यंदा २२ ऑगस्ट २०२०पासून श्रीगणेशाची स्थापना होणार असून महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशभराला ललामभूत असणारा गणेशोत्सव सुरू होत आहे. १ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला श्रीगणेशाचे विसर्जन होणार आहे. दहा दिवसांचा हा मंगलमय सोहळा दर वर्षी अतिशय दणक्यात साजरा होतो, पण यंदा मात्र यावर कोविड-१९चे - कोरोनाचे सावट आलेले आहे.
पुणे, मुंबई या भागाच्या तुलनेत विचार करता वैदर्भीय भागात हे प्रमाण जरा कमीच असते. या वर्षी तर अनेक गणेशोत्सव मंडळांनी फक्त श्रीगणेशस्थापना व विसर्जन हाच कार्यक्रम निश्चित केलेला आहे. या गणेशाची स्थापना होण्यापूर्वी नागपूरला मारबत नावाचा सोहळा १०० वर्षांहून अधिक काळ होत आहे. पोळ्याच्या दुसर्या दिवशी - म्हणजे तान्हा पोळ्याला ही मारबत निघते. काळी व पिवळी मारबत आणि अनेक बडगे या माध्यमातून काहीशा शिवराळपणाने हा उत्सव साजरा होतो. अनेक सामाजिक कुप्रथा व परंपरा यावर टपोरी पद्धतीने घणाघाती टीका होत असते. या मारबतीला किमान ४-५ लाख लोकांची हजेरी लागत असते. पण या वर्षी ते रूप बदलले आहे. मारबत कशी निघते ते तान्ह्या पोळ्याला दिसेलच. याच दिवशी विदर्भ-मध्य प्रदेश या सीमारेषेवरील पांढुर्णी या गावात असाच एक खास वैदर्भीय कार्यक्रम होतो. पांढुर्णी गावातून जाम नदी वाहत जाते. त्यामुळे या गावाची दोन उपगावे झालेली आहेत. एक पांढुर्णी व दुसरे सावरगाव. तान्ह्या पोळ्याला या नदीत पळसाचा झेंडा मध्यभागी लावला जातो. ती शौर्यकथा मानली जाते. कोणत्या गावातील तरुण ध्वज मिळवितात यावरून शौर्यात कोणते गाव सरस हे ठरते. दोन्ही बाजूचे लोक नदीतील गोटे (दगड) एकमेकांवर भिरकावत असतात. जो दगड लागून जखमी होईल, तो देवीच्या देवळात जाऊन रक्षा लावतो व पुन्हा गोटमारीत सहभागी होतो. गोटमारीत जखमी झालेल्यांची संख्या हजाराच्या घरात जाते. पण एक-दोन अपवाद वगळता गेल्या ५०-६० वर्षांत कुणीही मृत्युमुखी पडलेले नाही. ही गोटमार बघायला लाख-दीड लाख लोक जमतात. या वर्षी त्यांनीही गोटमारीचे रूप मर्यादित केले आहे. प्रत्यक्षात काय होते ते बघायला आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे तान्ह्या पोळ्याची.नंतर श्रीगणेशाचे आगमन होते. नागपुरातील संती गणेश मंडळ जवळजवळ ६३ वर्षांपूर्वी स्थापन झाले. नेमके सांगायचे तर १९५८ला. लोकमान्यांना अभिप्रेत असलेल्या माध्यमाने हा संती गणेशोत्सव होत असतो. दर वर्षी विविध ठिकाणी असलेल्या मंदिराच्या भव्य प्रतिकृतीसाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. गणपती येताना वा बोळवण होताना फटाके फोडले जात नाहीत. डीजेवर आचरटविचरट गाणी लावून नृत्य होत नाही. पोशाखांचीही या मंडळाची शिस्त आहे.या मंडळाचे संजय चिंचोळे या वर्षी कोविडमधील गणपती उत्सवासंबंधी बोलताना म्हणाले, "यंदाचे वर्ष वैशिष्ट्यपूर्ण आहे. या वर्षी जसा कोविड आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाचे व ऐतिहासिक कारण आहे, ते म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या महाप्रयाणाला १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आम्ही लोकमान्य व सार्वजनिक गणेशोत्सव या विषयावर विद्यार्थी व नागरिक यांच्याकडून ५-९ मिनिटांचे व्हिडिओ मागविले आहेत. ख्यातकीर्त ज्युरी मंडळ या सर्व व्हिडिओंचे मूल्यमापन करणार आहे. त्यानंतर आम्ही विजेत्यांना विशेष पुरस्कार देणार आहोत. या निमित्ताने लोकमान्य टिळक, त्यांची सामाजिक व राजकीय दृष्टी यावर चर्चा व्हावी, अभ्यास केला जावा हा त्यामागील मुख्य हेतू आहे.मंदिराच्या प्रतिकृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या आमच्या मंडळाच्या श्रीगणेशाचा मोठ्या प्रमाणावर भक्त भेट देतात. आम्ही यंदा हे सगळे टाळले आहे. २-३ महिन्यांपूर्वीच आम्ही नागपूरच्या जिल्हाधिकार्यांना भेटलो होतो व श्रीगणेशाची मूर्ती 4 फुटाहून लहान असेल हे सांगितले होते. ४ फुटापेक्षा गणपती मूर्ती असली की ४-५ व्यक्ती ती मूर्ती आणू शकतात, स्थापना करू शकतात आणि विसर्जनदेखील करू शकतात. ४ फुटापेक्षा मोठी मूर्ती असली की ती हाताळायला ४०-५० माणसे लागतात. घरगुती मूर्तीही आमच्या परिसरात २ फुटांपेक्षा लहान राहतील. दर वर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. आम्ही त्यांना यंदा आभासी दर्शन घडविणार आहोत.

कोरोनाच्या काळात आमच्या मंडळाने गरीब कुटुंबांना अन्नधान्याच्या व औषधांच्या किट्सचे मोठ्या प्रमाणात वाटप केले होते. या वर्षी मंडळाला वर्गणी कमी मिळत आहे, प्रायोजकही मिळत नाहीत, तर गणेशोत्सवातील पैसे वाचवून आम्ही ज्येष्ठ नागरिकांना व होतकरू विद्यार्थ्यांना यंदा मदत देणार आहोत. यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या अनेक घरांतून पैशांची चणचण जाणवत आहे. उद्योग बंद पडले आहेत, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशात गुणवंतांना अभ्यास वंचित राहावे लागू नये, म्हणून आम्ही शिष्यवृत्ती देणार आहोत. शाळा, शिकवणी वर्गातील प्रवेश यासाठी मदत करणार आहोत.सामान्यत: लोकांनी प्रत्यक्ष श्रींच्या दर्शनास येऊ नये असा प्रयास राहणार असला, तरी काही प्रमाणात लोक येतीलच. त्यांच्यात सोशल डिस्टसिंग व्हावे, त्यांनी सॅनिटायझेशन करावे, मास्क वापरावे अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. कोरोनाला पराभूत करावे हा हेतू क्षणभरासाठीही नजरेआड होणार नाही." संजय चिंचोळे पुढे म्हणाले की, "या वर्षी आम्ही घरगुती गणेशमूर्तीच्या सजावटीची स्पर्धा घेणार आहोत. घरात उपलब्ध साधनसामग्रीतून सजावट करावी असा आम्ही आग्रह धरणार आहोत. त्यांनी फोटो, व्हिडिओ पाठवावे. आम्ही त्याचे परीक्षण करून गुणवंतांना पुरस्कृत करणार आहोत."नागपूर शहरात आणखी एक महत्त्वाचा गणपती आहे तो गुलाब पुरी यांचा. गुलाब पुरी यांच्या गणपतीचे आगळेपण यात आहे की, दर वर्षी एखाद्या जिवंत प्रश्नावर, सामाजिक प्रश्नावर ते देखावा तयार करतात व त्यातून सरकार, प्रशासन यावर कठोर टीका असते. देखावा पूर्ण झाला की, जास्तीत जास्त एखाद तास तो राहतो व पोलीस येऊन जप्त करून जातात. जवळजवळ ५० वर्षांपैकी चाळिसेक वर्षांच्या मूर्ती, देखावे पाचपावली पोलीस ठाण्यात विसर्जनाची वाट बघत आहेत. २००५ साली मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत दिलासा दिला - न्या. जे.एन. पटेल यांनी निकाल दिला की तक्रार आली तरच जप्तीची कारवाई करण्यात यावी, पोलिसांना तक्रारीविना कारवाई करण्यास मज्जाव करण्यात आला. गेल्या ६१ वर्षांतील त्यांच्या दोन मनोकामना पूर्ण झाल्या आहेत - घटनेचे ३७० कलम रद्द झाले व श्रीराममंदिर उभारणी सुरू झाली. गुलाब पुरी आता या जगात नाही, पण मागील ५ वर्षांपासून त्यांचे पुत्र या गणपतीचे सामाजिक उद्बोधनाचे दायित्व स्वीकारत आहेत. आतापर्यंत गुलाब पुरींवर खटले सुरू होते. आता त्यांच्या पुत्रावर खटले सुरू आहेत. ते म्हणाले, "यंदा कोविडचा प्रभाव सर्वत्र आहे व माझीही प्रकृती ठीक नाही. त्यामुळे दर वर्षीप्रमाणे मोठा ‘शो’ होईल की नाही हे सांगता येत नाही, पण आमचा गणपती सरकारला बोचणार नाही, टोचणार नाही असे होणार नाही. शेवटच्या दिवशीपर्यंत सरकार आमचा गणपती जप्त करतीलच. मात्र त्यात आभासी वगैरे काही राहणार नाही."
याशिवाय सीताबर्डीवरील राजाराम वाचनालय दर वर्षी विचारप्रबोधनची पंरपरा सुरू ठेवणार आहे, पण दर वर्षीसारखा उत्साह यात नाही. तर वाशिममधील राष्ट्रीय गणेशोत्स्व मंडळदेखील ऐतिहासिक मंडळ. या मंडळाचा गणपती एका चित्रपटगृहात दर वर्षी बसतो. श्रीगणेशाच्या दहा दिवसांत हे चित्रपटगृह दर वर्षी बंद राहते. त्या ठिकाणी व्याख्याने होतात. स्वत: लोकमान्य टिळक या गणपतीच्या प्रतिष्ठापनेला आले होते. या शतकातील जवळजवळ सर्व विद्वान, नामवंत व्यक्तींनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. यंदा मात्र फक्त श्रीगणेश स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सकाळ-संध्याकाळ आरती व अथर्वशीर्षपठण असे व एवढेच कार्यक्रम आयोजित आहे.अमरावतीला भाजपाचे प्रवक्ते व ज्येष्ठ पत्रकार शिवराय कुलकर्णी यांनी मातीचे गणपती घरोघर बसविण्याचा संकल्प केला आहे. मागील वर्षी १ लाख ६० हजार रुपयांची माती त्यांनी वितरित केली. त्या मातीतून जवळजवळ ६० कुंभार श्रीगणेशाच्या मूर्ती करतात. या कुंभारांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे बंद केले आहे. मागील वर्षी ६० हजार घरांसाठी मातीच्या मूर्ती बनविल्या गेल्या. या वर्षी कोविडमुळे शिवराय कुलकर्णी यांनी किमान १०-१२ वर्कशॉप गणेशमूर्ती बनविण्यासाठी घेतले आहेत.अमरावतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवांबाबत ते म्हणाले, "तारखेड येथील हरिश्चंद्र पाटील यांचा गणपती दर्शनीय असतो. या ठिकाणी गणपती वर्षभर दर्शनाला ठेवून नंतर विसर्जित केला जातो. दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी या अमरावतीमधील पुराणपुरुषांनी या गणपती मंडळांना भेटी दिल्या आहेत. पण यंदा हे गणेशोत्सव मंडळ फक्त ४ फुटी मूर्ती बनविणार आहे व दर्शनासाठी भाविकांना लिंक पाठविणार आहे. याशिवाय आझाद हिंद मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सोमेश्वर पुसदकर यांच्या अकस्मात निधनामुळे उत्सवाचा उत्साह एकदम थंड पडला आहे. आभासी गणपती जनमानसाला किती भावतो माहीत नाही. सध्या यवतमाळवरून वणीला व्यवसायानिमित्त गेलेले स्वानंद पुंड यांची प्रवचनेही त्यांनी लिंकवर उपलब्ध करून देत आभासी गणेशोत्सवाला हातभार लावला आहे.