विवेकची अमृतवेल

विवेक मराठी    09-Aug-2020
Total Views |
एखाद्या विचारसरणीचा, मांडणीचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावणं, ससंदर्भ त्यातली त्रुटी दाखवणं वा त्याची महानता मांडणं... हे सगळंच ते सहजतेने करत आले आहेत. गांधी, आंबेडकर, नेहरू वा सावरकर यातल्या कोणत्याही व्यक्तीची वैचारिक मांडणी ते आत्मीयतेने समजून घेतात. त्यांना कोणाचंच वावडं नाही. त्यातलं जे काही विशेष उल्लेखनीय वाटेल, ते मोकळेपणाने मांडतानाही समाजातल्या त्यांच्या विशिष्ट प्रतिमेची त्यांना भीड पडत नाही, हे विशेष! हे लेखनधाडस अभ्यासण्याजोगं आणि अनुकरणीयही....  आज वयाची पंचाहत्तरी पार करतानाही त्यांच्या मनात उदंड योजना आहेत, त्यासाठी लागणारी ऊर्जा आणि उत्साहही. या अमृतवेलीची छाया विवेकच्या बृहद् परिवारावर सदैव राहावी, परमेश्वराने त्यांना निरोगी दीर्घायुष्य बहाल करावं ही आजच्या शुभदिनी प्रार्थना.

patange_1  H x

काळाबरोबर वाढत चाललेली प्रसारमाध्यमं आणि त्यातून बदलत चाललेलं पत्रकारितेचं स्वरूप आपल्या सर्वांसमोर आहे. लोकशाहीच्या या आधारस्तंभाची विश्वासार्हता धोक्यात येण्याचे प्रसंगही आजकाल अनेक वेळा येतात. अशा वेळी, 'Is it gentleman's business nowadays?' असा प्रश्न मनात येतो आणि त्याच वेळी जेव्हा दुसरं मन, 'yes, still it is...' अशी निःशंक ग्वाही देतं, तेव्हा त्याच्या तळाशी रमेशजी पतंगे यांच्यासारख्यांच्या निष्ठावंत संपादक-पत्रकाराचं आयुष्य असतं.
हिंदुत्वाचं अधिष्ठान असलेलं आणि समरसतेचा आत्मा असलेलं त्यांचं लेखन हे या विचारसरणीच्या पत्रकारितेसाठी दिलेलं अमूल्य योगदान तर आहेच, तसाच विवेक परिवारासाठी तो किंमती ॲसेट आहे. आणि त्याचा आम्हांला सानंद अभिमान आहे.
 
साप्ताहिक विवेक आणि रमेशजी पतंगे हा अद्वैत समास आहे. त्याची रुजवात ८०च्या दशकात झाली आणि सरणाऱ्या वर्षांबरोबर हे नातं अधिकाधिक दृढ होत गेलं. त्यांच्याशिवाय विवेकचा विचार करणंही शक्य नव्हतं. म्हणूनच संपादकपदाची प्रदीर्घ कारकिर्द संपल्यानंतर, त्यांच्यावर हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे - विवेकच्या मातृसंस्थेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली, जी त्यांनी आनंदाने स्वीकारली. आज ते समाजात विवेक समूहाची प्रतिमा आहेत ते, त्यांच्या या सर्व प्रकारच्या योगदानामुळेच.

'राष्ट्र प्रथम' हा विचार जगणाऱ्या रमेशजींच्या आयुष्यात संघाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संघाचा आदेश म्हणून विवेकशी संपादक या नात्याने जोडले गेलेले रमेशजी त्यांच्या बालवयापासून संघ स्वयंसेवक या नात्याने विवेकचे वाचक होते. ज्या नियतकालिकाने त्यांच्या विचारांचं भरणपोषण केलं, त्याच नियतकालिकाचं वैचारिक नेतृत्व नियतीने त्यांच्या हाती सोपवलं, हा एक विलक्षण आणि शुभयोग होता. पत्रकारितेची पार्श्वभूमी नसली तरी राष्ट्रीय विचारांची ठाम बैठक आणि वाचकांना नेमकं काय द्यायचं आहे याची सुस्पष्ट जाणीव, हे त्यांचं सुरुवातीच्या काळातलं वैशिष्ट्य. त्याला अनेक पैलू पडत गेले.
 
समाजाच्या प्रबोधनाचं प्रभावी माध्यम म्हणून विवेकला काम करायचं आहेच, पण आजच्या परिभाषेत बोलायचं तर, हा एक यशस्वी व्यवसायही करून दाखवायचा आहे, याचं भान त्यांच्या मनात सदैव जागृत असतं. त्याची प्रचिती त्यांच्याबरोबर काम करताना नेहमीच येते.


त्यांचं वाचन शब्दशः अफाट आहे. पुस्तकाची हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी आणि आजच्या काळातलं किंडल ही त्यांची साधनं. वैचारिक, गंभीर प्रकृतीचं वाचण्याकडे त्यांचा स्वाभाविक कल असला, तरी त्याला भाषेचं बंधन नाही. मराठी, हिंदी, इंग्लिश सर्व भाषांमधलं दर्जेदार वैचारिक साहित्य त्यांनी वाचलेलं आहे. त्यावर चिंतन करून, त्याची नव्याने मांडणी करणं यात त्यांचा हातखंडा. एखादा वळेसर गुंफावा तशी एकमेकांमध्ये कुशलतेने गुंफलेली छोटी छोटी वाक्यं, मांडणी वैचारिक असली तरी सोप्या व नेमक्या शब्दांची निवड या वैशिष्ट्यांमुळे सर्वसामान्य वाचकही त्यांच्या लेखनाकडे आकृष्ट होतात. वरवर साध्या दिसणाऱ्या त्या मांडणीत किती गहन आशय सामावला आहे, याची जाणीव त्या वाचकाला लेखनाच्या शेवटी झाल्याशिवाय राहत नाही.

माझ्या आठवणीत सुरुवातीचा काही काळ सोडला, तर रमेशजींनी लेखन केलं ते लेखनिकांच्या मदतीने. विवेकमधल्या आम्हां सर्वांना त्यांचा लेखनिक होण्याची केव्हा ना केव्हा संधी मिळाली आहे. आणि त्यातून खूप शिकायलाही मिळालं आहे. अतिशय ओघवतं, विषयाला धरून एका सुरात सलग काही तास डिक्टेशन देणं, त्यात एकही शब्द जास्त नाही की कमी नाही. अशा वेळी त्यांची लागलेली तंद्री, विषयाशी झालेली एकाग्रता ही अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यांची सहकारी म्हणून आणि आमची कार्यालयातली बसण्याची व्यवस्था एका खोलीतच असल्याने मी हे अनेक वर्षं अनुभवत असते आणि दर वेळी नव्याने थक्क होत असते. विषय राजकीय असो, सामाजिक असो वा निखळ वैचारिक वा एखाद्या जुन्याच कथेतून आजच्या काळाशी सुसंगत असं नवं तत्त्वज्ञान मांडणं असो... हे सगळं साध्या भाषेतून व्यक्त करणं त्यांना लीलया जमतं, कारण त्यामागे असलेली प्रदीर्घ साधना.
ही साधना करण्यासाठी त्यांना एकांतवासाची गरज नसते, चिंतनविषयाशी तादात्म्य पावलेलं मन असेल आणि आवश्यक तो अभ्यास, लेखनाचा आराखडा मनात तयार असेल तर लोकांतातही लेखनकार्य पुरेशा एकाग्रतेने विना अडथळा करता येतं, याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. आजच्या लॉकडाउनच्या काळातही ते मोबाइलवरून लेखाचं सलग डिक्टेशन देऊ शकतात. पुस्तकासाठी नवनव्या विषयांची जुळणी मनात आणि प्रत्यक्षही सुरूच असते. कोरोनासारखा जगाला वेढणारा अडथळाही आपलं काम थांबवू शकत नाही, हे ते प्रत्यक्ष कृतीतून आमच्यापर्यंत पोहोचवत असतात.

आमचं सानपाडा येथील कार्यालय बाराव्या मजल्यावर आहे. वीज गायब झाली की लिफ्ट बंद पडते आणि कार्यालयापर्यंत पोहोचणं मुश्कील होतं. तळमजल्यावर वाट बघत बसणं हाच एक पर्याय असतो. काही वर्षांपूर्वी सकाळी कार्यालय सुरू होण्याच्या वेळेतच वीज गेली, लिफ्ट बंद पडली. लवकर सुरू होण्याची चिन्हं दिसेनात. रमेशजी आणि विवेकमधील काही कर्मचारी तळमजल्यावर थांबले होते. पंधरा-वीस मिनिटं वाट पाहण्यात गेल्यावर काही न बोलता रमेशजींनी जिन्याने वर जायला सुरुवात केली. ते पाहून बाकी सर्व जण निमूटपणे त्यांच्यामागून जिना चढू लागले...

नवनव्या विषयांचा अभ्यास करणं, लेखनातून हे विषय वाचकांपर्यंत पोहोचवणं चालू असतंच, त्याचबरोबर कोणताही पूर्वग्रह न बाळगता विविध विषयांवरची पुस्तकं वाचणं, त्या लेखकाच्या विचाराशी दिशा आणि त्यामागची भूमिका समजून घेणं... आपल्या लेखनातून तो विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, हेही सातत्याने चालू असतं.

भारतीय राज्यघटनेचा अभ्यास हा अलीकडल्या काळातला त्यांचा ध्यासविषय. ध्यास किती पराकोटीचा असू शकतो आणि त्याच्या पूर्तीमध्ये वयाचा अडथळा कसा होऊ शकत नाही, हे आम्ही डोळ्याने पाहत आहोत. थक्क होत आहोत. भारतीय संविधानाशी निगडित शेकडो पुस्तकं, संसदेतली भाषणं तर त्यांनी वाचलीच आहेत, त्याचबरोबर अन्य देशांच्या घटनांशी तुलनात्मक अभ्यास चालूच आहे. दोन वर्षांत फक्त याच विषयावरची किती पुस्तकं विकत घेतली गेली याला गणतीच नाही. सर्वसामान्यांना भारतीय संविधानाची माहिती व महती सांगणारं पुस्तक लिहून झाल्यावर त्यांना वाटलं की याची रुजवण तर शालेय स्तरावरच व्हायला हवी. मग लगेचच लहान मुलांसाठी संविधानावरचं पुस्तक तयार झालं. संविधानकेंद्री आणखीही काही पुस्तकांचे विषय डोक्यात आहेतच.

एखाद्या विचारसरणीचा, मांडणीचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावणं, ससंदर्भ त्यातली त्रुटी दाखवणं वा त्याची महानता मांडणं... हे सगळंच ते सहजतेने करत आले आहेत. गांधी, आंबेडकर, नेहरू वा सावरकर यातल्या कोणत्याही व्यक्तीची वैचारिक मांडणी ते आत्मीयतेने समजून घेतात. त्यांना कोणाचंच वावडं नाही. त्यातलं जे काही विशेष उल्लेखनीय वाटेल, ते मोकळेपणाने मांडतानाही समाजातल्या त्यांच्या विशिष्ट प्रतिमेची त्यांना भीड पडत नाही, हे विशेष! हे लेखनधाडस अभ्यासण्याजोगं आणि अनुकरणीयही.
 

seva_1  H x W:  

वरकरणी अतिशय गंभीर प्रकृतीचे भासणारे आणि अनेक बाबतीत तसेच असणारे रमेशजी उत्तम आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचे चाहते आहेत. केवळ मुंबईतलीच नव्हेत, तर अनेक गावांमधली विशिष्ट खाद्यपदार्थ मिळणारी उत्तम ठिकाणं त्यांना माहीत असतात. आणि त्यांना शक्य होईल तेव्हा ते हा खाऊ आम्हां सर्वांच्या हातावर ठेवण्यासाठी आवर्जून घेऊन येतात. दर वर्षी आंब्याचा मोसम सुरू झाला हे आम्हांला विवेकमध्ये समजतं ते त्यांच्यामुळेच. मग आठवड्यातून एक-दोनदा तरी प्रत्येकाच्या डिशमध्ये एक तरी आंब्याची फोड येते. हा आम्रमहोत्सव मुंबईतली आंब्याची व्हरायटी संपेपर्यंत चालू असतो. एक तीळ सात जणांमध्ये वाटून कसा घ्यावा याचं सदैव अनुभवायला मिळणारं हे उदाहरण.

विवेकच्या घडणीत, विकासात व वाढीत त्यांचं आणि विवेक समूहाचे प्रबंध संपादक असलेले दिलीपजी करंबेळकर यांचं अमूल्य योगदान आहे. 'फाइन ट्यूनिंग'चं ते एक आवर्जून सांगण्यासारखं उदाहरण. त्या दोघांमध्ये विवेकच्या जबाबदारीची झालेली अलिखित वाटणी आणि न बोलताही दोघांकडून राखला जाणारा एकमेकांचा मान, आम्ही याचे साक्षी आहोत. त्यांच्यातलं नातं हे विवेकच्या यशाचा मूलाधार आहे.

बदलणाऱ्या काळाची स्पंदनं टिपताना, त्याचा मोकळेपणे स्वीकार करताना आणि त्यानुसार आपल्यात बदल करताना द्विधा मनःस्थिती होण्याचं कारणच नाही. हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, त्यातून पत्रकारितेला वेगळं काढता येणार नाही हे त्यांचं सांगणं असतं. म्हणूनच त्यांच्या प्रवासात नवीन विषय हाती लागला तर तो आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. त्यावर काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. संघविचारांची कास न सोडताही विवेक सर्व वाचकांचा होऊ शकतो, त्या सर्वांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा विचार करा... विषय आपोआप सापडतील, हे त्यांचं सांगणं आमच्यातल्या पत्रकाराला दिशा देत राहतं.

वयाची सत्तरी ओलांडल्यावर, केंद्रीय परिनिरीक्षण मंडळावर - फिल्म सेन्सॉर बोर्डावर सन्माननीय सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आमच्यासह अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा त्यांचा प्रांत नव्हे असंही मनात आलं. त्यांनी ही संधी नाकारली तर नाहीच, उलट आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेने त्या कामावरही आपली छाप पाडली. अतिशय मोकळ्या मनाचा आस्वादक, परीक्षक म्हणून त्या क्षेत्रात आदराचं स्थान निर्माण केलं.
 

seva_1  H x W:  

विशिष्ट विचारधारेच्या नियतकालिकाशी आयुष्यभर जोडलेलं असणं हे सतीचं वाणच असतं. ते त्यांनी यशस्वीपणे निभावलं ते समजूतदार पत्नीच्या साथीमुळे. तिन्ही मुलींना आपल्या वडिलांच्या थोरवीची जाण आहे. सामाजिक जीवनातली व्यग्रता आणि कुटुंबवत्सल पिता यातला समतोल साधणंही त्यांना लीलया जमलं आहे.
(त्यांच्याबरोबर इतके वर्षं काम करताना त्यांची पितृवत माया आम्ही सर्वजणींनीही अनुभवली आहे. त्यांच्या डब्यात काकूंनी काही विशेष पदार्थ असेल तर थोडासा स्वतःसाठी काढून घेऊन बाकीचा आम्हा महिलावर्गाला पाठवणं हे तर अनेकदा होतं. त्याहूनही विशेष जपून ठेवलेला प्रसंग म्हणजे, 2 वर्षांपूर्वी जेव्हा मला विवेकची कार्यकारी संपादक म्हणून 'कै. मधुकरराव महाजन स्मृती पुरस्कार मिळाला तेव्हा आवर्जून हजर राहिले तो. रविवारचा सुट्टीचा दिवस होता. ते प्रवासात नसले तरच विश्रांती मिळण्याचा दिवस. अशा वेळी, भर दुपारी मुलुंड ते विलेपार्ले प्रवास करून ते पुरस्कार सोहळ्याला आले. पूर्ण वेळ थांबले. मी हात जोडून नमस्कार केल्यावर, "मी आलो नसतो तर तुला वाईट वाटलं असतं," इतकं एकच वाक्य बोलले. पण त्यामागचा त्यांचा वत्सल भाव माझे डोळे भिजवून गेला.)

आज वयाची पंचाहत्तरी पार करतानाही त्यांच्या मनात उदंड योजना आहेत, त्यासाठी लागणारी ऊर्जा आणि उत्साहही. या अमृतवेलीची छाया विवेकच्या बृहद् परिवारावर सदैव राहावी, परमेश्वराने त्यांना निरोगी दीर्घायुष्य बहाल करावं ही आजच्या शुभदिनी प्रार्थना.

....लेखनविषय मनात भिजत ठेवायचा असतो, त्याचं चिंतन आतल्या आत चालू ठेवायचं असतं, मन-बुद्धीने हिरवा कंदील दिला की प्रत्यक्ष लेखन सुरू करायचं हा त्यांनी आचरणातून सिद्ध केलेला मंत्र. आज त्यांच्याविषयी एकटाकी लिहिताना हे लक्षात आलं की, त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचं चिंतन आपल्या मनात चालूच होतं. म्हणूनच ते विनासायास शब्दांत प्रकट झालं....

- अश्विनी मयेकर