Enter your Email Address to subscribe to our newsletters
उदो जाहला पाहाली वेळ । उठा वाचे वदा गोपाळ गा ॥१ ॥
आता आपण पुन्हा वासुदेवाकडे येऊ. वासुदेवाचे पहिले काम म्हणजे लोकांचे लक्ष आकर्षून घेणे. तसे पाहिले तर या गीतात अनुप्रास अलंकार आहे. गीतात सहसा वापरले न जाणारे 'ळ' हे अक्षर या गीतात विपुल प्रमाणात आहे. वेळ, काळ, टाळ, बाळ, रसाळ, इत्यादी. त्याने एक नादमयता सुद्धा निर्माण झाली आहे.
कैसा वासुदेव बोलतो बोल । बाळा पोटी माय रिगेल ।
मेले मानुस जित उठविल । वेळ काळाते ग्रासील गा ॥२ ॥
आता पुढची एक गंमत पाहा. काही अभंगात कूट प्रश्नांचा सुद्धा उपयोग दिसतो. अथवा चमत्कृतिप्रधान रचनाही आढळते. बाळाच्या पोटात आई सामावेल, मेलेले मनुष्य जिवंत होईल. वेळ काळाला खाऊन टाकील, असे ऐकून बाळगोपाळ मंडळी त्या वासुदेवाच्या भोवती गोळा न झाली तरच नवल होय. जर आध्यात्मिक विचार केला तर जिवंत माणसाचे लक्षण म्हणजे हरिभजन करणे जो हरीचे भजन करीत नाही तो मनुष्य मृतच समजला पाहिजे, फक्त त्याच्यावर अंतिम संस्कार थोड्या उशिराने होतो. अशा हरीला विन्मुख असणाऱ्या माणसाच्या मुखातही हरिनाम आले म्हणजे तो जिवंत झाल्याप्रमाणेच आहे ना!
आता ऐसेची अवघे जन । येते जाते तयापासून ।
जगी जग झाले जनार्दन । उदो प्रगटले बिंबले भान गा ॥३ ॥
या संपूर्ण जगात परमेश्वर बिंबला आहे असे भान येणे म्हणजेच खरी पहाट होय.
अंगारकणी बहुवसी । उष्णता समान जैसी । तैसा नाना जीवूराशी । परेश वसे ।।
ज्याप्रमाणे चुलीतील सर्व निखारे सारखेच गरम असतात त्याप्रमाणे प्रत्येक प्राणिमात्रांत त्याच एका परमेश्वराचा निवास असतो.
टाळाटाळी लोपला नाद । अंगोअंगी मुरला छंद ।
भोग भोगताची आटला भेद । ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा ॥४ ॥
जेव्हा आपले मन आनंदात निमग्न होते, तेव्हा तो छंद आपल्या अंगात मुरतो, भोवतालचा विसर पडतो. सर्व भेदाभेद मावळून जातात.
'एका जनार्दनीं म्हणे हरी हा गुप्ताची ओळखावा' या उक्तिनुसार हे ज्ञान गिळून टाकावे आणि गोविंदाच्या नामस्मरणात दंग राहावे. या छंदात मुरल्यामुळे ज्ञानदेवाची कांतीही विठूरायाप्रमाणे सावळी झाली आहे.
गावा आत बाहेर हिंडे आळी । देवदेविची केली चिपळी ।
चरण नसता वाजे धुमाळी । ज्ञानदेवाची कांती सावळी गा ॥५ ॥
हा वासुदेव प्रत्येक आळीत गावाच्या आत बाहेर हिंडतो आहे. त्याची एकदा आपल्याला भेट होते का ते पाहू.