लॉकडाउनमधल्या माणुसकीच्या गोष्टी

विवेक मराठी    05-Apr-2020
Total Views |

माणसाच्या मनात श्रद्धा असेल, डोळ्यात स्वप्ने असतील, स्वीकारलेले काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची सचोटी त्यांच्याकडे असेल आणि या सगळ्याच्या मुळाशी निरपेक्ष समाजसेवेची ऊर्मी असेल, तर आपण चमत्कार घडवू शकतो.. असाच एक चमत्कार 'लॉकडाउन'मध्ये घडला आहे. संकटकाळात सापडलेल्या बांधवांसाठी स्वयंसेवी संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी आणि माणुसकीने हात पुढे केला आहे. हे माणुसकीचे दर्शन गरजूंना साहाय्यभूत ठरत आहे. 'साप्ताहिक विवेक'च्या राज्यभरातील जिल्हा प्रतिनिधींशी संवाद साधून घेतलेला हा आढावा...
 

Coronavirus in India: Luc 

२०२०चे साल नवीन आपत्ती घेऊन येईल, असे कोणालाही वाटले नसेल. 'कोरोना' या महाभयंकर रोगामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. लाखांहून अधिक लोक या प्रादुर्भावात अडकले आहेत. हजारो लोकांचा जीव गेला आहे. संपूर्ण जगाचे आर्थिक नुकसान झाले आहे. आपल्या राज्याला आणि देशालाही याचा फटका बसला आहे. पानोपानी त्याच्या बातम्या येत आहेत. वृत्तवाहिन्या अहर्निश त्याचे चित्रण करत आहेत. यातून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे.. ज्या माणुसकीचा आपल्याला विसर पडत होता, त्या माणुसकीची ओळख निसर्गाने पुन्हा पटवून दिली. प्रत्येक जण नेहमी स्वतःला न्याय मिळावा म्हणून अप्रत्यक्षरीत्या स्वतःशी आणि प्रत्यक्षरीत्या समाजाशी लढत असतो. मात्र 'लॉकडाउन'च्या काळात प्रत्येक नागरिक संकटात सापडलेल्या दुसऱ्या नागरिकाला मदतीचा हात देतोय. ना इथे कोणी एका जातीचा आहे, ना कोणी पंथाचा.. प्रत्येक जीव दुसऱ्या जिवाची काळजी घेताना दिसतोय. ही लढाई लढताना अप्रत्यक्षरीत्या प्रत्येकाला माणुसकीचे दर्शन झाले आहे. माणुसकीचा महापूर राज्यात ओसंडून वाहताना दिसतोय. माणुसकीची या भावुक गाथा सांगली-कोल्हापूरच्या पुरात जशा पाहिल्या, तशाच कथा आता पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. या संकटकाळात कोणी अन्नधान्याचे वाटप करतोय, कोणी रक्तदान करतोय, तर कोणी स्थलांतरांसाठी निवारा देतोय.. चोवीस तास समाजाचे रक्षण करणारे पोलीस दलाचे कर्मचारी आणि अधिकारी स्वखर्चाने पराधीन कुटुंबांना जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडवत आहेत, ही गोष्ट लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली आहे. माणसांच्या वेषातले असे कैक अनाम देवदूत लॉकडाउनच्या काळात सेवा करताना दिसताहेत.

रा.स्व. संघ आला धावून...

कोरोनाचे संकट वाढल्याने देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. या काळात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. यामुळे अनेक जण घरापासून दूर अडकून पडले आहेत. अशा अडकून पडलेल्या लोकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून आला आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हजारो प्रशिक्षित स्वयंसेवक व कार्यकर्ते सेवा कार्यात मग्न आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रांतांत बेघर, भटके विमुक्त जाती-जमाती, जनजाती, स्थलांतरित, असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगार अशांच्या भोजनाची व्यवस्था करणे, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत जेवणाचे डबे, औषढे पुरविणे, गरजू कुटुंबांना शिधावाटप या व अशा विविध गोंष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुणे महानगरातील ५४० वस्त्यांमधील ३९४ आपातकालीन मदत केंद्रांच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. आपदा केंद्रांमधून संघाचे सुमारे दोन हजारांहून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पुणे ग्रामीण भागात संघासह अनेक स्वयंसेवी संस्थांचे मदतकार्य सुरू आहे.

सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी, संभाजीनगर, धाराशिव, लातूर, बीड, नाशिक, धुळे, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गडचिरोली, नागपूर यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांत जनकल्याण समितीसह अनेक सेवाभावी संस्था लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत.

साडेसात हजार लोकांना निवारा

कोरोनामुळे एकीकडे सर्व जण शहराला दूर करून आपल्या गावाला जवळ करण्यासाठी आटापिटा करताना दिसताहेत, असंख्य लोक पायी चालत गावाचा रस्ता जवळ करत आहेत. लॉकडाउन केल्यामुळे लोकांना शहराच्या सीमेवर अडविण्यात येत आहे. सध्या सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची सोय मिळत नाही. परंतु, या सर्वात काही गोष्टी चांगल्या घडतानाही दिसत आहेत. लोकांमधली माणुसकी यामुळे समोर येत आहे

पालघर जिल्ह्यात ४,२०० लोकांना, तर सांगली जिल्ह्यात ३,३१९ लोकांना निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संदर्भात आमचे पालघरचे जिल्हा प्रतिनिधी हर्षल भन्साळी सांगतात, "पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील हजारो कामगारांना आपल्या घरी जाता आले नाही. अशा ४,२०० कामगार-नागरिकांना प्रशासनाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील ठक्करबाप्पा विद्यालयासह विविध तीन ठिकाणी निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्वांना निवास, भोजन आणि वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे."
 

Coronavirus in India: Luc 

सांगलीचे आमचे जिल्हा प्रतिनिधी सुहास कुलकर्णी सांगतात, "प्रशासनाच्या वतीने सांगली जिल्ह्यात एकूण ३० निवारा केंद्रांमधून ३,३१९ व्यक्तींची सोय करण्यात आली आहे. तसेच १९ एनजीओंची निवारा केंद्रात खाद्यपदार्थ वितरणासाठी मदत होत आहे. निवारा केंद्रामध्ये आसरा देण्यात आलेल्या लोकांमध्ये हॉटेल कामगार, रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक असून या सर्वांना जेवण, औषधे त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविल्या जात आहेत. वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. निवारा केंद्रात भरती करताना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे."

सांगली शहरातील मालू हायस्कूल येथील निवारा केंद्रात असणारे अहमदनगर जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पोहेगाव येथील संतोष मोहन भालेराव हे गोव्यात कामाला होते. कोरोनामुळे ते घरी चालले होते. वाटेत त्यांना पोलिसांनी अडविले, त्यामुळे ते आपल्या गावी जाऊ शकले नाहीत. प्रशासनाने राहण्याची व जेवणाची सोय केल्यामुळे त्यांना कसलीच अडचण भासत नसल्याबद्दल भालेराव यांनी समाधान व्यक्त केले.

५ हजार लोकांना भोजन

राज्याच्या सर्वंच भागात मदतीचा ओघ सुरू आहे. पनवेल येथे जनकल्याण समिती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती व इतर सेवा संस्थांच्या मदतीने पनवेल, कळंबोली, उरण, कर्जत आदी भागात अडकलेल्या ५ हजारांहून जास्त लोकांना दररोज जेवण देण्यात येत असल्याचे आमचे प्रतिनिधी गुरुराज कुलकर्णी यांनी सांगितले.

सोलापूर शहरात संघाच्या वतीने तीन हजार गरजूंना शिधावाटप करण्यात आले आहे, तर पंढरपूर शहरातील वेदांत भक्तिनिवासमध्ये राहत असलेल्या तामिळनाडूमधील १०२ युवकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अहमदनगर शहरातील सेवा वस्तीमध्ये धान्य, डाळ वाटप करण्यात आले, तर बीड जिल्ह्यातील माजलगाव, अकोला शहर आणि ग्रामीण, बुलढाणा भागात सेवा कार्य सुरू आहे. उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेवरही सध्या कर्नाटक, आंध्र-तेलंगणाच्या शेकडो नागरिकांना आसरा देण्यात आला आहे. यासाठी दानशूर व्यक्ती, स्थानिक स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. मनमाड येथील वाणी समाजाच्या वतीने मनमाड रेल्वे स्टेशनवर १०० गरजूंना जेवण देण्यात येत आहे. निगडी (पिंपरी चिंचवड) येथे बाहेरील राज्यातील ट्रक ड्रायव्हर व क्लिनर अडकले आहेत, अशा ७० व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था उन्नीकृष्णन या संघ कार्यकर्त्याने केली आहे. जालना जिल्ह्यात जनकल्याण समिती व अन्य संस्थेच्या मदतीने सिंदखेडराजा येथे निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. वसई भागातही गरजूंना गहू, तांदूळ, डाळ, तेल इत्यादीचे वाटप करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील हेडगेवार सेवा समिती व एकल विद्यालयाच्या वतीने गरजूंना मदतीचा हात दिला.


corona_1  H x W 

'लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन'तर्फे मदतीचा हात

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या, सांगली येथील टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनने कोरोनाच्या संकटातही लोकांना मदतीचा हात दिला आहे. टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन, रॉबिन हूड आर्मी, तरंग बहुउद्देशीय संस्था, तसेच डॉ. वैभव माने आणि फिजिशियन ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने गरिबांना आणि ज्यांचे हातावरचे पोट आहे अशांच्या कुटुंबीयांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. आपल्या गावी जाऊ न शकणाऱ्या चारशे व्यक्तींना जेवण देण्यात येत आहे. या सेवेसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या पोलिसांच्या व शासकीय कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. जनकल्याण समितीच्या वतीने सांगली शहरातील बेघर लोकांना जेवण आणि रोजंदारीवरील लोकांना शिधा देण्यात आला आहे. तर ह्युमन राईट संस्थेच्या वतीने रुग्णाच्या नातेवाइकांना अन्नदान करण्यात आले आहे. कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सेवा कार्य सुरू आहे.

नाशिक येथे ट्रक चालकांची आणि मदतनीसांची गैरसोय होऊ नये यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. आडगाव ट्रक टर्मिनल आणि विल्होळी ट्रक टर्मिनल, पुणे ट्रक टर्मिनल येथे अडकलेल्यांना समितीच्या वतीने जेवणाचे डबे पुरविण्यात येत आहेत. मनमाड येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि गुरुद्वारा गुपतसर प्रबंधक यांच्या संयुक्त विद्यमाने औषधांची व लंगरची सोय करण्यात आली आहे. खामगाव येथे सेवा संघ भारतीच्या वतीने गरजूंना अत्यावश्यक वस्तूंच्या संचांचे वितरण करण्यात आले आहे. वैजापूर येथे बाहेरून आलेल्या ९०० नागरिकांसाठी सचिन काथवटे, दीपाली सोनवणे, मनीष शर्मा, दीपचंद पारिक यांनी अन्नदान केले. परतूर तालुक्यातील केसरीया सामाजिक संस्था, तुळजापूर तालुक्यातील केशव वाचनालय अणदूर व विवेकचे जिल्हा प्रतिनिधी साहेबराव घुगे यांच्या वतीने निराधारांना अन्नदान, जनजागृती मोहीम, मास्क-सँनिटायझरचे वाटप असे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

चलो, जलाए दीप वहाँ..

कोरोनाच्या संकटामुळे जनजातींच्या पाड्यावरचे कुटुंबांचे व वंचित समाजबांधवांचे हाल होऊ नयेत, म्हणून रा.स्व. संघाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. पालघर, वसई, रायगड भागातील जनजातींच्या पाड्यावर अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे.

माण तालुक्यातील म्हसवड येथे विविध ठिकाणी पाले बांधून राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. वैदू, नंदीवाले समाजातील अशा ७० कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले आहे. रा.स्व. संघ माण तालुका व जनकल्याण समिती सातारा जिल्ह्यामार्फत ही मदत देण्यात आली आहे. वाई येथे सेवा संस्थेच्या वतीने कातकरी बांधवांना प्रत्येक कुटुंबास ५ किलो तांदूळ, २ किलो डाळ, २०० ग्रॅम तिखट असा शिधा देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील वाघळी येथे झोपडी टाकून राहिलेल्या नागरिकांना शिधावाटप करण्यात आले आहे. तसेच जळगाव शहरातील बळीराम पेठ वस्तीतील नागरिकांना सामाजिक अंतर राखण्यासाठी (सोशल डिस्टन्सिंग) वर्तुळ तयार करून देण्यात आले आहे.

रक्तदान श्रेष्ठ दान

या संकटकाळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदानासाठी माणसेच पुढे येत नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्त जमा होत नाही. त्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. हा रक्त-तुटवडा भरून काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला आहे. संघ आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पुणे विभागात मोठी रक्तसंकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार जून २०२०पर्यंत सुमारे आठ हजार रक्तपिशव्या संकलित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान अकराशेहून अधिक रक्तपिशव्या संकलित झाल्या आहेत.

राज्यभरात सोलापूर, जळगाव, नागपूर, नगर, संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे सेवा संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५२ जणांनी, तर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे २५०हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. पाटण तालुक्यातील गुढे गावातील युवा कार्यकर्त्यांच्या व रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या सहभागातून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदानात दोन महिला रक्तदात्या सहभागी होत्या.

गडचिरोली येथे जिल्हा पोलीस मुख्यालयात ६७ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्याला हातभार लावला आहे.

वैद्यकीय सेवेतही पुढाकार

समाजाच्या आरोग्याच्या हितासाठी आवश्यक अशा संपूर्ण लॉकडाउनच्या काळातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वैद्यकीय आघाडीवरदेखील पुढाकार घेतला आहे. कोरोनाबाबत समुपदेशन करणे, मास्क वापरण्यास प्रोत्साहन देणे, सोशल डिस्टन्सिंगबद्दल जनजागृती करणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत.

नागपूर शहरातील ३८० झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना उपाशी राहावे लागू नये याची काळजी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गरजूंना मदत पोहोचवत असताना स्वयंसेवकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले होते. नागपूरसह विभागातील सर्व जिल्ह्यात सगळीकडेच ही बाब कटाक्षाने पाळली जात आहे. कोरोनासंदर्भात जनजागृतीसाठी विशेष वैद्यकीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाने आणि लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाने याबाबत सजगता दाखविली आहे. आपत्तिकाळाशी सामना करण्यासाठी डॉक्टरांची टीम सज्ज आहे.

ग्रामीण भागातील लोकांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा, यासाठी कराड येथील राष्ट्र संवर्धन संस्थेतर्फे 'डॉक्टर्स हेल्पलाइन' सुरू करण्यात आली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६पर्यंत ही हेल्पलाइन सुरू असेल. डॉ. प्रकाश सप्रे (9657719841), डॉ. निखिल आगवेकर (9423830195), डॉ. कृष्णात शिंदे (7045600007), डॉ. मकरंद बर्वे (9403783105), डॉ. दीपक माने (8308181230), डॉ. सुजित भालेकर (7875082087), डॉ. एस.आर. पाटील (9423272689) आणि डॉ. संभाजी फडतरे (8600920751) यांचा यात सहभाग आहे. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता गृहीत धरून स्थानिक प्रशासनाने काही स्वयंसेवक मदतीला मिळतील का, अशी विचारणा केली होती. त्याला लगेच प्रतिसाद देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ४८-५० स्वयंसेवकांची तुकडी तयार केली आहे. ही तुकडी दोन गटांत विभागून २८ मार्चपासून रुजू झाली आहे.
जळगाव ग्रामीण भागातील शिरसोली (प्र..) व शिरसोली (प्र.बो.) गावांत कम्युनिटी क्लिनिक उभारण्यात आले आहे. येथे दररोज ८० ते १०० रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. या कामासाठी डॉक्टर विनामूल्य सेवा देत आहेत.

नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथे आरंभ सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य जागृती करण्यात येत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग’ (चौकटी) तयार करून दिल्या आहेत.

बळीराजाचा दानशूरपणा

संकटाच्या काळात महाराष्ट्र एकजुटीने उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. काही शेतकरी बांधवही मदतीला धावले आहेत. तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील विकास रामलिंग पठाडे या शेतकऱ्याने आपली एक दोन एकर केळीची बाग गरजू आणि स्थलांतरित लोकांसाठी दान केली आहे. केळीच्या उत्पादनातून किमान दोन अडीच लाख रुपये मिळत असताना या सर्वावर पाणी सोडून या शेतकऱ्याचा दानशूरपणा आजच्या घडीला प्रेरित करणारा आहे. संकटकाळातही शेतकरीही मदतीसाठी पुढे येत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या शेतकऱ्याचे अभिनंदन केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील गावडी दारफळ येथील शेतकरी उत्तम मेहता यांनी आपल्या एक एकर पेरूची बाग गरजूंसाठी दान केली आहे. एक एकरात ५०० किलो पेरू निघाले होते. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाटसरूंना हे पेरू वाटले.

एकीकडे कोरोनामुळे काही दलाल शेतकऱ्यांचा फायदा घेत असताना, दुसरीकडे असे शेतकरी आपल्या घामातून पिकवलेला माल संकटकाळात गरजूंना दान करून खऱ्या अर्थाने अन्नदाता ठरले आहेत.
 

Coronavirus in India: Luc
आपत्तिकाळात गरजूंच्या मदतीसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. आलेल्या संकटाशी नागरिक आपआपल्या परीने सामना करीत आहेत. अनेक लोकांकडून, संस्थांकडून मदत दिली जात आहे. अनेक हात मदतीसाठी जात-धर्म विसरून पुढे आले आहेत. कोरोनाच्या संकटाने सगळ्यांना माणूस बनवले आहे. त्यामुळे आजच्या इंटरनेटच्या जगात माणुसकी जिवंत आहे, असेच म्हणावे लागेल.