शिवाजी महाराजांची माणसे आणि परकीयांचे अभिप्राय – भाग २
विवेक मराठी 24-Sep-2020
Total Views |
पोर्तुगीजांचे उच्चाटन हे महाराजाचे एक महत्त्वाचे ध्येय होतेच. सागरी व्यापारात, आरमारात महाराजांना कोणताही पूर्वानुभव किंवा कोणाचेही पाठबळ नव्हते. पण प्रत्यक्षात एखाद्या तरबेज आणि कसलेल्या माणसाप्रमाणे त्यांच्या हालचाली चाललेल्या दिसतात.
सुरतेहून कंपनीस पत्र / श १५८५ माघ शु १० / इ.स. १६६४ जाने. २८शिवाजीच्या कैद्यांपैकी हयात राहिलेले रॅडॅाल्फ टेलर, रिचर्ड टेलर, गिफर्ड आणि फॅरंड यांची सुटका झाली आहे. राजापूर आणि देशातल्या इतर व्यापारी पेठा बंडखोराच्या (शिवाजी महाराज) ताब्यात जाऊन सर्वत्र अंदाधुंदी पसरली असल्यामुळे तूर्त तिकडील व्यापार सोडून दिला आहे – इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड (११ पृ २०८)तात्पर्य – इंग्रजांसारख्या धूर्त आणि चिवट प्रतिस्पर्ध्याने महाराजांच्या ताब्यात गेलेल्या व्यापारी पेठांचा नाद सोडणे ह्याचा अर्थ महाराजांचा तिथला ताबा व्यापारी आणि लष्करीदृष्ट्या अत्यंत पक्का असला पाहिजे, ह्यांची खात्रीच पटते; त्याचबरोबर महाराजांच्या रचनात्मक दृष्टीची व त्यामुळे व्यापारासाठीची व्यवस्था अत्यल्प काळात सुरळीत करण्याची क्षमता त्यांना माहीत असल्यामुळे 'तूर्त' हा शब्दही महत्त्वाचा ठरतो.इंग्रज कैद्यांच्या सुटकेचा विषयही यामध्ये आला आहे. हे पत्र इ.स. १६६४च्या सुरुवातीचे आहे. त्याआधी इ.स. १६६१च्या मार्चमध्ये महाराजांनी आदिलशहाकडून राजापूर जिंकून घेतले होते. त्याच वेळी त्यांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात त्यांच्यावर तोफा डागणाऱ्या इंग्रजांना अटक केली होती आणि संपूर्ण वखार लुटून व खणून काढली होती. अटक झालेल्या इंग्रजांची सुटका अनेक महिने चाललेल्या वाटाघाटीनंतर झाली होती. सुमारे दोन वर्षे तरी त्यांनी ह्या दगलबाजांना अद्दल घडवली होती. त्यांच्या ह्या कणखर भूमिकेचा प्रभावही ह्या पत्रावर आहे. इंग्रज कैद्यांपैकी रिचर्ड नेपिअर आणि सॅम्युएक बर्नार्ड हे कैदेत असतानाच मरण पावले. ह्याचा अर्थ तुरुंगवासही कडकच असावा.गॅाब्रूनहून सुरतेस पत्र / श १५९० मार्गशीर्ष शु ३ / २६ नोव्हेंबर १६६८मस्कतहून ताजी बातमी आली आहे की, १९ मोठी आणि ५-६ छोटी गलबते मिळून ४००० लोक असलेले आरमार (अरबी) हिंदुस्थानचे किनाऱ्याकडे निघून गेले. काहींच्या मते हे आरमार मुंबईवर जायचे नाही. इतरांच्या मते शिवाजीला मदत करण्यासाठी ते जात असावे. सिंधचे मार्गाने काँगोकडे आलेली बातमी खरी असेल, तर ती प्रमाणे शिवाजीने पोर्तुगीजांपासून चौल घेतले असे समजते – इंग्लिश फॅक्टरी रेकॅार्ड ( १३ पृ ४४ इ.)इ.स. १६६९च्या जानेवारी महिन्यात अरबांच्या काही नौकांचा पोर्तुगीज लोकांनी पाठलाग केला असता त्या संगमेश्वर नदीच्या आश्रयाला जाऊन राहिल्या. ही नदी महाराजांच्या राज्यातून वाहत असल्यामुळे त्या नदीत शिरून अरब नौका पकडण्यास अथवा जाळून टाकण्यास पोर्तुगीज आरमाराचे अधिकारी धजले नाहीत. त्यांनी पोर्तुगीज विजरईची मसलत मागितली. त्यांच्या सल्लागार मंडळाने असे म्हटले की, "सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्यांना शिवाजीचे संरक्षण मिळाले आहे. त्याला डावलून अरबांवर हल्ला केल्यास तो त्यांच्या मदतीला धावून येईल. त्याच्याशी युद्ध खेळण्याइतकी परिस्थिती आज तरी आमची नाही. अशा परिस्थितीत एकच मार्ग उरतो अन् तो म्हणजे अरबांची कोंडी चालू ठेवणे व त्यांना अरबस्तानला जाऊ न देणे."तात्पर्य – वरील दोन्ही उदाहरणांवरून महाराज व मस्कतचा इमाम ह्यांचे सहकार्य उघड होते. पोर्तुगीज व अरब (मस्कतच्या इमामासह) यांचे हाडवैर होते. अरबांचे समुद्रातील वर्चस्व पोर्तुगीजांनीच संपवले होते. ही महाराजांच्या जन्माच्याही आधीची परिस्थिती होती. दरम्यानच्या काळात अरबांनी - विशेषतः मस्कतच्या इमामाने पुन्हा उचल खायला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत इमाम व महाराज यांना दोघांनाही युरोपीय दर्यावर्दी हे प्रमुख शत्रू होते. आपल्या राजकीय व आर्थिक उद्दिष्टांसाठी महाराज त्याचा योग्य उपयोग करत होते व त्याचा प्रभाव युरोपीयांवरही पडत होता, असे दिसते. महाराज हे व्यापार आणि आरमार या दोन्हीत खूप नवखे असूनही त्यांचे ह्या संदर्भातले सखोल ज्ञान व हुशारी यातून चांगली व्यक्त होते. धर्म हा विषयही त्यांनी व्यवसायिकपणे बाजूला ठेवलेला दिसतो. व्यापारी व आर्थिक गोष्टी धर्मापासून बाजूला ठेवायच्या, हे त्यांचे धोरणही त्यांची व्यावसायिक प्रगल्भता दाखवते.काही काळानंतर त्यानी इमामाशी असलेल्या संबंधाचा (जे मुळात फार घनिष्ठ नव्हतेच) बागुलबुवा उभा करून अनेक सवलतीही पोर्तुगीजांकडून मिळवल्या. केवळ समुद्रावरच नव्हे, तर जमिनीवरही चढाई करून पोर्तुगीजांना अनेक ठिकाणी नमते घ्यायला लावले व आपला वसूल वाढवला.ह्या सर्व परकीय व्यापाऱ्यांचे एक छुपे कलम किंवा उद्दिष्ट कायमचे असे, ते म्हणजे शिवाजी महाराजांना किंवा मराठ्यांना सतत पडद्याआडून पण विरोध! समुद्रावरील प्रभुत्त्व आणि राजकीय कुटिलपणा ह्यांच्या समन्वयाने ते हे उद्दिष्ट साधण्यात नेहमीच यशस्वी होत. त्यांच्यामुळेच महाराजांना सिद्दीसारख्या कावेबाज शत्रूचा बंदोबस्त कधीही पुरतेपणी करता आला नाही. जमिनीवर महाराजांनी त्याला पराभूत केले. पण चांगले आरमार, बळकट जंजिरा व अन्य परकीय शत्रूंची साथ या बळावर सिद्दी अजिंक्यच राहिला. मुघल सोडले, तर महाराजांच्या इतर शत्रूंना वेळोवेळी पोर्तुगीजांकडून मदत मिळत असे. त्यासही महाराजांनी आळा घातला.इ.स. १६७५ साली महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्याला वेढा घातला. पूर्वीप्रमाणे पोर्तुगीजांनी आदिलशाहीच्या फोंड्यावरील शिबंदीला चोरून रसद पुरवायला सुरुवात केली. मराठ्यांना त्याचा सुगावा लागल्यामुळे त्यांनी तिथल्या बोरी नदीवरील आपला पहारा वाढवला. एक दिवस रसद घेऊन येणारी पोर्तुगीजांची १० शिबाडे महाराजांच्या लोकांनी पकडली. महाराजांनी पोर्तुगीजांच्या विजरईला त्याचा जाब विचारला. त्याने अर्थातच उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर त्याला धडा शिकवण्यासाठी महाराजांनी त्यांच्या साष्टीच्या प्रांतात लुटालूट केली. त्याचा योग्य परिणाम होऊन पोर्तुगीजांनी आदिलशहाची फोंड्याकडची मदत थांबवली. शिवाय महाराजांच्या दुसऱ्या मागणीप्रमाणे विजरई चौथाई अथवा चौथ भरण्यासही तयार झाला, मात्र त्याने त्या प्रत्यक्ष भरल्याच्या नोंदी नाहीत. तथापि महाराजांच्या दडपणामुळे पोर्तुगीज गा'व कांदीला' उर्फ 'गावखंडी' हा कर मात्र मराठ्यांना नियमितपणे भरू लागले. पोर्तुगीज त्याला Grav-Candila म्हणत असत. हा कर मराठे शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन वसूल करत असत. धान्याच्या दर खंडीमागे (खंडी - धान्याचे एक माप) एक ठरावीक कर धान्यरूपानेच बांधून देण्यात आला होता. कालांतराने काही अडचणी आल्यामुळे पोर्तुगीज हा कर मराठ्यांना दमणच्या हद्दीवर आणून देऊ लागले.पोर्तुगीजांचे उच्चाटन हे महाराजाचे एक महत्त्वाचे ध्येय होतेच. त्यामुळे महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज विजरई उद्गारला होता - "आमच्या काळजीचे निवारण झाले आहे. युद्धकाळापेक्षा शांततेच्या काळातच त्याची आम्हाला अधिक भीती वाटायची." महाराजांच्या शक्तीची ही पावतीच म्हणायला हवी. कारण शांततेच्या काळातच 'चौथ'साठी महाराज पोर्तुगीजांकडे सतत तगादा लावीत. पितांबर शेणवी गुळगुळे हा यासाठी महाराजांचा एक प्रमुख वकील होता.फोंड्याबाबत महाराजांच्या कृतीची वैशिष्ट्ये -१. फोंडा काबीज करून त्यांनी आदिलशहा व पोर्तुगीज ह्यांना एकाच वेळी कोकणात शह दिला.२. नौदल व भूदल यांचे उत्कृष्ट समायोजन (Co-ordination) केले.३. भूराजकीय विजयातून 'चौथ' कराचा लाभ मिळवला. 'चौथ' प्रत्यक्षात मिळाली नाही, तरी 'गावखंडी' ह्या करातून आर्थिक लाभ मिळवलाच.४. फोंड्यानंतर कारवारात प्रवेश करून पोर्तुगीजांना एक प्रकारे वेढून टाकले.५. दीव-दमणकडच्या पोर्तुगीजांना दाबात ठेवून संपूर्ण पश्चिम किनारपट्टीमध्ये स्वतःच्या नावाचा दरारा प्रस्थापित केला.६. 'चौथ' हे नियमित उत्पन्नाचे साधन बनवण्याची पूर्वतयारी केली.७. 'चौथ' मिळाल्यास महाराज त्यापोटी आपल्याला संरक्षण देऊ शकतील असा विश्वास संबंधितांमध्ये निर्माण केला.८. साळ नदीवर खोलगड हा किल्ला, तर कारवारात कूर्मगड, मादलिंग गड, तर कद्रे आणि अंकोला येथे दोन भुईकोट किल्ले बांधले. आपली भूराजकीय आघाडी वाढवली. आदिलशहाला पश्चिम किनाऱ्यावर वावरण्यास अधिक अडचणी निर्माण केल्या.९. मिरीच्या व्यापारात (कर्नाटकातून येणाऱ्या) चंचुप्रवेश केला.सागरी व्यापारात, आरमारात महाराजांना कोणताही पूर्वानुभव किंवा कोणाचेही पाठबळ नव्हते. पण प्रत्यक्षात एखाद्या तरबेज आणि कसलेल्या माणसाप्रमाणे त्यांच्या हालचाली चाललेल्या दिसतात. पुढील १ किंवा २ लेखांमध्ये आपण अशा गोष्टींचा आणखी आढावा घेऊ.