एक अधुरी (प्रेम?) कहाणी - कादंबरी

विवेक मराठी    21-May-2020
Total Views |
 सुमन घोष दिग्दर्शित 'कांदबरी' हा बंगाली चित्रपट म्हणजे हळुवार पण उपेक्षित नाते उलगडण्याचा धाडसी प्रयत्न. रवींद्रनाथ टागोर आणि त्यांची भावजय कांदबरी यांच्यातील दीर- भावजय नात्यापेक्षा समाजप्रवाहाला छेद देणारे असे हे नाते.

Kadambari  film _1 &


स्थळ - उत्तर कलकत्तामधील जोडासाँको भागात असलेली ठाकूरवाडी. टागोर कुटुंबीयांची प्रशस्त वडिलोपार्जित हवेली. सूर्याच्या कोवळ्या किरणांत न्हाऊन निघालेल्या या इमारतीवर या क्षणाला एका अनामिक भयाची छाया पसरली आहे. इमारतीच्या बाहेर नोकरांची अस्वस्थ वर्दळ. अंगणात बग्गी उभी राहते. आतून या हवेलीचे वारस, देवेंद्रनाथ टागोरांचा पाचवा मुलगा ज्योतिरींद्रनाथ टागोर उतरतात. त्यांच्या शय्यागृहाच्या बाहेर कातरलेल्या मनाने उभी असलेली त्याची बहीण सांगते, "पूर्वी असे कधीच घडले नाही, पण आज कितीही हाका मारल्या तरी कादंबरी दार उघडत नाही."
दार फोडण्यात येते.

आत विस्कटलेल्या खोलीत, पलंगावर एक विशीतली मुलगी पहुडलेली असते. आजूबाजूला अस्ताव्यस्त पडलेल्या साड्या, दागिने, फुटलेला आरसा, विखुरलेल्या काचा, अफूची रिकामी बाटली आणि तिचा निष्प्राण देह.

डॉक्टरांना बोलवण्यात येते, पण खूप उशीर झालेला असतो. या आत्महत्येची चौकशी बंद दरवाजाआड केली जाते. नैसर्गिक मृत्यू म्हणून त्याची नोंद होते. वर्तमानपत्रांना गप्प बसवले जाते. घरातील मंडळींना आणि नोकरांना या बाबतीत बोलायची बंदी केली जाते. जेमतेम पंचवीस वर्षांचे आयुष्य स्वतःभोवती गूढतेचे वलय लपेटून नाहीसे होते. गच्चीवर कादंबरीने लावलेली झाडे मात्र रवींद्रनाथांच्या अश्रूंचे मूक साक्षीदार असतात.
कादंबरी देवी आणि प्रसिद्ध कवी आणि तत्त्वज्ञानी रवींद्रनाथ टागोर यांच्यातील नाते नेहमीच्या दीर-भावजय नात्यापेक्षा वेगळे होते. ती त्यांच्या अनेक कवितांची, चित्रांची प्रेरणा होती. तिच्या एकाकी आयुष्यात रवींद्रनाथ तिच्या जगण्याचा आधार होते, तिचे सहचर होते. या नात्याबद्दल बंगालमध्ये अनेक तर्क मांडले गेले, त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला गेला, टीकासुद्धा झाली, अनेक कथा-कादंबऱ्यांत, नाटकांत, माहितीपटांत हा विषय चर्चिला गेला. सुमन घोष दिग्दर्शित 'कादंबरी' हा बंगाली चित्रपट म्हणजे हे हळुवार पण उपेक्षित नाते उलगडण्याचा धाडसी प्रयत्न.

चित्रपटाची सुरुवात होते ती वर्तमानात, नंतर हा चित्रपट कादंबरीच्या नजरेतून, भूतकाळाचा वेध घेतो. पाच जुलै १८६८, कादंबरी आणि ज्योतिरींद्रनाथ यांचा लग्नदिवस. वर एकोणीस वर्षे, तर वधू केवळ नऊ. टागोर कुटुंब पिढीजात श्रीमंत, तर कादंबरी त्यांच्याचकडे काम करणाऱ्या एका हिशेबनीसची मुलगी. ज्योतिरींद्रनाथ साहित्य, संगीत, चित्रकला, अभिनय यात पारंगत. बुद्धिमान, देखणे आणि व्यावसायिक. उच्च अभिरुची आणि संस्कृती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग असते. हे मोठेपण समजायचे वय नसले, कुवत नसली तरी आपण छोट्याशा तलावातून

महासागरात आलो आहोत याची कादंबरीला जाणीव होते. कादंबरीची मोठी जाऊ ज्ञानदानंदिनी ही सुशिक्षित, आधुनिक, एका आयसीएसची पत्नी असल्याने समाजात वावरायची सवय असलेली देखणी स्त्री. ज्योतिरींद्रनाथ यांच्याशी तिची घनिष्ट मैत्री. स्वतःचे मन मोकळे करण्यासाठी ज्योतिरींद्रनाथांना तिचाच आधार वाटतो.
न्यूनगंडाचे मूळ कादंबरीच्या मनात रुजायला सुरुवात होते. ज्योतिरींद्रनाथ आणि कादंबरी यांचे नाते पतिपत्नीपेक्षा पालक आणि पाल्या असे असते. खरे तर तिला आपल्या पतीकडून बाह्य जगाची माहिती मिळते. हे कुटुंब स्त्रियांच्या बाबतीत कर्मठ असूनही ती घोडेस्वारी शिकते. नवऱ्याबरोबर फिरायला बाहेर जाते. शिक्षण घेण्यासाठी ते तिला प्रोत्साहन देतात. तरीही या बुद्धिमान पण कलंदर माणसाला समजून घेणे कादंबरीला जमत नाही. त्यांचे नाटकांवर प्रेम, शिवाय अनेक व्यवसाय. आपल्या कामात मग्न असणाऱ्या ज्योतींकडे पत्नीला देण्यासाठी वेळ नसतो.

त्यांच्या वयात बराच फरक असतो. कदाचित समपातळीवर येऊन एकमेकांना जाणून घेण्यात दोघेही कमी पडतात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातून आल्याने, या मोठ्या घराच्या स्त्रिया तिला सामावून घेत नाहीत. आपल्याला वेगळे ठेवल्याची भावना कादंबरीला भरल्या वाड्यात एकाकी करते. या मोठ्या वास्तूत तिला आधार असतो तो तिच्याहून दोन वर्षांनी लहान असलेल्या रवींद्रनाथांचा. तिच्या रोबीचा. पंधरा मुलांत सर्वात लहान असलेला रोबीसुद्धा एकटाच असतो. बाकी सर्व आपापल्या व्यापात दंग. जोडासाँको भागातील वाड्यात पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खिडकीतून बाहेरची निसर्गशोभा पाहत बसणे हा रवींद्रनाथांचा बालपणीचा विरंगुळा. 'जॉल पॉडे पाता नॉडे’ (पाणी पडे - पान झुले) ह्या लहानशा यमकाने त्यांच्या काव्यप्रवासाची सुरुवात होते. घरात काव्यशास्त्रविनोद, नाट्य, संगीत यांचे अप्रत्यक्ष संस्कार असतातच. या प्रवासात 'कादंबरी' त्यांची सवंगडी होते, सखी होते. रोबीच्या आवडीचे पदार्थ बनवणे हा कादंबरीचा छंद बनतो. तिला फुले आवडतात, ती पक्ष्यांशी बोलते. गच्चीवर बाग फ़ुलवते. इथेच रोबी तिला आपल्या कविता ऐकवतो. ती त्याला प्रोत्साहन देते, प्रसंगी त्यातल्या चुका दाखवते.


Kadambari  film _1 &
वयाच्या चौदाव्या वर्षी रवींद्रनाथ यांच्या आईचा मृत्यू झाल्यावर दोन वर्षांनी मोठी असलेली कादंबरी त्यांच्या आईची जागा घेते. रवींद्रनाथांच्या नजरेत ती एक ग्रीक देवता असते, मोहक, आकर्षून घेणारी देवता. ज्योतिरींद्रनाथ आणि रवींद्रनाथ यांच्या वयात बारा वर्षांचे अंतर असले,
तरीही रवींद्रनाथांवर ज्योतिरींद्रनाथ यांचा बराच प्रभाव असतो. कविता, संगीत आणि साहित्य यांची दोघांनाही आवड असते. कादंबरी हा या दोघांच्या नात्याचा समान दुवा होते.

रवींद्रनाथांना पुढील शिक्षण घेण्यासाठी लंडनला पाठवायचे ठरते. पण रवींद्रनाथ मात्र शिक्षण अर्धवट ठेवून परत येतात. त्यांचे पहिले पुस्तक 'भग्नो ह्रिदोय' (भग्न हृदय) हे कादंबरीला नजरेसमोर ठेवून लिहिले जाते, त्यांच्या बऱ्याच कवितांची नायिका कादंबरी असते. ह्या गोष्टी लपून राहत नाहीत.

एकोणिसाव्या शतकाचा हा काळ. तेव्हा बायका फक्त माजघरात असत. टागोर कुटुंब जरी आधुनिक असले, तरीही रवींद्रनाथ आणि कादंबरी यांच्या मैत्रीची घरात आणि बाहेर चर्चा होऊ लागते. कादंबरीला मूल नसते हासुद्धा टीकेचा विषय होतो. तिच्या नणंदेच्या लहान मुलीवर - उर्मिलावर ती जीव जडवते. तिच्या बाललीलांत आपले मन रमवते. पण एका अपघातात उर्मिलाचा दुर्दैवी अंत होतो. त्याचा दोष कादंबरीवर येतो.

खचत चाललेल्या, एकट्या पडलेल्या कादंबरीला आता आधार असतो तो फक्त तिच्या रोबीचा. हे नाते घट्ट होऊ लागते. दीर-भावजयीचे नाते तसे आपुलकीचे असतेच, पण ही जवळीक नात्याच्या पलीकडे जाऊ लागते. जिभा वळवळतात आणि वडिलांच्या इच्छेखातर रवींद्रनाथ लग्नाला तयार होतात. ह्या लग्नाला कादंबरीचा होकार नसतो, आपला एकुलता एक आधार आपल्यापासून हिरावून जात असल्याची जाणीव तिला असुरक्षित करू लागते. त्यातच नवऱ्याचे त्याच्या नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्रीबरोबर अनैतिक संबंध असल्याची बातमी तिला समजते आणि एका रात्री मनावर ठेवलेला संयम सुटतो. मानसिकदृष्ट्या खचून गेलेली, नैराश्येच्या गर्तेत सापडलेली कादंबरी हा धक्का पचवू शकत नाही. अफू घेऊन ती स्वतःच्या जिवाचा अंत करून घेते.

१८७०च्या सुमारास दोन निरागस मुलांत अतिशय जिव्हाळ्याचे, काहीसे बालिश, खेळकर नाते निर्माण होते, त्याचा स्रोत असतो आजूबाजूच्या कोरड्या संबंधातून आलेला एकाकीपणा. त्या असोशीमुळे दोन मने एकमेकांकडे ओढली जातात, एकमेकांच्यात गुंतत जातात. कुठेतरी सामाजिक नात्याच्या सीमा ओलांडून एक अत्यंत उत्कट पण आत्मिक नाते दोघांच्यात निर्माण होते. हे अतिशय स्वाभाविक होते, सहज होते. कादंबरी आणि ज्योतिरींद्रनाथ यांच्यातील दुरावा, ज्योतिरींद्रनाथ यांचे बाह्य संबंध यांची रवींद्रनाथांना जाणीव होतीच. आपल्या या बुद्धिमान पण मनातून खचलेल्या भावजयीची चिंताही होती. 'ताऱ्याची आत्महत्या' अशी त्यांची एक कविता आहे, यात ती भीती प्रत्ययास येते.
भरल्या घरात असूनही एकाकी असणे, दुर्लक्षित असणे, त्यात पोटी पोर नसणे एका हुशार पण संवेदनशील, हळव्या स्त्रीसाठी कठीण होते, तिच्या अंधाऱ्या आयुष्यात रवींद्रनाथाचे अस्तित्व म्हणजे आशेचा किरण होता. त्याचे लग्न आणि पर्यायाने तिच्यापासून लांब जाणे तिला संपवण्यास कारणीभूत ठरले.

प्रेम ही भावनाच अतिशय प्रबळ आहे. प्रेमामुळे वादंग होतात, अगदी युद्धे होतात, साहित्य, कला क्षेत्रात उत्कृष्ट कलाकृती जन्माला येतात. एकतर्फी आणि असफल प्रेम हे तर खूपच प्रभावी, शक्तिशाली रसायन आहे, कारण ते विभागले जात नाही. ह्यातला आवेग, तीव्रता जास्त प्रखर असते, कारण त्याला पूर्ततेचे वरदान नसते. हे प्रेमही कधी मरत नाही. हृदयाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात जखमी अवस्थेत, ते पडून राहते. काही दुर्दैवी लोकांसाठी मात्र ते कडवट होत जाते आणि त्यांचाच बळी घेऊन शांत होते. पडद्यावर द एन्डची अक्षरे प्रेक्षकांच्या मनात मात्र जर-तरची वादळे उमटवतात. अधुरा शेवट असा अस्वस्थ करून जातो.

कादंबरीची भूमिका कोंकणा सेन हिने अप्रतिम रंगवली आहे. परंब्रता चॅटर्जी (रवींद्रनाथ), टिटास भौमिक (ज्ञानदानंदिनी) यांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. मात्र चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू आहे ते याचे संगीत. पार्श्वभूमीला ऐकू येणारा प्रत्येक सूर, गीतसुद्धा चित्रपटाच्या कथेला
उठाव देते.
 
अजिबात चुकवू नये असा अनुभव आहे हा चित्रपट.