@डॉ. चैतन्य शिनखेडे
कम्युनिटी रेडिओ म्हणजे समुदायातील लोकांच्या अव्यक्त आणि दडलेल्या कलांचे व्यासपीठ आहे. बोलीभाषा जतन करण्याचे महत्त्वाचे काम कम्युनिटी रेडिओ करतो. कम्युनिटी रेडिओ संवादनिर्मितीचे काम करतो. तो लोकशाहीवादी आहे. याचे स्वरूप व्यावसायिक नाही. समुदायाचे भवितव्य उज्ज्वल करणे हा कम्युनिटी रेडिओचा मूळ पिंड आणि समुदायाचा सहभाग हा आत्मा म्हणावा लागेल.
कम्युनिटी रेडिओ म्हणजेच सामुदायिक रेडिओ हे माध्यम तसे जुनेच. प्रकाशझोतात न येता दुर्लक्षित आणि दुर्गम भागात काम केल्याने सामान्य जनतेपर्यंत या माध्यमाची खरी ओळख आणि कार्यक्षमता पोहोचत नाही, एवढेच! सामुदायिक रेडिओच्या विश्वात जर आपण नजर टाकली, तर आपल्याला या सोशल मीडियाच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (रीींळषळलळरश्र ळपींशश्रश्रळसशपलशच्या) काळात हे पारंपरिक माध्यम किती प्रभावीपणे काम करते आहे, याचा अंदाज येईल. रेडिओ या माध्यमाला प्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅकलुहान यांनी संपर्क क्रांती होण्याआधीच हॉट मीडिया या श्रेणीत विभागले होते. रेडिओ हे आपल्या ज्ञानेंद्रियांना दूरचित्रवाणी किंवा चित्रपट यांपेक्षा जास्त चालना देते, म्हणून ते अधिक प्रभावशाली (हॉट मीडिया) आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी या माध्यमाची ताकद ओळखली होती. आज देशात सोशल मीडियाने संपर्काच्या इतर सर्व माध्यमांवर वर्चस्व गाजविले असले, तरीही ग्रामीण भागात रेडिओने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. शहरी भागातसुद्धा रेडिओ ऐकला जातो. परंतु विकासाचे किंवा प्रगतीचे साधन म्हणून न बघता मुख्यत: मनोरंजनाचे साधन म्हणून त्याकडे बघितले जाते. ग्रामीण भागात याच्याविरुद्ध चित्र आहे. शेतात कुठले पीक घ्यायचे, आपला व्यवसाय जगासमोर कसा आणायचा, महिलांनी गर्भावस्थेत कशी काळजी घ्यायची, गुरांना कुठले पौष्टिक अन्न द्यायचे इथपासून ते कोविडमध्ये स्वत:ची काळजी कशी घ्यायची, सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यायचा, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक कसे करायचे, लस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची इथपर्यंत सामुदायिक रेडिओ जनतेला मदत करत आहे. हा समुदायाचा मित्र, घरातील एक सदस्य आणि जीवनाचा साथीदार बनून दैनंदिन आयुष्यातील अडचणी सोडवून जीवन सुखकर करीत आहे. स्थानिक संस्कृती जपत सामुदायिक रेडिओ सहभागी विकासाची संकल्पना अस्तित्वात आणत आहे. सामुदायिक रेडिओच्या प्रसारणाविषयी आणि एकूणच रचनेविषयी अनेक संभ्रम आहेत, म्हणून मुळातच याची संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.
सामुदायिक रेडिओ म्हणजे काय? संशोधकांनी माध्यमांचे ढोबळमानाने मुख्य माध्यम (मेनस्ट्रीम मीडिया) आणि पर्यायी (अल्टर्नेटिव्ह) असे दोन प्रकार केले आहेत. मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे मोठमोठ्या माध्यम समूहांकडून चालविली जाणारी माध्यमे (मीडिया). ही माध्यमे अनेकदा ग्रामीण भागातील समस्या जगासमोर आणायला कमी पडतात. तळागाळातील लोक मेनस्ट्रीम मीडियाच्या कव्हरेजपासून दूर राहतात. गाव-खेड्यांमधल्या लोकांचा आणि उपेक्षितांचा आवाज दाबला जातो किंवा जगासमोर येतच नाही. टीआरपीच्या आणि जाहिरातदारांना खूश करण्याच्या नादात मोठे माध्यम समूह स्थानिक घडामोडींकडे लक्ष देऊ शकत नाही. अशा वेळी स्थानिक पातळीवर काम करणारी माध्यमे - उदा., स्थानिक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, ब्लॉग्ज, नाटक, विविध कला हे गावपातळीवर परिणामकारक ठरतात. यांना कम्युनिटी मीडिया असेही म्हणतात. स्थानिक विकास हा यांचा उद्देश असतो. ही माध्यमे सर्वच पातळ्यांवर समुदायावर अवलंबून असतात. अनेकदा कम्युनिटी मीडिया हा समुदायाच्या निधीवर उभा केला गेल्याने त्याला जाहिरातदारांना बांधील राहावे लागत नाही. कम्युनिटी रेडिओ हे माध्यम कम्युनिटी मीडियाचाच एक प्रकार आहे. आता तो प्रायव्हेट एफएम रेडिओ, आकाशवाणी, इंटरनेट रेडिओ यांपासून वेगळा कसा? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. सामुदायिक रेडिओ म्हणजे केवळ 15 कि.मी. परिसरात प्रसारण करणारे नभोवाणी केंद्र. हा रेडिओ चालविण्याचा परवाना भारतामध्ये केवळ बिगरसरकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र आणि शैक्षणिक संस्था यांना मिळतो. सामुदायिक रेडिओ हा मर्यादित व ठरावीक समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतो. प्रसारणक्षमता मर्यादित असल्याने सामुदायिक रेडिओने ठरावीक भौगोलिक क्षेत्रामध्ये प्रभावी आशयनिर्मिती करून स्थानिक समाजाला प्रगतीकडे नेण्याचे काम करणे अपेक्षित आहे. टॅबिंग या संशोधकाने कम्युनिटी रेडिओची व्याख्या उत्तम केली आहे - ‘समुदायांतर्गत, समुदायासाठी, समुदायाबद्दल, समुदायाकडून चालविले जाणारे नभोवाणी केंद्र म्हणजे सामुदायिक रेडिओ होय’. सामुदायिक रेडिओचा समुदाय केवळ भौगोलिक रचनेवरूनच ठरतो. त्यामध्ये इतर कुठलेही घटक समाविष्ट नसतात. इंग्लिशमध्ये हॅम रेडिओ, लोकल रेडिओ अशा नावांनीसुद्धा कम्युनिटी रेडिओ ओळखला जातो व ‘नीश ब्रॉडकास्टिंग’ या प्रकारामध्ये मोडतो. सामुदायिक रेडिओ शहरात आणि ग्रामीण या दोन्ही भागांत उभा केला जाऊ शकतो. हा सुरू करण्यासाठी सरकारने नेमून दिलेली प्रक्रिया करणे गरजेचे आहे. सामुदायिक रेडिओचे काम आटोपशीर असते. यावर असलेल्या अनेक मर्यादांमुळे कर्मचारी संख्या कमी असते. अनेकदा बिगरसरकारी संस्थांतर्फे चालविल्या गेलेल्या कम्युनिटी रेडिओला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, म्हणून केंद्राचे व्यवस्थापन मर्यादित असते. ठरावीक क्षेत्रामध्ये प्रसारण करण्यासाठी कम्युनिटी रेडिओचे ट्रान्स्मिटर्स कमी शक्तिशाली असतो. याचा स्टुडिओसुद्धा कमी खर्चात उभारला गेला असतो. माहिती व प्रसारण मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकानुसार भारतात सध्या 316 सामुदायिक रेडिओ केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वाधिक (38) उत्तर प्रदेशात आणि तामिळनाडूमध्ये आहेत. या पत्रकानुसार महाराष्ट्रात सद्य:स्थितीत 30 केंद्रे आहेत.
कम्युनिटी रेडिओची आदर्श चौकट
प्रभावी आणि परिणामकारक संवादातून (आशयातून) समस्या निराकरण करणे अशी सामुदायिक रेडिओची कल्पना आहे. समुदायाची समुदायाकडूनच प्रगती करणे हा या माध्यमाचा खरा उद्देश आहे. याला इंग्लिशमध्ये ‘पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट’ असे म्हणतात. अधिक सविस्तरपणे सांगायचे झाले, तर कम्युनिटी रेडिओवरील आशयनिर्मिती कोणा व्यावसायिक रेडिओ जॉकीकडून किंवा निवेदकाकडून न केली जाता समुदायातील व्यक्तींकडून केली जायला हवी. केवळ आशयनिर्मितीतच नव्हे, तर समुदायातील सदस्य हे मालकी, व्यवस्थापन व तंत्रज्ञान संबंधित कार्यप्रणालीतसुद्धा समाविष्ट पाहिजेत. सरकारच्या नियमावलीत तसे नमूद केले आहे. सामुदायिक रेडिओ हा कोण्या एका व्यक्तीचा किंवा एका संस्थेचा नसून तो प्रसारित क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. जात, पंथ, धर्म, लिंग अशी कोणतीच बंधने या रेडिओला नाहीत. जागतिकीकरणाच्या या काळात माहितीचा प्रसार तर सर्वच स्तरांत होतो आहे; परंतु ही माहिती योग्य रूपात, अन्वयार्थ लावून आणि उचित समयी दुर्गम आणि दुर्लक्षित भागात पोहोचविणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि याहून महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करताना स्थानिक संस्कृतीला, परंपरेला आणि सामाजिक वातावरणाला धक्का लागू नये याची काळजी घेणे. आपला भारत देश प्रचंड मोठा आहे. आज इंटरनेट आणि स्मार्ट फोन जरी दुर्गम भागात पोहोचले असले, तरीही काही भाग अजूनही काळाच्या मागे धावत आहेत. इथे कदाचित तंत्रज्ञानाने धडक मारली असेल, परंतु लोकांनी त्याचा कितपत स्वीकार केला आहे, याबाबत शंकाच आहे. ‘माध्यम-साक्षरता (media literacy)’ या पैलूकडे दुर्लक्ष होत आहे. अशा वेळी सामुदायिक रेडिओकडून अपेक्षा वाढल्या आहेत. समाजाचे अनेक गट प्रसारमाध्यमांकडून जाणूनबुजून किंवा अनाहूतपणे वगळले जातात. त्यांचा आवाज प्राइम टाइमवर येऊ शकत नाही. अशा गटांनी याबद्दल शोक करत बसण्यापेक्षा कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून व्यक्त व्हावे आणि समस्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा असते. कम्युनिटी रेडिओने समुदायात सुसंवाद निर्माण करून कल्याणकारक व पोषक वातावरणनिर्मिती करणे अपेक्षित आहे. कम्युनिटी रेडिओ म्हणजे समुदायातील लोकांच्या अव्यक्त आणि दडलेल्या कलांचे व्यासपीठ आहे. स्थानिक भाषेला कम्युनिटी रेडिओ प्राधान्य देतो. याला शुद्ध भाषेचे वावडे नसते. समुदाय जेवढा त्यांच्या खास बोलीभाषेत एक ठरावीक हेल काढून बोलेल तेवढे चांगले. बोलीभाषा जतन करण्याचे महत्त्वाचे काम कम्युनिटी रेडिओ करतो. प्रत्येक समुदायाची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती कुठल्या ना कुठल्या कलेतून अभिव्यक्त होत असते. कम्युनिटी रेडिओने ही कला आणि लोकसंस्कृती जतन करणे अपेक्षित आहे. कम्युनिटी रेडिओ संवादनिर्मितीचे काम करतो. तो लोकशाहीवादी आहे. याचे स्वरूप व्यावसायिक नाही. नफा कमविणे हे याचे उद्दिष्ट नाही. म्हणूनच महसुलाच्या बाबतीत यावर अनेक निर्बंध आहेत. समुदायाचे भवितव्य उज्ज्वल करणे हा कम्युनिटी रेडिओचा मूळ पिंड आणि समुदायाचा सहभाग हा आत्मा म्हणावा लागेल. समुदायाच्या सहभागाशिवाय कम्युनिटी रेडिओने कार्यरत राहू नये.
राजकारणी व धार्मिक संस्थांना कम्युनिटी रेडिओचा परवाना मिळत नाही. प्रसारणातसुद्धा राजकारणासंबंधी आशयनिर्मिती करण्यास बंदी आहे. तसेच निवडणुकांदरम्यान राजकारण्यांकडून जाहिराती घेण्यास बंदी आहे. याचाच अर्थ कम्युनिटी रेडिओचे प्रसारण पारदर्शक असावे आणि पूर्वग्रहदूषित नसावे, असे अपेक्षित आहे. याशिवाय कम्युनिटी रेडिओने सरकार व स्थानिक जनता यांमधील दुवा म्हणून काम करणे आवश्यक आहे. अनेकदा सरकारी योजनांची घोषणा होते, पण स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होताना अडचणी येतात. अशा वेळेस स्थानिक लोकांचे प्रश्न समजावून त्यांना सरकारी संस्थांसोबत संवादाचे एक योग्य व्यासपीठ उघडे करून देणे हे कम्युनिटी रेडिओचे काम आहे. काही केंद्रे कम्युनिटी रेडिओची ही आदर्श चौकट राखतात, तर काही अपयशी ठरतात. नैतिकतेची चौकट या माध्यमासमोर अनेक आव्हाने उभी करते. कम्युनिटी रेडिओसमोरील आव्हाने गैर सरकारी, ना नफा तत्त्वावर चालणार्या संस्थांकडून सुरू केलेल्या कम्युनिटी रेडिओलाच खर्या आव्हानांना सामोरे जावे लागते. कारण यांना निधी मिळविणे अवघड जाते. सामुदायिक रेडिओचे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत म्हणजे जाहिराती, देणगी, भागधारक, प्रायोजित कार्यक्रम, समुदायाचे सभासदत्व (community membership) आणि बिगरसरकारी स्वयंसेवी संस्था. आपल्या पालक संस्थेवर आर्थिक बाबींसाठी सामुदायिक रेडिओने संपूर्णत: अवलंबून राहणे चूक आहे. कम्युनिटी रेडिओ स्वावलंबी हवा. स्वयंसेवी संस्थेकडून आर्थिक पाठबळ घेण्यामध्ये नियमांचे उल्लंघन होत नाही. परंतु तसे करणे फारसे चांगले नाही. असे केल्याने स्वयंसेवी संस्थेचा हस्तक्षेप वाढतो. कम्युनिटी रेडिओ हा स्वयंसेवी संस्थेकडून चालविला न जाता समुदायाकडून चालविला जायला हवा. कम्युनिटी रेडिओ हा स्वतंत्र घटक असून एकदा तो कार्यरत झाल्यावर स्वयंसेवी संस्थेने आपली गुंतवणूक त्यातून कमी करणे अपेक्षित आहे. शैक्षणिक संस्था आणि कृषी विज्ञान केंद्र यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही, कारण या संस्थांना कम्युनिटी रेडिओ चालविला जाण्यासाठी निधी मिळतो. उदा., शैक्षणिक संस्थेतर्फे चालविला गेलेला सामुदायिक रेडिओ, जो ‘कॅम्पस रेडिओ’ या नावानेसुद्धा ओळखला जातो. संबंधित शैक्षणिक संस्थाच त्यासाठी निधीपुरवठा करते. तेथील विद्यार्थी सर्व कारभार बघतात. नैतिकतेच्या दृष्टीकोनातून हा निधीपुरवठा योग्य वाटतो. परंतु स्वयंसेवी संस्थेतर्फे चालविल्या गेलेल्या रेडिओचे तसे नसते. या रेडिओला आर्थिकदृष्ट्या शाश्वत (sustainable) होणे आवश्यक आहे. परंतु ते होणे अवघड आहे. त्यासाठी योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे. कम्युनिटी रेडिओचे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन म्हणजे जाहिराती आणि प्रायोजित कार्यक्रम होय. पण सरकारने त्या बाबतीत नियम कडक केले आहेत. कम्युनिटी रेडिओला एका तासात फक्त सात मिनिटांच्या जाहिराती प्रसारित करण्याची मुभा आहे. सध्या एका सेकंदाला चार रुपये आकारले जातात. हे दर माहिती व प्रसारण मंत्रालयाने ठरवून दिले आहेत. खाजगी संस्था आणि दुकानदार यांच्याकडून जाहिराती मिळविणे सोपे नाही. अनेक कम्युनिटी रेडिओ अशा भागात स्थित असतात, तेथे बाजारपेठाच नाहीत. प्रायोजित कार्यक्रमांच्या संख्येवरसुद्धा निर्बंध आहेत.
आशयनिर्मितीविषयी काही संकेत दिले गेले आहेत. बातमीनिर्मिती व प्रसारण करण्यास कम्युनिटी रेडिओला परवानगी नाही. त्याऐवजी आकाशवाणीवरून प्रसारित झालेले बातमीपत्र पुन:प्रसारित करण्याची परवानगी आता सरकारने दिली आहे. परंतु तसे करण्यास रेडिओ केंद्रे अनिच्छुक दिसतात. कम्युनिटी रेडिओच्या कार्यकारणीत स्वयंसेवी संस्थांचा प्रभाव कमी राहावा, म्हणून सरकारने कम्युनिटी रेडिओला स्वतंत्र बँक खाते असणे बंधनकारक केले आहे. जाहिराती व प्रायोगिक कार्यक्रम यातून मिळालेला नफा केवळ ऑपरेशनल आणि भांडवली खर्चासाठी (capital expensesसाठी) खर्च करावा, असे नमूद केले गेले आहे. जाहिराती व प्रायोगिक कार्यक्रमांशिवाय उत्पन्नाची इतर अनेक साधने आहेत, परंतु ही रेडिओ केंद्रे त्यांचा परिणामकारक वापर करण्यास कमी पडतात, असे दिसते. कम्युनिटी रेडिओ केंद्रांचे खर्च बरेच असतात. अशात उत्पन्नामध्ये आलेली बंधने व नैतिकतेची चौकट यामध्ये ही केंद्रे संघर्ष करतात. या केंद्रांसमोरचे दुसरे आव्हान म्हणजे आशयनिर्मिती आणि त्यामध्ये समुदायाचा सहभाग. कम्युनिटी रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये 80 टक्के तरी समुदायाचा सहभाग हवाच. परंतु अनेकदा कम्युनिटी रेडिओ श्रोत्यांसाठीच संघर्ष करताना दिसतो, तर मग त्यांचा कार्यक्रमनिर्मितीमध्ये सहभाग दूरचाच. कल्पक आणि नावीन्यपूर्ण आशयनिर्मित करणे तेवढेच गरजेचे आहे, जेवढे समुदायाला त्या प्रक्रियेतून सामावून घेणे होय. आपले कार्यक्रम अधिकाधिक लोकांनी ऐकावे आणि त्यांचा प्रतिसाद मिळावा, यासाठी कम्युनिटी रेडिओला अधिक प्रयत्न करावे लागतात. अशिक्षित आणि मागासलेल्या लोकांना बरेचदा कार्यक्रम कसे ऐकावे, रेडिओ सेट कसा लावावा आणि कार्यक्रमांच्या वेळा कशा लक्षात ठेवाव्या इथपासून प्रशिक्षण द्यावे लागते. म्हणजे मुळात काय, तर प्रथम श्रोते निर्माण करा, त्यांना माध्यम शिक्षण द्या आणि मग कार्यक्रमांमधून विकासाचा मार्ग पकडा. सोशल मीडियामुळे पारंपरिक माध्यमांचा श्रोता विखुरला गेला आहे (ऑडियन्स फ्रॅगमेंटेशन). हा श्रोता रेडिओला तेव्हाच खरा मानेल, जेव्हा रेडिओ त्याच्या सभोवतालची प्रतिकूल परिस्थिती बदलू शकेल. हे करण्याचे कम्युनिटी रेडिओमध्ये सामर्थ्य आहे. सोशल मीडियाचा विषय निघालाच आहे, तर सामुदायिक रेडिओसमोर ही कशी आव्हाने ठरत आहेत, हेसुद्धा बघू. खाजगी एफएम वाहिन्यांवर जर नजर टाकली, तर असे दिसेल की आज सर्वांची यूट्यूबवर चॅनल्स आहेत. रेडिओ स्टुडिओमध्ये तयार केल्या जाणार्या कार्यक्रमांचे चित्रीकरण करून तेच यूट्यूबवर अपलोड केले जाते आणि तरुणाई ते पाहणे जास्त पसंत करते. कम्युनिटी रेडिओवरसुद्धा याचा परिणाम होतो आहे. कम्युनिटी रेडिओने सोशल मीडियाला घाबरण्यापेक्षा आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर करून घेणे अधिक फायद्याचे ठरेल. ‘न्यूज ऑन एअर’सारख्या अॅपमुळे देशातल्या कुठल्याही दुर्गम भागातील आकाशवाणी केंद्र घरबसल्या ऐकता येतात. इंटरनेटमुळे भौगोलिक दुरावा संपला आहे. रेडिओ केंद्रे ठरावीक भागासाठी मर्यादित राहिली नाहीत. त्यामुळे कम्युनिटी रेडिओ केंद्रांना स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. अशात समुदायाचा रेडिओ केंद्रापासून तयार झालेला दुरावा कम्युनिटी रेडिओचे अस्तित्वच संपवू शकतो. रेडिओचा प्रचार न झाल्याने किंवा समुदायाला कार्यक्रमांपासून दूर ठेवल्याने रेडिओ केंद्राच्या 5 किलोमीटरजवळच्या परिसरातील लोकांना रेडिओ स्टेशनच्या अस्तित्वाची माहितीसुद्धा नसते. केवळ प्रचार हेच याचे कारण नसून कार्यक्रमांची नसलेली उपयुक्तता हे आहे. प्रसारण सभेत केवळ गाणेच वाजविणे, अप्रासंगिक व असंबद्ध आशयनिर्मिती करणे, केवळ जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम करणे, रेकॉर्डेड व माहिती देणारे कार्यक्रम प्रसारित करणे, कार्यक्रम रिपीट करणे या व अशा अनेक कारणांमुळे कम्युनिटी ठरावीक काळानंतर रेडिओ ऐकणे बंद करते. त्यांचा रस कमी होतो आणि ते इतर पर्याय निवडतात, जे अमर्याद आहेत. लोकांना कम्युनिटी रेडिओच्या निर्णयांमध्ये, उपक्रमांमध्ये सामावून न घेतल्याने त्यांची रेडिओमध्ये भावनिक गुंतवणूक राहत नाही, जी अत्यंत महत्त्वाची आहे. ही सर्व आव्हाने जरी खरी असली, तरी यांवर विजय मिळवून यशस्वीरित्या काम करणारी अनेक कम्युनिटी रेडिओ केंद्रे आहेत.
आव्हाने पेलणारी सामुदायिक रेडिओ केंद्रे कम्युनिटी रेडिओच्या आर्थिक अडचणी सोडविण्याची गुरुकिल्ली त्याच्या आशयनिर्मिती आणि त्यामध्ये समुदायाचा सहभाग यात दडलेली आहे, हे आपल्याला सातारा जिल्ह्यातील म्हसवड तालुक्यातील ‘माण देशी तरंग वाहिनी’ आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ‘येरळावाणी’ या दोन केंद्रांकडे नजर टाकली तर लक्षात येईल. या दोन केंद्रांवरील कार्यक्रमांमुळे आशय आणि आर्थिक उत्पन्न यांचा घनिष्ठ संबंध आहे असे कळते. जालिहाल या छोट्या खेड्यातून येरळावाणी तिथल्या स्थानिकांपर्यंत पोहोचते. हा भाग येरळा या नावाने ओळखला जातो. जेन उत्पादन हा या भागाचा पारंपरिक उद्योग आहे. जेन ही लोकरीपासून बनवली जाणारी चादर आहे. काही वर्षांपासून हा उद्योग ठप्प झाला होता. येरळावाणीने या उद्योगाविषयी एक कार्यक्रम शृंखला बनविली. यामध्ये या उद्योगाशी निगडित उत्पादकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या व या उद्योगाविषयी सर्वांगीण माहिती प्रसारित केली. त्यानंतर या उद्योगात येणार्या अडचणी चर्चिल्या गेल्या. त्याचबरोबर हा उद्योग छान रणनीती आखून केल्यास किती लाभदायक आहे याविषयी विवेचन झाले. हा उद्योग स्थानिक अर्थव्यवस्थेचे कसे पुनरुज्जीवन करू शकतो, हे सांगितले गेले. या शृंखलेमुळे स्थानिक तरुणाई, जिने या व्यवसायाकडे पाठ फिरविली होती, ती परत एकदा या पारंपरिक उद्योगाकडे वळली. एका नव्या दृष्टीकोनासह तरुणांनी या व्यवसायाकडे बघितले. 2019 साली झालेल्या नॅशनल अवॉर्डस फॉर कम्युनिटी रेडिओमध्ये ‘प्रमोटिंग लोकल कल्चर’ या श्रेणीत येरळावाणीला वरील कार्यक्रमासाठी दुसरे पारितोषिक मिळाले. येरळा या भागाला तुम्ही भेट दिली, तर समजेल की हा जगापासून किती तुटला गेला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असल्याने या भागातली बोलीभाषा सामान्यांना कळणारी नाही. येरळावाणीने इथे श्रोतानिर्मितीसाठी फार कष्ट घेतले आहेत. रेडिओ म्हणजे काय हेसुद्धा ज्या लोकांना माहीत नव्हते, असे लोक आता आशयनिर्मितीमध्ये सहभाग घेतात. हे कसे झाले? तर केवळ जनजागृती करण्याऐवजी रेडिओ कर्मचारिवर्गाने फील्डवर जाऊन कार्यक्रमांचा प्रभाव कसा होतो आहे हे बघितले आणि समस्यांची चर्चा करून सरकारकडे याचना करत बसण्यापेक्षा त्या गावपातळीवर सर्वांना सोबत घेऊन त्या सोडविण्याचा कल ठेवला. पुढील दोन उदाहरणांवरून हे कळेल. काही वर्षांपूर्वी या भागात डेंग्यूची साथ आली. येरळावाणीने तातडीने या रोगाविषयी माहितीपूर्ण कार्यक्रम केला आणि स्थानिकांना सजग केले. पण रेडिओ कर्मचारिवर्ग एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांनी सॅनिटायझेशन डिपार्टमेंटच्या सहकार्याने जवळील भागातील साचलेल्या पाण्याचे साठे शोधून काढले आणि त्याचा निचरा केला. असेच काही वर्षांपूर्वी या भागातील काही किशोरवयीन मुले दारूच्या व्यसनाला लागली आणि रासायनिक दारू पिऊन त्यांचा मृत्यू झाला. इतर मुलांना यापासून वाचविण्यासाठी येरळावाणीने दारूच्या व्यसनाबद्दल एक कार्यक्रम शृंखला केली. ज्या देशी दारूच्या अड्ड्यावर ही दारू तयार केली जात होती, तो शोधून कर्मचारिवर्गाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तो उद्ध्वस्त केला.
म्हसवड गावातील ‘माण देशी तरंग वाहिनी’ हा सामुदायिक रेडिओ सर्वच पातळ्यांवर अव्वल ठरतो. माण देश हा दुष्काळी भाग. येथील काही स्थानिकांना दर वर्षी स्थलांतर करण्याशिवाय गत्यंतर नाही. अशा भागात ‘माण देशी तरंग वाहिनी’ माण देशी फाउंडेशनबरोबर प्रशंसनीय काम करत आहे. एनजीओ आणि कम्युनिटी रेडिओ यांनी आपापसात नैतिकतेच्या दृष्टीकोनातून कसे संबंध ठेवावे, हे माण देशी तरंग वाहिनीकडून शिकायला हवे. माण देशी फाउंडेशन ही बहुराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. या भागातील अनेक लोकांची आयुष्ये याने सुधारली आहेत - खासकरून स्त्रियांची. त्यामुळे एनजीओतर्फे घेण्यात आलेल्या उपक्रमांना लोकांपर्यंत घेऊन जाण्यास माण देशी रेडिओची खूप मदत होते. माण देशी तरंग वाहिनीसुद्धा या उपक्रमांना उत्कृष्ट आशयाची जोड देते. माण देशी रेडिओचे व्यवस्थापन, निर्णयप्रक्रिया आणि मालकी या तिन्ही समित्यांवर सर्व सदस्य हे समुदायातील आहेत. अर्थ आणि आशय यांचा संबंध कसा घनिष्ठ आहे, हे माण देशी तरंग वाहिनीच्या ‘प्रश्न आमुचे उत्तर तुमचे’ या प्रश्नमंजुषा कार्यक्रमातून समजून येईल. हा तासाभराचा कार्यक्रम समुदायातील एक सदस्य निर्मित करतात. यामध्ये सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारले जातात आणि त्याची बरोबर उत्तरे देणार्यांना बक्षीस दिले जाते. हा कार्यक्रम या भागात इतका लोकप्रिय झाला (याचे कारण या कार्यक्रमाचे स्पर्धात्मक स्वरूप होय) की याला प्रायोजकत्व मिळाले. या कार्यक्रमात विजयी झालेल्या सदस्यांना एका स्थानिक उपाहारगृहाकडून कूपन दिले जाते. ते दाखवून त्यांना उपाहारगृहात सवलत दिली जाते. स्पर्धात्मक आशय नेहमी लोकप्रिय ठरतो आणि जाहिरातदारांना व श्रोत्यांना आकर्षित करतो. यावरून असे लक्षात येते की जेवढा उपयोगी आशय तेवढे जास्त श्रोते - जेवढे जास्त श्रोते तेवढ्या जाहिराती - आणि जाहिराती म्हणजेच कार्यक्रमाला मिळालेले प्रायोजकत्व. प्रायोजकत्व म्हणजेच आर्थिक उत्पन्न. आशयाचा संबंध सरळसोट आर्थिक उत्पन्नाशी जोडला आहे. त्यामुळे आशय आणि समुदायाचा आशयनिर्मितीमधील सहभाग कम्युनिटी रेडिओला शाश्वत करतो.
स्थानिक व्यवसायाला आणि संस्कृतीला उत्तेजन देण्याच्या संदर्भात उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील रेडिओ एसडीच्या गुर (गुळ) महोत्सवाचे उदाहरण साजेसे आहे. या प्रदेशात उसाचे मोठे उत्पादन आहे आणि इथे गुळाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हा गुळाचा पारंपरिक व्यवसाय जतन आणि उन्नत करण्यासाठी रेडिओ एसडीने एक कार्यक्रम शृंखला तयार केली. यामध्ये या उद्योगात येऊ इच्छिणार्या उमेदवारांना गूळ तयार करण्याचे नवनवीन मार्ग शिकविले. या व्यवसायाला आर्थिक दृष्टीने बळकटी आणली एवढीच या कार्क्रमाची फलश्रुती नव्हती, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुळाची मागणीसुद्धा वाढली. याशिवाय रेडिओ एसडीच्या कर्मचार्यांनी सर्व गूळ व्यापार्यांना गतिशील करून वेगवेगळ्या ठिकाणी गुळाचे स्टॉल्स लावले. यामुळे ही स्थानिक पाककृती सर्व ठिकाणी पोहोचली. रेडिओ एसडीने या निमित्ताने व्यापार्यांना गुळाची ऑनलाइन विक्री कशी करावी, हेसुद्धा सांगितले. या उदाहरणांवरून एक गोष्ट लक्षात येते की जागरूकता निर्माण करणारा आशय कम्युनिटी रेडिओला समुदायात पक्के स्थान प्राप्त करून देऊ शकत नाही. लोकांचा विश्वास जिंकायचा असेल व त्यांचात रेडिओविषयी आपलेपणाची भावना निर्माण करून द्यायची असेल, तर कम्युनिटी रेडिओला समुदायाच्या अडचणी सोडविणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षण समुदायाचा विकास कसा होईल याचाच विचार करणे आवश्यक आहे. या संदर्भात आणखी एक उदाहरण म्हणजे बिहारमधील गोपालगंज येथील रेडिओ रिमझिमच्या ‘जन सुनवाई’ या कार्यक्रमाचे, ज्याने स्थानिकांचे जगणे सुखकर केले आहे. स्थानिकांच्या तक्रारी प्रशासनपर्यंत पोहोचवून त्यांचे निरसन करण्याचे काम या कार्यक्रमाने केले. या तक्रारी समुदायातील व्यक्तींनी पत्र, फोन कॉल, एसएमएस, व्हॉट्सअॅप, ई-मेल याद्वारे रेडिओला कळविल्या. ज्या व्यक्तींना त्यांचे नाव गुप्त ठेवून तक्रार करायची होती, त्यांना तशी मुभा दिली गेली. उपविभागीय दंडाधिकारी आणि प्रसंगी एसडीएम ऑफिस यांनी सक्रियपणे या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि वेळोवेळी योग्य ती कारवाई केली. सर्व तक्रारी रोजच्या रोज न चुकता अपेक्षित सरकारी कर्मचार्याच्या टेबलपर्यंत पोहोचविला गेल्या. वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसच्या चकरा खाण्यापेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या अडचणी प्रशासनपर्यंत घरबसल्या पोहोचविता आल्या व त्यांचे निरसनही झाले. पेन्शन, जमिनीसंबंधित अडचणी, रस्ता खराब असणे, साखर कारखान्यासंबंधी अडचणी, सरकारच्या योजनांची अंमलबजावणी असा छोट्या-मोठ्या मुद्द्यांशी या तक्रारी संबंधित होत्या.
कम्युनिटी रेडिओच्या आशयावर जरी निर्बंध असले, तरी कल्पकता व नावीन्य यांना मरण नाही, हे मध्य प्रदेशातील विदिशा येथील मुख्यत: स्थलांतरितांसाठी काम करणार्या ‘रेडिओ मन’ने त्याच्या एका वेगळ्याच उपक्रमामुळे दाखवून दिले. कोविड-19 महामारीमुळे देशात आर्थिक उलथापालथ झाली. या आणीबाणीच्या प्रसंगी मार्च 2020मध्ये कोरोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडची घोषणा केली आणि देशभरातून वेगवेगळ्या भागातून लोकांनी यामध्ये निधी जमा करण्यास सुरुवात केली. रेडिओ मनने ‘जिनियस ऑफ द वीक’ हा अनोखा कार्यक्रम सुरू केला, ज्यामध्ये प्रथम पीएम केअर फंड काय आहे आणि किती महत्त्वाचा आहे याबद्दल माहिती दिली गेली आणि नंतर या कार्यक्रमाचे स्वरूप समजावून सांगितले. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात सर्व वयोगटाच्या व्यक्तींना प्रवेश दिला गेला. ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी 101/- रुपये भरणे अनिवार्य ठेवले आणि भरलेली रक्कम पीएम केअर फंडमध्ये टाकण्यात येईल असे सांगितले. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सामान्य ज्ञानासंबंधित काही प्रश्न स्पर्धकांना विचारले गेले. प्रत्येक आठवड्याला एक विजेता ठरविला, ज्याला त्यांनी किंवा तिने भरलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम बक्षीस म्हणून रेडिओकडून मिळाली. या कार्यक्रमामधून लोकांचे मनोरंजन झाले, त्यांच्या ज्ञानात भर पडली आणि देशाला कोरोनाशी लढण्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करता आले, म्हणजेच समाजसेवा घडली. अशा पद्धतीचे कल्पक कार्यक्रम श्रोतृवर्ग वाढवितात आणि जाहिरातदारांचेसुद्धा लक्ष खेचतात. केरळातील वायनाड जिल्ह्यातील ‘रेडिओ माटोली’ हा कम्युनिटी रेडिओ संपूर्ण देशात त्याच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध आहे. या रेडिओने इतर सर्व सामुदायिक रेडिओंसमोर आदर्श ठेवला आहे. दर वर्षी या रेडिओला अनेक पारितोषिके मिळतात. 24 तास प्रसारणक्षमता असणार्या या रेडिओमुळे या परिसरात खूप प्रगती झाली आहे. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे इथल्या आदिवासी संस्कृतीचे जतन तर झालेच आहे, तसेच अनेक अडचणीसुद्धा सोडविल्या आहेत. या भागातील लोकांचा शाश्वत विकास व्हावा, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून या वर्षी रेडिओ माटोलीने ‘रितुबंधाम’ नावाच्या कार्यक्रम शृंखलेची निर्मिती केली. कृषी उत्पादन वाढविण्यासाठी आणि त्याबरोबर मानवी आणि सामाजिक मूल्य जपण्यासाठी या कार्यक्रमात क्लायमेट अॅडॉप्शन मॉडेल्सची निर्मिती करण्यात आली आणि जिल्ह्यातील शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात चर्चा, माहितीपट, नाट्य, थेट (लाइव्ह) फोन-इन कार्यक्रम यांचा समावेश करण्यात आला होता.
लोकसंस्कृतीचे जतन फक्त कम्युनिटी रेडिओचा करू शकतो. कारण हे माध्यम लोकसंस्कृती (गाणी, वाद्य, चित्रकला इ.) यांचा संग्रह करू शकते. उत्तराखंडमधील पंत नगर जनवाणीचा ‘आंचल की सुरभी’ हा कार्यक्रम तेथील टेकडी परिसरसातील नष्ट होत चाललेल्या वाद्यांच्या वादनावर आधारला आहे. या भागातील टेकड्यांमध्ये काही समुदाय आणि कुटुंबे वादनाचा पिढीजात व्यवसाय करीत आहेत. हे लोक ही दुर्मीळ वाद्य हातांनी बनवतात, त्यांचे जतन आणि सादरीकरण करतात. या स्थानिक वाद्यांचा या भागातील धार्मिक आणि पारंपरिक सणांमध्ये वापर केला जातो. ह्या लोकांच्या वादनाचे रेकॉर्डिंग जनवाणीने केले. अशा रीतीने या दुर्मीळ आणि नष्ट होत चालेल्या कलेचा पुरावा आता कायमचा संग्रहित झाला आहे. 2019मधील नॅशनल कम्युनिटी अवॉडर्समध्ये या कार्यक्रमाला ‘प्रमोटिंग लोकल कल्चर’ या श्रेणीत पहिले पारितोषिक मिळाले. माण देशी तरंग वाहिनीनेसुद्धा माण देशातील नष्ट होत चालेल्या लोकसंस्कृतीचा संग्रह करून ठेवला आहे. माण देशी वाहिनीच्या स्टार आरजे केराबाई सरगर या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषेतील ओव्या, अभंग, गौळणी आणि पाळणे यांमुळे माण देशातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीस पावल्या. दुर्दैवाने गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. केराबाईंना रेडिओ कर्मचारिवर्ग शोधायला गेला नाही किंवा रेडिओमध्ये येऊन आपली कला सादर करा अशी विनंती केली नाही. केराबाई स्वत: एक दिवस रेडिओ स्टुडिओमध्ये आल्या आणि त्यांच्याजवळ असणार्या खजिन्याचा संग्रह करून ठेवा अशी त्यांनीच विनंती केली. याचा अर्थ असा की समाजालासुद्धा स्वत:च्या संस्कृतीची आणि ती टिकविण्याची जाणीव हवी. केराबाईंनी केलेले योगदान अमूल्य आहे. अमीन सयानींच्या हस्ते त्यांना गौरविले आहे, तर ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये स्वत: अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. केराबाईंचे हे दुर्मीळ लिखाण आता पुस्तकाच्या आणि सीडीच्या स्वरूपात उपलब्ध आहे. दर वर्षी मुंबई येथे माण देशी एनजीओ माणदेशी महोत्सव भरवतो. त्यामध्ये रेडिओवर लोककला सादर करणार्या कलावंताचा एक खास कार्यक्रम ठेवला जातो आणि कलावस्तू विक्रीस ठेवल्या जातात. माण देशी वाहिनीवर लोककला सादर केल्याने अनेक कलावंत लोकप्रिय झाले आणि त्यांना बिदागी मिळायला सुरुवात झाली. कम्युनिटी रेडिओने लोकसंस्कृती समृद्धीस नेण्याची अनेक उदाहरणे आहेत. राजस्थानातील ‘रेडिओ मधुबन’ हा आदिवासी प्रांतामध्ये वसला आहे. या भागाचा इतिहास समृद्ध आहे. या रेडिओच्या ‘गांव री बातें’ या कार्यक्रमात तेथील समुदायाच्या पूर्वजांच्या कथा सांगितल्या गेल्या. एका कार्यक्रमात या कथांशी निगडित अवशेष आणि पुरातन वस्तू स्थानिक वस्तुसंग्रहालयात आहेत असे सांगितले. या कार्यक्रमावरून प्रभावित होऊन संग्रहालयात अचानक गर्दी वाढली आणि लोक इतिहासात रस घेऊ लागले.
उपयुक्तता हा कम्युनिटी रेडिओचा सर्वात मोठा घटक आहे. नाशिक शहरातील ‘रेडिओ विश्वास’ हे 14 तास प्रसारण करते. कोविडमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शिक्षणाचे सर्वत्र हाल झाले. शाळा आणि कॉलेजेस बंद झाल्याने अनेकांना ऑनलाइन शिक्षणाची कास धरावी लागली. परंतु सर्वांनाच ते शक्य नव्हते. ग्रामीण भागात अनेकांकडे स्मार्ट फोन, इंटरनेट नव्हते. अशामध्ये प्रामुख्याने मुलींचे शिक्षणावर परिणाम झाला. यावर तोडगा म्हणून रेडिओ विश्वासने गरीब व वंचित विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षण सर्वांसाठी’ हा कार्यक्रम सुरू केला. स्थलांतर करणार्या मजुरांच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणार्या मुलांच्या शिक्षणावर या कार्यक्रमामध्ये लक्ष केंद्रित केले गेले. यासाठी नाशिक शहरातील 150 शालेय शिक्षकांना तयार केले गेले. या सर्वांना विषय ठरवून दिले व त्यांची व्याख्याने रेडिओवरून प्रसारित केली. शिक्षण ऑनलाइन झाल्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासूनच वंचित झाले. त्यामुळे रेडिओवरून त्यांना शिक्षण देण्याची कल्पना त्यांच्यासाठी खूप लाभदायक ठरली. या कार्यक्रमाला आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ अवॉडर्समध्ये थीमवर आधारलेल्या श्रेणीत दुसरे पारितोषिक मिळाले. सोशल मीडियाचे कम्युनिटी रेडिओसमोर आव्हान आहे असे आपण म्हणतो. परंतु धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर तालुक्यातील जेबापूर येथील ‘पांझरावाणी कम्युनिटी रेडिओ’चे उदाहरण चकित करण्यासारखे आहे. पिंपळनेर गावाच्या थोडे बाहेर असल्याने आणि सभोवताली डोंगरांची रांग असल्याने येथील भागात रेडिओच्या लहरी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे उच्च दर्जाचे कार्यक्रम बनवूनसुद्धा समुदाय पांझरावाणीच्या प्रसारणापासून वंचित राहत होता. परंतु पांझरावाणीच्या रेडिओ कर्मचारिवर्गाने यावर एक युक्ती शोधून काढली, ती अशी की या भागातील नियमित श्रोत्यांचे व्हॉट्सअॅप क्रमांक मिळविले आणि पांझरावाणीचे पाच व्हॉट्सअॅप ग्रूप्स बनविले. आता कर्मचारी सकाळची प्रसारण सभा प्रसारित झाल्यावर पूर्ण सभाच या ग्रूप्सवर अपलोड करतात आणि संध्याकाळीसुद्धा हेच वेळापत्रक फॉलो करतो. यामुळे समुदायातील लोक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून रेडिओ ऐकत आहेत. यामुळे काही अधिक नावीन्यपूर्ण गोष्टींची भर पडली आहे, त्या म्हणजे आरजे श्रोत्यांशी संवाद साधू शकतात आणि त्यांचा प्रतिसाद ताबडतोब मिळवितात. यामुळे कार्यक्रमनिर्मिती प्रक्रिया सुकर झाली आहे. आरजे आणि श्रोते यांनी जवळीक साधली आहे आणि त्यामुळे साहजिकच श्रोते रेडिओच्या सर्व प्रक्रियांमध्ये समाविष्ट झाले आहेत. या श्रोत्यांना आशयनिर्मितीमध्ये सहभागी करून घेणेसुद्धा सोपे झाले आहे.
शाश्वतता (sustainability) हा कम्युनिटी रेडिओमध्ये संशोधनाचा विषय आहे. नैतिक उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करून आणि आशयनिर्मिती प्रक्रियेत जास्तीत जास्त समुदायाला सहभागी करून समुदायाचे आयुष्य सुखकर आणि अडचणीविरहित करणे हे कम्युनिटी रेडिओचे काम आहे आणि त्यासाठी त्यामध्ये इतर कोणाच्याही आर्थिक, तांत्रिक आणि संस्थागत मदतीशिवाय दीर्घकाळ टिकण्याची क्षमता हवी. कम्युनिटी रेडिओने स्वावलंबित्वाच्या विविध पद्धती आजमावणे हे त्याचे कर्तव्यच आहे. ओडिशामधील रेडिओ गुंजन हा पूर्णत: स्वयंसेवकांवर अवलंबून आहे आणि यशस्वी काम करतो आहे. या भागातील 70 श्रोत्यांच्या गटांसाठी हा काम करतो. उत्तराखंडमधील चंबा प्रांतातील हेंवलवाणी हा रेडिओ एनजीओने सुरू केला असला, तरी तो एनजीओपासून पूर्णत: विलग आहे. हा रेडिओ एनजिओवर कुठल्याच प्रकारे अवलंबून नाही. रेडिओचा स्टुडिओ एनजीओच्या ऑफिसपासून विलग आहे. रेडिओच्या नावे बँकेत दोन स्वतंत्र बँक खाती आहेत. रेडिओ सुरू करतानाच कोर्टात शपथपत्र देऊन एनजीओ कम्युनिटी रेडिओच्या आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करणार नाही असे निश्चित केले. हेंवलवाणीसुद्धा पूर्णपणे स्वयंसेवकांवर अवलंबून आहे. रेडिओमध्ये आशयनिर्मितीमध्ये सहभाग घेणार्या कोणत्याच व्यक्तीला रेडिओकडून मानधन दिले जात नाही. प्रसंगी प्रवासाचा खर्च दिला जातो. तरी आजवर पाचशेहून अधिक लोकांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. रेडिओ हे त्यांचे हक्काचे व्यासपीठ आहे, याची ह्या लोकांना जाणीव निर्माण झाली, म्हणून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता त्यांनी त्यांचे योगदान दिले. हरियाणामधील अल्फाज-ए-मेवात या रेडिओने शाश्वततेचे एक चांगले प्रारूप तयार केले आहे. या रेडिओची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे सर्व कार्यक्रम समुदायाचा प्रतिसाद घेऊन बनवले जातात आणि दुसरे म्हणजे सर्व कर्मचार्यांना रेडिओ उपकरणे दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे कोणतीही तांत्रिक अडचण आली, तरी प्रसारण थांबणार नाही. हरियाणामधील रेडिओ सांझसुद्धा शाश्वततेसाठी नावाजला गेला आहे. या रेडिओने काही निधीसंकलन उपक्रम निश्चित केले आहेत, ज्यांकडून वर्षाला रेडिओला ठरावीक निधी प्राप्त होतो. याशिवाय रेडिओमध्ये नियमित कर्मचारिवर्ग कमीत कमी ठेवला आहे व समुदायातील व्यक्तींकडूनच इतर सर्व कामे करून घेतली जातात. त्यामुळे व्यवस्थापनवर ताण येत नाही आणि बचत होते.
थोडक्यात काय, वरील सर्व विवेचनातून काही गोष्टी प्रकर्षाने समोर येतात, त्या म्हणजे सामुदायिक रेडिओचा योग्य आणि नियोजनपूर्ण वापर झाला, तर हे जनसंपर्काचे आणि जनप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. सरकारकडून या रेडिओला जरी निधी मिळत नसला, तरी हा रेडिओ परिणामकारक आशयातून स्वत:साठी निधी उभा करू शकतो. जरी कम्युनिटी रेडिओचा उद्देश व्यावसायिक नसला, तरी हा रेडिओ आर्थिक दृष्टीकोनातून टिकाव तर धरूच शकतो, नफ्यातही राहू शकतो. परिणामकारक आशय व आशयनिर्मिती प्रक्रियेमध्ये समुदायाचे योगदान या दोन गोष्टींमुळेच कम्युनिटी रेडिओ यशस्वी होऊ शकतो. आशय आणि नफा या दोन भिन्न गोष्टी नाहीत. या परस्पर निगडित आहेत. आशयाच्या जोरावर जास्तीत जास्त भागधारक (स्टेकहोल्डर्स) मिळवलेत तर कम्युनिटी रेडिओसाठी हितकारक ठरेल. समुदायाचा कम्युनिटी रेडिओच्या सर्व पैलूंमध्ये सहभाग आवश्यक आहे. रेडिओ कर्मचार्यांनी समुदायाला स्टुडिओमधील सर्व उपकरणे हाताळण्यात तरबेज करणे आवश्यक आहे. केवळ समित्यांवर समुदायातील सदस्यांची नावे नको, तर निर्णयप्रक्रियेमध्ये त्यांच्या मतांना वजन हवे. रेडिओ शाश्वततेचा विचार केला, तर असे लक्षात येते की कम्युनिटी रेडिओ स्थापन करतानाच जर योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि भविष्य डोळ्यासमोर ठेवून व्यवहाराच्या बाबतीत योग्य उपाययोजना केल्या, तर पुढे भविष्यात या जनप्रबोधनाच्या माध्यमाला अडचणींचा काहीच सामना करावा लागणार नाही. अनेकदा स्टुडिओच्या समुदायापासूनच्या अंतरामुळे समुदायातील लोक स्टुडिओपर्यंत येऊ शकत नाही. अशा वेळेस लोकांचे स्टुडिओपर्यंत येणे सोईस्कर करण्यापेक्षा रेडिओ कर्मचार्यांनीच लोकांपर्यंत पोहोचणे उचित आहे. लोकांपर्यंत त्यांच्या घरी पोहोचल्याने आशय मिळण्याची शक्यता वाढते आणि कार्यक्रम परिणामकारक होतात. तसेच समुदायाशी चांगले संबंधसुद्धा निर्माण होतात. या माध्यमामध्ये संपूर्ण समाज ढवळून काढण्याचे सामर्थ्य आहे, ह्या वस्तुस्थितीची समुदायाला जाणीव करून देण्याचे कामही कम्युनिटी रेडिओ कर्मचार्यांचेच आहे. या माध्यमाला लोकांकडून आपुलकी आणि प्रेम मिळणे फार गरजेचे आहे. कम्युनिटी रेडिओने समुदायाचा विश्वास संपादित करायला हवा. एकदा तो मिळविला की समुदायाकडून समुदायाची प्रगती करण्यास तो फक्त एक निमित्तमात्र ठरतो. येणार्या काही वर्षांमध्ये या माध्यमाकडून खूप अपेक्षा आहेत आणि नव्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा ह्या माध्यमाचे सामर्थ्य ओळखून त्याचा सदुपयोग करणे फायद्याचे ठरेल.