Enter your Email Address to subscribe to our newsletters
आता आपण पुन्हा वासुदेवाकडे येऊ. आज आपण जगदगुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचा वासुदेव पाहणार आहोत. म्हटला तर हा वासुदेव अगदी सोपा आहे आणि म्हटला तर या वासुदेवात गहन अर्थ भरलेला आहे.
रामकृष्ण गिती गात । टाळ चिपळ्या वाजवित ।
छंदे आपुलिया नाचत । निज घेऊनी फिरत गा ॥ 1 ॥
तुकोबारायांच्या अंगणात उभा राहिलेला हा वासुदेव मुखाने रामकृष्ण नामाचा उच्चार करीत आहे आणि एका हाताने टाळ व दुसर्या हाताने चिपळ्या वाजवित आहे. वासुदेवाला एका हाताने टाळ वाजविण्याची कला साधलेली असते. या टाळांचा अतिशय मधुर ध्वनी येतो आणि त्याला चिपळ्यांची सुंदर जोड मिळते. मग एक मधुर गुंजन तयार होते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, जर जगाला तुम्ही आपल्या रंगात रंगवू इच्छित असाल तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या रंगात रंगायला हवे! अन्यथा खाली सांगितल्याप्रमाणे प्रकार निर्माण होईल.
कुंकवा नाही ठाव । म्हणे मी आहेव ॥
जुन्या काळात विधवा महिलांना कुंकू लावण्याची प्रथा नव्हती. त्यामुळे जर कपाळाला कुंकू नाही तर मी सधवा आहे, हे सांगण्याची महिलांना परवानगी नव्हती. त्यामुळे आधी आपणच आपल्या रंगात रंगून जा! जग आपोआप तुमच्या रंगात रंगेल!! तुकोबारायांचा हा वासुदेव आपल्याच छंदात नाचत आहे आणि आपल्या भोवती गर गर गिरक्या घेत आहे.
जनी वनी अवघा देव । वासनेचा पुसावा ठाव ।
मग वोळगा तो वासुदेव । ऐसा मनी वसू द्या भाव गा ॥2 ॥
या दुसर्या चरणात ‘पुसावा’ हा शब्द आहे. त्याचेही दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे - विचारणे आणि दुसरा म्हणजे मिटवून टाकणे. ज्याप्रमाणे फळ्यावर लिहिलेले पुसून टाकावे अगदी त्याचप्रमाणे! वासनेचा ठाव का पुसावा? तर,
जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे ।
तिच झाली अंगे हरिरूप ॥
वासना नष्ट झाल्यावाचून जीवाची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होणे अवघड आहे. वासनेतून सुटका करून घेेण्यासाठी आपल्याला सर्वत्र हरिचे दर्शन करावे लागेल.
‘सर्वत्र समदर्शनः।’ असे श्रीमद् भगवद् गीतेत ध्यानयोग नामक सहाव्या अध्यायातील 29व्या श्लोकात सांगितले आहे. खर्या भक्ताला सर्वत्र भगवंताचेच दर्शन होते.
‘हें समस्तही श्री वासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा ओतला भावो ॥ म्हणौनि भक्तांमाजि रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥अ.7 ओ.136॥’ यातूनही हाच अर्थ ध्वनित होतो.
श्रीमद् भगवद् गीतेत ज्ञानविज्ञानयोग नामक सातव्या अध्यायातील 19व्या श्लोकात सांगितले आहे की,
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः।
या सर्व विश्वात वासुदेव भरला आहे असा ज्याचा पूर्ण अनुभव असतो तोच भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि ज्ञानी असतो. आपल्या सर्वांना असा वासुदेव ओळखता आला पाहिजे.
निज दानाची थोर आवडी । वासुदेवासी लागली गोडी ।
मुखी नाम उच्चारी घडोघडी । ऐसी करा वासुदेवी जोडी गा ॥3 ॥
तर या वासुदेवाशी आपला संबंध जोडायचा असेल तर केवळ एकच मार्ग आहे तो म्हणजे नामसंकीर्तन. मुखाने घडोघडी त्याच्याच नावाचा उच्चार करायला हवा.
अवघा सारुनी शेवट झाला । प्रयत्न न चले काही केला ।
जागा होई सांडूनि झोपेला । दान देई वासुदेवाला गा ॥4 ॥
शेवटी तुकोबाराय म्हणतात की, अरे बाबा! मनुष्य जन्माला येऊन असा झोपेत दंग का झाला आहेस? ही झोप सोडून जागा हो आणि या वासुदेवाला काहीतरी दानधर्म कर!
तुका म्हणे धन्य त्याचे जिणे । जिही वासुदेवी घातले दान ।
त्या न लगे येणे जाणे । झाले वासुदेवी राहणे गा ॥ 5 ॥
हे दान आपल्याला नाशिवंत वस्तूचे करायचे नाही!
अविनाश करी आपुलिया ऐसे ।
लावी मना पिसे गोविंदाचे ॥
आपल्या मनाला जर गोविंदाचे पिसे लागले तर...
त्याची सरली येरझार । झाला सुफळ संसार ॥
मग अशा देवभक्ताचे ऐक्य होऊन जाते. त्यालाच वासुदेवी राहणे असे म्हटले आहे. येथे सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता अशा रितीने चारी मुक्तीचा विचारही करता येईल. पण तो या वासुदेवाचा विस्तार होईल. वासुदेव हरी! पांडुरंग हरी!!
**