वनांचा विश्वकोश पद्मश्री तुलसी गौडा

विवेक मराठी    13-Nov-2021
Total Views |
देशात असे अनेक लोक आहेत, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय समाजाची सेवा करत असतात. आपलं संपूर्ण आयुष्य दुसर्‍यांच्या सेवेत वाहून देणारी बरीचशी मंडळी या देशात आहेत. अशाच निस्वार्थी आणि सेवाभावी वृत्तीने कार्यकर्तृत्वाचा डोंगर उभा करणार्‍यांना देशातील सर्वात मोठा नागरी सन्मान म्हणजे पद्म पुरस्कार दिला जातो त्यातीलच एक आहेत वन संवर्धनात आपले महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या पद्मश्री तुलसी गौडा.
 
padmshree_2  H
पद्म गौरव लेखमालेत यावेळी आपण पद्मश्री तुलसी गौडा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. नुकतेच राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार सोहळा संपन्न झाला. 2014पासून परिवर्तनाचे वारे वाहू लागले आणि ‘लोकांसाठी असलेला लोकांचा पद्म’ अशी व्याख्या विद्यमान सरकारने प्रत्यक्ष साकार केली. आजवर जी माणसं आपणास माहितीही नव्हती त्यांच्या कार्याची दखल विद्यमान केंद्र सरकारने घेतली आणि त्यांच्या कार्याची ओळख आता जागतिक पटलावर होत आहे. देशातील या सर्वोच्च सन्मान सोहळ्याचे गुणगौरव आजपर्यंत आपण अनुभवतो आहे. याच धारेत आज ज्यांच्याबद्दल जाणून घेताना अभिमान वाटावा असेच त्यांचे कार्य आहे त्या आहेत पद्मश्री तुलसी गौडा.
निसर्ग माणसाला भरभरून देत असतो आणि जेव्हा आपण त्याला समर्पण भावनेने अर्पण करतो तेव्हा तो त्याची परतफेड कशी करतो याचे उदाहरण म्हणजे पद्मश्री तुलसी गौडा. कर्नाटकच्या प्रसिद्ध पर्यावरणवादी तुलसी गौडा यांचे राष्ट्रपती भवनातील अनवाणी आणि पारंपरिक आदिवासी वस्त्र परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, आज ज्याने अनेकांची मने जिंकली आहेत आणि त्यातून अनेकांना कार्य करण्याची प्रेरणा मिळते आहे.
पद्मश्री तुलसी गौडा यांना ‘वनांचा विश्वकोश’ म्हणून ओळखले जाते. कारण त्यांच्या विविध प्रजातींच्या वनस्पती आणि वनौषधींबद्दलच्या प्रचंड ज्ञानामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कर्नाटकातील होनाली गावातील रहिवासी असलेल्या तुलसी गौडा यांनी सात दशकांहून अधिक काळ पर्यावरणासाठी काम केले असून त्यांनी 30,000 रोपे लावली आहेत. गेल्या सात दशकांपासून पर्यावरण संवर्धन कार्यात त्या सहभागी आहेत.


padmshree_1  H
 
एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या, तुलसी गौडा यांनी वयाच्या दुसर्‍या वर्षी वडिलांना गमावले आणि अगदी लहान असतानाच त्यांनी त्यांच्या आईसोबत स्थानिक पाळणाघरात काम करायला सुरुवात केली. त्या कधीही शाळेत गेल्या नाहीत आणि त्या लहान असताना घरच्या परिस्थितीमुळे त्यांचे लवकर लग्न झाले होते. सरकारी रोपवाटिकेत 30 वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर, तुलसी गौडा यांना वन विभागात कायमस्वरूपी नोकरीची ऑफर देण्यात आली, जिथे त्यांनी 15 वर्षे काम केले आणि वयाच्या 70व्या वर्षी निवृत्त झाल्या.
वन विभागात असतांना त्यांनी 1,25,000 रोपे तयार केली आहेत, जी हिंदी महासागराच्या किनार्‍यावर असलेल्या मंगळुरू शहरात नागरी पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून वितरित केली जाणार आहेत. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र निर्माण करणे तसेच उत्पादकांना आधार देणे समाविष्ट आहे. किनारी शहराच्या शाश्वत विकासाच्या समर्थनार्थ मंगळुरू स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी 35 विविध जातींची पहिली 10,000 रोपे लावली आहेत.
साग, चंदन आणि 49 इतर प्रजातींसह उर्वरित, शाळा, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, जमीन मालक आणि अगदी ज्या व्यक्तींना ते विनामूल्य किंवा माफक योगदानाच्या बदल्यात मिळतात त्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
त्यांच्या या कामाबाबत कौतुक करताना राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलंय की, राष्ट्रपती कोविंद यांनी सामाजिक कार्यासाठी श्रीमती तुलसी गौडा यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. त्या कर्नाटकात राहणार्‍या आणि पर्यावरणासाठी काम करणार्‍या महिला आहेत ज्यांनी तीस हजारहून अधिक झाडे लावली आहेत. गेल्या सहा दशकांपासून त्या पर्यावरणाच्या संरक्षणाशी निगडीत चळवळीशी जोडलेल्या आहेत. तुलसी गौडा या कर्नाटकातील हलक्की आदिवासी जमातीतील आहेत. झाडे आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींबाबत असलेल्या अफाट ज्ञानामुळे ‘जंगलाच्या एनसायक्लोपीडिया’ या नावाने त्यांना ओळखलं जातं.
या आधी त्यांना ‘इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र अ‍ॅवॉर्ड’, ‘राज्योत्सव अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘कविता मेमोरियल’ यांसारखे कित्येक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनवाणी पायांनी चालत मा. राष्ट्रपतींकडून सन्मान प्राप्त करताना त्यांनी दाखवले की ज्यावर डोकं टेकवावं असे पाय अजूनही आपल्या देशात आहेत. भारताची खरी ओळख जगाला आता होते आहे आणि हीच ओळख अनेकांना कार्य करायला प्रेरणा देणारी ठरेल यात शंकाच नाही. यावेळी बा.भ. बोरकरांच्या ओळीच आठवत आहेत. ते म्हणतात,
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ॥

----------------------

अभिमानास्पद ‘पद्म’चिन्हे
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी दिले जाणारे पद्म पुरस्कार हे महत्त्वाचे राष्ट्रीय सन्मान आहेत. गेल्या काही वर्षात पद्म पुरस्कारासाठी अनेक अपरिचित, पण अलौकिक कार्य करणार्‍यांची होणारी निवड अशा प्रकारे निस्वार्थी भावनेने कार्य करणार्‍यांना उभारी देणारे ठरत आहे.
भारत हा वैविध्यपूर्ण आणि विविधतेने नटलेला देश आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयाला हात घालून त्याला जिंकायचे आणि त्याचवेळी आपला विवेक, नैतिक भूमिका आणि आग्रह कमी होऊ द्यायचे नाहीत, अशी विलक्षण क्षमता असणारे अनेकजण आजवर केंद्र सरकारच्या ‘पद्म’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहेत. 2014पासून परिवर्तनाची नांदी सुरू झाली आणि पद्म पुरस्कारही वेगळ्या उंचीच्या माणसांपर्यंत जात त्याचे वेगळेपण जपत आहेत. काही पुरस्कार व्यक्तीची उंची वाढवतात, तर काही व्यक्ती पुरस्कारांची उंची वाढवतात. 2014पासून असाच अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला येतो आहे. नुकताच राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात 2020 आणि 2021 या वर्षांचे पद्म पुरस्कार मा. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संपूर्ण सोहळा बघताना, प्रसंगी ऐकताना त्यांच्या कार्याला समजून घेताना अंगावर शहारे तर आलेच; पण डोळेही पाणावले.
 
यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. तसेच 2020मध्ये 7 पद्मविभूषण, 16 पद्मभूषण व 112 पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. मात्र कोविड संकटामुळे त्यांचे वितरण करण्यात आले नव्हते. या यादीत महाराष्ट्रातील रजनीकांत श्रॉफ व आनंद महिंद्रा या उद्योजकांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, सय्यदभाई, परशुराम आत्माराम गंगावणे, नामदेव कांबळे, जसवंतीबेन, जमनादास पोपट, सिंधुताई सपकाळ, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार, सुरेश वाडकर यांना यावेळी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
वैज्ञानिक ते उद्योजक असा प्रवास करणारे युनायटेड फॉस्फरसचे रजनीकांत श्रॉफ यांना आणि महिंद्रा उद्योग समूहाचे आनंद महिंद्रा यांना व्यापार उदीम क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्मभूषण प्रदान करण्यात आले.
 
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे उपेक्षित, वंचित घटकातील लोकांसाठी, भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे योगदान मोठे आहे. ‘भटके-विमुक्त समाज परिषदे’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत. तुळजापूरजवळील वैदू, कैकाडी, पारधी समाजातील मुलांसाठी त्यांनी काम केले आहे. चिंचवड येथील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’द्वारे भटक्या समाजातील मुला-मुलींना शिक्षण देण्याबरोबरच पारंपरिक कौशल्यविकासाद्वारे त्यांना स्वावलंबी बनविण्याचे महत्त्वाचे काम ते करत आहेत. पारधी समाजाविषयी, त्यांच्या प्रश्नांविषयी, त्यांच्या जीवनावर आधारित त्यांचे विविध माध्यमातून सतत लेखन सुरू असते.
 
मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथा परंपरांविरुद्ध आवाज उठवित गेली साठ-पासष्ठ वर्षे तिहेरी तलाक पद्धतीने ग्रासलेल्या मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी झगडणारे सय्यदभाई पद्मश्रीच्या यादीत आहेत. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून हजारो महिलांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून त्यांना ते मदत करत आहेत.
 
 
सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांना सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ मिळाली आहे. सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या ‘अनाथांची माय’ म्हणून परिचित आहेच.
 
कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील परशुराम गंगावणे यांना जाहीर झाला आहे. परशुराम गंगावणे गेल्या 45 वर्षांपासून आदिवासी पारंपरिक लोककला जतन करत त्याचा प्रसार करण्याचे काम करत आहेत. आदिवासी कलेचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी परशुराम गंगावणे यांनी गुरे आणि गोठा विकून त्याठिकाणी लोककलेचे संग्रहालय बनवले आहे.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पिंगुळी गावात परशुराम गंगावणे यांनी कळसूत्री बाहुल्यांची कला जोपसली आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी अनेक लोककथा सादर केल्या आहेत.
 
गावकुसाबाहेरील स्त्रियांच्या वेदना मांडणारे विदर्भातील लेखक नामदेव कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. ‘राघववेळ’ या कांदबरीसाठी 1995 साली साहित्य अकदमीच्या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कार्यासाठीचा पद्मश्री पुरस्कार जसवंतीबेन जमनादास पोपट यांना जाहीर झाला. सहकाराचे उत्तम उदाहरण असलेल्या आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाचे योगदान देणार्‍या सुप्रसिद्ध लिज्जत पापड उद्योगाच्या त्या संस्थापिका आहेत. आपल्या घराला हातभार म्हणून महिलांनी हे काम सुरू केले आणि बघता बघता लिज्जत पापड ब्रँड होत घराघरात पोहचला आहे.

यंदा विशेष म्हणजे ‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांमध्ये 29 महिला, तर एक ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. ट्रान्सजेंडर लोकनर्तक मंज्जमा जोगती यांनी मा. राष्ट्रपतींची दृष्ट काढली आणि या कृतीने संस्कृती आणि परंपरा याची ओळख संपूर्ण जगाला झाली. तसेच 10 व्यक्ती अनिवासी भारतीय, भारतीय वंशाच्या व्यक्ती आणि भारताचे परदेशी नागरिक आहेत.

खरंतर गेली कित्येक वर्ष हे सर्व लोक त्यांचे कार्य नित्यनेमाने करत होतेच, पण यांचा आता गौरव व्हावा यासाठी विद्यमान सरकार अभिनंदनास पात्र आहे. खरंतर यासाठी जी पारदर्शकता विद्यमान सरकारने दाखवत अनेकांना पुरस्कृत केले, याने प्रत्येक भारतीयाला आनंदच झाला आहे. पद्म पुरस्कारप्राप्त यादी पाहिल्यावर लक्षात येतं की जो खरंच मनापासून अपेक्षारहित कार्य करतो, त्याला योग्य सन्मान मिळतो.