२०२० हे वर्षं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहण्यासाठी ज्या अनेक घडामोडी समोर आल्या आहेत, त्यात कोरोना हे सर्वात मोठं, अगदी जागतिक स्तरावर हलकल्लोळ उडवून देणारं संकट तर आहेच, पण ते चालू असताना येणार म्हणता म्हणता येऊन गेलेली टोळधाड ही दुसरी मोठी घटना आणि त्याकडे असलेलं माध्यमांचं आणि म्हणून पर्यायाने लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवणारी ताजी घटना म्हणजे 'निसर्ग' चक्रीवादळ. पण या तीन महत्त्वाच्या घटनांमध्ये माध्यमांना आणि लोकांना, विशेषत: शहरांतील लोकांना त्यातल्या त्यात कमी महत्त्वाची वाटणारी घटना म्हणजे टोळधाड. कारण त्यांच्या रोजच्या जीवनशैलीवर त्याचा थेट परिणाम होत नाही, हा समज. होणारं पिकांचं नुकसान किती यावर गांभीर्याने विचार केला तर कदाचित टोळधाड आणि त्याचा परिणाम यावर सखोल चर्चा होऊ शकेल आणि तशी चर्चा झाली, तर यातून बाहेर पडायला प्रचलित उपायांपेक्षा काही वेगळे उपाय आहेत का, याचाही शोध सुरू होईल.
मुळात हो टोळधाड का येते? एवढे कीटक अचानक एकदम कसे जन्माला येतात आणि ते जिथे जातात, तिथे आपण काय काय उपाय करू शकतो, ज्यामुळे पिकांचं नुकसान कमी करणं किंवा टाळणं शक्य होईल? असे अनेक प्रश्न बहुसंख्य लोकांच्या मनात आहेत किंवा अनेकांच्या मनातही नाहीयेत. म्हणजेच, टोळधाड हा विषय म्हणजे अनेकांसाठी 'अज्ञानात सुख' या प्रकारात मोडणारा आहे.
टोळ हा नाकतोड्याच्या गटातील एक कीटक आहे. आपल्याकडे आलेली सध्याची टोळधाड ही टोळांच्या वाळवंटातील प्रजातींपैकी आहे. यांच्या तीन प्रजाती आहेत. त्यातील 'वाळवंटी टोळ' ही प्रजाती खूप अधाशी आणि खादाड आहे आणि त्यामुळे ती कमी वेळात जास्त नुकसान करते. रेताड जमिनीत मादी ५०-१०० अंडी घालते. जमिनीतील ओलावा आणि हवेतील उष्णता यानुसार २-४ आठवड्यांमध्ये पिल्लं अंड्यातून बाहेर येतात. पुढची किडीची अवस्था साधारण ४ आठवडे असते आणि यात टोळाच्या किडीला पंख फुटलेले नसतात. लहान टोळ ३-५ दिवसांच्या अंतराने ५ वेळा कात टाकतात. यादरम्यान त्यांच्यात शारीरिक बदल घडत राहतात आणि पंख फुटतात. सध्या आलेले हे टोळांचे थवे पूर्व आफ्रिकेतून पाकिस्तानमार्गे भारतात आले आहेत. ही जगातील सर्वात विध्वंसक स्थलांतरित होणारी कीड आहे. टोळांचा एक थवा एक किलोमीटरपर्यंतचा परिसर व्यापू शकतो आणि त्यात ७-८ कोटी कीटकही असू शकतात. आफ्रिका खंडातील इथिओपिया, सोमालिया, केनिया इत्यादी देशांमध्ये प्रचंड धुमाकूळ घालून, तिथल्या शेतीचं प्रचंड नुकसान करून ही टोळधाड सुदान, इराण या देशांमधून पाकिस्तानमार्गे भारतात आली आहे. आपल्याकडे राजस्थानमध्ये दाखल झालेले हे थवे त्यानंतर पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात आले आहेत.
टोळ नुकसान करतात म्हणजे काय करतात –
निसर्गात जे वारंवार बदल होतात, त्यामुळे अनेक संकटं समोर येतात. टोळधाड हे त्यापैकी एक. अनियमित आणि लांबलेला पावसाळा, वादळं इत्यादी टोळांच्या वाढीसाठी अनुकूल असणाऱ्या नैसर्गिक घटनांमुळे टोळांचं पुनरुत्पादन कित्येक पटींनी वाढतं. मग रस्त्यात मिळेल ते पीक संपवत ही धाड पुढे सरकते. टोळ हे शाकाहारी कीटक असल्याने बाकी जीवसृष्टीला त्यांच्यापासून थेट धोका नाही. पण पिकं संपवत असल्याने आणि तीही प्रचंड वेगाने, टोळधाड खूप नुकसान करते. कोट्यवधी कीटक थव्याने रस्त्यात मध्ये येणाऱ्या शेतांमधील सर्व पीक संपवून पुढे सरकतात. हे कीटक चपळ आणि अधाशी असतात. हिरवी पानं, फुलं, फळं, बिया, फांद्या, कोवळी पालवी इत्यादी गोष्टींचा फडशा पाडत हे थवे पुढे सरकत राहतात. संध्याकाळी त्याच झाडाझुडपांमध्ये वस्ती करतात. खूप दूरवर उडत जाण्याची क्षमता असल्याने टोळधाड पिकांसाठी, शेतीसाठी खूपच धोकादायक ठरते.
टोळ साधारणपणे त्याच्या वजनाएवढं अन्न रोज खातो. असा अंदाज आहे की एक चौरस किलोमीटर क्षेत्रात साधारण ३००० क्विंटल टोळ असतात. म्हणजेच, ते रोज त्या भागातील तेवढंच अन्न संपवू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ताशी १२-१६ किलोमीटर या वेगाने हे थवे अन्न आणि ओली रेताड जमीन यांच्या शोधात पुढे सरकत राहतात. उड्डाण करून लांबवर जाण्याची आणि अन्न संपवण्याची त्यांची क्षमता त्यांना जगातील सर्वात विध्वंसक स्थलांतर करणारा कीटक ठरवते.
आपल्याकडे ही टोळधाड मध्य प्रदेशमधून विदर्भात आली. नागपूरचे माझे वकील मित्र प्रतीक राजूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भंडारा, गोंदिया, नागपूर, इत्यादि जिल्ह्यांमध्ये, विशेषत: पूर्व आणि पश्चिम विदर्भाच्या सीमारेषेवर या टोळधाडीचा प्रादुर्भाव दिसून आला. यातही अनेक आश्चर्यकारक निरीक्षणं आहेत. एकतर हा शेतीचा मुख्य ऋतू नाही. खरीपाची सुरुवात होणार आहे आणि रबी पीक कापून झालंय. त्यामुळे टोळधाड फळबागांमध्ये जास्त प्रमाणात सक्रिय दिसली. विशेष म्हणजे, शेतात कापणी चालू असलेल्या भात पिकावर हल्ला न करता, शेजारी असलेल्या आंबा, जांभूळ, मोह, बोर, बाभूळ या झाडांच्या पानांवर आणि खोडावर हल्ला केलेला दिसला. त्यातही, आंब्याची पानं संपवली, पण फळांवर हल्ला केला नाही असंही दिसून आलं. अनेक भागांमध्ये संत्र्यांच्या बागांमध्ये मात्र टोळधाड आल्याने नुकसान झाल्याची बातमी आहे. त्यातच कोरोनामुळे जाहीर केलेल्या गृहबंदीमुळे शेतात कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आणि इतर कामांसाठी बंधनं आल्याने परिणामकारक उपाय वेळेत योजता आले नाहीत, असंही एक मत दिसतं.
सध्या टोळधाड परत मध्य प्रदेशात गेली आहे. त्यामुळे आत्ता तरी त्याचा थेट काही धोका दिसत नाही. पण आता गरज आहे ती सजगपणे काम करायची आणि टोळ आपल्या भागात अंडी घालत नाहीत ना, हे बघण्याची.. आणि तसं असेल तर त्यावर आत्ताच उपाय करून हे संकट ऐन भातपिकांच्या वेळी परत येणार नाही यासाठी खबरदारी घेण्याची.
सध्या टोळधाड नियंत्रणासाठी काय उपाय केले जातात –
साधारणपणे प्रतिहेक्टर १०,०००पेक्षा जास्त टोळ असतील किंवा प्रत्येक झुडपावर ५-६पेक्षा जास्त कीटक असतील, तर ते आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर करू शकतात असं म्हटलं जातं. त्यामुळे आर्थिक नुकसानाची पातळी लक्षात घेऊन त्यानुसार खाली सांगितल्याप्रमाणे काही उपाय केले जातात.
१. शेतात, बागेत विविध वाद्यं, स्पीकर्स यांचा वापर करून मोठा गोंगाट केला तर ही टोळधाड तिथे थांबणं टाळते असा अनुभव आहे
अनेक ठिकाणी कोरडा पालापाचोळा एकत्र करून तो जाळून, धूर करून टोळधाड लांब ठेवता येते.
२.अनेक ठिकाणी लोकांनी पेट्रोल जाळून, धूर करून टोळधाड पळवून लावली.
३. संध्याकाळी आणि रात्री टोळ ज्या झुडपांमध्ये वस्ती करतात, तिथे मशाली पेटवून किंवा धूर पसरवून आपण टोळधाड नियंत्रित करण्यात यश मिळवू शकतो.
४. जर थव्यांमध्ये पिल्लांची संख्या जास्त असेल, तर त्यांना एका वेळी फार लांब उडता येत नाही. त्या वेळी, या थव्याच्या मार्गामध्ये अंदाजे २ फूट रुंद आणि अडीच ते तीन फूट खोल चर खोदून ठेवावेत. म्हणजे या पिल्लांना पकडून नष्ट करता येतं आणि धाडीवर नियंत्रण मिळवता येतं.
५. कडुनिंबाचा अर्क, तेल आणि पाणी यांचा वापर करून कीटकनाशक तयार करून त्याची फवारणी करून यावर नियंत्रण मिळवता येतं.
६. याव्यतिरिक्त, रासायनिक कीटकनाशकांचा वापर करूनही या धाडीवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. पण ते योग्य आणि अनुभवी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणं आवश्यक आहे. अन्यथा, दूरगामी नुकसान होण्याची भीती निर्माण होते.
हे झाले प्रचलित उपाय. याव्यतिरिक्त अनेक जैविक उपाय (biological control) आहेत, जे जगात इतरत्र वापरले जातात अशी माहिती आहे. हे आपल्याकडे वापरले जात असल्याची काही माहिती नाही, पण यावरही विचार करायची आणि प्रयोग करायची आवश्यकता आहे. रासायनिक कीटकनाशक किती वापरणार आणि किती क्षेत्रावर वापरणार याला मर्यादा आहेत. पण जैविक उपाय (biological control) योजले तर हा धोका कमी करता येतो. या वर्षी तर काही ठिकाणी ड्रोनचा वापर करूनही कीटकनाशक फवारणी केली गेली आहे. पण ते व्यावहारिकदृष्ट्या आणि प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीनेही परवडणारं आहे का?
पूर्वीसुद्धा चीनसारख्या देशांनी कोंबड्या आणि बदकं वापरून टोळधाडीवर नियंत्रण मिळवलं होतं, याची अनेक उदाहरणं आहेत. असे कीटकभक्षक प्राणी वापरून जर टोळांची संख्या कमी करता आली, तर मग रासायनिक फवारण्या करायची आणि त्याचे वाईट परिणाम भोगायची वेळ येणार नाही. मग आपण आपल्याकडे हा उपाय करून का नाही बघत? या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचं यावर काय मत आहे? असं कुठे आपल्याकडे होतंय का? करून पाहिलंय का? त्याचा परिणाम काय? इत्यादी गोष्टी शोधायचा प्रयत्न केला, पण माहिती मिळाली नाही. आपण आजही फक्त टोळधाड आली की त्यावर काहीतरी तात्पुरता उपाय करून ती वेळ मारून नेतो, असं दुर्दैवी चित्र आहे.
टोळधाड या प्रश्नावर जर दूरगामी आणि शाश्वत उपाय योजायचा असेल, तर जैविक नियंत्रण हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यासाठी आवश्यकता आहे ती प्रचलित उपायांपेक्षा काही वेगळं पण अभ्यासपूर्ण काम करायची. समस्येच्या मुळाशी जाऊन योग्य उपाय शोधला, तर त्यात आपल्याला नक्की खात्रीशीर उपाय सापडू शकेल. प्रश्न हा आहे की आपल्याला हे शिकायचं आहे का? की आपण या तात्पुरत्या उपायांवर समाधानी राहणार आहोत आणि नुकसान झालं तर सरकारकडे नुकसानभरपाई मागणार आहोत?
वर उल्लेख केलेले प्रश्न आपल्यामधील अनेकांना पडले आणि त्यावर उत्तर शोधण्यासाठी आपण काम करायला सुरुवात केली तर याचं शाश्वत उत्तर नक्की मिळू शकतं. प्रश्न त्या मार्गाने प्रवास करायला सुरुवात करण्याचा आहे.