सदर - चित्रलिपी दर्जेदार चित्रपटाची भाषा ही देश-प्रांत-धर्म या सीमा जाणत नाही. मग भले त्या चित्रपटातील माणसं कोणत्याही भाषेत का बोलत असेनात, त्यापलिकडे जगभरातल्या माणसांना जोडणा-या भाषेचा अंतःप्रवाह या चित्रपटांमधून वाहत असतो. म्हणूनच त्याचा आशय मनबुद्धीला स्पर्श करतो, विचार करायला भाग पाडतो. ज्याला मायावी जग असं म्हटलं जातं, त्या माध्यमाचं हे सामर्थ्य आहे. माणसांना विचारप्रवण करण्याचं, कृतीप्रवण करण्याचं, संवेदनशीलतेला खतपाणी घालण्याचं, माणसाच्या जगातल्या चिरंतन मानवी मूल्यांना चित्रलिपीतून समोर मांडण्याचं. अशा काही दर्जेदार चित्रपटांची ओळख आपण प्रिया प्रभुदेसाई यांच्या नव्या सदरातून करून घेणार आहोत... या सदराचं नाव आहे,चित्रलिपी दर्जेदार कलाकृती चोखंदळ वाचकांसमोर उलगडून दाखवणं हा हेतू असल्याने चित्रपट निवडीला ना विषयाचं बंधन असेल ना देशप्रांताचं...जगभर कोरोनाने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर या सदरातील पहिला लेख आहे, काँटॅजिअन या चित्रपटाची ओळख करून देणारा....
भीतीचे अनेक पदर असतात. हा थँक्सगिव्हिंगचा महिना. आता सुट्ट्या सुरू होणार. सणाचे दिवस म्हणून लोकांची गर्दी होणार. याचा फायदा घेण्यासाठी जैविक शस्त्र म्हणून केलेला हा विषाणूंचा हल्ला असेल का, ही शंका पोलिसांच्या मनात येते. येथील डॉ. एलिस चीवर, साथीच्या रोगांची तज्ज्ञ डॉ. एरिन मेअर्सला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मिनिआपोलिस येथे पाठवतात. ह्या साथीचा सुरुवातीचा बिंदू शोधणे आवश्यक असते. स्टीव्हन सॉडरबर्ग दिग्दर्शित 'काँटॅजिअन' हा चित्रपट ज्या वेळी प्रदर्शित झाला, तेव्हा तरी ही केवळ कल्पना होती. तरीही हा अतिशय वास्तववादी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या आधी आलेली सार्सची साथ, मलेशियात निपाह विषाणूमुळे घडलेला उत्पात ह्याच्या आधाराने ह्या चित्रपटाची संहिता लिहिली गेली. मानवाच्या इतिहासात जीवाणू, विषाणू आणि परजीवी जंतूंनी जेवढे बळी घेतले आहेत, तेवढा सर्वनाश महायुद्धानेसुद्धा केला नाही. चौदाव्या शतकातील प्लेगने वीस कोटी लोकांचा बळी घेतला. देवीच्या साथीने १७९६पासून लस असूनही फक्त विसाव्या शतकात तीस कोटी संपवले. जीवाणू किंवा विषाणू एवढ्या मोठ्या प्रमाणावर संहार घडवून आणतात, कारण ते प्राणी, वनस्पती, सजिवांसह जवळपास सर्वाना संसर्ग करू शकतात. धरणीकंप म्हणा किंवा ज्वालामुखी जरी प्रचंड संहार घडवून आणतात, तरीही त्यांना जागेची मर्यादा असते. विषाणूचा वेगाने प्रसार होतो, कारण खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे हवेतून एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला याची लागण होऊ शकते आणि त्यावर नियंत्रण करणे त्रासाचे होते. अगदी साध्या हात मिळवण्यापासून ते शारीरिक संबंधांमधून हा प्रसार झपाट्याने होतो आणि ते चक्र थांबवणे म्हणून कठीण असते. या अशा साथीचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात. डॉ. मेअर्सला लागण होऊन तिचा मृत्यू होतो. दुर्दैव असे की जी व्यक्ती आपले प्राण पणाला लावून या साथीचे मूळ शोधत असते, तिच्यासाठीसुद्धा हॉस्पिटलमध्ये जागा उरत नाही. यातून हे एखाद्या राष्ट्राने मुद्दाम घडवलेले षडयंत्र असावे की काय, या गोष्टींना उधाण येते. काही लोक स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी भीतीचा उपयोग करतात. होमिओपॅथीच्या औषधाने बरे झाल्याच्या अफवा पसरवतात. त्या औषधाचा साठा संपतो. विषाणूचा प्रचार एवढ्या वेगात होतो की वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडतात. शहरे बंद होतात. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडते. दुकाने लुटली जातात. दंगली सुरू होतात. विषाणू हा या चित्रपटाचा खलनायक. त्याबरोबर बदलली जाणारी मूल्ये, ढासळणारे समाजजीवन याचे दर्शन या चित्रपटात होते. जेव्हा सर्व सुरळीत चालू असते, तेव्हा शिस्त असते, माणुसकी असते, कर्तव्याची जाणीव असते. मृत्यूच्या सावलीत मात्र माणसाचा मुखवटा गळून पडतो. कर्तव्य का प्रेम या प्रश्न कठीण. भीतीच्या दडपणाखाली माणसे कोसळतात. अराजक माजते. साधनांची मर्यादा लक्षात आली की जगण्याच्या शर्यतीत दुसऱ्यांवर पाय देऊन उभे राहणे हा जगण्याचा मूलमंत्र बनतो. केवळ विषाणूच संसर्गजन्य नसतो, तर समाजात धुमसत असणारा असंतोष, योग्य माहितीचा अभाव, समाजकंटकांनी स्वतःचा फायदा करण्यासाठी पसरवलेल्या अफवा आणि सोशल मीडियामुळे चुकीच्या माहितीचा झपाट्याने होणारा प्रसार हासुद्धा अतिशय संसर्गजन्य असतो आणि नाशाला कारणीभूत ठरतो. झाडे तोडताना त्यावरील वटवाघळांचे विस्थापन होते. ती आपली जागा सोडून जातात आणि बरोबर हा विषाणू माणसांच्या जगात आणतात. बेसुमार झाडेतोड आणि प्राण्यांच्या जंगलावर कब्जा याचे अनेक वाईट परिणाम कसे होऊ शकतात, हे हा चित्रपट दाखवतो. तंत्रज्ञानाने केवळ माणसाचाच प्रवास वेगवान झाला असे नाही, तर अशा जीवाणूंना आणि विषाणूंनासुद्धा तुम्ही जग उघडे केले आहे, याचीही जाणीव हा चित्रपट करून देतो. चित्रपटात अनेक जागा अशा आहेत, जिथे सामान्य माणसाची कसोटी लागली आहे. लस लवकर येणे अतिशय आवश्यक असल्याने, आरोग्य खात्याची नियमावली तोडून डॉ. हेक्सटॉल स्वतःच्या शरीरावर लशीचा प्रयोग करते. लॉकडाउन जाहीर होण्याअगोदर डॉ. चीवर आपल्या प्रेयसीला शहर सोडून जाण्याची सूचना देतात. त्या अपराधासाठी डिपार्टमेंटच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार होतात, पण स्वतःला मिळालेल्या लशीचा उपयोग मात्र ते एका सामान्य सफाई कामगाराच्या मुलासाठी करतात. डॉ. मेअर्स मरणाच्या दारात असतानासुद्धा आपल्या अंगावरील कोट, थंडीने कुडकुडणाऱ्या दुसऱ्या रुग्णाला देते. डॉ. ओरंट्स हिला लस मिळवण्यासाठी ओलीस ठेवलेले असते. तिची सुटका केली जाते, पण त्या बदल्यात दिलेली औषधे खोटी आणि निरुपयोगी आहेत हे समजल्यावर ती स्वतः त्यांच्याकडे परत जाते. चांगल्याबरोबर वाईट प्रवृत्तीसुद्धा समाजात असतात. दुकाने बंद करण्याचा हुकूम असताना थँक्सगिव्हिंगनंतरच दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. डॉ. मेअर्सला वाचण्याऐवजी एका राजकीय नेत्याला नेण्यासाठी विमानाचा उपयोग करतात. लॉटरी काढून लशीचे वाटप केले जाते. अर्थात तोपर्यंत मृतांचा आकडा जगभरात २ कोटी ६० लाख एवढा वाढलेला असतो. नऊ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट आताच्या परिस्थितीचे चित्रण करतो असे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन, या परिस्थितीत आपण कसे वागायला हवे याचे मार्गदर्शन करतो. माणसाच्या मूलभूत चांगल्या प्रवृत्तीचे दर्शन या चित्रपटात पदोपदी होते. माणसे एका घरात जबरदस्तीने का होईना अडकल्यामुळे, एकत्र येतात, एकत्र झुंजतात. समान ध्येयासाठी परस्परांना सहकार्य करतात. एकमेकांवर असलेले प्रेम, आदर आणि समाजातील आपल्याहून कमी सुदैवी असलेल्या लोकांप्रति सहानुभूतीची भावना या संकटातून तरून जायला हात देते. हा विषाणू माणसांच्या शरीरांना एकमेकांपासून दूर ठेवत जरी असला, तरी मनाने जवळ आणतो. चित्रपटातील गाणी, कथा, संवाद हे केवळ करमणुकीसाठी नसतात. त्यांचा पाया मानवी भावना, मूल्ये, आदर्श यांनी पक्का केलेला असतो. भावनेला भाषेचे, अंतराचे आणि संस्कृतीचेसुद्धा बंधन नसते. अशा भावभावनांनी नटलेल्या काही चित्रपटांची ओळख या सदरात करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. |