@डॉ. रमा गर्गे
सॉक्रेटिस खरोखर केवळ बुद्धिप्रामाण्यवादी होता का, जसे आज सांगितले जाते!! यावर पुन्हा एकदा विचार व्हायला पाहिजे. चिंतन व्हायला पाहिजे. कारण त्याचे विचार जीवनाच्या समग्रतेला कवेत घेऊ पाहणारे आहेत, असे त्याचे संवाद वाचताना अनेकदा लक्षात येत जाते. भारतीय प्रतिभेने नयसिद्धान्त, द्रष्टा-दृश्य तत्त्व, प्रतित्यसमुत्पाद यामध्ये सांगितलेले विविधतेतील एकतेचे, जीवनाच्या समग्रतेचे (नॉनफ्रॅंगमेंटेबल) असे तत्त्व सांगितले आहे, तेच साध्या शब्दांमध्ये सॉक्रेटिसदेखील सांगू इच्छितो.

सॉक्रेटिस हे नाव लहानपणापासून आपल्या कानांवर पडलेले असते. शाळेमध्ये एखाद्या वक्त्याच्या भाषणातून, तर कधी एखाद्या पुस्तकातून आपण त्याच्याविषयी माहिती घेत असतो. 'सॉक्रेटिस माणूस आहे - माणूस मर्त्य आहे - म्हणून सॉक्रेटिस मर्त्य आहे' अशी कार्यकारणभावाची वाक्ये, 'ज्ञान हा आत्म्याचा सद्गुण आहे' किंवा 'सॉक्रेटिस सर्वात शहाणा आहे, कारण 'आपल्याला पूर्ण ज्ञान नाही' याचे त्याला ज्ञान आहे' यासारखी सुभाषितवजा वाक्ये आपण ऐकत असतो. इतिहासाचे शिक्षक जगज्जेता सिकंदरची गोष्ट सांगताना म्हणतात, "जगातील महान गुरुशिष्यपरंपरा म्हणजे सॉक्रेटिस, प्लेटो, ऍरिस्टॉटल आणि अलेक्झांडर.'
पुढे कधीतरी आपण "अरे, किती वेळ विष तयार करायला? द्या मला ते लवकर." असे म्हणत धैर्याने विषप्राशन करणारा सॉक्रेटिस जाणून घेतो. ओशोंच्या प्रवचनात हिंदी भाषेत सॉक्रेटिसचे 'सुकरात' होते. डॉ. श्रीराम लागूंनी सादर केलेला नाट्यप्रयोग 'सूर्य पाहिलेला माणूस' बघितला की प्लेटोने आपल्या गुरूंच्या अंतिम क्षणांना किती हद्य स्वरूप दिले आहे ते लक्षात येते. अशा प्रकारे हा सॉक्रेटिस आपल्याला भेटत राहतो.
येशू ख्रिस्ताच्या सुमारे ५०० वर्षे आधी हा ग्रीक तत्त्वज्ञ जन्माला आला. त्याचा कालखंड त्याने खूप गाजवला. परंतु नंतरच्या काळात त्याचे विचार, तत्त्वज्ञान बासनात पडून राहिले.
इसवीसनाच्या १३ ते १६व्या शतकाच्या दरम्यान - ज्याला रेनेसॉन्स पिरियड, म्हणजे पुनरुज्जीवनाचा काळ म्हणतात, त्या काळात पश्चिमेकडे मूलभूत परिवर्तने घडून आली. प्रचलित धर्ममतांना धक्के देत नव्याने मते प्रस्थापित होऊ लागली. कोपर्निकस, गॅलिलिओ, मार्टिन ल्यूथर किंग, देकार्ते यांनी घडवलेले हे युग. याच दरम्यान प्लेटोने लिहून ठेवलेले सॉक्रेटिसचे इसवीसनापूर्वीचे 'डायलॉग्ज', झेनोफेनने लिहिलेले 'मेमोराबिलिया' इंद्रायणीतून गाथा वर यावी तसे वर आले आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाच्या मांडणीत 'बुद्धिप्रामाण्यवादी, शास्त्रशुद्ध दृष्टीकोन' देणारा पहिला तत्त्वज्ञ म्हणून १८व्या शतकाच्या उत्तरार्धात सॉक्रेटिसला मान्यता देण्यात आली.
अथेन्सच्या नगरराज्यात इसवीसनपूर्व ४७०मध्ये फिनारेती व सोक्रोनिस्कस यांच्या पोटी सॉक्रेटिसचा जन्म झाला. बुटका, फारसा देखणा नसलेला चेहरामोहरा, पण डोळ्यांत करुणा आणि तेज यांचा अद्भुत संगम असा सॉक्रेटिस!! त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र असल्याप्रमाणे मित्रमंडळी ओढली जात असत. हा माणूस दैवी संकेत घेऊन पृथ्वीवर अवतरित झालेला आहे, याची त्याच्या मित्रमंडळाला खात्री होती.
अथेन्सचे नगगरराज्य हे प्रस्थापित आणि अभिमानास्पद परंपरांचे केंद्र होते. धार्मिक विधी, यात्रा, विशिष्ट पद्धतीने होणारे उत्सवांचे आयोजन, धर्मपंडितांनी रुजवलेल्या प्रतीकांचा, मिथकांचा अभिमान बाळगणे आणि तेच अंतिम सत्य मानून जगणे. राज्याच्या गरजेनुसार युद्धात भाग घेणे, शौर्याच्या खुणा अंगावर मिरवणे याचे तरुणाईला आकर्षण होते.
या निःशंक समाजजीवनात एक अवलिया वादळ घेऊन आला. चौकात, बाजारात, ओट्यावर जिथे म्हणून तरुणवर्ग असेल, तेथे हा साधा, फाटका दिसणारा माणूस जाऊ लागला. "मला काहीही माहीत नाही, मला जरा समजावून सांगणार का?" अशी सुरुवात करून तो प्रश्न विचारू लागला!!
एखाद्या तरुणाला तो विचारत असे, ''शौर्य म्हणजे नक्की काय?" त्याने उत्तर दिले की त्यावर पुन्हा सॉक्रेटिस नवा प्रश्न विचारत असे. या पद्धतीने प्रश्नोत्तरे झाली की तरुणांच्या लक्षात येत होते, आपण स्वतः कशावरही चिंतन केलेले नाही. आपल्या वडीलधाऱ्यांनी जे आपल्याला सांगितले, त्यालाच आपण नीती, जीवनमूल्ये मानून बसलो आहोत. आपले व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन यातल्या आचरणात खूप तफावत आहे. थोडक्यात, आपण आपले जगणे विचारांनी तपासून जगत नाही आहोत, तर आपल्याला जे सांगण्यात आले त्याला तथ्य मानून जगत आहोत.

सॉक्रेटिस कुठेही नीतिमत्तेला धक्का लावत नव्हता. ज्ञान आणि नीती यांची सांगड असणे त्याला अपेक्षित होते. तत्त्वे, मूल्ये, निष्ठा या तपासून घेतल्या पाहिजेत. त्यावर असलेला विश्वास हा कुणीतरी सांगितले म्हणून नाही, तर आपल्याला आतून माहीत आहे म्हणून असावा! आपल्याकडे आयुर्वेदामध्ये 'प्रज्ञापराध' ही संकल्पना आहे. सॉक्रेटिस या संकल्पनेच्या जवळ जाणारे विचार मांडतो, असे त्याचे संवाद वाचताना लक्षात येते. आंतरिक वास्तविकतेला डावलून जेव्हा भ्रमित मेंदूकडून निराळा निर्णय घेतला जातो, तेव्हा प्रज्ञापराध घडतो. या विसंगतीमुळे मनुष्य गतानुगतिक आणि दुराग्रही होत जातो.
सॉक्रेटिसची चिंतनाची दिशा पाहिली की एका जुन्या संस्कृत सुभाषिताचा प्रत्यय येतो -
दृष्टीपूतं न्यसेत् पादं।
वस्त्रपूतं पिबेत् जलम्।
सत्यपूतां वदेत् वाचं।
मन:पूतं समाचरेत।
पूतं म्हणजे पवित्र केलेले, धुतलेले. आपले सगळेच आचरण सजगतेने धुऊन घेतलेले असले पाहिजे. पाऊल टाकले जाते, तेव्हा दृष्टीने सजग असावे, पाणी पिताना वस्त्रगाळ असावे, वाणीचा वापर सत्याने आचरण मनाने सजग राहून व्हावे.
सॉक्रेटिस म्हणतो की आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान हे ज्ञान नसते, कारण आपल्या अंतरात्म्याने त्यावर चिंतन केलेले नसते. आपल्यातच असलेल्या ज्ञानी व अज्ञानी भागाचा आपण संवाद घडवून आणला पाहिजे.
असा हा तरुणांना बिघडवणारा, नगरराज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडवून देणारा, चुकीच्या दिशा देणारा, जुन्या दैवतांवर प्रश्नचिन्ह उभे करणारा, राज्यनिष्ठा, लोकशाही मूल्ये यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारा, ईश्वरविषयक नवीन कल्पना मांडून प्रचलित धर्ममतांचा आणि मिथकांचा अनादर करणारा आणि मुख्य म्हणजे 'का? कसे? कशामुळे?' असे प्रश्न विचारणारा हा माणूस राजसत्तेला त्रासाचा ठरू लागला. एनिट्स आणि मिलिट्स या दोघा अधिकाऱ्यांनी त्याला नगरराज्याचा शत्रू म्हणून घोषित केले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालवला गेला. त्यामध्ये अथेन्सच्या ज्यूरींनी त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली.
सॉक्रेटिस तुरुंगात गेल्यावर, मित्रांनी त्याला पळून जाण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे योजनादेखील आखली. तो सहज पळून जाऊन दुसरीकडे दुसऱ्या राज्यात आश्रय घेऊ शकत होता. आपला जीव वाचवू शकत होता. परंतु "न्याय आणि नीती हे अविभाज्य घटक आहेत, ज्या नगरराज्यात मी राहतो तेथील नियम पाळणे ही नीती आहे आणि याचे ज्ञान मला आहे, त्यामुळे मी ते कसे चुकीचे आहे हे एक वेळ तिथेच उभे राहून सांगेन, परंतु पळून जाऊन येथील कायद्याचा अपमान माझ्याकडून कदापि होणार नाही" असे स्वच्छपणे सांगून सॉक्रेटिसने विषाचा प्याला ओठांना लावला. सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर प्लेटो, झेनोफेन या समकालीन मंडळींनी त्याची वचने, संवाद, विचार नीटपणे लिहून ठेवले.
सॉक्रेटिस खरोखर केवळ बुद्धिप्रामाण्यवादी होता का, जसे आज सांगितले जाते!! यावर पुन्हा एकदा विचार व्हायला पाहिजे. चिंतन व्हायला पाहिजे. कारण त्याचे विचार जीवनाच्या समग्रतेला कवेत घेऊ पाहणारे आहेत, असे त्याचे संवाद वाचताना अनेकदा लक्षात येत जाते. भारतीय प्रतिभेने नयसिद्धान्त, द्रष्टा-दृश्य तत्त्व, प्रतित्यसमुत्पाद यामध्ये सांगितलेले विविधतेतील एकतेचे, जीवनाच्या समग्रतेचे (नॉनफ्रॅंगमेंटेबल) असे तत्त्व सांगितले आहे, तेच साध्या शब्दांमध्ये सॉक्रेटिसदेखील सांगू इच्छितो. हे जर सिद्ध झाले, तर आज सॉक्रेटिस ज्या बंडखोर वृत्तीचा उगम असल्याचे उपयुक्ततावाद्यांनी एकेकाळी सर्व जगावर ठसवले, तसे न राहता सॉक्रेटिस हा पाश्चिमात्य अध्यात्माच्या समग्र प्रणालीचा उद्गाता ठरू शकतो. डावीकडून उजवीकडे येऊ शकतो.