सन १८३०च्या दशकात हिंदुस्थानातील मुस्लिमांच्या मनावर अखिल-इस्लामवादाची पकड घट्ट होऊ लागली होती. ह्या तत्त्वावर अढळ राहूनच ते ब्रिटिशांबाबतची भूमिका ठरवीत राहिले. सन १८५७च्या उठावाच्या वेळी ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्याची स्वप्ने मुस्लिमांना पडली होती. नंतरच्या काळातही काही मुस्लीम नेते हे स्वप्नरंजन करत राहिले असले, तरी ब्रिटिशांशी जमवून घेण्यातच इस्लामचे हित आहे, हे बहुसंख्य मुस्लीम नेत्यांना उमगले होते. ब्रिटिशांची तळी उचलण्याची त्यांची भूमिका १९११पर्यंत चालू राहिली. त्या वर्षी ब्रिटिशांनी बंगालची फाळणी मागे घेतली. पहिल्या महायुद्धाच्या दिशेने काही घटनाही मुस्लीम जगतात घडत होत्या. परिणामी १९११-१९२० ह्या काळात ब्रिटिश आणि हिंदुस्थानातील मुस्लीम एकमेकांकडे डोळे वटारून समोरासमोर उभे ठाकले. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अखिल-इस्लामवादी हितसंबंधांना धक्का पोहोचताच तोवर म्यान असलेली तलवार मुस्लिमांनी ब्रिटिशांविरुद्ध परजली. त्या तलवारीचे तडाखे हिंदूंनाही देण्यास ते विसरले नाहीत.
खिलाफत चळवळ मुख्यतः १९१९-१९२४ ह्या काळात झाली असली, तरी १९११ सालीच तिचे पडघम वाजू लागले होते. पहिल्या महायुद्धाच्या दिशेने घडणाऱ्या घटनांशी त्यांचा संबंध होता. ऑटोमन तुर्की साम्राज्याला आणि तिच्या खलीफाला पहिल्या महायुद्धात उतरती कळा लागताच खिलाफत चळवळीने इथे उचल खाल्ली. इथल्या मुस्लीम नेत्यांना हिंदुस्थानातील घटनांचे कधीच सोयरसुतक नव्हते. त्यांचे डोळे विशिष्ट जागतिक घटनांकडे लागले होते.
पहिले महायुद्ध आणि ऑटोमन तुर्की साम्राज्य
दि. २८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ हा पहिल्या महायुद्धाचा काळ समजला जातो. ह्यात एका बाजूला ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, रोमानिया, जपान आणि अमेरिका ही मित्रराष्ट्रांची युती, तर दुसऱ्या बाजूला जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, बल्गेरिया आणि ऑटोमन तुर्की साम्राज्य ही केंद्रीय सत्तांची युती होती. महायुद्धाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत वेगवेगळे देश त्यात सामील झाले. महायुद्धात सैनिक-असैनिक मिळून सुमारे १६ लाख लोकांचे शिरकाण झाले. ह्या भीषण महायुद्धात मित्रराष्ट्रांचा विजय झाल्यामुळे ऑटोमन तुर्की साम्राज्य पराभूतांच्या रांगेत उभे राहिले.
ऑटोमन तुर्की साम्राज्य १२९९ साली स्थापन झाले. सन १५२०-१५६६ हा त्याच्या परमोत्कर्षाचा काळ! मध्य-पूर्व (अरबस्तानचा काही भाग, सीरिया, लेबनॉन, पॅलेस्टाइन, जॉर्डन, इजिप्त), पूर्व युरोप (तुर्कस्तान, ग्रीस, बल्गेरिया, मॅसेडोनिया, रोमानिया) आणि उत्तर आफ्रिकेची किनारपट्टी अशा विस्तीर्ण भूप्रदेशावर एकेकाळी ऑटोमन तुर्की सत्ता होती. सतराव्या शतकात युरोपात चर्चविरुद्ध पुनर्जागृती आणि त्याचबरोबर औद्योगिक क्रांती होताच ऑटोमन तुर्की साम्राज्य आचके खाऊ लागले. पुढील शंभर वर्षांत ग्रीस (१८३०), रोमानिया, सर्बिया आणि बल्गेरिया (१८७०), त्रिपोली (१९११-१९१२), आग्नेय युरोपातील उरलीसुरली भूमी (बाल्कन युद्धे, १९१२-१३) असा भूप्रदेश ऑटोमन साम्राज्याने गमावला. पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभीच ऑटोमन तुर्की साम्राज्याची स्थिती बिकट झाली होती. त्याचा विस्तार तर कमी झाला होताच, शिवाय अंतर्गत कलह आणि ढासळलेली अर्थव्यवस्था त्याच्या अडचणीत भर घालत होते. पण ह्या आपत्तींनी खचून न जाता नाममात्र सुलतान महंमद पंचम याने, सत्तारूढ राजकीय वर्गाने आणि समर्थक वृत्तपत्रांनी राष्ट्रीय जागृतीची हाक दिली. खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी पहिल्या महायुद्धात अलिप्त राहणे तुर्कस्तानला चालण्यासारखे नव्हते, कुणाचे तरी साहाय्य घेणे क्रमप्राप्त होते. ऑटोमन तुर्की सेना आणि नौदल पुनर्गठित करण्यासाठी युद्धमंत्री एनवर पाशाने अनुक्रमे जर्मनी आणि ब्रिटन ह्या दोन पारंपरिक शत्रूंची चाचपणी केली. दोघांपैकी कुणाही एकाशी युती करण्याची तुर्कस्तानची तयारी होती. ब्रिटनशी दीर्घकालीन युती करणे तुर्कस्तानला कठीण होते. शिवाय जर्मनीने कधीही ऑटोमन भूप्रदेशाची अभिलाषा दाखविली नव्हती. जर्मनीशी तुर्कस्तानचे पूर्वीही सैनिकी संबंध होते. ह्या सगळ्याचा विचार करून ऑटोमन तुर्की साम्राज्याने जर्मनीशी युती केली. दि. ३० सप्टेंबर १९१४ला तुर्कस्तानने जर्मनीकडून सोन्याच्या स्वरूपात पन्नास लाख तुर्की पौंडाचे कर्ज मागितले. जर्मनीच्या बाजूने तुर्कस्तान महायुद्धात उतरल्यास कर्ज देणे शक्य होईल, असे जर्मनीने सांगितले. दि. २९ ऑक्टोबर १९१४ला तुर्की आरमाराने रशियन बंदरांवर बॉम्बवर्षाव केला. अशा प्रकारे तुर्कस्तानने महायुद्धात उडी घेतली.
सन १९१५च्या मध्याला आंतरराष्ट्रीय भांडवल बाजारांची दारे तुर्कस्तानसाठी बंद झाल्यामुळे ऑटोमन तुर्की साम्राज्य आर्थिक संकटात सापडले. गॅलिपोली (१९१५) आणि कुत (१९१६) येथे तुर्की सैन्याने ब्रिटनवर विजय मिळवूनही १९१६पर्यंत त्याची पुरती दमछाक झाली होती. सन १९१६च्या हिवाळ्यात रशियाने आणि १९१६-१७मध्ये सीरिया, पॅलेस्टाइन आणि जेरुसलेममध्ये ब्रिटनने केलेल्या चढायांमुळे ऑटोमन तुर्की सैन्य पार जेरीस आले (टर्कीज एंट्री इंटू वर्ल्ड वॉर १: अॅन असेसमेंट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज, उलरिच ट्रम्पेनर, द जर्नल ऑफ मॉडर्न हिस्ट्री, खंड ३४, क्र. १९६२, पृ. ३७४; शिवाय, द ऑटोमन एम्पायर, केनेथ डब्ल्यू. हार्ल, द ग्रेट कोर्सेस. २०१७. पृ. २२८-२५०).
सन १९००मध्ये तुर्की सुलतान अब्दुल हमीदने त्याच्या साम्राज्यातील अरब प्रांतांना दमास्कसशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या बांधकामाची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. मक्का-मदिनेला जोडणाऱ्या 'इस्लामी प्रतिष्ठे'च्या ह्या रेल्वे योजनेला जगभरातील मुस्लिमांनी देणग्या दिल्या. ह्या इस्लामी मर्दुमकीसाठी मेंदू मात्र जर्मन अभियंत्यांचा होता! ही नामुश्की पुरेशी नाही म्हणून की काय, ह्या मार्गावर पहिल्या रेल्वेगाड्या सप्टेंबर १९१८मध्ये धावू लागल्या त्या विजयी ब्रिटिश सैनिकांना घेऊनच ('टी.ई. लॉरेन्स' इन अरेबिया अँड आफ्टर, लिडेल हार्ट, जॉनाथन केप, १९३४, पृ.५१-५३).
अखिल इस्लामवादाचा फुगा फुस्स
पहिले महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच ऑटोमन तुर्की साम्राज्यातील अरब प्रजेत चुळबुळ सुरू झाली होती. मक्केचा शेरीफ हुसेन (१८५३-१९३१) ह्यास लयास गेलेल्या अरबी अब्बासी खिलाफतीचे गतवैभव खुणावत होते. तुर्की वर्चस्व झुगारून आपल्या घराण्याची सत्ता असलेल्या विशाल अरब संघराज्याची तो स्वप्ने रंगवू लागला. बरे, हा हुसेन कोणी उपटसुंभ नव्हता. तो प्रत्यक्ष प्रेषित मुहम्मदांचा ३७वा वंशज होता. थोडक्यात, प्रेषितांचा वंशजच इस्लामच्या तथाकथित एकमुखी खिलाफतीला आव्हान देत होता. हुसेन मक्केत आला, तेव्हा तिथे वाहिब बे नावाचा अरबद्वेष्टा तुर्की राज्यपाल होता. त्याने लागलीच शेरीफ हुसेनच्या सुरक्षा रक्षकांना त्यांच्याकडे असलेल्या शंभर जुन्या रायफली जमा करण्याचा आदेश दिला. ह्या अपमानाचे पर्यवसान दंग्यात झाले. अरबस्तानात आणि सीरियात सार्वभौम अरब राज्य व्हावे अशी ब्रिटिशांचीही इच्छा होतीच. तुर्कस्तानने ब्रिटनविरुद्ध जिहाद पुकारल्यास शेरीफ हुसेनची साथ त्यांना हवी होती. शेरीफ हुसेन प्रेषितांचा वंशज असला, तरी खिलाफतीवर दावा सांगण्याइतपत बळ त्याच्यापाशी नव्हते. तरीही ब्रिटनने त्याला पाठिंबा दिला. जानेवारी १९१५मध्ये जिहाद पुकारण्यात यावा हे तुर्कस्तानचे मत हुसेनने ब्रिटनच्या सांगण्यावरून अमान्य केले. सौदी अरेबियाच्या वर्तमान सौदी राजघराण्याचा संस्थापक इब्न सौद ह्याची हुसेनला फूस होती, हे विशेष (लिडेल हार्ट, उपरोक्त, पृ. ६१-६४).
सन १९१६च्या सुरुवातीला तुर्की सैन्याने सीरियात घुसून अरबांचे हे बंड चिरडून टाकले. संशयित बंडखोरांची सामूहिक हत्या करण्यात आली. जर्मन तुकडीला बरोबर घेऊन खैरी बेच्या नेतृत्वाखाली विशेष तुर्की दलाने मक्केत प्रवेश करून बंड मोडून काढले. मक्केला कुणा मुस्लिमेतराचा वारा लागता कामा नये हा प्रेषितांचा अंतिम आदेश असताना त्यांच्याच वंशजाला नमविण्यासाठी इस्लामचा खलीफा ख्रिस्ती सैनिकांना बरोबर घेऊन मक्केत गेला! इस्लामची केवढी ही नामुश्की!
दि. ५ जून १९१६ला अरबांचे बंड सुरू झाले. त्याच्या शिरोभागी स्वतः शेरीफ हुसेन होता. त्याच्या सैन्यात ५०,००० अरब सैनिक असले, तरी त्यांच्याकडे अवघ्या १०,००० रायफली होत्या. तरीही अरब बंडखोरांनी मक्का, जेद्दाह आणि ताईफ शहरे हिसकावून घेतली. सन १९१९-१९२४ ह्या काळात अरबस्तानच्या ह्या भागावर शेरीफ हुसेनचा अंमल चालला. पुढे दि. ३ मार्च १९२४ला तुर्की खिलाफत समाप्त झाल्यावर शेरीफ हुसेनने स्वतःला खलीफा घोषित केले. पण सध्या अरबस्तानावर राज्य करणाऱ्या सौदी घराण्याने प्रेषितांच्या ह्या वंशजाला अरबस्तानातून पळवून लावले (लिडेल हार्ट, उपरोक्त, पृ. ६५-७३). ह्या सगळ्या घटनाक्रमातून इस्लामी बंधुभावाचा दावा किती पोकळ आहे, हे सुज्ञ माणसाला वेगळे सांगण्याची गरज नाही. पण स्वतःची बुद्धी मजहबी शिकवणीच्या दावणीला बांधून ठेवणाऱ्या खिलाफतवादी नेत्यांना हे शहाणपण कसे सुचणार? दि. २६ जून १९१६ला लखनौला झालेल्या मुस्लीम लीगच्या बैठकीत हुसेनची 'निर्लज्ज वर्तणूक पवित्र स्थळांच्या सुरक्षेसाठी धोकादायक' ठरविण्यात येऊन तिची निंदा करण्यात आली. हुसेन आणि त्याचे समर्थक इस्लामचे शत्रू असल्याचे फिरंगी महालच्या मौलाना अब्दुल बारींनी सांगितले. हुसेनला साथ देण्याची ब्रिटिशांची नीती घोडचूक असून ती ठीक करावी, असा सल्ला अजमल खान ह्यांनी व्हाइसरॉयला दिला (द खिलाफत मूव्हमेंट इन इंडिया, १९१९-१९२४, मुहम्मद नईम कुरेशी, लंडन विद्यापीठाला सादर केलेला प्रबंध, १९७३, पृ.४६).
त्रिपोलीच्या आणि त्यानंतर झालेल्या बाल्कन युद्धांतील तुर्की पीडितांसाठी मुहम्मद अलींनी १९११ साली हिंदुस्थानात कोष सुरू केला. डिसेंबर १९१२मध्ये
डॉ. एम.ए. अन्सारींच्या नेतृत्वाखालील तुर्की पीडितांच्या साहाय्यासाठी हिंदुस्थानातून वैद्यकीय पथक गेले (द खिलाफत मूव्हमेंट इन इंडिया १९१९-१९२४. ए.सी. नीमायर, मार्टिनस नायहॉफ, १९७२, पृ.५६). सन १८९८ ते १९१८च्या दशकात प्लेगने हिंदुस्थानात किमान एक कोटी लोकांचा बळी घेतला. एकट्या १९११ साली ३९९७ लोकांचा मुंबईत, तर १७३६ लोकांचा कलकत्त्यात प्लेगने मृत्यू झाला (द मेडिकल गॅजेट, मार्च १९४८, पृ. १३८). सुदूर तुर्कस्तानातील पीडितांसाठी
डॉ. अन्सारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जीव कासावीस होत होता, पण आपल्या शेजारी प्लेगने मरणाऱ्या लोकांसाठी त्यांची हृदये द्रवल्याची कुठे नोंद नाही. ब्रिटिशांची मर्जी राखूनच मुहम्मद अलींनी कोषाचे आणि वैद्यकीय पथकाचे काम केले. दिल्लीच्या रेड क्रिसेंट सोसायटीचा आश्रयदाता म्हणून प्रत्यक्ष व्हाइसरॉयलाच सहभागी करून घेण्यात मुहम्मद अली यशस्वी झाले. त्यांनी ब्रिटिश वकिलातीच्या अधिकाऱ्यांमार्फत हे सर्व पुनर्वसन कार्य केले. पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर त्यांच्या 'कॉम्रेड टर्किश रिलीफ फंड'मधून उभे राहिलेले रुग्णालय त्यांनी हिंदुस्थानात ब्रिटिशांनी उभ्या केलेल्या वैद्यकीय व्यवस्थेला देऊन टाकले (नीमायर, उपरोक्त, पृ.५६).
पहिल्या महायुद्धाच्या वेळी 'इस्लामचे हित सर्वोपरी' ह्या अढळ तत्त्वावर हिंदुस्थानातील मुस्लिमांनी कोलांटउड्या मारल्या. बाल्कन युद्धाच्या वेळी सर्बिया तुर्कस्तानच्या विरुद्ध होता, म्हणून जुलै १९१४मध्ये सर्बिया आणि ऑस्ट्रियामध्ये युद्ध सुरू होताच इथल्या मुस्लिमांची सहानुभूती ऑस्ट्रियाकडे गेली. एकेकाळी रशिया आणि तुर्कस्तान यांच्यात युद्ध झाले होते, हे ध्यानात ठेवून जर्मनी आणि रशिया एकमेकांशी भिडले तेव्हा इथले मुस्लीम जर्मनीच्या बाजूने उभे राहिले. पहिल्या महायुद्धात ख्रिस्ती देश आपसात लढत असल्याचे दृश्य हिंदुस्थानातील मुस्लिमांना सुखावत होते. सर्व ख्रिस्ती सत्तांनी तुर्कस्तानशी दुर्व्यवहार केल्यामुळे अल्लाह त्यांना शिक्षा देत असल्याचे त्यांचे प्रामाणिक मत होते. ह्या महायुद्धामुळे युरोपात ख्रिस्ती सत्तांचे पतन होऊन इस्लामी सत्तेचे पुनरुज्जीवन होणार, असे अनेक मुस्लिमांना वाटत होते (कुरेशी, उपरोक्त, पृ.२९, ३०).
ऑगस्ट १९१४मध्ये ब्रिटनने सर्बिया आणि रशियाच्या बाजूने जर्मनीच्या विरोधात उडी घेतली. जर्मनीला पाठिंबा देण्याच्या आपल्या भूमिकेत इथल्या मुस्लिमांनी पूर्ण घूमजाव करत चक्क ब्रिटनला पाठिंबा घोषित केला. ह्या सुमारास तुर्कस्तानने तटस्थ भूमिका घेतली होती, हेच ह्या दलबदलूपणाचे एकमेव कारण होते (कुरेशी, उपरोक्त, पृ. ३०,३१). मौलाना अब्दुल बारींनी तुर्की सुलतानाला तार करून 'तटस्थ रहा नाहीतर ब्रिटनची बाजू घ्या' अशी याचना केली. तुर्कस्तानला तटस्थ राहता येईल असा व्यवहार ब्रिटनने करावा, अशी याचना व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंज (१८५८-१९२७) ह्यास करायलाही मौलाना बारी विसरले नाहीत (कुरेशी, उपरोक्त, पृ. ३२, ३३). सन १९१४पर्यंत मौलाना अब्दुल बारी, अली बंधू, जफर अली खान, हसरत मोहानी आणि मौलाना आजाद हे कट्टर अखिल-इस्लामवादी नेते पक्के ब्रिटिशधार्जिणे होते, हे लक्षात घेतले पाहिजे. मित्रराष्ट्रांची बाजू घेता येत नसेल तर निदान तटस्थ राहा, असा उपदेश मुहम्मद अली तुर्कीच्या अधिकाऱ्यांना करत होते. बंदिगृहात असताना उत्तर प्रदेशचे गव्हर्नर मेस्टन आणि व्हाइसरॉयशी मुहम्मद अलींचा झालेला पत्रव्यवहार त्यांच्या ब्रिटिशधार्जिणेपणाची साक्ष देतो.
ब्रिटनने तुर्की हितसंबंधांना धक्का लावताच तोवर ब्रिटिशांची लाळ घोटणाऱ्या अखिल-इस्लामवाद्यांचा ब्रिटिशविरोध जागा झाला. हा ब्रिटिशविरोध देशप्रेमातून केव्हाही उत्पन्न झाला नाही. मुळात ही सर्व मंडळी ब्रिटिशधार्जिणी होती. मार्च १९२२मध्ये भारतसचिव मॉंटेग्यूने ऑटोमन साम्राज्य खालसा करण्यास विरोध करणारे निवेदन प्रसिद्ध केल्यावर मौलाना बारी आणि हसरत मोहानी ह्यांचा ब्रिटिशविरोध लागलीच मावळला आणि ते ब्रिटिशांविरुद्ध असहकार चळवळ करू नये असा प्रचार करू लागले. अखिल-इस्लामवाद आणि केवळ अखिल-इस्लामवादाच्याभोवतीच संपूर्ण खिलाफत चळवळ फिरत राहिली (शरीफ अल-मुजाहिद लिखित समीक्षा: द खिलाफत मूव्हमेंट: रिलीजस सिम्बॉलिसम अँड पोलिटिकल मोबिलायजेशन इन इंडिया, गेल मिनॉल्ट, पाकिस्तान होरायझन, खंड ३९, क्र. २, १९८६, पृ.८७, ८८). तिच्यात देशप्रेमाचा लवलेशही नव्हता.
अखिल-इस्लामवाद्यांचे घूमजाव
सन १९१७मध्ये रशियात साम्यवादी क्रांती झाली. मित्रराष्ट्रांनी त्याच सुमारास जर्मनीशी स्वतंत्र संधी केली. मित्रराष्ट्रे ऑटोमन साम्राज्याच्या विघटनाचे मनसुबे रचत असल्याची कुणकुण लागलेली होती. मित्रराष्ट्रांनी तुर्कस्तानचा पराभव केला, तरी तुर्की साम्राज्य अबाधित राखण्यात यावे असा सूर मुहम्मद अलींचे 'कॉम्रेड' आणि मौलाना आजादांचे 'हिलाल' ही अखिल-इस्लामवादी वृत्तपत्रे आता आळवू लागली. ब्रिटिशांना मुस्लिमांचा पाठिंबा नको होता असे नव्हतेच. तुर्कस्तानविरुद्ध ब्रिटिशांचे युद्ध राजकीय स्वरूपाचे असून ब्रिटनविरोधी जिहाद मजहबदृष्ट्या अवैध असल्याचा फतवा बरेलवी सुन्नी प्रणालीचा उद्गाता अहमद रजा खानने ब्रिटनच्या सांगण्यावरून काढला (कुरेशी, उपरोक्त, पृ., ३१).
तुर्कस्तानचा पारंपरिक शत्रू समजला जाणारा रशिया ब्रिटनच्या बाजूने महायुद्धात उतरल्यावर हिंदुस्थानातील मुस्लिमांच्या ब्रिटिशविरोधाला आणखी धार चढली. खिलाफतला वाचविण्याचे काही फुटकळ प्रयत्न मौलाना अब्दुल बारी (लखनौ), मौलाना आजाद (कलकत्ता), महमूद अल-हसन (देवबंद) आणि दिल्लीत हकीम अजमल खान,
डॉ. अन्सारी आणि अली बंधूंनी वैयक्तिक स्तरावर सुरू केले. नोव्हेंबर १९१४मध्ये ब्रिटनच्या विरोधात तुर्कस्तान महायुद्धात उतरताच खरे म्हणजे खिलाफत चळवळ सुरू झाली. महमूद अल-हसन 'रेशमी पत्र' कटात सापडल्यामुळे त्याला माल्टा येथे सीमापार करण्यात आले. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या सरकारांनी मौलाना आजादांना सीमापार केले. मौलाना हसरत मोहानींना उत्तर प्रदेश सरकारने स्थानबद्ध करून नंतर बंदिवासात धाडले (कुरेशी, उपरोक्त, पृ. ४१, ४२).
युद्धविराम
दि. ३० ऑक्टोबर १९१८ला मित्र राष्ट्रे आणि तुर्कस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली. त्यापाठोपाठ दि. ११ नोव्हेंबरला जर्मनीने शरणागती पत्करली आणि महायुद्ध संपले. 'ऑटोमन साम्राज्य हे पाश्चात्त्य संस्कृतीच्या दृष्टीने निश्चितपणे उपरे असून त्याला युरोपातून घालवून देण्याचे आणि तुर्कांच्या रक्तरंजित जाचातून लोकांना मुक्त करण्याचे' मित्रराष्ट्रांनी ठरविलेलेच होते (कुरेशी, उपरोक्त, पृ. ४९). कॉन्स्टँटिनोपलसह तुर्कस्तानचे सर्व युरोपीय प्रदेश अलग करण्याचा, शिवाय मेसोपोटेमिया (वर्तमान इराक), पॅलेस्टाइन, अरबस्तान आणि सीरियालादेखील स्वतंत्र करण्याचा घाट घातला गेला. ऑटोमन तुर्की साम्राज्याला छिन्नविच्छिन्न करणाऱ्या ह्या अटींमुळे तुर्कस्तानात मुस्तफा केमाल अतातुर्क ह्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली सेक्युलर तुर्की गणराज्याची चळवळ पुढे १९२३ साली यशस्वी झाली. खलीफापद नाहीसे करून तुर्की मुस्लिमांनीच अखिल-इस्लामवादाची लक्तरे तुर्कस्तानच्या वेशीवर टांगली. अखिल-इस्लामवादाचे थोतांड कवटाळणाऱ्या हिंदुस्थानातील खिलाफ़तवाद्यांचे चांगलेच हसे झाले.
क्रमश: