जगण्याची मळकी पायवाट तुडवत भक्तगण आता चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचलेत. त्या पंढरीनाथाला भेटायच्या आधी तिच्या पुण्यतीर्थात एक डुबकी मारायची. चालत चालत येताना काय काय तुडवत आलो, जगताना कोणत्या कोणत्या विकारांचा चिखल पायाला लागला, तो धुऊन स्वच्छ अंतःकरणाने शुचिर्भूत होऊन आपलं मस्तक त्या समचरणांवर ठेवायचंय.
आणि आणच घ्यायची की 'बा विठ्ठला, तुझा सदैव पाईक होऊन राहीन. अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ असा बनेन. संसारात गुंतून विनाकारण संचयाच्या, आसक्तीच्या मागे लागणार नाही. सहा रिपूंना दूर ठेवायचा यत्न करेन. अमंगळ भेदाभेद मनी उपजू देणार नाही. माझ्याहीपेक्षा जो गांजलेला असेल, त्याच्यातच तुला पाहीन अन त्याची सेवा करेन.
विठ्ठला, मायबाप संतांनी तुजजवळ येण्याचा जी वाट दाखवली, तिची पायवारी कधीही सोडणार नाही.'
ही आश्वासनं भिजल्या मनाने त्याला द्यायची!
पांडुरंगा, माझ्या डोळ्यातल्या सद्भावनेच्या अश्रूंनी तुझे पाय प्रक्षाळतोय. सगळ्या वासनांचा जाळून केलेला बुक्का वाहातोय आणि नव्या जाणिवांचं तुळशीपत्र तुझ्या पायावर ठेवतोय. तुझ्याच कृपेने माझ्या हातून झालेल्या
सत्कर्मांची फुलं वाहातोय. डोळ्यांच्या निरांजनांनी तुला अौक्षण करतोय, आणि माझ्या देहाचाच तुला नैवेद्य दाखवतोय... असं म्हणून त्याच्या चरणावर लोटांगण घालायचं!
आणि मग त्याचं मनोहर रूप नजरेत भरून घेऊन दूर येऊन उभं राहायचं. गाभार्यातून पाय निघत नाही.
सभामंडपात, प्रांगणात सर्वत्र वैष्णवांची दाटी झालीय अन एका सुरात टाळ खणखणत आहेत, वीणा झंकारत आहेत, मृदंग गर्जत आहेत. गाभार्यात कोंदलेल्या धुपाने त्याचं रूप अलौकिक सुंदर दिसत आहे. कोटिसूर्यांचं तेज असलेलं त्याचं श्रीमुख वारकरी दांपत्याने धरलेल्या तबकातल्या ज्योतीने आणखीनच खुललं आहे. भक्तांचा मेळा पाहून तो अपार सुखावलाय आणि असा तो आनंदसोहळा आरतीने संपन्न होतोय.
माझ्या कोणत्याही संकटात ही विठ्ठल माउली मला उद्धरायला गरुडावरून धाव घेईल, हा माझा विश्वास आहे! मी फक्त तिला अंतःकरणपूर्वक साद घातली पाहिजे..
येई हो विठ्ठले माझे माउलिये!
त्या भक्तजनवत्सलाला, त्या करुणाकल्लोळाला, त्या सजलजलदाला आर्ततेने आवाहन करायचं - म्हणजे आरती करायची!
आणि मागणं काय मागायचं?
रामदासस्वामींची श्रीविठ्ठलाची ही एक अप्रसिद्ध आरती...
निर्जरवर स्मरहरधर भीमातीरवासी।
पीतांबर जघनीं कर दुस्तर भव नासी॥
शरणांगतवछळ पाळक भक्तांसी।
चाळक गोपीजनमनमोहन सुखरासी ॥ १॥
जये देव जये देव जये पांडुरंगा।
निरसी मम संगा निःसंगा भवभंगा ॥ ध्रु. ॥
अणिमा गरिमा महिमा नेणती तव महिमा।
नीळोत्पळदळविमळ घननीळ तनु शामा॥
कंटकभंजन साधुरंजन विश्रामा ।
राघवदासी विगळितकामा निःकामा ॥ २॥
रामदासांनी मागितलाय वासनांचा नाश. निःसंगपणा मागितलाय. अणिमादी अष्टसिद्धींपेक्षाही त्याचा महिमा मोठा आहे. तो कंटकभंजन व साधुरंजन आहे. त्याचं हे रूप मनात स्मरू या आणि आज ही वारी त्याच्या दारी पोहोचलेली असताना त्याच्याकडे वरदान मागू या -