॥ हरिनामाचा सरवा ॥

विवेक मराठी    14-Jun-2020
Total Views |
विठ्ठल हा मालनीचा जिवलग. त्याला एकदा भेटून तिचं मन निवत नाही. पण संसाराची, मुलालेकरांची, गायीगुरांची जबाबदारी तिच्यावर असते. ती जबाबदारी तिला दर वारीला जाऊ देत नाही. मग तिला वाटतं की आपण बाईमाणूस म्हणून जाऊच नये. दुसर्‍या रूपात जावं, पण जावं. पंढरीच्या वाटेवरचं काहीही होऊन राहणं तिला चालणार आहे. किंवा कदाचित मनुष्यजन्म सरल्यावरही तिला त्याचा सहवास हवा आहे. तो कसा? तर


pandharpur ashadhi ekadas

पंढरपुरीचाऽ
मी का व्हयीन खराटाऽऽ
इट्टलाच्या बाईऽ
लोटंऽन चारी वाटा ऽऽ
पंढरपुरीची ऽ
व्हयीन देवाची पायरी ऽऽ
ठेवील गऽ पाय ऽ सये
येता जाता हरी ऽऽ
पंढरपुरीची ऽ
मी गं व्हयीन परात ऽऽ
विठूच्या पंगतीला ऽ
वाढीन साखरभात ऽऽ
याचा अर्थ कळण्याजोगा आहे, पण याचा शेवट मोठा लोभस आहे!

पंढरपुरामंदी ऽ
मी का व्हयीन ऽ पारवा ऽऽ
येचीन मंडपात ऽ
हरिनामाचा सरवा
तिला पारवा होऊन हरिनामाचा सरवा वेचायचा आहे!
किती विलक्षण प्रतिभा आहे या मालनीची!

शेतातल्या पिकाची कापणी, मळणी करताना धान्याचे काही दाणे भुईवर सांडतात, तो सरवा. पाखरं तो टिपतात. पंढरपुरात मंदिरात जागोजागी हरिनामाचा गजर होतच असतो. नामसंकीर्तन, भजन, कीर्तन झाल्यानंतर भक्त बाहेर पडतात.
त्यांच्या मुखातूनही तेच ऐकलेलं नाम बाहेर सांडत असतं. हा नामाचा सरवा तिथे मंदिराच्या सभामंडपात, प्रांगणात सांडून राहतो, तो तिला वेचायचा आहे!
अशाच एका मालनीला वाटेवरचं गवत होऊन, वारकर्‍यांनाच विठू समजून त्यांचे पाय कुरवाळायचेत! मातीचा डेरा होऊन त्यांचे पाय आपल्या आतल्या पाण्याने, मायेने भिजवायचेत. पण पुढे तिला बाभूळ, तुळस व्हावं वाटतं, यामागे मात्र वारकर्‍याचं मोठं मन दिसून येतं. ती म्हणते,‍

पंढरीच्या वाटं ऽ
मी तं व्हयीन बाभूळ ऽ ऽ
येतील मायबाप ऽ
वर टाकीती ऽ तांदूळ ऽ ऽ
पंढरीच्या वाटं ऽ
मी ग व्हयीन तूळस ऽ ऽ
य‍ेतील मायबाप ऽ
पानी देतील मंजूळसं ऽ ऽ
 
वारीला जाताना वारकरी सोबत पीठमीठ घेतात, तसे तांदूळही घेतात. आपल्यासोबत चालणारा, भेटणारा कुणीही उपाशी राहायला नको, याकरता ते दक्ष असतात.
 
एकांड्या साधू-संन्याशाला ते तयार भाजी-भाकरी देतात. कुणाला ते चालत नसलं, तर त्याला शिधा - म्हणजे तांदूळ देतात. चालताना बाभळीचं झाड आलं की पालवी दाट नसल्याने त्यावरची पाखरं लगेच दिसतात. मग ते त्यांना तांदूळ टाकतात. पाखरांनाही दाणे फेकलेले दिसतात व खाली येऊन ती ते टिपू लागतात. बाभळीच्या झाडोर्‍यासारखी ही मालन.
तिच्याकडं काहीच साहित्य नाही. पण ही सार्‍यांची सेवा करते. सामान वाहाते, पाणी आणते, भाकर्‍या बडवू लागते, पाय चेपून देते. ही वारीची लेक होते.
 
मग मायबाप तिलाही दाणा घालतात, जेवू घालतात. वारीत बाया डोईवर तुळस नेतात. तिला, किंवा वाटेतही तुळस दिसली की तिला पाणी द्यायची रीत आहे. वारकरी या मालनरूपी तुळसाबाईलाही जवळचं पाणी देतील. पण ती पिईल कशात? तर अोंजळीत हलकेच ओतलेलं मंजुळसं पाणी तिला मिळेल!
 
वारीला जाण्यामागे विठ्ठलाची ओढ तर आहेच. तिच्या रूक्ष, खडतर संसारात तिला न मिळणारी माया, आपलेपणा तिला वारीत मिळतो. रोजच्या कामच्या रगाड्यातून सुटका तर होतेच, तसाच मुक्तपणाचा एक निर्भर आनंदही तिला हवाहवासा वाटत असणार.
 
वारीत सारे सारखे. एकमेकांकडे सख्यभावाने, आत्मीय भावाने पाहाणारे. तिथल्या सार्‍या बंधूंना ती साधू म्हणते. तिथे ती सासुरवाशीण नाही. कपड्याचे, केसाचे - तिच्या संस्कृतीतल्या नियमांचे काच वारीत नसतात.
 
मग तीही जरा सैलावते आणि निगुतीने तेलपाणी करून जपलेले आपले केस मोकळे सोडू शकते. वारीत उन्हापावसात चालणं, कधी घामाने तर कधी पावसाने भिजणं, नदीत स्नान करणं यामुळेही ती कायम केस बांधत नाही. कितीतरी मालनी या साध्याशा सुखाबाबत भरभरून बोलतात..
पंढरीला जातेऽ
मोकळी माझी येनी
साधूच्या बराबरी ऽ
मी ग आखाड्या केला दोनी ऽ ऽ
पंढरीच्या वाटं ऽ
मोकळा माझा जुडा ऽ ऽ
साधूच्या संगतीत
मीळाला दूध पेढा ऽ ऽ
पंढरी मी गऽ जातेऽ
मोकळं माझं क्यास ऽ ऽ
साधूच्या संगतीनं ऽ
मला घडली एकादस ऽ ऽ
 
हे एक प्रकारचं प्रबोधन, एक प्रथा मोडण्याचं इवलं धाडसच ती करते आहे. असे केस सोडले तरीही माझं काही वाईट तर झालं नाहीच, उलट एकादशा-उपवास-दर्शन याने मी पुण्यच जोडलं, असं ती सांगते.
 
पण या प्रतीकात्मक मुक्तीशी मालन थांबत नाही. तिचं सुखनिधानच इतकं उंचावर आहे की त्याच्या ओढीने ती देहभोगांच्या पार जाते!
 
पंढरीच्या वाटं ऽ
वाटंऽ पंढरी कीती दूरऽऽ
नादावला जीवऽ
वाजंऽईना गऽ बिदीवर ऽ ऽ
 
पंढरीची वाट, मुक्तीची वाट दूरची खरी. अती खडतर. पण त्या वाटेवर चालताना त्याच्या नामात, स्मरणात, त्याच्या ओढीत पावलं अशी दंग होतात की कसलंच भान राहात नाही. जीव नादावतो. बीदी म्हणजे वाट. त्या वाटेवर आता तिला नादही ऐकू येईना.
 
ती वाट म्हणजे एकतारीची तार आणि तिची पावलं हाच त्याचा झणत्कार.
तिचं चालणंच वीणेचं वाजणं झालंय.
 
आता तिला ना देहाची जाणीव उरलीय, ना चालीची. सारं एकच झालंय.
सगळ्यातून एकच नाद उमटतोय..
 
विठ्ठलविठ्ठल विठ्ठलविठ्ठल विठ्ठलविठ्ठल
आज ऐकू या 'दळिता कांडिता' कौशल इनामदार यांच्या अनोख्या चालीत..