॥ ध्यायी भांडं उजळलं ॥

विवेक मराठी    17-Jun-2020
Total Views |

pandharpur ashadhi ekadas

पंढरी हे मालनीचं माहेर, विठ्ठल-रखुमाई मायबाप, पुंडलीक भाऊ, तर चंद्रभागा वहिनी, असं वर्णनही येतं. पण चंद्रभागेला मालनींच्या अोव्यात स्वतंत्र स्थान आहे.

इंदिराबाईंनी तिला नेमकं नाव दिलंय - माहेरची भावगंगा!
भिवरगिरीत उगम पावलेली म्हणून भीवरा. भीवरगिरीवर शंकराचं मांदिर आहे.
भीमाशंकराचं. त्याची ही लाडाची लेक, म्हणून भीमा.
पुंडलिकाला आईवडिलांच्या सेवेकरता पाणी हवं होतं, म्हणून पंढरपुरात आली ती भीमाभागीरथी. इथे आल्यावर विठ्ठलाला पाहून तिने चंद्रकोरीसारखं एक मोहक वळण घेतलं, म्हणून विठ्ठलाची ती चंद्रभागा. अशी तिची नावं. तिच्या पुण्यतीर्थात स्नान केलं की पापाचा भार नष्ट होतो, ही समजूत इथेही आहेच. पण तिचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.. हिच्या तिरावर वारकर्‍यांचा शेवटचा पडाव असतो - विसावा. पंढरीच्या अलीकडे तीनचार कोसांवरच्या या विसाव्याजवळूनच चंद्रभागा वाहते. इथून मंदिराचा कळस दिसतो. तिच्यात उतरून निदान पाय धुवायचे, हवं तर स्नानही करायचं व तसंच तिला पार करूनही मंदिरात जाता येतं. या विसाव्याबद्दल लिहिलेल्या अोव्यांमध्ये वारंवार एक मजेदार उल्लेख आढळतो -
पंढरीला जाते ऽ
संगं आईचं लुगईडं ऽ ऽ
चंद्रभागा तीरी ऽ
न्हाया धूयाला दगईड ऽ
हे आईचं लुगडं आणल्याचा उल्लेख बरंच काही सुचवतो.
मालन काही फार समृद्ध घरातली नाही. बाईला लुगडी दोनच.. एक मांडीला व एक दांडीला असं पूर्वीच्या बाया म्हणत, तसं असावं. मग वारीत जाताना एखादं बरं लुगडं सोबत नको? प्रवासभर एकावरच भागवलं तरी निदान आंगुळ्या करून दर्शनाला जाताना तरी वेगळं, बरं लुगडं अंगावर असावं असं वाटणार. ते आईच देत असेल.. किंवा आईला वारीला येता येत नाही, म्हणून मालन तिचं लुगडं नेसून देवाला भेटत असेल. म्हणजे आईचीही भेट घडल्याचं समाधान तिला मिळत असेल.. मालनींची परिस्थिती नि भावस्थिती अशी अोव्यांमध्ये हळूच गुंफलेली आहे!
तर विसाव्याशी आल्यावर तिला कधी एकदा चंद्रभागेत पाय बुडवते असं होतं. हातात दुसरं लुगडं न घेताच ती घाईघाईने पाण्याकडे धावते. तिथे गेल्यावर मग उतरलोच आहोत तर एक डुबकी मारून स्नानच करू, असा मोह तिला होतो. तिची उतावीळ काठावरून पाहणारी कुणी पोक्त सखी जाणते की तिला आता पडदणी लागेल. पडदणी म्हणजे आंघोळीपुरतं अंगाला लावायचं जुनेर. ही तर ती न घेताच पळाली. मग ती कुणा लेकराहाती तिला ती पडदणी धाडते. मालन म्हणते,
चंद्रभागा तूझ्या ऽ
उदकात भिजली नीरी ऽ ऽ
हाती पडदणीचा पीळा ऽ
उभा द्वारकेचा हरी ऽ ऽ
जनीकरता धावत दळायला येणारा, द्रौपदीला वस्त्रं पुरवणारा द्वारकेचा राणा, माझ्याकरताही असा पडदणीचा पिळा घेऊन धावत आला याचं तिला अप्रूप वाटतं.. या विचारानेच तिला जीव धन्य झाल्यासारखं वाटत असेल!
संवादांची आणखी एक मजेदार चढाअोढ तिथे जमलेल्या मालनींमधे लागली आहे. पंढरी आपल्याकरता कशी खास आहे, हे त्या रंगवून सांगत आहेत.
पहिली तिथली सासुरवाशीण आहे. आता 'सासर' असलं, तरी पंढरीला नावं ठेवण्याची तिची मानसिकता नाही, तसं धाडसही यांच्यापुढे होत नसणार! मग ती सासुरवास न सांगता पंढरीत तिला काय छान वाटलं तेवढंच सांगते. म्हणते,
पंढरी सासईर ऽ
धन ग माझ्या ऽ कपाळाची ऽ ऽ
चंद्रभागं ऽ ला धूनं धूती ऽ
वर सावली पिंपळाची ऽ ऽ
"तुम्ही तर येकडाव इथं येता. माझं कुंकूच इथलं असल्यानं मी चंद्रभागेत रोज धुणं धुते, इतकं माझं पुण्य आहे. शिवाय रोज मला त्रास नको, म्हणून त्याने सावलीला पिंपळही दिला आहे."
दुसरी म्हणते, "तू तर बाई सासरी आल्यानंतर पंढरीत राहिलीस. माझा तर जन्मच मुळी इथला!"
पंढरी मी पाह्यली ऽ वाडवडीलापासून ऽ ऽ
अंगूळ म्या केली ऽ चंद्रभागंऽत बसून ऽ ऽ
आम्ही तर पिढ्यानपिढ्याचे रहिवासी! मी मुळी जन्मल्यापासूनच विठूला पहाते नि चंद्रभागेत नहाते! इतकंच नाही, तर
पंढरी माह्यार ऽ
माझं वस्तीला हायी दाट ऽ ऽ
सोन्याचा कंदील ऽ
गस्त इठूची ऽ सारी रात ऽ ऽ
आम्ही इतके भाग्यवंत, की हातात सोन्याचा कंदील घेऊन विठ्ठल सारी रात आमच्या वस्तीत गस्त घालतो!
तिसरी खरंच हुशार आहे. ती वारीपुरती आलीय. या पलीकडचं आपण काही सांगू शकत नाही, हे तिला कळतंय. पण तरीही ती सर्वांवर कडी करते...
विठोबा माझा पीता ऽ
मला माह्याराला नेतो ऽ ऽ
गिनानाची पोथी ऽ
माझ्या हातामंदी देतो ऽ ऽ
माझं तर हे माहेर आहे. विठ्ठल माझा पिता आहे. तो मला बोलावून घेतो, माझं माघारपण करतो नि निघताना अोटी भरून मला मौल्यवान भेट देतो.
वारीकरता आईचं लुगडं मागून आणणार्‍या मालनीला कल्पनाशक्तीच ताणायची तर 'अोटीत पैठणी घालतो' असं म्हणता आलं असतं की! पण ही खरी त्याची लेक. त्याच्याकडे काय मागायचं हे तिला कळतं. ती म्हणते, "निघताना तो मला हातात गिन्यानाची पोथी - ज्ञानाची भेट देतो!"
किंवा "तिथे जाऊन काय केलंस?" विचारणार्‍या मैत्रिणींना असं उत्तर मिळतं..
सया पूशीत्याता ऽ पंढरीला काय केलं ऽ ऽ
चंद्रभागाच्या पान्यायात ऽ ध्यायी भांडं उजळलं ऽ ऽ
आपल्या देहाचं मलीन भांडं चंद्रभागेच्या पाण्यात ती उजळणार आहे! बस्, तिची आणखी कोणतीच मनीषा नाही.
साक्षात कालीमातेने दर्शन दिल्यावर भक्ती, ज्ञान, वैराग्य मागणारे विवेकानंद किंवा 'नहाये धोये क्या भया। जो मन मैला न जाय।' म्हणणारे कबीर यापेक्षा या अडाणी मायबहिणी कुठे कमी आहेत! भारतीयांच्या रक्तालाच अध्यात्माची केशरी छटा आहे ती अशी!
संत तुकाराम (नवा ) चित्रपटातल्या, जात्यावरच्या सुंदर अोव्या आज ऐकू!