांपैकी ऑक्टोबर-नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत उत्तराखंडात बर्फवृष्टी होते. तो वितळायला सुरुवात होते मार्च-एप्रिलमध्ये अन साधारण त्याच सुमारास चार धाम यात्रा सुरू होते. या वेळी पाऊस आधी सुरू झाला, तोही मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे वितळलेला बर्फ, पाऊस यांचा एकत्रित परिणाम म्हणून नद्या भरून वाहू लागल्या व भूस्खलनं होऊ लागली.
उत्तराखंडात प्रश्न येतो त्याच्या भौगोलिक परिस्थितीचा. हे सगळं बांधताना, प्लँट्स उभे करताना, किंवा काहीही structure उभं करताना, अवजड मशीनरी हलवताना सुटून येणारे भूखंड, ढासळणारे कडे व त्याच्या मलब्याखाली दाबली जाणारी गावंच्या गावं ..
अन हे कधीतरीच घडत नाही, तर नित्यनेमाचं. एखादं भूस्खलन झालं तर सुटलेला कडा अथवा पहाडाचा तुकडा हा जीवितहानी होऊ नये यासाठी आवश्यक असणारं blasting.
या भागात जेव्हा असं लश्ररीींळपस करायची वेळ येते, तेव्हा ते केंद्र सरकार व उच्च/सर्वोच्च न्यायालय यांच्या परवानग्या व त्यांच्या निकषात बसेल अशाच प्रमाणात किमान प्रमाणात करू दिलं जातं. या अशा लश्ररीींळपससाठी उच्च न्यायालयाची परवानगी लागते. हे सरसकट केलं जात नाही. न्यायालयाने त्याचे काही निकष ठरवून दिले आहेत, अन त्या अंतर्गतच हे करावं लागतं. अगदी अत्यावश्यक असेल तेव्हा अन तिथंच.
नदीपात्रातील व इतर ठिकाणी होणारं बेसुमार बांधकामं, स्थानिकांनी अनेक ठिकाणी नदीपात्रांत बेकायदेशीर केलेली आहेत, ज्यासाठी नदीपात्रातून बांधकामासाठी दगड व वाळू खणण्याचं काम करण्याच्या या बेकायदेशीर कृत्यांमुळे नद्या, त्यांची पात्रं रुंद होणं व नद्यांच्या प्रवाहांच्या दिशा बदलणं.