मालनींचं नि विठूचं नातं अतिशय हृद्य आहे. मनाच्या गाभ्यातलं आहे. इंदिराबाईंनी हा भाव किती सुरेख टिपला आहे पाहा -
"दिवसाकाठी एकदा तरी विठुरायाच्या ओढीने त्यांचं मन उमलून आल्याशिवाय राहात नाही. पहाटेच्या निवांत वेळी जात्याच्या सुराच्या संथ प्रवाहात या मालनी या दर्शन भेटीच्या ध्यासाचे दिवे ओवीच्या नितळ केळीच्या पानाच्या द्रोणातून मोकळेपणाने सोडत असतात. प्रत्येक ज्योतीचे आकार वेगळे, उजळणे वेगळे, रंगही वेगळे."
असा एक कोवळा, थरथरता, व्याकूळ रंग ओव्यांमध्ये दिसतो. तिला त्याच्या भेटीला जाता आलेलं नाहीये. ती दिवसभर या विचाराने व्याकूळ होते नि जात्याच्या खुंट्याचा स्पर्श होताच तिच्या मनातला गहिवर असा झरू लागतो..
पयली माझी ववी ऽ
मी ग ऽ बसले दळनाला ऽ ऽ
गेलं गं ऽ माझं चित्त ऽ विठुरायाच्या पंढरीला ऽ ऽ
आणि त्याच्या भेटीकरता मी कशी कासावीस झालेय, काकुळतीला आलेय हे सांगताना ती म्हणते,
चवथी माझी ववी
गाते पाकळूका ऽ ऽ
ववीला गाते मी ऽ
पंढरीचा परणसखा ऽ ऽ
पाचवी माझी ववी ऽ
किती येळ येळा ऽ ऽ
देवा पांडुरंगा ऽ बसलास डोळा ऽ ऽ
तिला आता दुसरं काही सुचत नाही. त्या प्राणसख्याच्या भेटीची तळमळ तिच्या मनातून जात नाही. तिला प्रत्यक्ष विठूची समोरासमोर भेट घेता येत नाही, पण ती विठूला एक गुपित सांगतेय की कितीतरी वेळा तू माझ्या डोळ्यात बसून मला तुझी भेट दिली आहेस! तिला आता हा एकच मार्ग. डोळे मिटून त्याला त्या पापण्यांच्या संपुटात भेटून घेणं. पण त्याला आोव्यातून गाऊनही तिचा जीव काही शांत होत नाही. मग ती पाणवठ्यावरच्या सख्यांशीही त्याच्याविषयीच बोलत राहाते. कथा-कीर्तनांत त्याला ऐकते. कुठे सप्ते, पोथीवाचन असेल तर तिथे जाऊन ती बसते की त्याचं नाव तरी कानावर पडेल. पण तिला उमगतंच की थेट त्याच्या समोर जाऊन त्याला भेटण्यात जे सुख आहे, ते या कशातच नाही! ती त्याला हेच पुन्हापुन्हा कळवळून सांगते की मला प्रत्यक्ष बोलाव, कारण
सख्या जीवाला जोडील्या ऽ साधुसंतांच्या गऽ भैनीऽऽ
पंढरीच्या कीर्तनाचा ऽ
नित उतारा येतो कानी ऽऽ
पोथी नि पुस्तकाचा ऽ
न्हायी येत अनुभाव ऽ ऽ
सावळ्या इठ्ठला ऽ
मला पंढरी तं ऽ दाव ऽ ऽ
जिची वारी अंतरली, तिच्या मनात एकच ध्यास असतो.
कधी नि कसं आपल्याला पंढरीला जाता येईल.
पंढरीत काय आहे हे सांगताना ही मालन किती धिटाईने बोलते आहे!
अंतरली पंढरी ऽ
सये तिकडं माझा डोळा ऽ ऽ
सावळा पांडुरंग ऽ
माझा पिरतीचा पानमळा ऽ ऽ
पंढरी ग ऽ मधी ऽ
न्हायी कूनाचं देनं घेनं ऽ ऽ
सख्या पांडुरंगा ऽ तुझ्यासाठी माझं येनं ऽ ऽ
जीवाचं सूकदूक ऽ
तुला सांगीते इट्टला ऽ
सावळ्या पांडुरंगा ऽ
कवा भेटसी एकला ऽ ऽ
पंढरीला जातेऽ
न्हायी मागची आशा केली ऽ ऽ
इट्टल सावळ्यानं ऽ
मला गऽ भेट दीली ऽ ऽ
चरणावर माथा ऽ
आले सख्याला ऽ भेटून ऽ ऽ
अभीर गुल्लाल ऽ चोळीला ग ऽ आठवन ऽ ऽ
पांडुरंग हा तिचा पिरतीचा पानमळा! हिरव्यागार हृदयाकार पानांच्या गच्च मळ्यात गेलं की जिवाला थंडावा लाभतो. त्या पानासारखीच त्या वेलींखालची भुईही स्पर्शाला स्निग्धशीतल! तिथली हवाही सुखद, आल्हाददायक. त्या पानमळ्यात शिरलं की देहाचं, स्थळ-काळाचं, वेळेचं भान सुटणार. अाणि एकदा याची ओढ लागली की मागची आशा सुटणार.
माहेर-सासर-आप्त-भरतार-लेकरं हे पाश, कर्मकांडं-व्यवहार-व्रतवैकल्यं हे संसाराचे सारेच पाश तिने मागे टाकलेत. समाजातून मिळणार्या उपहासालाही तिने जुमानलं नाही आणि ती निघालीय. ती त्याला भेटते. चरणावर माथा टेकताच तिच्या मनीचं गूज त्याला कळतं नि तो तिला हृदयाशी धरतो.. ती उगीच नाही म्हणत,
पंढरीचा विठू ऽ
न्हायी कूनाच्या देवार्यात ऽ ऽ
माळकर्याच्या हुरुद्यात ऽ ऽ
या भक्तांच्या भेटी म्हणजे दो हुरुदांतून झुळझुळत वाहणारा जिव्हाळ्याचा झरा! इंदिराबाई या अोढीच्या मागचं कारण शोधताना म्हणतात, "सहकार हे विश्वाचं मूलतत्त्व. जिव्हाळा त्यातून उगम पावतो. पण बहुधा मानवाच्या मनात हा सहकार, जिव्हाळा हा काहीतरी स्वार्थी हेतूकरता असतो. निखळ वात्सल्य हा एकच अपवाद! या जिव्हाळ्यामागचे फोलपण समजले, तरी जीवनप्रवाहाला जखडलेल्या कुणालाच त्याचा त्याग करता येत नाही. 'नको हे बंधन' असे ज्याला होते, त्याच्याच वाट्याला ही अोढ येते. मग अशी अोढ लागलेल्या मालनीच्या आयुष्यात पांडुरंगाच्या प्रेमाचा पानमळा फुलतो आणि मालन त्याच्या प्रेमाच्या गार सावलीत समाधानाने विसावते. हा निसर्गातला सौहार्दाचा निर्मळ आदिरस तिच्या वाट्याला येतो!"
इंदिराबाईंना हा प्रश्न पडणं स्वाभाविक होतं की तुकारामांच्याच विराणीने मालनरूप घेतलं की ही मालनच तुकारामाने गायलेली विराणी झाली?