स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे - आक्षेप आणि वास्तव

विवेक मराठी    14-Dec-2021
Total Views |
लेखक अक्षय जोग यांनी संशोधकाच्या भूमिकेतून हे पुस्तक लिहून सावरकरांवरील आक्षेप खोडण्यात आणि वास्तव समाजापुढे आणण्यात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
ज्यांना आपण आदर्श मानतो, त्यांना इतर काही जण खोटे ठरवतात.. ज्यांच्या जाज्वल्य देशभक्तीला सर्वोच्च त्यागाची आणि स्वाभिमानाची असलेली जोड कायमच आपल्याला प्रेरणा देते, त्यांच्यावरच काही जण शंका घेतात.. ज्यांनी देशासाठी अतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, त्यांच्या निष्ठांवरच काही जण प्रश्नचिन्ह उभे करतात.. असा अनुभव सद्य:स्थितीत वारंवार येत होता. वाचलेला इतिहास विरोधकांना सांगून उपयोग नव्हता, म्हणूनच ऐतिहासिक संदर्भ, ब्रिटिशांचे गुप्तचर अहवाल, महत्त्वाचे पत्रव्यवहार, नोंदी ह्यांचा अभ्यास करून अक्षय जोग ह्यांनी लिहिलेले हे पुस्तक सत्य परिस्थिती दाखवून देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरते आहे.
 
 
RSS_1  H x W: 0
 
पुस्तकाच्या सुरुवातीलाच अंदमानातील भयंकर छळाचे वर्णन केलेले आहे. सावरकर अंदमानात कोणत्या परिस्थितीवर मात करून आले होते, त्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. त्यांना सर्व कायदेशीर विशेषाधिकार नाकारलेले होते. सहा महिने कठोर एकांतवास, दंड-बेडी, आडव्या-उभ्या बेड्या, खोड बेडी, आजारपणात जिथे रुग्णांना दूध दिले जात होते, तिथे सावरकरांना कच्ची पोळी नाहीतर पाणी-भात देण्यात येई. जर सावरकर ब्रिटिशांना मिळालेले असते, तर त्यांना अशी वागणूक दिली असती का? ह्याचा विरोधकांनी विचार करावा. अन्य कैद्यांना पाच वर्षांनी कुटुंबीयांची भेट घेण्याची सवलत होती, पण सावरकरांना सहा वर्षे झाली, तरी अशी सवलत मिळाली नव्हती. त्यांची पत्नीशी भेट आठ वर्षांनी झाली.

पुस्तक खरेदी कारणासाठी

• लेखक - अक्षय जोग
• प्रकाशक - स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, पुणे
• पृष्ठसंख्या - 144 • मूल्य - 200 रुपये
पुस्तक मिळविण्यासाठी संपर्क
धनाजी जाधव - 9594993834

https://www.vivekprakashan.in/books/swatantryaveer-savarkar-and-reality/
 

अंदमानच्या तुरुंगामध्ये मनोधैर्य खचल्यामुळे त्यांनी क्षमापत्रे लिहिली, हे साफ खोटे आहे. त्यांनी एकूण दहा आवेदने केली होती. त्यामागची भूमिका लेखकाने सप्रमाण मांडली आहे. ते उपयुक्ततावादी होते. कारागृहात खितपत पडण्यापेक्षा बाहेर राहून देशाची सेवा करणे उपयुक्त होते, असे त्यांच्या पत्रांमधून, ऐतिहासिक दस्तऐवजांच्या अभ्यासातून लेखकाने मांडलेले आहे. सावरकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ‘कमला’ हे पाच हजार ओळींचे महाकाव्य तुरुंगातील भिंतीवर कागद-पेन्सिल नसताना लिहिले आणि मुखोद्गत केले. मग त्यांचे मनोधैर्य खचले होते असे कसे म्हणता येईल? ‘स्वसमुपदेशन’ करणारे आणि इतरांनासुद्धा आत्महत्येपासून परावृत्त करणारे सावरकर. त्यांची माफीपत्रे हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि डावपेचांचा एक भाग होता, हे वाचकांना पटल्याशिवाय राहत नाही, हेच लेखकाचे मोठे यश आहे.

ब्रिटिशांना पूर्ण जाणीव होती की सावरकरांची सुटका करणे अतिशय धोकादायक आहे. सावरकरांच्या आवेदन पत्रांमागची भूमिका अतिशय स्पष्ट शब्दात या पुस्तकात मांडलेली आहे. अंदमानला नेण्याच्या आधीच आपली 25-25 वर्षांची दोन जन्मठेपींची शिक्षा एककालिक करावी, असा त्यांनी अर्ज केला होता. सावरकरांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकण्याचे काम लेखकाने केले आहे. सावरकरांना केवळ हुतात्मे नको होते, तर विजयवीर हवे होते, हे त्यांच्या लेखनातून सिद्ध होते. जतीनदास ह्यांच्या अन्नत्यागाने झालेल्या मृत्यूविषयी सावरकरांची प्रतिक्रियासुद्धा ह्याला दुजोरा देते. रेजिनॉल्ड क्रॅडॉकची नोंद, आधी घरून येणार्‍या पत्रातून भारतातील घडामोडींची माहिती मिळवून मग ते अंदमानच्या तिसर्‍या संपात सहभागी झाले, यातून त्यांच्या मुत्सद्दीपणाची आणि ब्रिटिशांना पुरते पुरून उरण्याच्या मानसिक क्षमतेची जाणीव होते. सुटकेला योग्य राजकीय परिस्थिती निर्माण झाली असे वाटले की ते अर्ज करीत असत. हे सगळे विवेचन अतिशय ओघवत्या भाषेत असल्यामुळे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवते.
 
पुस्तकाच्या शेवटी सावरकरांची मूळ आवेदन पत्रे आणि त्यातील मजकूरही असल्यामुळे ते अतिशय उपयुक्त झालेले आहे. संदर्भ ग्रंथांची मोठी यादीसुद्धा आहे. लेखकाने संशोधकाच्या भूमिकेतून हे पुस्तक लिहून सावरकरांवरील आक्षेप खोडण्यात आणि वास्तव समाजापुढे आणण्यात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. ऐतिहासिक सत्य जाणू इच्छिणार्‍या प्रत्येकाने अवश्य वाचावे.