ज्येष्ठ अर्धा सरलाय. आकाशात ढगांची जमवाजमव सुरू झालीय. या दिवसांत आकाशात मळभ दाटून येतं, पण मराठी मन मात्र मरगळ झटकून एका निराळ्याच चैतन्ययात्रेची वाट पाहात असतं. त्याला आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन त्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घ्यायचं असतं.
शतकानुशतकं ही चैतन्यदायक परंपरा मराठी माणसाने जिवंत ठेवली. यंदा कदाचित प्रथमच या परंपरेला असं बंदिस्त व्हावं लागतंय. पण भक्तीची धारा खंडित होत नाही, अडथळा आला तरी ती दुसर्या मार्गाने वाहू लागते.
पंढरपूरची वाट चालून आमची पावलं प्रत्यक्ष मळणार नाहीत, पण मनं अबीर-गुलालाने रंगल्याशिवाय कशी राहतील? पांडुरंगाच्या भेटीकरता यंदा मानसवारी करू! मनाच्या वाटेवर अोव्यांचं शिंपण घालू, कवितांच्या रांगोळ्यांनी नटवू, आरत्यांचे दीप लावू, चित्रगीतांच्या पताका उभारू आणि लोकगीतांनी ती वाट दुमदुमवून टाकू!
या वाटेवरूनच पोहोचायचं मनगाभार्यात आणि तिथे विराजत असलेल्या त्या श्रीमूर्तीचं दर्शन घ्यायचं अंतश्चक्षूंनी.
शारदीय पौर्णिमेसारख्या तेजाळ, सुहास्य वदनावर कुंडलांची रत्नप्रभा फाकलेली, सूर्यबिंबासम रक्तवर्णी असलेल्या जास्वंदीसारखे त्याचे अधर आणि ते आकर्ण कमलनयन! अशा परब्रह्म पांडुरंगास नमस्कार!
किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं।
सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः।
त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं।परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ६ ॥
त्याच्या हिर्याचा झळाळत्या मुकुटाने आसमंत तेजाळला आहे. त्याला पूजण्याला देवही हाती रत्नं घेऊन उभे आहेत. तीन जागी वाकून उभा राहिल्याने अन गळ्यात वनमाळा नि मुकुटात मोरपीस ल्यायल्यामुळे तो बाळकृष्णच शोभतो आहे. अशा परब्रह्म पांडुरंगास नमस्कार!
गवां वृन्दकानन्ददं चारुहासं ।परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्॥ ७ ॥
हाच लीलानाटकी सर्वसंचारी. हाच वेणूचा नाद, हाच वादक. याचा अंतपार कुणा लागत नाही. स्वतः गोपालन करणारा, गोपगोपींना मोहक हास्याने वेड लावणारा हाच! अशा परब्रह्म पांडुरंगास नमस्कार!
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं ।परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ८ ॥
हा अजन्मा, रुक्मिणीचे चित्सुखधाम, हा जगताचा विश्राम. हा भक्तांचे कैवल्यधाम. हा बाल्य-तारुण्य-वार्धक्य किंवा जागृती-स्वप्नावस्था-सुषुप्ती या अवस्थांच्या पलीकडचा.
हा दीनबंधू, हा कृपासिंधू, दुःखहरण करून प्रसन्नता देणारा व देवांनाही प्रिय. अशा परब्रह्म पांडुरंगास नमस्कार!
स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये ।पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।
भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकाले ।हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥
या पुण्यप्रद स्तोत्राच्या पठणामुळे भक्त सहज संसारसागर पार करून जातील. जे एकचित्ताने मनन करतील, त्यांना अंतकाळी या परब्रह्माच्या शाश्वत रूपाचं सान्निध्य लाभेल.
आदिशंकराचार्यांनी वर्णिलेल्या या
परममंगल रूपाचं आपण ध्यान करावं नि सारा भार त्याच्यावर सोपवून निश्चिंतपणे आपलं कर्म करत राहावं!