ओट्टल (मल्याळम) या चित्रपटाचा विषय खूप संवेदनशील आणि वास्तववादी आहे. बालमजुरी हा विषय एकविसाव्या शतकातसुद्धा चर्चिला जावा, हे खरे तर दुर्दैवी आहे. ओट्टल म्हणजे पिंजरा. परिस्थितीच्या तडाख्याने कुट्टप्पाईचे आयुष्य जखडून गेले आहे. तरीही हा चित्रपट मेलोड्रामा होत नाही. चित्रपटाचा विषय आहे तो आणि त्याच्या आजोबांमध्ये फुलत गेलेले नाते. त्याला केरळमधील नयनरम्य खेड्याची पार्श्वभूमी आहे. आधुनिकतेचा स्पर्शही न झालेल्या या खेड्याप्रमाणेच येथील माणसंही साधी सरळ आहेत.
'बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' असे म्हणतात. बालपण हा प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, परंतु सर्वांचेच बालपण काही सुखाचे आणि आनंदाचे नसते. मुले ही देशाचे भविष्य आहे असे आपण मानतो, पण आज एकविसाव्या शतकातसुद्धा बालमजुरी ही गंभीर आणि व्यापक समस्या आहे. ज्या मुलांनी शाळेत जाऊन आपले भविष्य घडवायचे स्वप्ने पाहायची, तीच मुले दारूगोळा, फटाके कारखाने, हॉटेल, वीटभट्टी, घरकाम या, तसेच शेतीच्या कामात गुंतलेली आढळून येतात. या मुलांचे बालपण तर कोमेजून जातेच, शिवाय बरीचशी मुले शारीरिक आणि आर्थिक शोषणाची बळी होतात. त्यांचे कामाचे तास ठरलेले नसतात. शिक्षणाची संधी हिरावली जाते. त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते. भविष्य उद्ध्वस्त होते. सर्वात वाईट म्हणजे लहान वयात आलेल्या या अनुभवांनी नकळत्या वयातच मूल आपली निरागसता गमावते. २०१४मध्ये प्रदर्शित झालेला, पारितोषिकप्राप्त ओट्टल हा मल्याळम चित्रपट ही अशीच एका हरवलेल्या निरागसतेची गोष्ट.
काही गोष्टी कालातीत असतात. अन्याय, दुःख, निराशा या भावनांचा पोतही तसाच. आज एकशे तीस वर्षांनीसुद्धा तेवढाच रखरखीत. ओट्टल ह्या चित्रपटाची प्रेरणा आहे एकोणिसाव्या शतकातील, आन्तोन चेखव या रशियन लेखकाने लिहिलेली कथा 'वांका'.
नाताळचे दिवस आहेत. जग येशूचा जन्म दिवस साजरा करण्यात मश्गूल आहे. मात्र बाहेरच्या रोशणाईचा अंधुकसा प्रकाशसुद्धा मॉस्को येथील बूट
बनवायच्या कारखान्यात येत नाही. येथेच नऊ वर्षाचा वांका झुकॉव्ह शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला आहे. कारखान्याच्या मागच्या भागात आता कुणीही नाही. सगळेच जण चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले आहेत. वांका कपाटातून शाईची बाटली काढतो. एक चुरगळलेला कागद आणि त्यावर
चिमुकल्या हाताने लिहिलेली अक्षरे त्याचे भविष्य ठरवणार आहेत..
प्रिय आजोबा,...
कागदावर अक्षरे उमटत जातात आणि वांकाचे मन मात्र भूतकाळात त्याच्या आजोबांच्या गावात भिरभिरते.
'ओट्टल' हा चित्रपट एकोणिसावे शतक ओलांडून एकविसाव्या शतकात आपली कथा मांडतो, काळाबरोबर जागाही बदलते. रशियाची जागा भारतातले केरळ राज्य घेते. वांकाची भूमिका करतो कुट्टप्पाई आणि त्याचे आजोबा आहेत वाल्याप्पाचायी. कुट्टप्पाईचे आईवडील कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेल्याने आत्महत्या करतात. कुट्टप्पाई मात्र वाचतो. हा आठ वर्षांचा अनाथ मुलगा गावात राहणाऱ्या आपल्या आजोबांकडे राहायला येतो.
आजोबांची स्वतःची जागा नाही. जिथे रोजगार मिळेल तिथे ते राहतात. जेव्हा काम संपते, तेव्हा कामाच्या शोधात दुसरीकडे स्थलांतर करतात. गावात बदकांची शेती होते. इथे ते रोजगारावर काम करतात. बदकांचे अन्न म्हणजे किडे. हे अन्न संपले की दुसऱ्या जागेच्या शोधात अशी ही आयुष्यभराची वणवण पाठीशी लागलेली आहे.
तलावात पोहणाऱ्या बदकांकडे आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या कुट्टप्पाईला पाहून आजोबांचा मालक त्याला फटाक्यांच्या कारखान्यात
पाठवण्याचा सल्ला देतो. “हेच तर वय आहे शिकण्याचे आणि कमाई करण्याचे.” आजोबा दुर्लक्ष करतात पण पुढच्या भविष्याची ती नांदी असते.
कुट्टप्पाई इथे रमतो. हा मुलगा गरीब आहे, शाळा सुटल्याने शिक्षण मिळण्याचा मार्ग बंद आहे, पण तो हुशार आहे, सर्जनशील आहे, समजूतदार आहे. स्वतःच्या परिस्थितीची त्याला जाणीव आहे पण तिच्याशी त्याने जुळवूनही घेतले आहे. निसर्गाच्या सांनिध्यात आणि आजोबांच्या कुशीत त्याचे पोरकेपण संपते. इथेच त्याच्याच वयाच्या मुलाशी त्याची ओळख होते. वय सारखे, पण परिस्थितीत बरेच अंतर असते. तरीही हा फरक मैत्रीच्या आड येत नाही. हा मुलगा टिंकू एका मोठ्या बंगल्यात राहतो, मोठ्या शाळेत शिकतो, पण त्याला कुट्टप्पाईची ओढ असते. कुट्टप्पाई हुशार असतो. टिंकूला तो अभ्यासातसुद्धा मदत करतो. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आजोबा आणि नातू एकमेकांच्या सोबतीने आपले विश्व निर्माण करतात. त्यात रमतात. पण यालाही कुणाची तरी नजर लागते.
आजोबा आजारी पडतात. त्यांच्या लक्षात येते की आता फारच थोडा वेळ उरला आहे. आपल्यानंतर कुट्टप्पाईचे काय होणार ही चिंता त्यांना भेडसावू लागते. त्यांच्या मालकाला सांगून ते कुट्टप्पाईला फटाक्यांच्या कारखान्यात पाठवतात. बिचाऱ्या कुट्टप्पाईला याची कल्पना नसते. त्याला
वाटते, आपण शाळेत जाणार आहोत. त्याच्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना त्याच्या आजोबांनाही नसते.
चित्रपटाचा विषय खूप संवेदनशील आणि वास्तववादी आहे. बालमजुरी हा विषय एकविसाव्या शतकातसुद्धा चर्चिला जावा, हे खरे तर दुर्दैवी आहे. ओट्टल म्हणजे पिंजरा. परिस्थितीच्या तडाख्याने कुट्टप्पाईचे आयुष्य जखडून गेले आहे. तरीही हा चित्रपट मेलोड्रामा होत नाही. चित्रपटाचा विषय आहे तो आणि त्याच्या आजोबांमध्ये फुलत गेलेले नाते. त्याला केरळमधील नयनरम्य खेड्याची पार्श्वभूमी आहे. आधुनिकतेचा स्पर्शही न झालेल्या या खेड्याप्रमाणेच येथील माणसंही साधी सरळ आहेत.
यात काही प्रसंग अतिशय सुंदर घेतले आहेत. एके दिवशी कुट्टप्पाई टिंकूला आपल्या घरी जेवायला बोलावतो. त्याच्यासाठी खास मासे पकडून आणतो. त्याचे आजोबा खपून जेवण बनवतात. केळीच्या पानाने भांडी झाकून दोघेही टिंकूची वाट पाहतात, पण टिंकू येत नाही. कुट्टप्पाई खट्टू होतो. “गरिबाघरचे अन्न श्रीमंतांना पचत नाही रे” वाक्य टोचणारे, पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आजोबा कुट्टप्पाईला गुदगुल्या करून हसवतात. आजोबा आणि नातू यांच्यामधला बंध अतूट आहे. तो त्यांच्या खोड्या काढतो, त्यांना प्रश्न विचारतो, मस्ती करतो. ते त्याच्या प्रश्नाला प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. कामांमधून त्याला जगाची ओळख करून देतात. आजोबा तसे अबोल आहेत, पण नातवाशी खेळताना, त्याला खोटे खोटे रागावताना, त्याचा एकटेपणा दूर करताना दाट मिशांच्या मागून एक प्रेमळ चेहरा नजरेस पडतो.
टिंकू लहान आहे. जगाच्या व्यवहारापासून कोसो दूर आहे. कुट्टप्पाई, त्याला एक प्रोजेक्ट बनवून देतो, ज्याला राज्याचे प्रथम पारितोषिक मिळते. बक्षीस घेताना टिंकूचे डोळे कुट्टप्पाईच्या आठवणीने भरून येतात. लहान मुलांच्या हातात परिस्थितीशी लढायचे बळ नसेलही, पण एकमेकांविषयी
असलेले अकृत्रिम प्रेम, जिव्हाळा प्रेक्षकांच्याही काळजाला हात घालतो.
चित्रपटातील पात्रे सुद्धा वास्तववादी आहेत. त्यातली काही सहृदयी आहेत, मदत करायची त्यांची मनापासून इच्छा आहे. टिंकूच्या आईला कुट्टप्पाईबद्दल आस्था आहे, पण तिच्या हातात कसलीही सूत्रे नाहीत. बदकांची अंडी बदके उबवत नाहीत, त्याच्यासाठी कोंबड्यांचा उपयोग केला जातो आणि काम झाल्यावर त्यांना हुसकावून लावले जाते. आयुष्यात बेरीज आणि वजाबाकी कशी करायची याचे जरी शिक्षण घेतले, तरी गरिबांच्या पदरात शून्य असते ही जगाची रीत इथेही प्रत्ययास येते.
वासुदेवन या नटाने आजोबांची भूमिका वठवली आहे. सत्तर वर्षांच्या नटाची ही पहिलीच भूमिका. त्यांचा व्यवसाय मासेमारी. खेड्यात चित्रीकरणाची तयारी चालू असताना या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची, जयराज यांची वासुदेवन यांच्याशी भेट झाली आणि त्यांना आपले आजोबा सापडले. मुलाची भूमिका करणाऱ्या अशांत शाह याची हीच गोष्ट. तोसुद्धा रूढार्थाने अभिनेता नाही. मात्र आपली भूमिका त्याने समजून निभावली आहे.