अमेरिकेचे WHOमधून बाहेर पडणे हे या संघटनेच्या वाढत्या राजकीयीकरणाचे लक्षण आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात बहुराष्ट्रीय संस्था - जागतिक आरोग्य संघटना, मानवाधिकार समिती यांसारख्या संघटना खरे तर स्वतंत्र असल्या पाहिजेत. मात्र गेल्या काही वर्षांत या संघटना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग झाल्याचे दिसून येते आहे. विकसित महासत्तांच्या सत्तासमीकरणाच्या राजकारणाचे व्यासपीठ होताना दिसताहेत.
अमेरिकेने शेवटी WHOला सोडचिठ्ठी दिली. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि WHO यांच्यामधला संघर्ष वाढला होता. अमेरिकेने WHOला दिला जाणारा ५० कोटी डॉलर्सचा निधी यापूर्वीच रोखला होता. एप्रिल महिन्यात काही अटी WHOला एक महिन्यात पूर्ण करण्यास अमेरिकेने सांगितले होते. त्याची पूर्तता झाली नाही. शेवटी अमेरिकेने या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यातून बहुराष्ट्रीय संघटना महासत्तांच्या राजकारणाचे व्यासपीठ कसे बनत आहेत याचे दर्शन होते. प्रश्न आहे की अमेरिकेने एवढा टोकाचा निर्णय का घेतला? WHOचे नेमके काय चुकले? हे समजून घेतले पाहिजे.
WHO आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग बनली
अमेरिकेचे WHOमधून बाहेर पडणे हे या संघटनेच्या वाढत्या राजकीयीकरणाचे लक्षण आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात बहुराष्ट्रीय संस्था - जागतिक आरोग्य संघटना, मानवाधिकार समिती यांसारख्या संघटना खरे तर स्वतंत्र असल्या पाहिजेत. मात्र गेल्या काही वर्षांत या संघटना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग झाल्याचे दिसून येते आहे. विकसित महासत्तांच्या सत्तासमीकरणाच्या राजकारणाचे व्यासपीठ होताना दिसताहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेपासून ती अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील आणि आता अमेरिका आणि चीन यांच्यातील सत्तासमतोलाच्या राजकारणाचे व्यासपीठ बनली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेची तीच अवस्था झालेली आहे. ती अमेरिका आणि चीन यांच्यातील सत्तासमतोलाच्या राजकारणाचा एक भाग होत असल्याचे दिसून येत आहे. या जागतिक स्तरावरील संघटनांचा मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे निधीपुरवठा - फंडिग. त्यांना आवश्यक असलेला निधी मिळत नाही. विकसित किंवा श्रीमंत देश त्यांना निधी पुरवत असतात आणि मग या देशांची बाजू उचलून धरण्याचे काम या संघटना करतात, जे अर्थातच दुर्दैवी आहे. कधीकाळी अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वात जास्त निधी देत होता, परंतु आता ती जागा चीनने घेतली आहे. त्यामुळे WHO सध्या चीनची बाजू घेताना दिसत आहे.
WHOने केलेल्या चुका
अमेरिकेने WHOमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाकडे चुकीचा किंवा केवळ राजकारणाचा भाग म्हणून पाहता येणार नाही. त्यासाठी गेल्या काही महिन्यांतल्या WHOच्या काही चुका प्रामुख्याने जबाबदार आहेत. या चुका पुढीलप्रमाणे सांगता येतील -
नोव्हेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, पण जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी घोषित करण्यासाठी ११ मार्च उजाडले. म्हणजे तीन-साडेतीन महिन्यांनंतर WHOने महामारी जाहीर केली. वुहानमध्ये १७ नोव्हेंबर रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण लक्षात आल्यानंतर २० डिसेंबरपर्यंत चीनने काही कृती केली नाही. त्या वेळी चीनने हा संसर्गजन्य विषाणू नसल्याचे सांगितले. त्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेने चीनची बाजू उचलून धरणे अत्यंत चुकीचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेलाच या विषाणूचे गांभीर्य कळले नाही आणि हा विषाणू व्यक्तीव्यक्तीमधून संक्रमित होत नसल्याचे या संघटनेने सुरुवातीला जाहीर केले. जागतिक आरोग्य संघटनेने जगाची दिशाभूल करत चीनची पाठराखण केली.
जागतिक आरोग्य संघटनेने चीनची बाजू उचलून धरणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळेच अशा जागतिक संघटना, ज्यांनी तटस्थ राहिले पाहिजे, ज्यांना विकसनशील देशांमध्ये आरोग्याचे महत्त्वाचे काम करायचे आहे, त्याच संघटना जर सत्तासमतोलाचा भाग होत असतील तर किंवा त्या राजकारणातील हत्यार म्हणून वापरल्या जात असतील, तर जागतिक पातळीवर त्याच्याइतकी दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही.
WHOला कोरोनाचे गांभीर्य कळलेच नाही
कोरोना विषाणूने जगभरात कल्लोळ माजवला आहे. त्याची दहशत बसावी इतका त्याचा प्रसार जगाच्या कानाकोपर्यात होतो आहे. कोरोनाने आत्तापर्यंत किती बळी घेतले आहेत ह्याची आकडेवारी आपल्याला कळते आहे, परंतु भविष्यात ही आकडेवारी किती असेल याची कल्पनाही कोणी करू शकत नाहीये. भारतात याचा शिरकाव झाला नि आपण हादरलो. आज संपूर्ण देश लॉकडाउन करून लोकांना आपल्याच घरात कोंडून राहावे लागते, त्याला जबाबदार कोण आहे? जगभरात अनेक बळी जाताहेत त्याला जबाबदार कोण आहे? जगातल्या दहा जीवघेण्या विषाणूंचा जन्म परदेशातच झालेला आहे, असे असूनही त्याचे परिणाम मात्र भारताला भोगावे लागले आहेत. सार्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू , यानंतर आलेला हा कोरोना विषाणू. चीनच्या वुहान प्रांतात त्याचा जन्म झाला हे आता लपून राहिले नाहीये, चीनने अर्थातच सर्वच जगापासून लपवून ठेवले. हा विषाणू एवढ्या लोकांचे बळी घेईल असे चीनलाही वाटले नव्हते. परंतु डॉ. लीसारख्या चिनी डॉक्टरांनी याची कल्पना देऊ केली, तेव्हाही चीनने त्यांची मुस्कटदाबीच केली होती. दरम्यानच्या काळात पर्यटनप्रेमी असलेले चिनी नागरिक आणि व्यापारी अजाणतेपणे सर्व जगभरात फिरत या रोगाचा प्रसार करत होते.
असे असताना जागतिक आरोग्य संघटनेलाच या विषाणूचे गांभीर्य कळले नाही आणि हा विषाणू व्यक्तीव्यक्तीमधून संक्रमित होत नसल्याचे जाहीर केले. बिनबुडाचे हे वक्तव्य करून त्यांनी जगाला गाफिल ठेवले. जगभरात जागतिक आरोग्य संघटनेचे निकष पाळले जातात, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जगाची दिशाभूल करत चीनची पाठराखण केली. चीनमध्ये प्रवास करू नये असा धोकाही नसल्याचे सांगितले. परंतु दुसरीकडे अमेरिकेने चीनला जाण्यास बंदी घातली होती. पाश्चात्त्य देशांच्या निष्काळजीपणामुळे हा विषाणू पसरला असेही विधान WHOने मार्चमध्ये केले होते. ही संघटना चीनच्या बाजूने आहे का किंवा चीनच्या आश्रित आहे का? असेही प्रश्न यामुळे पडतात.
WHO चीनधार्जिणी का बनली?
WHOच्या अशा वर्तणुकीमागे एक कारण असू शकते, ते म्हणजे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वच जागतिक संघटनांतून माघार घेण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळे या संघटनांना अर्थपुरवठा करावा लागणार नाही आणि तो पैसा वाचवून अमेरिकेची अर्थव्यवस्था टिकवून ठेवता येईल, असे ट्रम्प यांनी बोलूनही दाखवले. हेच चीनच्या पथ्यावर पडले. जिथे जिथे अमेरिकेने अंग काढून घेतले, तिथे चीनने शिरकाव केला. जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक अर्थपुरवठा अमेरिका करत होती. परंतु चीनने शिरकाव केला आणि टायग्रोस या WHOच्या अध्यक्षांना निवडून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. चीनच्या या उपकारांची जाण ठेवत कोरोना विषाणूच्या बाबतीत चीनची पाठराखण करत WHOने जगाला कोरोना संसर्गाच्या विळख्यात लोटले. जानेवारी महिन्यातच जगाला सावधगिरीची सूचना देण्याऐवजी जागतिक आरोग्य संघटनेने बोटचेपी भूमिका न घेता जागतिक आरोग्य रक्षणाचे त्यांचे ध्येय कायम ठेवले असते, तर आज जग ठप्प झाले नसते, लोकांना घरबंदी व्हावे लागले नसते, आंतरराष्ट्रीय स्तरावर जगबंदी होण्याची वेळ आली नसती, हे नक्की.
कायमस्वरूपी निधीची उपलब्धता नाही
संयुक्त राष्ट्र संघटनेत १९३ देश आहेत. परंतु हे देश जागतिक आरोग्य संघटनेला म्हणावे तेवढा निधी देण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी जोपर्यंत सर्वच देश या संघटनांना पुरेसा निधी उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत या संघटना विशिष्ट देशांची तळी राखणार, जे देश त्यांना निधी पुरवतात. २००३मध्ये जेव्हा सार्सची साथ आली होती, त्या वेळी अमेरिका मोठ्या प्रमाणावर निधी देत होता, तेव्हा जागतिक आरोग्य संघटना अमेरिकेच्या निर्देशांनुसार काम करत होती. तेव्हा WHOने चीनविरोधात कडक भूमिका घेतली होती. परंतु आता चीनने निधी देण्याबाबत महत्त्वाची जागा घेतली आहे. याच संघटनेला नव्हे, तर इतरही अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांना चीन मोठा निधी देत आहे. स्वाभाविकच WHOने चीनची बाजू उचलून धरली आहे.
बहुराष्ट्रीय संघटनांना राजकारणापासून दूर ठेवणे गरजेचे
वास्तविक या सर्व संघटनांना आंतरराष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. विशेषतः जागतिक आरोग्य संघटनेची फार मोठी जबाबदारी आहे, कारण तिला विकसनशील देशांमध्ये अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. साथीचे अनेक रोग आहेत, ज्यामुळे विकसनशील देशांमध्ये हजारो लोक प्रतिवर्षी मृत्युमुखी पडतात. त्यावरील आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यक त्या लशींचा विकास करणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे काम आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेसारखी संस्थाच जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र होते, तेव्हा मात्र तीही आपल्या उद्दिष्टापासून भरकटलेली दिसते, असा आरोप या घडीला तिच्यावर होताना दिसतो आहे. औषधनिर्मिती कंपन्यांच्या औषधांचे मार्केटिंग किंवा विपणन कशा प्रकारे करता येईल अशा पद्धतीने WHO करते, असाही आरोप संघटनेवर होताना दिसतो. वास्तविक ज्या उद्देशाने WHOची स्थापना करण्यात आली होती, त्या उद्दिष्टाला बगल देण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने या सर्वांपासून दूर राहाणे आवश्यक आहे. उलट विकसनशील देशांमध्ये जे गरीब देश आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने असे साथीचे रोग येतात, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक असे नुकसान होते, त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गरज पडली तर आंतरराष्ट्रीय समुदायामधल्या सर्व राष्ट्रांनी त्यांना मदत करणे गरजेचे आहे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचा वरचश्मा दाखवण्यासाठी कोणताही देश जागतिक आरोग्य संघटनेचा वापर करणार नाही.