देणे कृतज्ञतेचे

विवेक मराठी    19-Apr-2020
Total Views |


आपला समाज आपल्याला अनेक गोष्टी देत असतो. अनेक गोष्टी शिकवत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अविरतपणे काम करणारे असंख्य संघ स्वयंसवेक एक प्रकारे समाजॠणच फेडत असतात. अशांपैकी एक नाव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील भारतमाता मंदिर प्रकल्पाचे पूर्णवेळ कार्यकर्ते शंकर खंडेराव जाधव होय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून लहान-थोर सर्वांनाच मास्क वापरणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर, शंकर जाधव दररोज ५० ते ६० मास्क्स तयार करून त्याचे गरजूंना मोफत वाटप करताहेत. याचबरोबर धान्यसंकलन करून ते धान्य गरजूंना पोहोचवत आहेत.


mask making to indian peo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या लोहारा गावातील भारत माता मंदिर प्रकल्पातील पूर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. त्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक :
https://www.facebook.com/VivekSaptahik/
शंकर जाधव हे मूळचे रेणापूर तालुक्यातील सांगवी गावचे. त्यांनी कला शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. शालेय वयातच ते संघशाखेशी जोडले गेले. शाखा - मुख्य शिक्षक, कार्यवाह आणि तालुका शारीरिक प्रमुख म्हणून आजवर त्यांनी दायित्व सांभाळले आहे. तसेच त्यांनी २००३ ते २०११ या कालावधीत पालमपूर्णा (परभणी), धुळे, नंदुरबार, जालना येथे प्रचारक म्हणून काम पाहिले आहे.

शंकर यांच्या नंदुरबार जिल्ह्यातील कामाचे वैशिष्ट्य म्हणजे, नंदुरबारच्या वनवासी भागात धर्मांतर मोठ्या प्रमाणात चालत होते. हे रोखण्यासाठी शंकर यांनी धर्मजागृतीच्या माध्यमातून सतत तीन वर्षे वनवासी पाड्यांवर जाऊन लोकांचे प्रबोधन केले. त्याचबरोबर प्रत्येक पाड्यावर रामरथ कार्यक्रम हाती घेऊन असंख्य वनवासी बांधवांची घरवापसी केली.

त्यानंतर २०११ ते २०१४ या काळात लातूर येथील मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली. २०१४पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत आहेत. सध्या ते लोहारा येथील भारत माता मंदिर प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत आहेत. या वास्तूतच ते सहकुटुंब राहतात.


mask making to indian peo

या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरात धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन होत असते. या कामात स्थानिक गावकऱ्यांना आणि तरुणांनाही सहभागी करून घेऊन शंकर जाधव त्यांना विविध कामांसाठी प्रोत्साहन देत असतात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक :
https://www.facebook.com/VivekSaptahik/


पाचशे मास्क्सचे वाटप

'कोरोना' या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जण आपल्याला परीने धडपड करीत आहे. ज्यांच्याकडे अजूनही मास्क नाही, अशा गरजूंसाठी शंकर यांनी प्रथम स्वतःच्या खर्चाने आणि नंतर कार्यकर्त्यांच्या मदतीने घरीच कापडी मास्क्स शिवले आहेत. सध्या ते दररोज ५० ते ६० मास्क्स शिवतात. आतापर्यंत त्यांनी पाचशे मास्क्स तयार करून गरजूंना दिले आहेत. गेल्या दहा बारा दिवसांपासून ते या निःस्वार्थी कामात गढून गेले आहेत.

याविषयी बोलताना ते म्हणाले, "लोहारा हे तसे तालुक्याचे ठिकाण आहे, पण तसे हे शहर म्हणजे मोठे गाव समजले जाते. 'कोरोना'मुळे ग्रामीण जनता भयभीत झाली आहे. या संकटकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. आरोग्य संदर्भात जनजागृतीही करण्यात येत आहे. प्रत्येकाने आपल्याला परीने आरोग्याची काळजी घेतली, तरच 'कोरोना'तून आपण मुक्त होऊ, हे त्यांना समजावून सांगण्यात येत आहे. त्यातूनच मास्क लावण्याची गरज लोकांना पटली आहे. या मास्कचा सध्या जाणवणारा तुटवडा लक्षात घेऊन मी स्वतः घरीच कापडी मास्क शिवून ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले."

पत्नी-मुलाची साथ

शंकर जाधव सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत लोहारा आणि आसपासच्या खेड्यात जाऊन धान्यसंकलनाचे काम करतात. त्यानंतर घरी आल्यानंतर रात्री सात-आठ वाजेपर्यंत घरातल्या शिलाई मशीनवर मास्क शिवत बसतात. या कामात त्यांना पत्नी सुलक्षणा व मुलगा मंथन यांचीही सक्रिय साथ आहे. सुलक्षणा या लोहारा तालुक्यात राष्ट्र सेविका समितीसाठी आणि पालावरच्या शाळेसाठी काम करतात. "सध्याच्या या संकटकाळात पती शंकर करत असलेले काम, त्यांची मेहनत पाहून या कामात खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही दोघे त्यांना साथ देत आहोत" असे सुलक्षणा शंकर जाधव यांनी सांगितले.

२५ क्विंटल धान्यांचे वाटप

कोरोना लाॉकडाउनमुळे सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. याचा विशेष परिणाम ग्रामीण वर्गावर होत आहे. ग्रामीण भागातील उपेक्षित व वंचित घटकांना 'कोरोना'चा फटका बसू नये, म्हणून शंकर जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून धान्यसंकलनाचे काम हाती घेतले आहे.

लोहारा तालुक्यातील माळेगाव, उंडरगाव, कास्ती बु आणि नागूर आदी गावातील ५५० घरांतून गहू, तांदूळ, ज्वारी, डाळ, कांदे अशा स्वरूपात २५ क्विंटल धान्य संकलित करून गरजूंना त्याचे वाटप करण्यात आले आहे.

mask making to indian peo


उस्मानाबाद जिल्हा ग्रामविकास समितीचे जिल्हा संयोजक जयंत पाटील यांनी जाधव यांच्या कामाची आणि संघकार्याची प्रशंसा केली आहे.

९९७०४५२७६७